Wednesday, July 15, 2015

बॅकबेंचर्स - १ टॅंजंट

प्रस्तावना : दोन गावाकडचे घनिष्ठ मित्र. त्यातला एक शहराकडे शिकायला गेला अाहे. एक गावातच. त्याच्यातला ह्या पत्रव्यवहाराची मालिका. अाणि मागल्या बेचंवरुन उलगडणारे त्याचे भावविश्व 


प्रिय माऊल्या , 

सनविवि लिहायचा नियम शाळेत मारोती मास्तरांनी सांगितला असला तरी मला तो अापल्यात पाळायची गरज नाही वाटत. पण बरका तुझी पत्राची कल्पना भन्नाट अाहे. अापण एकमेकांना नेहमी पत्रच लिहित जाऊ. अाज कॉलेजाचा पहिला दिवस संपल्या संपल्या खोलीवर येऊन तुला पत्र लिहायला घेतलं. तू इथं पाहिजे होता. इथं शहरात पोरंसुद्धा जंटलमंटल दिसतात म्हणुन मी अापला गुमान मागल्या बेंचावर जाऊन बसलो. दिवसभर फक्त सर लोकांनी अोळखीपाळखी करुन घेतल्या. इथं खिडकीतुन काहीच दिसत नाही. अापल्या शाळेतल्या प्रत्येक खिडकीतुन गुलमोहर, सावळ्या अाईचं देऊळ, शिवाईची टेकडी ह्यापैकी काहीतरी दिसायचंच. इथंल्या खिडक्यांमधुन पलिकडच्या इमारतीची खिडकी, गिरणीची चिमणी अाणि जास्त डोकावुन पाहिलं तर फुंकर मारल्यावर पळुन जाणा-या मुंग्यासारख्या सिग्नलवरच्या गाडया दिसतात. पहिल्या दिवस होता म्हणुन जरा टरकलीच होती. इथले वर्ग खुप मोठे अाहे. एखाद्या मास्तराने लक्ष नाही म्हणुन खडु मारला तर पोहचेल कि नाही हि शंकाच वाटते. तुला पाठवलेलं पत्र घरी पोहोयच्या अात पोस्टातुन घेऊन टाकत जाशील का ? नाही म्हणजे इथल्या पोरींबद्दल सांगायचं होतं. तू इंग्लिश शिकवायचा त्यामुळे फिजिक्स,केमेस्ट्री समजायला सोप्प जातंय. तुझं कॉलेज सुरु झालं का ? तू सोबतीला नसल्यामुळे कोणताच वर्ग बुडवायचा नाही ठरवलंय. तू इथं पाहिजे होता. सोबत असता तर जोडीने 'टॅंजंट' मारला असता. खोलीवर पार्टनर म्हणुन एक 'जेजे'चा पोरगा अाहे. जादु अाहे जादू. कसली चित्र काढतो. पण कमी बोलतो. जे बोलतो ते तुझ्यासारखं.माझ्या तर साला एकदम टॅंजंट जातं कधी कधी. म्हणजे निर्वात, क्षितीज, अाणीबाणी, सुर्यडुबी, लॅंपपोस्ट असं सगळं बोलतो तो. काल शेवटल्या बेंचावर माझ्या शेजारी एक पोरगा होता त्याने चालु वर्गात तंबाखु मळली. मला ही म्हणाला 'डबल मळू का?' खरं सांगतो टरकली माझी त्यात पलिकडची दोन वेण्याची.... नाही ते नंतर सांगतो. गोदीला वासरु झालं का? उत्तराची वाट पाहतोय. पुढल्या अाठवड्यापर्यंत लिही. सोप्पं लिही.
इथं सगळं ठिक अाहे. वर्ग तसेच पण थोडे मोठे, गोंधळ तोच पण अनोळखी, अाणि शेवटचा बेंच तोच पण शेजारी तू नाही.

तुझा दोस्त
तुक्या

ताक : सोबत जेजेवाल्या मित्राचं एक छोटं स्केच पाठवतोय. जादू रे साला जादू.


- प्राजक्त १५ जुलै १५

(दै सामना २५ जुलै फुलोरा )

Friday, May 22, 2015

निबंध ( १६ मे मटा मैफल)

