Friday, April 18, 2014

इलियास

असं म्हणतात सरकारी कार्यालयात जास्त काही मिळत नाही .मिळालं तर रिकाम्या खुर्च्या किंवा बफाम सुदर्शनी पंखे किंवा फायलींचे गठ्ठे किंवा तुमच्या-अामच्यासारख्या अडलेल्या लोकांकडुन सहज गप्पांमधुन कालची मॅच हरल्याचे विच्छेदन किंवा ८ रू. चहा अाणि अगदीच एखादा 'कामाचा' माणुस सापडलाच (इथे कामाचा ह्या शब्दाचं महत्व अनन्यसाधारण अाहे ) तर पुढची तारीख. पण मला एकदा जिवंत अनुभव भेटला. म्हणजे अगदी गेल्या वर्षी शोले परत ३D मधे रिलिज केला होता तेव्हा माऊथ अॉर्गन ऎकत ऎकत जया भादुरी कसा एक एक कंदिल मालवते ? हे मोठ्या पडद्यावर पहाणं जिवंत अनुभव असतो किंवा चार-पाच वर्षापुर्वी मुगले अाझम अाला होता रंगीत तो तर पहिल्या सेकंदा पासुन अनुभव होता. तर हे असे जिवंत अनुभव फक्त 'अाठवण' ह्या प्रकारात मोडतात.म्हणजे ते अाठवलं की एक वातावरण अपोअाप तयार होउन जातं तसंच.
मला इलियास चच्चा भेटला. इलियास चच्चा. एका तालुक्याच्या ठिकाणी कुठल्याशा कागदपत्रासाठी गेलो तेव्हा एका बाकड्यावर पाठ टेकवुन बिडीचा सैल झालेला धागा घट्ट करत बसला होता. थोडी विचारपूस , इकडंच-तिकडंच झाल्यावर कळालं इलियास चच्चा तिथेच चपरासी म्हणुन कामाला होता. पण मग सरकारी कामं कशी बेजबाबदार अाहे ,कसे लोक पैसे खातात ,अमुक एक अधिकारीच फक्त कसा प्रामाणिक अाहे ह्या पढडीतल्या गप्पा न मारता अामचा वेगळाच प्रवास सुरू झाला. तो दिवस इलियासचा शेवटचा दिवस होता.मग तो निवृत्त होणार होता. 
इलियास चच्चा.साधीशी खाकी विजार , अातुन कोपरी अाणि बाहेरुन गर्मी मुळे अर्धा उघडा केलेला खाकी शर्ट. दाढी वैगेरे नावाला तुरळक. पायातल्या बुटाचा सोल चच्चाचं वय , अनुभव अाणि केसातल्या चांदीचं कारण सांगत होता. मला बघुन म्हणाला , " काय काम अाहे ? साहेब येतीलच बसा,विझीट ला गेलेय". इतकी अदब मी फक्त खाजगी कंपनीत पाहिली होती.मग जरा वेळाने म्हणाला , ' बेटा तुझ्या इतका एक नातु अाहे मला. म्हणजे तसे सगळे मोजले तर सगळ्या बेट्या-बेटींचे मिळुन १८ नातवंड अाहेत. रोज घरी गेलो की ' क्या लाया क्या लाया ?' चालु होतं .मग वाटतं की अल्लाह ने हफ्ता ७ दिन का क्युं बनाया अठ्ठाराह दिन का बना देता तो क्या जाता ? सब खुश होते क्युं ! " मी हसलो अाणि विचारलं कि किती दिवस झाले अाता कामावर अाहात तर म्हणाले " अब तो याद भी नही की पहले दिन कैसा लग रहा था. अाब्बा थे यहा वो गुजर गए तो त्यांचा बुट मी घालुन घेतला अाणि झालो रुजू. तिसरी पिढी अाहे अामची... तिसरी. मला अाधी वाटलंच नव्हतं की मला काम जमेल . मी अापला मटरगश्ती करणारा पोरगा. पण दंगलीत घर गेलं अाणि अम्मी-अब्बाला एकदा रडतांना पाहुन ठरवलं  की काही झालं तरी ये अांसु शेवटचे परत नाही येऊ द्यायचे. विश्वास ठेवला अाणि विश्वास ठेवणं म्हणजे काय जिना दिसत नसला तरी पहिल्या पायरी वरुन दुस-या पाय पुढे टाकणे .पुर्ण विश्वासाने. 
