Sunday, September 6, 2015

बॅकबेंचर : ८ बॅकबेंचर मोरया


मच्छी बाजारात जसा गोंधळ व्हावा तसा गोंधळ चालु होता.पण तरी अासमंतात चैतन्य होतं. असंख्य गराड्यातुन दुकानदार हात उंचावत गळ्याच्या शिरा ताणत अोरडत होते. छोट्या छोट्या पाय-या करुन त्यावर शाळेतली मुलं रांगेत उभी करावी तशा रांगेत मुर्त्या ठेवलेल्या होत्या. " घ्या नवीन स्टाईलवाला जय मल्हार घ्या" , " घ्या पीळदार बाहुबली घ्या" ,दबंग नको असेल तर सिंघम घ्या"  काहीकाळ मी स्वत:ला प्रश्न केला कि मी ज्या कामासाठी अालोय तिथेच पोहोचलोय कि चुकलोय ? जेव्हा सगळीकडेच चूक दिसु लागते तेव्हा कालांतराने स्वत:च्या बरोबर असण्यावर शंका निर्माण होते. जरा मागे सरकलो तर मागच्या हात गाड्यावरचं केवड्याच्या पानाचा काटा कोपराला टोचला. अगरबत्तीचा वास दरवळत होता, पाच भाज्याचा वाटा, पुजा सामान, पितांबर , रेडीमेड मोदक, बॅटरी अॉपरेटेड चक्र, थर्माकॉलचं मखर, चांदीचा वर्ख असलेला कळस काय नव्हत त्या रस्त्याच्या कडेला. ह्मम ! रस्ता ? रस्ता राहिलाच नव्हता तो अाता. एखाद्या गाडीवाल्याने गाडी घातली तर तोच शरमेने मान खाली घालुन कसाबसा वाट काढत अपराधी भावनेने तिथुन जात होता.सगळीकडे चूक असेल तर तुमचं बरोबर वागणं शंकास्पद ठरतं.पुन:प्रत्यय. 

अाधी मुद्द्यात हात घालु असं ठरवुन मुर्ती घ्यायची ठरवली. कसाबसा गर्दीतुन वाट काढत दोन पावलंं स्थिर ठेवतील अशी जागा शोधुन मी समोरच्या मुर्त्यांमधुन कोणता देव घरी न्यायचा याचा 'चॉईस' करायला लागलो. "देवा रे, मीच का ? माझ्या बरोबरच का घडतं असं? त्या अट्टल चोराला सगळं माफ मग सुख देतांना माझी निवड का नाही करत तू " असं ज्याला लोक विचारतात तीच लोकं अाता त्या देवाची निवड करत होते. मग पाच हजार जास्त होतात , तीन हजार ठिक अाहे, इतकुसा तर अाहे , रंग जाणार नाही ना, भंगलेली अाहे का ? सोंड नक्की उजवीकडे अाहे कि डावी कडे वगैरे शंभर चौकशी वजा भावतोल अाजुबाजुला घडत होता. विचार अाला भक्त निवडण्यात देवाने इतक्या चाळण्या लावल्या असत्या तर नास्तिकता प्रमुख धर्म झाला असता. " नीट बुडेल ना ?" ह्या प्रश्नाने मी माझ्याच मुठी अावळल्या अाणी परत अागतिकपणे राग गिळुन शांत उभा राहिलो. 
दगडूशेठ, लोडाला रेलुन बसलेला, उंदरासोबत सिसॉ खेळणारा, बालाजी, विठ्ठलरुप, साईरुप, छत्रपती शिवाजीरुप अशा अनेक रुपांचे लहानथोर मुलांचे वर्ग भरावे तशा मुर्त्या समोर शहाण्या मुलांसारख्या बसल्या होत्या. प्रत्येकाच्या हाताला 'प्राईज टॅग' होता. ह्या वर्गाच्या सगळ्यात शेवटी माझी नजर स्थिरावली. 
शेवटच्या बेंचवर. अाजुबाजुच्या गोंगाटापासुन अलिप्त, कोणी मागितला नाही म्हणुन अाशिर्वाद मुद्रा न देणारा , लहानपणी मुनिमजींचा लिहायचा टेबल असायचा तशा लहानशा टेबलवर चोपडीवर काहीतरी वाचत बसलेली एक उंदराची निरागस मुर्ती. अाणि तो जे वाचतोय ते तन्मतेने ऎकत बसलेली श्रीमुर्ती बॅकबेंचवर सुट्टीच्या दिवशी अभ्यासात मग्न. सोंडेंची दिशा, हातात मोदक , अाशिर्वादाचा हात इत्यादी 'फॉरमॅलिटी' न पाळणारा , बॅकबेंचरचा नियम असलेला ' नियम धाब्यावर' हा नियम पाळणारी मुर्ती. 
कोणताही मोलभाव न करता. तो बॅकबेंचर मी त्याच्या ऎकण्यात व्यत्यय येणार नाही इतक्या अलगद हाताने घरी अाणला.अाणि त्याच्या कामात खोळंबा नको म्हणुन खुसफुसत्या अावाजात स्वागत म्हणुन म्हणालो "गणपती बाप्पा मोरया"