कोसा कोसावर जशी भाषा बदलते तशी लाईफस्टाईल पण बदलते.त्यात लहान मुलांचं विश्व वेगळंच. लहान मुलांचं खरं अंतरंग पहायचं असेल तर त्यांचे निबंध वाचायला पाहिजे. ते निबंध वाचल्यावर कळतं कि त्यांच्या मनातलं जग कसं असु शकेल अाणि त्या जगातली त्यांची लाईफस्टाईल कशी असते.
एक मित्र शाळेत शिक्षक अाहे. तो ब-याचदा शाळेचे पेपर तपासायला घरी अाणतो. त्यात एकदा दोन निबंध वाचले. एक मुलगा इथलाच तर दुसरा नुकताच विदर्भाचा जो शिकायला इकडे मामाकडे अालेला.
इथला मुलाच्या निबंधात पाऊस होता, मोर होता, पाण्याचं डबकं होतं,आईच्या पदराने घासलेलं डोकं होतं, कागदाची होडी होती, छत्री होती, रेनकोट होता, अळुच्या पानावरचा मोत्याचा थेंब होता, चिखलाचे पाय होते,सुसाट चालवलेली सायकल होती. पण त्या दुस-या मुलाचा निबंध अनुभवणं जास्त महत्वाचं आहे. त्याच सबंध वेगळं जग होतं. त्याचा पेपर मध्ये सगळ्यात वर मध्यभागी लिहलं होतं...
"माझा अावडता ऋतू"
शाळेत शिकवत जरी असले तरी जन्माला अाल्यापासुन मी कधी तीन ऋतू पाहिले नाही. अामच्या गावाकडं फक्त उन्हाळा असतो. अाणि हिवाळ्यात रात्रीपुरता गारवा असतो. बाकी भुगोलात शिकवलेलं खरं असंल तर पावसाळा हा माझा सगळ्यात अावडता ऋतू असु शकतो. पावसात उभं राहिलं कि म्हणे अंगावरुन थेंब निथळतात. अाम्ही मित्र पकडा-पकडी खेळुन दमलो की घामाच्या धारा लागतात अाणि अंगावरुन जमीनीवर थेंब निथळतात तेव्हा अाम्ही "पाउस अाला,पाउस अाला" असं म्हणतो.तेव्हा खुप मजा येते म्हणुन मला पावसाळा अावडतं असावा. माझ्यामध्ये कधी कधी जादु अाहे असं वाटतं,कारण माझ्या घामाचा थेंब जमिनीवर पडल्यावर तसाच वाफ होऊन गायब होतो जसा अाईचा गरम तव्यावरचा पाण्याचा शिपकारा गायब होतो. पावसात म्हणे सगळीकडे हिरवं हिरवं होतं. मी एकदा चित्रकलेच्या तासाला तसं चित्र पण काढुन पाहिलं. अामच्या कडे जे तेलकट खडु अाहे त्यात पांढरा अाणि हिरवा खडु कशाला अाहे हे मला अाज पर्यंत कळालंच नाहीए. म्हणुन मी मित्रांचे पण हिरवे खडु घेऊन सगळीकडे हिरवळ दाखवली.पण पोरं खुप हसले म्हणाले 'असं हिरवं कधी असतं का?' म्हणुन मी ते चित्र माझ्या उशीच्या खोळात लपवुन ठेवलं अाहे.मला ते चित्र अावडतं, म्हणुन मला पावसाळा अावडतं असावा. अामच्या इथं एक किराणा दुकानदार दर जून मधे रंगीत छत्र्या विकायला अाणतो. त्या दुकानदाराला अाम्ही नेहमी "सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का?" असं चिडवतो. तो खुप चिडतो अाणि दगडं घेऊन अामच्या मागे लागतो. तेव्हा दुसरा मित्र हळुच बरणीतुन चार-पाच खोब-या गोळ्या काढतो. फुकटच्या खोब-या गोळ्या जास्त गोड का लागतात माहित नाही पण अाम्हाला त्या खुप अावडतात. हे फक्त ह्याच ऋतुत घडतं म्हणुन मला पावसाळा अावडत असावा. 
अाप्पा म्हणतात त्यांच्या लहानपणी पाऊस यायचा तेव्हा ते खालच्या मळ्यात सायकलीवरुन रपेट मारायचे अाणि गार वारा अंगाला झोंबायचा. मी पण कधीकधी गुपचूप थोडं पाणी डोक्यावर अोतुन सायकलीची रपेट मारतो. मग नुकत्याच अोसरलेल्या पावसातुन फिरल्यासारखं वाटतं अाणि लहानपणीचा अाप्पा झाल्याचा भास होतो. मला अाप्पा अावडतात,म्हणुन कदाचित मला पावसाळा अावडत असावा.जून मध्ये पाऊसाची सुरवात होते असं पुस्तकात लिहलं अाहे. पण अामच्याकडे जून मध्ये साथीचा रोग येतो.त्या रोगाला काय म्हणतात माहित नाही पण लोक इकडे तिकडे फोन करुन "अाला का?" "कुठवर अाला?" "ह्या वेळेला जोरात असावा हो ना?" , "थोडथिडका का होईना पण अाहेच " असं बरळायला लागतात. काही लोक तर मुर्खासारखा पैसा खर्च करुन कौलाच्या अाणि घराच्या फटी पक्क्या सिमेंटने बुजवतात. ह्या पावसाळ्यात कदाचीत साथीचा रोग पसरतो म्हणुन दर दोन दिवसा अाड झाडावर लटकुन काही लोक मरतात. साथीच्या रोगामुळे दरवर्षी ह्याच ऋतुत खुप लोकं मरतात. सुरेखाचा बाबा असाच साथीच्या रोगामुळे मेला. इतकं अाजारी असतांना झाडावर जाऊच नये असं मला तरी वाटतं. ह्या साथीचं रोगाचं एक सोडलं तर बाकी नावं ठेवण्यासारखं काही नाही.म्हणुन मला असं वाटतं कि मला बहुतेक पावसाळा हा ऋतु अावडतं असावा.जय भारत.