अंग्रेजोंके जमाने से दादा के परदादा थे चपरासी. तेव्हा असं असायचं की तहसीलदार साहेबांच्या पाच मिनीटं अाधी चालायला लागायचं. माझे परदादा दिसले की सगळे लोक रस्ता सोडायचे अाणि वाट करुन द्यायचे कारण त्यांना माहित असायचं मागुन तहसीलसाहेब येताय. " लोक वाट करुन द्यायचे म्हणतांना इलियासचा चेह-यावर उगाच अभिमानाची झलक दिसली. तितका मान अाता नाही ही खंत ही त्यात कुठेतरी असावी. 
मग म्हणाला , "पण चांगलं अाहे लोक अोळख ठेवतात. एखादा गरिब अाला की अाम्ही अामच्या परीने मदत करुन देतो.तितकंच पुण्य गाठीशी .मग पाणी प्यायला उठतांना गुढघ्यावर एका हाताने जोत देत उठतांना पुटपुटला "विठ्ठला !!!! " इलियास चच्चा अाणि "विठ्ठला !!!! " काय अजब रसायन असावं नाही !
मग परत येऊन बसता बसत म्हणाला ," हे अाताचे तहसील साहेब माझे ४९ वे साहेब अाहे. सब अच्छे ही थे. ये वाले ज्यादा अच्छे है इमानदार है. पगार लेट झाला की खिशातले देतात काढुन.खिशातुन भरलेला हात बाहेर येत नाही इथे सहसा. अाणि अाठवणीने विचारपुस करतात घरची . "
मग म्हणाला " अाज मेरा शेवटचा दिवस अाहे इथला. मग अाहेच ते १८ अाणि मी. दिनभर मस्ती" मी विचारलं , " का ? चाची कुठे ? " मग हसत म्हणाला , " है वो भी है. दिवार पर टंगी है . हंसती है मुझपर कहती है चच्चा देखो ये अाया तिनसौंवा चांदीका तार तेरे सिर पे. बहुत बुढे हो गए हो जनाब. " मग त्याने खिशातुन पाकीट काढलं अाणि त्याच्या बेगमचा फोटो दाखवला म्हणाला " ये देख ये तेरी चाची. खुदा कसम इतनी खुबसुरत अौरत मैंने कभी नही देखी थी .शायद खुदा ने भी ना देखी हो सो बुला लिया उसे . शाळेपासुनच हिच्या मागे मागे फिरायचो मी . अगदी पायाला भेगा येई पर्यंत फिरायलो तेव्हा कुठे हो म्हणाली मला. फोटो बघत म्हणाला चाची ला म्हणाला " तू थी तब पांव में थे अब तू नहीं तो.. 
यादों पे आते है छाले , बेगम"
हा सगळा अामचा संवाद चालु असतांना कुणी ना कुणी इलियासला अावाज द्यायचा अाणि इलियास कपाळावरची एकही अाठी य़ेउ न देता पटकन जाउन काम अाटोपून परतायचा अाणि अामची गाडी पुढे सरकायची.
साहेब त्या दिवशी परत अालेच नाही . शेवटी मी निघायच्या तयारीत इलियास ला म्हणालो " चलो चच्चा निघतो. कागद मिळाला असता तर चांगलं कॉलेज मिळालं असतं.जाउ द्या समजु नशिबात नव्हती ही संधी"
तेव्हा इलियास म्हणाला "संधी तेव्हाच हुकते जेव्हा तुम्ही ती घेण्याचं टाळतात."
दुस-या दिवशी गेलो.इलियास नव्हता.कागद मिळाला.अाणि संधीही.
- प्राजक्त