- प्राजक्त

Sunday, August 23, 2015

बॅक बेंचर्स : ६ अायझॅक

वस्तुमान असलेल्या कोणत्याही दोन वस्तूंच्या एकमेकांकडे आकर्षिल्या जाण्याच्या प्रवृत्तीला गुरुत्वाकर्षण असे म्हणतात. उदाहरणार्थ हे डस्टर जर मी एक विशिष्ट बल लावुन फेकलं तर एका सरळ रेषेत जाऊन जसे जसे ते बल कमी होईल तसे तसे ते खाली अोढले जाईल अाणि शेवटी खाली पडेल. धाssssड ! " शेवटच्या बेंचवरच्या अायझॅकच्या डोक्यात डस्टर जाऊन पडलं. त्याचं नाव अायझॅक नव्हतं . पण ते नाव ह्याच प्रसंगामुळे पडलं. समस्त भुतलावरच्या गणित अाणि विज्ञानाचे मास्तर जर मास्तर नसते तर थाळीफेक, भालाफेक,नेमबाजीमध्ये तरबेज असते असा शालेय कालापासुनचा माझा समज दहावीत येता येता तेव्हा दुढ झाला जेव्हा मी एका मास्तराच्या डस्टरपासुन लपायला दप्तराची ढाल केली होती अाणि मास्तरांनी शेजारच्या भितीवरुन डस्टर अादळवुन तो मला बाजुनं खांद्यावर मारला. नंतर हीच क्लृप्ती मी कॅरममध्ये बापरु लागलो.  अशा प्रकारे 'क्लृप्ती' हा शब्द वापरण्याचा माझा या जन्मीचा प्रथम अाणि अंतिम अट्टहास मी इथे केलेला अाहे. जसा गाणितातला साईन,थिटा दैनंदिन जीवनात नेमके कुठे येतात हा माझा कळीचा प्रश्न अाहे तसाच काही मराठीच्या शब्दांबद्दलसुद्धा 'क्लृप्ती' हा त्यातलाच एक शब्द.असो. हा शब्द अाता इथे मी माझ्या बालभारतीच्या मास्तरांना दिलेली अादरांजली समजा. तर असे हे विज्ञान मास्तर एखाद्या कलावंतासारखे विक्षिप्त अाणि लहरी वाटतात. कधी पुर्ण वर्गाची मंडई होते पण यांना फरक पडत नाही. अाणि कधी यांना टाचणीचा अावाज पाहिजे असतो.मुळात अती हुशार , अती कलासक्त लोक हे थोडे लहरीच असतात. अाईनस्टाईनने त्याच्या मांजरीला येजा करायला त्याच्या लॅबच्या दाराला एक मोठं भोक केलं होतं. कलांतरांनं त्या मांजरीला पिल्लु झालं. मग अाईनस्टाईनने त्या भोकाशेजारी छोटं भोक केलं अशी अाख्यायिका अाहे. अाता हे पाहुन जर त्याला कोणी 'तू येडा अाहे का रे' म्हटंल असेलच. तेव्हा पासुन 'तू येडा अाहे का रे?' असं मला कुणी म्हटलं तर राग न येता अभिमान येऊ लागला. तर विषय असा कि गुरुत्वाकर्षणचा धडा शिकवुन झाल्यावर मास्तरांनी शेवटी विचारलं " या प्रकरणाबद्दल कोणाला काही प्रश्न? तर अायझॅकने शेवटच्या बेंचवरुन हातवर केला अाणि म्हणाला "मास्तर, सफरचंद पडल्यामुळे गुरुत्वशक्तीबद्दलचा प्रश्न न्युटनला पडला तर इतके वर्ष त्याची लघवी काय वर उडत होती का? "  पुढे काय झालं हे सांगणे नलगे. त्या दिवसापासुन त्याला अामचं अखिल गाव अयझॅक नावाने अोळखु लागलं


-प्राजक्त २४/०८/२०१५ 



Sunday, August 16, 2015

बॅक बेंचर्स : ५ Whats in the Bench ?