इयत्ता तीच,विषय तोच,ऋतु तोच, निबंधही तोच.फक्त ‘परिक्षा’ वेगळी.

- प्राजक्त २३ मे १५

मटा मैफल 



Friday, May 8, 2015

'तो' उन्हाळा कुठे गेला (मटा ९मे १५)

अापण लहानपणी दोन कारणांसाठी उन्हाळ्याची वाट पहात रहायचो. एक म्हणजे अांबा अाणि दुसरं म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्या. विकत घेण्यापेक्षा गरम झळा खात ,कानशीलामागुन एक गारट घामाची धार अनुभवत अांब्याच्या झाडाखाली उभं राहुन अर्जुन होण्यातली मजा बाजारात जाऊन नुसता वास घेत ‘कशी दिली पेटी?’ ह्यात नाही. अाताशा लाईफस्टाईलमध्ये सुट्ट्या त्याच ज्या शनिवार-रविवारला जोडुन येतात. बाकी कामाच्या गु-हाळ्यात जुंपलेलं अायुष्याला सिनेमा किंवा मॉलच्या घुंगरांची तेवढी करमणुक. पण तरी अशा उन्हाळात अॉफिसमधल्या एखादया तुम्हा अाम्हाला एक प्रश्न दरवेळी पडतो कि ‘तो' उन्हाळा कुठे गेला ?
उन्हाळा अाला कि सुट्टी अाणि सुट्टी असलं कि गाव हे समीकरण पक्कं होतं. मग शेण सारवलेल्या अंगणात उन्हाळ्याची वाळवणं दिसायची. पावसात डबकी चुकवत चालवं तसं ऎन उन्हाळ्या वाळवण चुकवत उड्या मारत शेवटी दाराला अाधार घ्यावा लागायचा. दारावरची साखळीकडी खडडखट्ट करत लाकडी दारावर वाजायची. मग अातल्या अंधा-या कोप-यात माळ जपत बसलेली म्हातारी घोंगडी अोरडणार ‘कोण खेळतय रे कडी-कोयड्याशी? अशी खटखट नाही करु,कटकट होते मग” तितक्यात तसाचसा खटखट अावाज अॉफिसच्या तुमच्या दारावर होतो तंद्री तुटते. प्रश्न उरतो ‘तो' उन्हाळा कुठे गेला ?
मग लंच टाईम होतो तुम्ही डबा उघडता खालच्या पोळीत लोणच्याची पोळीची गुंडाळी असते. हळदमसाल्याच्या घमघमत्या वासांनी परत तुमचं मन अंगणात रमतं. जात्याचा भरारा, कै-याच्या चार खापा करतांना धारदार विळ्यावर अाईचा बांगडी मिश्रीत दणका. त्या कच्च्या कै-यामधे एखादा पिकलेला अांबा असायचा मग तो अापल्या झोळीत यायचा. घसा कोरडा झाल्यावर कोणीतरी  पाणी अाणायला लावायचं. काळ्या कुट्ट मडक्यामध्ये पितळी तांब्या चुबकन बुडवायचा. एकदा त्याच तांब्यामध्ये उंदीर सापडला म्हणुन सगळ घर डोक्यावर घेतलं होतं. नंतर पोटातली कळ लपवत लपवत प्रत्येक जण सांगत होता कि तो उंदीर नाही वाळा अाहे. अॉफिसात थंड ठणका बसेल इतकं गारपाणी घशाखाली घरंगळतांना वाळ्याच्या निथळत्या चवीची अाठवण विचारत राहते कि 'तो' उन्हाळा कुठे गेला ?
हात धुवून रुमाल अोला करुन तोंडावरुन फिरवल्यावर भर उन्हात कामाची भगभग जरा कमी होईल असं वाटत राहतं तेव्हा नदीवर तासभर डुंबून सुस्तावलेले अापण स्मरत राहतो. अापल्याच घरातल्या अाया-बायका धुणी पिळुन खांद्यावर घेऊन निघतात. तेव्हा धुतलेल्या पिळ्यातुन चुकून एखादं खाली पडलेलं उपरणं नदीच बुचकाळुन अाणायची हुकूम दिला जातो अाणि अापण उपरणं घेऊन नदीच्या प्रवाहात उतरतात. वडाखाली वाट पहात असलेल्या अापल्या अायाबायका कपाळी पालथा हात लाऊन किलकिल्या डोळ्यानी अावाज दिल्यावर अापण भानावर येतो अाणि उपरणं पिळुन गऴयाभोवती लपेटुन उन्हाच्या झळा कापत झपाझपा चालु लागतो. अोल्या उपरण्याची पिळ अाणि अोल्या रुमालाची अाणि मानेभोवतीची अोली रेष विचारत राहते कि ‘तो' उन्हाळा कुठे गेला. 
अॉफिसचा पंखा लावतो,भरभरु लागतो, कागदं फडफडतात. त्यांना शांत ठेवण्यासाठी काचेचे गारट ‘पेपरवेट’ तुम्हीअाम्ही कागदावर टेकवतो.तेव्हा अाठवतो कोतुळेश्वराच्या टेकडीखाली पिंडीखालचा जिवंत झरा अाणि अाठवतो शिवाईच्या पाणथळीजवळ खोलेश्वरच्या पन्नास फुटी खोल गाभा-यातला पिंडीवरचा गारवा. तेव्हा अंगावर शहारा उभारत तो गारवा विचारत राहतो कि 'तो' उन्हाळा कुठे गेला.
त्याच उन्हाळ्यात अांब्याच्या झाडावर काठी मारल्यानंतर सुकलेल्या बुंध्यावरुन एक पोपडा खाली पडतो अाणि त्यामागुन सैरावैरा पळणा-या मुंग्या दिसतात. अगदी तसं सुटतं मग अॉफीस. ‘त्या’ सुट्ट्यांमध्ये घडत असं खुप काही नसतं पण तरी काहीतरी अविरत चालु असतं. 
तरी अापण परत परत वाट पहात राहतो उन्हाळ्याची. परत परत अाठवतं कि अापण लहानपणी दोन कारणांसाठी उन्हाळ्याची वाट पहात रहायचो. त्या उन्हाळ्याच्या शोधातलं उतारावरचं पाणी एका उत्तरावर येऊन थांबत कि नंतर हळुहळु उन्हाळा भीषण होत गेला.
नंतर हळुहळु अापण मोठे होत गेलो,अांबे महाग होत गेले अाणि सुट्ट्या कमीकमी होत गेल्या इतकंच.