(सामना १९/४/१४ 
http://epaper.saamana.com/Details.aspx?id=48513&boxid=123458578 )

मिरवणुक

मिरवणुक 
......मग गजबजल्या चौकाच्या मध्यभागी एखाद्या प्रशस्त बारला लाज येईल अशी असा एक मोठ्ठा खांब थाटात उभा राहिला. मग त्या खांबावर सप्तरंगी इंद्रधनुष्याला (अाणि झालंच तर त्या इंद्राच्या बाणांना) लाज वाटेल अशा टेच्यात असंख्य रंग उधळत ते हेलॉजन दिवे लुकलुकु (किंवा झापझुप) लागले. शंभर अासुडचा मिळुन एक अावाज होईल असा विजेचा कडकडाटसुद्धा भेदरुन लपुन बसेल अशा अावाज कुठून तरी तुतारीचा अावाज अाला अाणि संपुर्ण रस्त्यावर ढाय ढाय अावाजात "मानवंदना" कम मिरवणुक सुरु झाली.  
"अरे या या , भोसले सर" डिपीला समोरुन एक गृहस्थ येतांना दिसले . चेक्सचा हाफबाही शर्ट , ढगळ पायजमा, किंचितशी दाढी, हातात छोटीशी पिशवी अाणि चेह-यावर प्रचंड अनुभवाची लकाकी. 
झापझूप करणा-या दिव्यांचा डिपीला त्रास होत होता.पण अाज संध्याकाळ पासुनच त्याला 'बंदोबस्ताच्या' नावाखाली सर्व बाड-बिस्तर अावरायला सांगितलं होतं. म्हणुन डीपी अाणि सॉक्रेटिस तिथेच लाकडी फळकुट्यावर " मिरवणुक कम मानवंदना" बघत बसले होते. सॉक्रेटिस पेंगाळला होता. परत डिपीच्या डोळ्यावरुन एक तिव्र दिव्याचा झोत झापझुप करुन गेला.अाणि भोसले सर , डिपीच्या शेजारी बसत म्हणाले " काय लेका ? कसं काय चालु ?" 
"बस सर ! चालुय अापलं .सॉरी सर अाज चहा नाही. लौकर अावरावं लागलं" डीपी वरमला.
"बरोबर अाहे , गोंधळ करण-यां रिकाम्यांमध्ये एखादा कामाशी काम ठेवणारा दिसला की त्यांना अॉव्कवर्ड होईल ना रे ! " भोसले सर खळखळुन हसत म्हणाले.
डिपी हसला नाही . मग बराच वेळ दोघांमध्ये फक्त शांतता वाहत राहिली अाणि त्या गच्च अंधारात झापझुप दिवे त्यां दोघांवरुन शांततेसोबत वाहात राहिली .
डीपी काहीतरी बोलणार तितक्यात भोसले सर म्हणाले ," कळतंय मला कळतंय. तुला काय म्हणायचंय अाणि का म्हणायचंय कळतंय. पण अाता खरंच कठिण होऊन बसलंय. प्रत्येक दिवसात अशी काहीतरी गोष्ट कळते की मी अाश्चर्यचकित होऊन जातो. अाणि दररोज बरका , द-र-रो-ज. "
पिशवी ठेऊन सरांनी दोन्ही हातांनी पायाला अाधार देऊन मांडीच घातली अाणि सांगु लागले " अाता मी शिक्षक होतो तेव्हा लोक मानायचे मला खूप. म्हणजे अाता पण रस्तायाने जातांना दहामधले सात माणसं "राम राम सर" म्हणतात नाही असं नाही. पण कसंय कि मी शिकवलेलं किती जणांनी अात्मसात केलं अाणि त्यातले किती जण वर वर राम-राम घालणारे अाहे ह्यात खुप अंतर अाहे . खरंतर माझ्या तालमीतले लोक 'चांगला माणुस बनुया' अशी खुणगाठ पक्की करुन निघतातही पण भारत शोधायला निघालेला कोलंबस अमेरिकेत