- प्राजक्त 
मटा ९।मे।१५


Friday, April 24, 2015

ब्रॅंड व्हॅल्यू ( मटा २५ एप्रिल १५)

अाजच्या लाईफस्टाईलमध्ये शिक्का खुप महत्वाचा मानला जातो. शिक्का म्हणजे ? तेच ते ज्याला शुद्ध मराठीत ‘ब्रॅंड’ म्हणतात. म्हणजे कसंय कि बुटापासुन केसाच्या टोकापर्यंत तुम्ही कोणता शिक्का वापरताय हे महत्वाचं मानायला लागतलेत. मग तुम्ही एखाद्या वस्तुच्या पाहिल्या पाहिल्या प्रेमात जरी पडला तरी मनाप्रमाणे शिक्का नसल्याने तुम्ही ती वस्तु नाकारता. पण प्रत्येक गोष्टीचं मुल्य शिक्क्यात कसं मोजाल ? 
जी मोटारसायकल घ्यायची त्याचा शिक्का महत्वाचा, जो बुट घालुन मोटरसायकलला किक माराल त्या बुटाचा शिक्का महत्वाचा, निघण्यापुर्वी जो सेंट माराल त्या सेंटचा शिक्का महत्वाचा. सगळीकडे शिक्क्याचं महत्व अनन्यसाधारण अाहे. पण खरा अानंद हा मानण्यात असतो. अाणि ख-या समाधानाला कुठल्याच शिक्क्यांचं मिंधेपण नसतं.
अाज विरंगुळा म्हणुन उंचीच्या चित्रपटगृहात,ठराविक शिक्क्याचे चित्रपट बघतात. ठराविक शिक्क्याचे थंडपेय पितांना, ठराविक शिक्क्याचे पोपकोर्न चघळतात. अाणि समाधान मानतात.लहान मुलं टिव्ही लॅपटॉपवर प्ले-स्टेशनवर ठराविक शिक्क्याचे  खेळ खेळतात अाणि अानंदाने दंगुन जातात. पण पुर्वी लिंगोरच्या खेळायचो. कपच्यांवर कपच्या रचल्या अाणि जुने सॉक्स एकत्र करुन जो चेंडु बनवला त्या चेंडुवर कोणता शिक्का होता?  नीट अाठवुन सांगा कि घशाची निळी टपटपीत शीर ताणुन लि लि लिगोंरच्या s s !  अोरडतांना डोक्यात कोणता शिक्का होता ?
गेल्याच महिन्यात पाडव्याला जी गुढी उभारली त्याची काठी कोणत्या शिक्कयाची होती ? सणाला घरी ताई अाली होती. तिच्या गोंडस छकुलीने अायुष्यातला पहिली कोकिळकुहू ऎकली. त्या बाहुलीच्या विस्फारलेल्या बाहुल्या पाहुन कोणत्याच यू-ट्युब विडीअोने होणार नाही इतकं मनोरंजन झालं. मग गंमत म्हणुन तुम्ही तिला कडेवर घेऊन खिडकी-बाल्कनीतुन डोकावत कोकीळा दाखवण्याचा चंग बांधला. सांगा ती कोकिळेवर कोणता शिक्का होता? तीला कडेवर धरुन हाताला लागलेल्या कळेचं समाधानला कोणता शिक्का माराल. बोला ! दुपारी काळ्या अामटीत बुडवलेल्या पुरणपोळीचा शिक्का बोला ? अाज लोकांची नावं वाचतांना अाधी अडनावाकडं लक्ष का गेलं ? तुमच्या लहानपणी शाळेत मित्राच फक्त पहिलं नाव माहित असायचं ते पण अर्धवट. म्हणजे शेख्या हा मित्र शेखर अाहे कि चंद्रशेखर कि शेख हे सुद्धा माहित नसायचं. मधल्या सुट्टीतला त्याचा प्लास्टिकचा डब्बा तुमच्याकडे, तुमचा स्टिलचा टिफीन त्याच्याकडे. एकाच वाॅटरबॅग मधलं पाणी तुम्ही अर्धा वर्गाला द्यायचे अाणि ते तोंड लावुन प्यायचे. अाजही चिंचेच झाड दिसलं कि लहानपणीचा प्रसंग अाठवतो जेव्हा चिंचा तोडायला तो खाली वाकलेला अाणि तुम्ही पाठीवर पाय देऊन अोंजळभर चिंच्या तोडल्या. त्याच्या पाठीवर धुळीचे दोन पाय उमटले होते. सांगा , त्या धुळीवरचा शिक्का कोणता ? गरगर फिरवणा-या लाकडी भव-्यावर फक्त रंग शोधायचो. त्यावर कंपनीचे शिक्के कधी शोधल्याचं अाठवतं ? तेव्हा गोळ्या फक्त लिमलेटच्या होत्या तमुक कंपनीची लिमलेटची गोळी किराणा दुकानात मागायला कधी गेल्याच अाठवत नाही.
तुमच्या -अामच्या सारख्या शिक्कयांची थेरं जर परमेश्वराला असती तर विठ्ठलाने वीट सिमेंटची मागितली असती, येशु ख्रिस्ताने  क्रुसासाठी चंदनाचं झाडं शोधलं असतं, पैगंबराला वेलवेटची चादर लागली असती अाणि कृष्णाने फक्त जातिवंत मोराचं मोरपीस खोवलं असतं.
अहो कळस दिसला कि डोक्याकडुन छातीकडे हात अाणि किंचीत कमरेत लवण्याचे संस्कार अापले अात गाभा-यात कोणता देव अाहे हा प्रश्न कधी पासुन पडायला लागला ?  

- प्राजक्त 
मटा २५ एप्रिल १५

Friday, April 17, 2015

आत खळबळ शून्य (मटा १८ एप्रिल १५)

अाजकालच्या धक्काधकीच्या लाईफस्टाईलमध्ये ….. हो हो ! 'धक्का’धकी म्हणायचंय मला ‘प्रिंटींगमिस्टेक' किंवा माझं अशुद्धलेखन नाही ते . म्हणजे कसंय दर दुस-या दिवशी कसलीतरी ब्रेकिंग न्युज, कुठेतरी धक्कादायक बातमीचा 'अाखों देखा हाल’ अापल्या फोनवर चित्रासकट येतो. तर अाजकालच्या ह्या धक्काधकीच्या लाईफस्टाईलमध्ये अापली अभिव्यक्ती अाणि संवेदनांची तिव्रता कमी झालीय का? असा प्रश्न पडु लागलाय. शुद्ध मराठीत म्हणायचं झालं तर 'अापल्या इमोशन्स अाणि फिलींग्जची इंटेंसीटी कमी झालीय का ?’ म्हणजे काहीही घडो, कितीही तीव्र असो पण अात खळबळ शून्य.

श्वास अाणि उच्छवासाप्रमाणे नियमित अंतरावर मोबाईलचा मेसेज बॉक्स शुकशुक करुन बोलवत राहतो. एखादा किरकोळ विनोद असो किंवा एखादी ‘पुलं लेवल’ची कोटी असो, वाचणारा गंभीर मुद्रेने, शुन्य नजरेने रिप्लाय देतो LOL. LOL म्हणजे असं सांगायचं असतं कि मी इकडे खळखळुन हसलो. किंवा असाही रिप्लाय जातो ROFL. ROFL म्हणजे अरे तुझ्या विनोदामुळे मी इकडे जमिनीवर गडाबडा लोळुन हसतोय. परंतु प्रत्यक्ष परिस्थिती अशी कि चेह-याचे भाव शून्य, नजरेतला अानंद शून्य अाणि महत्वाचं म्हणजे अात खळबळ शून्य.

रस्त्यांने चालणारे दिसतील. चालतांना पावलांचे अावाज कमी अाता किपॅडचे अावाज जास्त येतात.सगळेच ‘अंगठेबहाद्दर'.कधी कुणाला अानंद किंवा काळीज पिळवटणारं दु:ख झालंच तर अाधी 'स्टेटस अपटेड’ होतो मग ग्रुप मेसेज मध्ये बातमी जाते. नंतर प्रत्यक्ष घरात बातमी सांगितली जाते. अशा प्रकारे मानसिक अाधार पण अाता व्हर्च्युअल झालाय.जेवण महत्वाचं कि टिव्ही ह्या संभ्रमात जेवत जेवत टिव्ही बघतांना किंवा टिव्ही बघत बघत जेवतांना ‘अाणखी दोन शेतक-यांची अात्महत्या’ ही बातमी चालु असतांना दुसरा घास कालवलाच कसा जाऊ शकतो हे माझ्यासाठी कोडंच अाहे. अशा वेळेस चॅनेल बदलाल पण डोक्यातला विचार खरकट्या हातासारखे धुवू नाही शकत. नंतर हात धुतांना बेसिनच्या नळाचीही खळबळ होते पण अापल्या अात खळबळ शून्य.