पोचुन रमुन जातो तसं काहीसं होतं बघं. नाही म्हणजे भारत म्हणजे चांगला माणुस अाणि अमेरिका म्हणजे वाईट वैगेरे असं काही नाही . पण नकाशावर भारत पाहिला होता ना ? भारत डोक्यावर ठेऊन निघाला होता ना बाबा तू ? मग ? गंमत असते रे सगळी . कसंय रे शिकवण ,अात्मसात , चांगला माणुस इत्यादी इत्यादी हे अाम्हा "अोल्ड स्कूल"वाल्या शिक्षकांचे चोचले बरका. अामच्याकाळी दगडी गार भिंती गडकिल्ल्यांसारख्या शाळा अाणि चांगला मित्र घडवायचो अाम्ही बस्स. हे एकदा झाले की त्यात  'चांगला मुलगा /चांगला नागरिक/चांगला विद्यार्थी' इत्यादी सगळे कॉमन डिनोमीनॅटर अालेच . पण अाता बघुन असं वाटतं हा नंगा नाच कोणी शिकवला ? कुठून शिकले हे लोकं ? हे जे बेफामपणे नाचताय ह्यांना माहिती तरी अाहे का की कित्येकांच्या घरी दर्या रडणारी लोकं अाहे. कदाचित ह्याच नाचणा-या लोकांच्या घरातले कोणी असतील. अाम्ही घाम गाळायला शिकवला अाणि अाभाळ प्यायला शिकवलं. कदाचित अाम्ही चुकलो काहीतरी शिकवण्यात अाम्हीच. " भोसले सरांनी सुस्कारा सोडला. पुढच्याच क्षणी सरांना रस्त्याच्या पलिकडे गर्दीत कडेला हाताची घडी घालुन उभे असलेले गृहस्थ दिसले अाणि सर म्हणाले "डीपी ते बघ अामच्यासारखेच एक सर , नेकस्ट बॅच अाहे पण अोल्ड स्कुलवालेच.  डॉक्टर म्हणायचो अाम्ही त्यांना"  सरांना डॉक्टरांना अावाज देऊन शेजारी बसवायचं होतं पण गोंगाटामुळे शक्य नव्हतं. 
"अाम्ही लपल्या गेलोय त्याच जुन्या उजळणीच्या पुस्तकात.अाता कुणी बघत नाही कारण सगळ्यांना वाटतं ' हे येतं अाम्हाला'  अाणि देश छापल्या गेलाय रक्तरंजित ,निगरगट्ट वर्तमानपत्राच्या बातम्यांमध्ये. तो चुकला की नियम अाणि मी चुकलो की अपवाद हा स्वभाव झालाय. अरे गंमत म्हणजे अाजकाल 'भोसलेसरांचा विद्यार्थी अाहे' असं सांगुन कामं काढुन घेतात म्हणे लोक . गंमत म्हणजे बरेचसे लोक माझे विद्यार्थी नाही सुद्धा. उगाचच ढोंग. "
सरांचा पहाडी अावाज जरासा घोगरा झाला डिपीने त्यांना पाणी दिलं .तोंडावर पाणी मारता मारता सर म्हणाले " वाद होऊ द्या पण अाधी अापला अापल्याशीच.मग बाहेर. अाधीच बाहेर ह्याच्या-त्याच्या गच्च्यांड्या पकडुन उत्तरं कसे मिळतील."
क्षणभरासाठी गाणं संपलं . सर म्हणाले " डिपी , ते बघ त्या डॉक्टरांची परिस्थीती वेगळी नाहीए त्यांना पण तेच वाटतं जे मला .म्हणुन माझ्या सारखेच तेही ह्या गर्दीत स्वत:च्या चुकीची कारणं शोधताय" 
अाणि भोसले सरांनी अावाज दिला "डॉक्टर !! या इकडे" डॉक्टर फक्त हसले खिन्नपणे श्वास सोडुन फक्त हातानेच 'ठिक अाहे इथेच' अशी खुण करुन हाताची घडी घालुन शुन्य नजरेने सावळागोंधळ बघत राहिले. 


परत एक मोठ्ठा झोत डिपीच्या डोळ्यावरुन चमकला अाणि सॉक्रेटिसच्या हलवण्याने डिपीची तंद्री तुटली.पहाट होत अाली अाली होती अाणि समोरच सगळं नाहीसं झालेलं होतं .....मिरवणुक , ढोल-ताशे, 'नाच्चो'च्या अारोळ्या, झिंगलेले जयजयकार , पलिकडचे डॉक्टर अाणि शेजारचे भोसले सर. 
डिपीने सॉक्रेटिसला विचारलं " ते गेले ? "
"ते? कोण?" सॉक्रेटिस चमकला
"कुणी नाही.चल." डिपी  -प्राजक्त

२९ मार्च २०१४ दै.सामना  

Friday, March 21, 2014

Tea च्या मारी २

Tea च्या मारी २

"तुम्हाला सांगतो गॅलिलीअो अाणी माझं कधी पटलंच नाही हो." डिपी त्याच्या नव्या पण अाताशा रोजचा झालेल्या गि-हाईकाशी बोलत होता. (अाता डिपी त्याच्या चहा टपरीवरच्या मुलांना स्वत:ची नावं देतो अाणि शेवटचा काम सोडुन गेलेला पोरगा म्हणजे 'गॅलिलीअो' हे कळायला त्या गि-हाईकाला नववा घोट यावा लागला ) ".....म्हणजे अाजिबात नाही पटलं माझं त्याच्याशी कधी यायचा ? कधी जायचा स्साला धुमकेतु सारखा. मग मी ठरवलं ह्याला एक दिवस सांगुन देऊ ,' भाउ उद्या पासुन अायुष्यात एकदाच दिसणारा धुमकेतु हो अाणि जा बाबा. "
नविन पण अाता रोजचा झालेला गि-हाईकला अाता डिपीच्या बोलण्याची सवय झाली होती अाणि अाता कुठे त्याला कळतं होतं की डिपी नेमकं काय म्हणतोय.तितक्यात डिपी हात पुसत त्याच्या शेजारी बसला अाणि म्हणाला " तुम्हाला सांगतो साहेबा, त्याला उद्या कामावरुन काढणार हे ठरवलं होतं म्हणुन अादल्या दिवशी जरा नीट वागलो त्याच्याशी.अदबीने की का म्हणतात तसं. रंगपंचमीला जो शर्ट घालणार असतो त्याला रंगपंचमीच्या अादल्या दिवशी कसं प्रेमाने पाहतो? हां अगदी तस्संच ! "
मी जेव्हा पहिल्यांदा डिपीला भेटलो तेव्हा मी पावसात अाडोसा म्हणुन डिपीच्या टपरीला उभा होतो. मी जेव्हा तिथे अास-याला गेलो तेव्हा तिथे कुणीच नव्हतं. मग तितक्यात डिपी अाला कुठुन तरी अाणि मला न विचारता माझ्या पुढ्यात चहा ठेवला. अाणि लागलीच तणतणत बोलु लागला. असं जसं काही जाण्याच्या अाधी अामचा विषया अर्धवट राहिला होता. " असेल ना , असेल तुम्ही मोठे राजकारणी किंवा अजुन कोण तुर्रमखान भले दिवसाला ५०० कट चा धंदा होईल पण अापला ऊसुल अाहे 'असेल राजकारणी तर नो उधारी' काय बरोबर की नाय?" ("अाता मला कसं माहीत?"अशा नजरेने मी त्याच्याकडे बघितलं) स्टोव्ह भगभग करावा तसा डिपी बोलतच होता , " नाहीतर काय? कमी रेट ने विज देणार होते. ह्याची कमी रेटची विज कुठे? फाईलीत. रस्ते, पाण्याचे टॅंकर कुठे? फाईलीत. बरं तुम्हाला म्हणुन सांगतो , हाच पिचका-या (पिचका-या म्हणजे पान-मावा खाणारा हे कळायला मला दुसरा कट अाणि पावसातली पहिली विज यावी लागली) च्यायला ! ह्या पावसानं येडं केलंय अाज एक. तर मी सांगत होतो की हाच पिचका-या, त्याच्या वाढदिवसाला स्वत:चे सतराशे बेंशी फुटी फ्लेक्स माझ्या टपरी समोर लावतो . दिवसभर काय पहायच ह्या तिरळ्याला ? सांगा ना तुम्ही ! ( मी फक्त हसलो. पिचका-या अाणि तिरळ्या मला अाता तो नगरसेवक अंधुक अंधुक दिसायला लागला होता. गुन्हेगाराचं स्केच काढता तसं हळु हळु माझ्या मेंदुतला डायरेक्टर कामाला लागला होता) डिपी अजुन सुरुच होता " तर मी सरळ बोल्लो कि साहेब पैसे अाधी मिळत असेल तर काम होईल परिस्थिती टाईट अाहे. तर त्याच्या एका बगलबच्च्याने माझी कॉलर पकडली ना टाईट ! (बगलबच्चा म्हणजे त्या नगरसेवकाच्या नेहमी बगलेत असणारा एक कार्यकर्ता. हो हा शब्द सुद्धा मराठीला डिपी नेच बहाल केला असावा . मी अाणि माझी चहाने भाजलेला जिभेचा शेंडा साक्षीदार अाहोत त्या क्षणाचे ) मग डिपी म्हणाला " मी फक्त त्याच्या साहेबा कडे पाहुन म्हणालो 'कस्सं काय मत द्यायचं तुम्हीच सांगा !"
अाता पाऊस अोसरायला अाला होता.सॉक्रेटीस दिवसभराचा हिशोब डिपीला देत होता.डिपी त्याच्या वहीत ती मांडुन घेत होता. मी त्याला विचारलं "किती झाले ?" डिपी मग माझ्याजवळ येउन म्हणाला " अडचणीत सापडुन अास-याला अालेल्या फस्ट टाइमर्सला फ्रि असतो चहा. कंपनीची पॉलीसीच अाहे तशी "
मी "कंपनी ?"
डिपीने फक्त डोळा मारला अाणि माझ्या जवळ येत म्हणाला , " माझं तर मत असं अाहे बरका ,जनतेने सरकार भंग करत बसण्यापेक्षा अाता ह्या सरकारने ही जनता भंग करुन नवीन जनता निवडायला पाहिजे एकदाची . ते सुखी अाणि अापल्या डोक्याचा त्रास मिटेल.कायमचा. अाणि ज्या दिवशी ख-या अर्थाने हे राजकारणी देश 'चालवतील' तेव्हा अापली 'पळापळ' थांबेल. काय ?"
"चल सॉक्रेटिस , हॉली ग्रेल घे अाणि घे निर्माल्य अावरुन."(हॉली ग्रेल म्हणजे शेवटचा जाण्याअाधीचा त्यांचा चहा अाणि निर्माल्य म्हणजे टपरीचा पसारा हे जेव्हा मला डिपी कडुन कळालं तेव्हाच मला कळालं होतं की हा अाता माझा नेहमीचा अड्डा होणार ) - प्राजक्त 