लहानपणी गिरकी गिरकी खेळायचो. वर आभाळाकडे बघत, मागे मान टाकुन गर गर गिरकी घ्यायची. मग थांबलो कि समोरचे सगळे जग एकमेकांत मिसळून जायचे. पांढ-यांत लाल, लालमध्ये पिवळा, बिल्डिंगमधे रस्ता, रस्तामधुन ढग, ढगामधुन पिंपळाच्या पारंब्या सगळं जग उलट पालट होऊन जायचं. अंगणात चाफ्याचं झाडं होतं. गरगरत जात आधार म्हणुन त्याला धरलं कि परत हळूहळू सगळं जागेवर यायचं. अाता अाधाराला अंगण नाही, अंगणामध्ये चाफा नाही. चाफा अाणि मोबाईल दोन्ही सायलेंट मोडवर. अाणि सायलेंट मोड असल्याने अात खळबळ शून्य

कुणी म्हणेल तंत्रशिक्षण पुढारलं अाहे वगैरे वगैरे. हो पुढालंय ना. सगळं जग पुढे जातंय वगैरे वगैरे.हो जातंय ना. मग जर तेच अापण अंगिकारलं तर चुकलं कुठे वगैरे वगैरे?नाहीच चुकलं पण गुलॹार म्हणतात तसं पानं उलटवतांना जीभेवर जी पुस्तकपानांची चव रेंगाळते ती मजा ह्या क्लिकमध्ये कुठे हो? तंत्र नको सोडुया पण छोट्या गोष्टींमधली मजा तशीच अनुभवुन पाहु. इतकंच कि मित्राकडे गेल्यावर नेहमीसारखं घराखालुन मिस् कॉल देण्याऎवजी त्याला पुर्वीसारखा एकदा तार स्वरात अावाज देऊन पाहु. टिव्हीवरच्या कॉमेडी नाईटसोबत कधीतरी तळहातावर भवरा फिरवल्यावरची हुळहुळसुद्धा अनुभवुन पाहु. एसी जिममध्ये ट्रेडमीलवर घाम घाळतोच पण एखाद्या सकाळी जिमखान्याच्या रस्त्यावरचा गुलमोहर तुडवुन पाहु. चालतांना शेवटचा घाम कधी अाला होता ? पळतांना पायात शेवटचा गोळा कधी अाला होता? हसतांना पोटात शेवटचा मुरडा कधी अाला होता ? मिश्किलपणे मित्राच्या डोळ्यात संत्र्याचे साल शेवटचं कधी पिळलं होतं ? पिंपळाची सळसळ शेवटची कधी ऎकली होती ? ह्या प्रश्नांचा मागेमागे गेलं कि सापडेल खरं उत्तर. कोणत्या प्रश्नाचं उत्तर ? हाच प्रश्न कि 'अात शेवटची खळबळ कधी झाली होती ?'

- प्राजक्त ( मटा १८ एप्रिल १५)

http://epaperbeta.timesofindia.com/Article.aspx?eid=31833&articlexml=18042015004023

Friday, April 10, 2015

ट्राफीकनामा ( मटा ११ मार्च १५)