( http://epaper.saamana.com/Detailsprint.aspx?id=47633&boxid=232328781 ) 

Thursday, March 13, 2014

अवकाळी पावसाची भाषांतरे

कपाळी अत्तराचा घाम,
पाठकुळी वजन फुलपाखरापेक्षा हलकं होतं
कारण होतं पाठीवर
टम्म फुगलेलं धान्याचं पोतं

मग कडाडली विज 
अशी 
जशी

कोयता अन् पहारींनी पाडावं भगदाड त्याच पोत्याला
अाता भविष्याचं भगदाड वाचवण्यासाठी
पोत्याचं छिद्र न छिद्र लपवतोय तो
.
.
उरेल त्याची पै
छिद्रातुन घरंगळतंय त्याचं पाणी

- प्राजक्त १३ । ०२ । २०१४

(छिद्र लपवतांना अाठवतोय
अाभाळाला दगड मारत अोरडणारा
वेशीवरचा वेडा पीर
अोरडतोय
"ये रे पावसा
तुला द्येतो पैसा
ये ना ये " )

Friday, March 7, 2014

Tea च्या मारी - 1


"अापला चहा दुनियेचा भारी असतो.दुनियेचा भारी. अनुभवामुळे रापुन काळी-चॉकलेटी झालेली पावडर , राकट अालं-इलायची....बापासारखी !  हां पण भल्यासाठीच अाणि जीवाभावाचे गोड 'साखर'क्षण इतकं टाकलं की अापला चहा तयार होतो. नाही पाणी-दुध पण असतं की पण ते अापल्यासारखं दुध काय पाण्यासारखं पातळ अाणि पाणी पण दुधासारखं गढुळ "डिपी दिवसातुन पंचवीस वेळेस हे एखाद्या नवीन माणसाला सांगायचा.

डिपी - अगदी मौक्याच्या ठिकाणी डिपीची चहाची टपरी होती.टपरीला नाव नव्हतं पण डिपी ह्या त्याच्या नावावरुन सगळे त्याला अोळखायचे. डिपी म्हणजे दिलीप पावसकर ? कि दानिश परवेझ ? कि डेरेक पॅट्रिक ? कि दलविंदर पुरी? कि ???? अाणखी बरंच काही ??? हे कोणालाच माहिती नव्हतं. पण बोलयाचा असा कि जशी चहाला उकळी.

"अाज चहा नको का? " अोरडुन विचारायचा . मग पलिकडुन कोणीतरी म्हणायचं "नको नको तोंड अालंय, डिपी" मग डिपी हसुन बडबडायचा ,"'तोंड' आलं की रावणाचं नवल वाटायला लागतं,राव"

"तुला गंमत सांगतो , साहेबा " डिपी एका रोज मुलाखती देउन थकलेल्या अाणि नविनच डिग्री 'प्रसुत' झालेल्याला तरुणाला सांगत होता. "गंमत सांगतो कि माझ्याकडे रोज हातावर काम घेणा-या वेठबिगारापासुन तर हाताच्या इशा-यावर कोटीच्या उलाढाली करणा-या पर्यंत सगळे येतात चुस्कीसाठी. देवाला मानणारे अाणि मान न (दे)णारे दोघं येतात. " अाणि हे सगळं डिपी अाजुबाजुच्यांना चहा देत अाणि साफसफाई करत अाणि सोबतच्या मदत करणा-या मुलाला अॉर्डर देत देत बोलत होता. डिपीच्या टपरीवर मदत करणा-या पोरांची गंमत होती. अगदी गरजु मुलांना तो कामावर घ्यायचा ज्यांना सहसा कोणी घरादाराचा शेंडाबुडखा नसायचा अाणि तो पोरांना कामावर ठेवतांना सांगायचा कि "हं तर, डिपी कंपनीपॉलिसी नुसार(कंपनी ? पॉलिसी ??)  ,कंपनी तुला एक नाव देईल तेच तुझं नाव असेल" अाता ही वितभर टपरी म्हणजे हयाची कंपनी. अाणि डिपी त्याच नाव द्यायचं कारण म्हणे त्याला नावं लक्षात नाही राहायची.

"सॉक्रेटीस , सुर्या वाल्याकडे ४ कट मार ! " अाता सॉक्रेटिस म्हणजे ह्याचा चहा वाटणारा पोरगा (तो सारखे प्रश्न विचारायचा म्हणुन असं नाव बहाल केलं होत डिपी ने ) सुर्यावाला म्हणजे नाक्यावर सुर्या एंटरप्राईजेस नावाचं दुकान , ४ कट मार म्हणजे ४ कटींग नेउन दे. हा असा सगळा डिपीचा चहोत्सव, पहाटे रस्तावर एक कप अोतुन अाणि रात्री शेवटचा चहा सगळं अावरुन सॉक्रेटीस सोबत स्वत: घेतला की संपायचा. पहाटेचं धुकं त्याच्या चहाच्या उकळीतुन उगम पावतंय असं वाटायंच अाणि रात्री स्टोव्हच्या फरफर सोबत अाजुबाजुचा गजबजाटडिपीने शांत केल्यासारखं वाटायचं. "डिपीशेठ, थंडीत चहा जास्त गोड लागतो का हो ?" सॉक्रेटीस ने हात शेकत प्रश्न केला अाणि डिपी शुन्यात बघितल्यागत शेकोटीकडे टक लाऊन बघत बसला.

अाणि अचानक शेकोटीतुन अागीचा अजस्त्र अाकार घेत एक जमाव उभा राहिला अाणि त्याच्या बापाला विचारु लागला " नाव बोल बे पटकन नाव बोल " बाप पुटपुटला अाणि जमावाने बापाला ऊस कापावा तसा कापला . मग जमाव पळुन गेला.मग त्याच शेकोटीच्या धुरातुन दुसरा जमावाचा अाकार तयार झाला अाणि त्याच्या बहिणीला नाव विचारु लागला अाणि ती काही म्हणायच्या अात तीला नासवलं सुद्धा.हे सगळं वितभर उंचीचा डिपी, बोटावर मोजण्या इतक्या वयात कोप-यात गुढघे मुडपून बघत होता. अाजच्या डिपीने त्या लहान्या डिपीकडे पाणी डोळ्याने पाहिलं. दोन वेगवेगळे जमाव येउन अापला घराला वेगवेगळं करुन गेल्याची सल त्याच्या तांबरलेल्या डोळ्यात स्पष्ट होती. जमावातला एक जण जाता जाता म्हणाला थंडीतला हवा जास्त गोड लागते हो ना ? त्यातल्या एकाने जाता जाता अंगणातल्या पिंपावर हातातल्या काठीने उगाच जोरात अावाज केला अाणि.....