उफराट्या स्टाईलने लाईफ जगणं वेगळं अाणि अस्सल जगण्याला स्टाईल म्हणुन जगत राहिलं कि होते ती लाईफस्टाईल वेगळी. पण हा साधा रस्ता शहराच्या घाई गदारोळात अाणि चमचमत्या मॉल्सच्या थाटात हरवत चाल्लंय.
कसंय शहरात उद्यानं नाही अाणि असलीच तर भकास. ती उद्यानं कचराकुंडीवरच्या पावसासारखी दिसतात. गोदाघाटावर कोणाकोणाच्या वाट्याचं धुणं धुत बसलेली नदी नंतर ह्याच पावसाने वाहत राहते. ह्या नदीच्या एकदम मध्याभागी एखादी शिळा बांधता अाली पाहिजे. जिथे फक्त एकाला उभं राहायची जागा असावी अाणि त्या जागेवर उभं राहायला महानगरपालिकेकडुन अागाऊ बुकींग करावं लागावं. मग खळखळत्या पाण्यात सुर्यडुबीला एकांतात अशा शिळेवर जाऊन उभं राहल्यावर कळतील शहराला वेड लागण्याची कारणं.
सिग्नल पाळणे म्हणजे तर भित्रेपणाचं लक्षण झालंय. तुम्ही शहाण्या बाळासारखे सिग्नलवर उभे राहतात अाणि मागची घायकुतीला अालेली जमात तुम्हाल हैराण करुन सोडते. अाणि जाता जाता ऎकु जाईल अशा अावाजात ‘हरिश्चंद्राची अौलाद…!’ अशी शिवी ही हासडतील. ह्या अशा घायकुतीच्या जमाती असो कि सिग्नलवरची निराश झालेली हरिश्चंद्रांच्या अौलादी असो हे सगळेजण सिग्नलवर फुगेवाल्यांसारखेच सैरभैर दिसतीलच. अाजकाल ह्याच सिग्नलवर एकवेळ तृतियपंथीयांची फरशीवर फरशी अापटावी अशी स्पष्ट टाळी ऎकु येईल पण ट्राफिक पोलीसाची शिट्टी कुठेच ऎकु येणार नाही. अशात ही बेबंद ट्रॅफिक सिग्नल्स वेडी नाही तर काय होणार?
सिग्नलवरच्या बेबंद रांगेत उभं राहणं म्हणजे भिक्षेपात्र घेऊन उभं राहणं अाहे कि काय इतका कमीपणा वाटु लागलाय. पुर्वी 'अाज सुट्टी अाहे' म्हणुन बाहेर पडाणारे अधिक असायचे. अाता 'अाज सुट्टी अाहे गर्दी,गजबज जास्त असेल' म्हणुन घरात टिव्ही समोर ध्यान लाऊन बसलेले अधिक असतात. एखाद्याच्या मागे जाऊन उभं राहणं हे ना अापणाला मान्य असतं , ना कुणी अापल्या पोरांना हे शिकवतं. अाधीपासुनच मुलांना हेच शिकवलं जातं कि नेहमी रांगेच्या पहिल्या टोकाला तुम्ही कसे असले पाहिजे. मग त्यासाठी त्यांना लावा कराटे क्लास, लावा वैदिक मॅथ्स, लावा डान्स क्लास, लावा गायनाचा ध्यास. अरे काय चाल्लंय काय? मग अशाने शहरातली मुलं वेडी नाही तर काय होणार ?
नाक्यावरचं कचराकुंडीच्या ठिकाणी ‘ कचरा कचराकुंडीतच टाका’ ही पाटी ‘ कचरा कचराकुंडीच्या अासपास टाकला तरी चालेल’ अशी वाचुन तिथल्या वासाच्या घाणीने चार फुटावरुन कचरा भिरकवुन दिला जातो. मग त्या कच-यामधले कागदाचे बोळे, कांद्याचे टरकलं सैरभैर होतात अाणि फेर धरुन ट्रॅफिक तुंबलेल्या शहराच्या भटकंतीला निघतात. अाणि शहराच्या अाडोशाला जिथे अाधीच पाऊस तुंबलेला असतो तिथे जाऊन विसावतात. अाधीच तुंबलेलं, ही नवी विटंबना, अशाने पावसाला वेड नाही तर काय लागेल? 
अाताशा कोणाला कुठे पोहोचायचं असेल तर वेळेत निघायची जबाबदारी वेळ देणा-याची असते. कारण वेळ देणा-याने अर्धा तास अगाऊची सांगायला पाहिजे हे गृहितक जवळ जवळ ठरलेलं असतं.  चार वाजता भेटायची वेळं ठरली कि माणसं चारला भांग पाडतात. मग उशीराने चिडचिडत घर सोडुन सगळे निघतात. अाणि दिसेल त्याच्यावर डाफरत रस्त्याने प्रवास करत राहतात. खरतरं शहरात चेहरे कमी अारसे जास्त फिरतात. तुमची चिडचिड,तुमची शिवी, तुमचं स्मित, तुमचा खळखळाट फिरुन परत तुमच्याकडेच येतो. अाता अायुष्यभर 'अाजकाल पुर्वीसारखे अारसे मिळत नाही बाजारात' अशी तक्रार करत राहिले तर अारशांना वेड नाही तर काय लागेलं?
गंमत अशी अाहे कि ह्या शहरात घाई सगळ्यांना अाहे पण पोहोचायचं कुठंच नाही. अशाने शहराला वेड नाही लागेल तर काय?

- प्राजक्त ( मटा ११/०४/१५)


Friday, April 3, 2015

वेगवेगळी उन्हं ( मटा ४ एप्रिल१५)