शेकोटीमध्ये अांधळ्या स्वप्नाने झेप घेणारा किडा ताडकन उडाला अाणि डिपीची तंद्री भंगली .

मग उठता उठता डिपी म्हणाला , "दंगल जर जिवघेणी असेल तर दंगली नंतर जे जगतो ते काय असतं ?"

सॉक्रटीस "काय? "

डिपी " काही नाही छापा पण नाही काटा पण नाही .नाव विचारलं तर सॉक्रेटीस सांगायचं सॉक्रेटीस . !"




- प्राजक्त

Thursday, January 2, 2014

मैं

इक सालाना दस्तुरसा है
दस्तक होती है दरवज्ज़े पर
बाहर सन्नाटा रहता है
गुमनामसा बादल बहता है
मुड़कर अंदर देखू तो
'वो' शतरंज बिछाए हसता है
मैं आता जो सालाना हुँ
वो कहता मैं 'फ़लाना' हुँ
विल्स-माईल्ड के धुएँ तले
फिर शह-मातों का दौर चले
जिसकी भी हार यहाँपर हो
दुनिया पचड़े का कच्चा वो
बचा खुचा सब जुतीपर
जो जीतें जाए छुट्टीपर

हर साल मैं सोचुं पुछूंगा
यही सवाल मैं नोचूँगा

सवाल,शक,डर ऐसा है
दस्तुर ये जो सालाना है
'वो' दस्तकवाला जो आए
'वो' मैं हुँ या फ़लाना है

- प्राजक्त ७ जुन '१३

(फिर दस्तक होती दरवाज़े पर
बाहर सन्नाटा रहता है
गुमनामसा बादल बहता है
मुड़कर अंदर देखू तो
'वो' शतरंज बिछाए हसता है)

Monday, August 19, 2013

चोटें तय कर लेंगे हम


छोड ना ! फिर देखेंगे हम

पहले चल जी लेंगे हम

नइ की क्या है जल्दी
हां 'वही' उधेड देंगे हम

चल गिन लेते है सदमें
चोटें तय कर लेंगे हम

रुखसार पे चलते चलते
लब पे थोडे  'हो' लेंगे हम

हल तो पहोंच चुका ,अब
सवाल पहोचाएंगे हम

अांगन से कैसा शिकवा
घोसलेसे रुठेंगे हम

दिवारें भाव करे तो
दरवज्जोंसे तोलेंगे हम

गूडीगुडी कैसे है बजती
खाली पेटसे पुछेंगे हम

गुलजारजी निंद में है क्या
'इरशाद' ही हो लेंगे हम

अासमां की शमा बुझी है?
चल अपनीही दे देंगे हम

इसबार जो लैा बुझी,तो
तुफान उठा देंगे हम

बस 'वो' तिली हो जो,तो
हसहसके अैार घिसेंगे हम
- Prajakt
.

नंतर बघून घेऊ
ये आधी जगुन घेऊ..!!

नकोच नवे बहाणे
जुने उसवुन घेऊ..!!

मोजुन ठेव जखमा
घाव ठरवुन घेऊ..!!

गाली ओघळलो तर
ओठी सरकुन घेऊ..!!

उत्तर पाठ आहे
प्रश्न समजुन घेऊ..!!

अंगण तेच असुदे
घरटे तरुण घेऊ..!!

उठतील मग भिंती
दार बसवुन घेऊ...!!

लागते झोप उपाशी
भूक बदलुन घेऊ..!!

या फ़ुलांना जाग नाही
चल उमलुन घेऊ..!!

आभाळाचे दोन दिवे
एक उचलुन घेऊ..!!

दिव्यास तेल नाही
नसु देत, ऊन घेऊ..!!

हरएक आपलाही
क्षण उजळुन घेऊ..!!
 -Sachin Kakde



अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...