उन्हाळा लागला कि दुपारच्या ठराविक वेळी शहरात कर्फ्यू लागल्यागत शांतता होते. ऋतु बदलाची पहिली माणसाळलेली खुण लोकांच्या डोक्यावर दिसते. तापमान शुन्याकडे धाव घ्यायला लागला कि डोक्यावर कानटोपी येते. ढग काळवंडुन अोसंडायला लागले कि डोक्यावर छत्री येते. तापमानला चाळीशीचे वेध लागले कि डोक्यावर उन्हाची टोपी येते. म्हणजे बदल कोणताही असतो पहिली चाहुल दिसु लागते ती गर्दीच्या डोक्यावर. मग अाधीच मुखवटे चढवलेल्या मुखवट्यांवर काळे गॉगल येतात. त्यात ज्यांना चष्मा असेल त्यांचे दु:ख अवर्णनीय असतं. ह्या लोकांचं दु:ख पावसाळ्यात तर महाअवर्णनीय असतं. जमिनीतुन उगवावे तसे नारळपाणीवाले, ऊसाच्या रसवाले, लिंबु सरबतवाले, टरबूजवाले, अाईस गोळेवाले ईत्यादीवाले रस्त्याच्या कडे कडेला उगवतात. कुठलतरी सावलीचा अाडोसा धरुन बसलेले हे लोकं म्हणजे टळटळीत उन्हाळ्यात रस्त्याच्याकडेला असलेले अमृताचे घडेच अाहे. अमृताचे घडे एवढ्यासाठी कारण दैवदुर्विलासाने जर तुम्हाला ह्या अघोरी उन्हात बाहेर पडावं लागलंच तर तुम्हाला पाठीवरती हात ठेऊन लढ म्हणणारे हि एकमेव जमात अापल्याला रस्त्यावर दिसेल. ठरल्याप्रमाणे उन्हं पसरावी अाणि ठरल्याप्रमाणे सावल्या पांगाव्या इतकं ठरल्याप्रमाणे सगळ्याची लाईफस्टाईल बुद्धीबळाच्या पटाप्रमाणे मांडलेली असते.
पण उन्हं वाढली कि सावल्या पांगतातच असं नाही.जेव्हा सुर्य डोक्याच्या अगदीवर नव्वद अंशात असतो असा ‘झिरो शेडो दिवस’ पण कधीतरी येतो. अशा वेळेस जाणीव होते कि जगाचा भार माथ्यावर अाला कि कधीकधी सोबतीला सावलीसुद्धा नसते. ब-यादचा असंही होतं कि बाहेरच्या शहरातुन एखादा पाहुणा शनिवार-रविवार बघुन त्रंबकराजाच्या निमित्ताने किंवा साईनाथांवरच्या श्रध्देने नाशकात सबुरीने तंबु ठोकतो. कारण एकच कि त्यामानाने नाशिकची उन्हं ही कमी तापदायक. पण जाळायचं म्हटलं कि थोडं जाळु जास्त,जाळु असं काही होतं नाही. उगा अापल्या मनाची समजुत दुसरं काय. खरी धमाल स्टाईल असते ती तरुणांची.त्यांच्या टोप्यांच्या त-हा, गाॅगल्सच्या त-हा, स्कार्फच्या त-हा सगळंच त-हेवाईक. अशा उन्हात दिंडी आणि पालख्यांचे भोई दिसतात तसे नोकरी शोधणारे सुटबूटधारी पण दिसतात.  दोघांचा शोध शाश्वत. मग ह्या चालणा-यांना नेमका कोणता विचार अखंड चालवत ठेवतो? असा विचार मी नेहमी करतो. मग ह्या निष्कर्षावर येतो की सकाळी मागे असणारी सावली दुपार कलंडता कलंडता आपल्या समोर पसरते. अशावेळी चालताना एक सुख असं ही असेल की आज नाही कोणाला पण सुर्याला तर मागे टाकलं आपण.
गावाकडे छतावर धारं असायची. म्हणजे बंद छता ऐवजी जाळी असायची. उन्हाळी सुटीत दुपारी पडल्या पडल्या त्या घरात ढगांमुळे उन सावलीचे गालिचांची नक्षी तयार व्हायची. तशी नक्षीदार उन्हं आता दुर्मिळच.
भर उन्हात सगळीकडे रुक्षपणा, डोळे किलकिले करायला लावणारा भक्क उजेड असतो तेव्हा एखाद्या नाक्यावरचा गुलमोहराचा लाल केशरी रंग डोळ्यात भरुन राहतो. असं वाटत राहतं कि जागोजागी पसरलेली ही अाग ह्या गुलमोहरानेच पसरवली अाहे. एखादं झाड पेटवुन द्यावं तसा हा गुलमोहर पेटुन पिवळसर केशरीलाल रंगी ज्वाळांसारखा लपलपतांना दिसतो. पण कधी ह्याच दाहात त्या झाडाखाली सावलीला गारवा अनुभवत उभं राहिल्यावर अापल्याला कळतं कि कदाचित असं ही असु शकेल कि जसं महादेवाने विष प्राशन करुन सृष्टीचा दाह कमी केला होता , जसा येशूने जगाचे घाव अापल्या अंगावर सोसले अाणि क्रुसाच्या अाधीन झाला अगदी तसंच ही अाजुबाजुला जी अाग पसरलीय ती गुलमोहराने अंगावर झेलुन घेतली अाहे. अाता जो दाह अाहे तो त्यामानाने जरा कमीच अाहे ह्याला कारण अाहे तो हा गुलमोहरच. गैरसमज गैरसमज म्हणतात तो हाच का ?


- प्राजक्त 
http://epaperbeta.timesofindia.com/Article.aspx?eid=31833&articlexml=04042015005005
मटा ४/४/१५

अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...