रेल्वेमध्ये बसायला जागा न मिळणं हा काळाने तुमच्यावर हलगर्जीपणा केल्याचा उगवलेला सुड असतो. हो म्हणजे एक लोकल चा विषय सोडुन देऊ कारण तिथे मुळातच गर्दी असते. चाळीसेक हजार लोकांसाठी ती केलेली सुविधा होती अाता चाळीसेक लाख लोक 'सुविधा' उपभोगल्यावर अाणखी काय होणार. तर अशा उगवलेल्या सुडामुळे तुम्हाला रेल्वेच्या दाराशी उभं राहुन करावा लागलेला प्रवास हाही बॅक बाकावर बसल्याचा प्रकार. त्यापेक्षा मास्तरांनी शिक्षा म्हणुन मागल्या बाकावर उभं रहायची शिक्षा दिल्यासारखा प्रकार.
असाच दारात बसुन एक प्रवास सुरु झाला. मध्ये एका ठिकाणी एकजण चालत्या गाडीत सराईतपणे लटकुन मला 'थोडं अडजस्ट' खुणावत बसुन राहिला. मग तो म्हणाला 'घरातलं शेंडेफळ अाणि शाळा कॉलेजातला शेवटच्या बाकावरचा दिसतो'.पांढरे केस,पांढरी दाढी, बाह्या वळलेला चेक्सचा शर्ट, अाता फॅशन नसलेलं ससपेंडर, पट्टीने अाखाव्या तशा ठसठशीत कपाळावर चार रेषा अाणि तंबो-याला चुकून हात लागल्यावर कितीतरी वेळ घुमत राहावा तसा घनगंभीर 'बेस'चा अावाज. असा माणुस मी पहिल्यादा पहात होतो. मी म्हणालो 'हो,कसं अोळखलं?'
" शाळेत अाणि घरात शेवटी असलेले जरा शेफारलेले असतात. म्हणुन निघायला उशीर होतो.अाणि दारात बसावं लागतं.पण याची चिडचिड कमी असते अापल्याला. हो अापल्यालाच म्हणालो मी. कारण दारात बसता येतं.मिळाली जागा तर ठिक नाही तर हवेचा प्रवास.दोन्ही बाजुने जिंकल्याची भावना नाही का?  तुझं नाव सांगु नको,माझं विचारु नको. शेक्सपिअर म्हणतो,नावात काय अाहे? हाच नियम बाकाला पण लागु होतो बरका. बाकात काय अाहे? पहिला-शेवटचा. तुम्ही काय शिकला ते महत्वाचं.बरं पेपर वाचतो का ? मागच्या महिन्यात भारत-पाक युद्ध संपलं. काय वाटतं ? सोड,अाता कोणाला वाटुन काय फायदा म्हणा. "
मी बोलायच्या अात तो बोलत होता जणू त्याला फक्त कुणीतरी ऎकणारं पाहिजे होतं. मी फक्त ऎकायचं ठरवलं. " See, Wars are not won on Field , my son. (हृदयाकडे हात नेत) Real war is here" अातला लढा जिंकला तरच जिंकला तू. अाणि मारायला काय लागतं? सांग, बंदुक?रायफलं? नाही. कोणाला मारायला लागतात फक्त "steady hands".अाणि जेव्हा तू चारीबाजुने घेरला जातो तेव्हा देश,प्रदेश,मान,सन्मान हे सगळं सारुन तू लढतो फक्त स्वत:साठी.जगण्याची लढाई. War is old man talking & young ones dying.मग सगळं जिंकल्यावर हाताशी येतात पडलेल्या इमारती,लाल जमिनी वगैरे. मग वाटतं हे जिंकायला लढलो अापण? मग शोध सुरु होतो काय जिंकल्याचा. पण शोधल्यावर हरवलेलं मिळतं बदलेलं नाही. एनी वे, टू मच फिलॉसोफी इन वन जर्नी. हे सगळं तुला का सांगतोय मी? कारण यू अार अ बॅकबेंचर."
बाहेर धुकं,पाऊस अाणि मधेच घाटात इमरजंसी गाडी थांबली.. तो उतरुन सिगारेट पिऊ लागला. गाडी सुरु झाली. मी त्याला अावाज दिला. त्याने बेफिकीरपणे मला टाटा केलं.मी त्याला नाव विचारलं. त्याने उत्तर दिलं. Nobody, बाकात काय अाहे?  
 
-प्राजक्त १७/०८/१५

Monday, August 10, 2015

बॅकबेंचर : ४ शेवटची खिडकी

बसमध्ये सहसा शेवटी कोणी बसतं नाही. कंडक्टरने मागे जाऊन बसा असा इशारा केला कि ‘शेवटची सीट ? नको रे देवा’ असे यांत्रिक शब्द नेहमीच कानावर पडतात. पण मी बसमध्ये सुद्धा ‘लास्ट बेंचर’च. बसमध्ये पुढे बसलं कि जरावेळाने मागुन कुणीतरी अातला राग दाबत उसन्या-खोट्या अादरयुक्त अवसानात अापल्याला म्हणतं ‘ अहो जरा खिडकी लावता का प्लिज’.  झालं ! संपला कि हो विषय. बंद खिडकीचा प्रवास म्हणजे छळ अाहे. त्यात पावसाळा असेल तर ते पाप ही असु शकतं. नाही ते चित्रपटात वगैरे दाखवतात तसं  अर्ध अंग बाहेर काढुन , तळहातावर अाणि चेह-यावर पावसाचे थेंब झेलत “ अहा अहा रम्य निसर्ग “ असा फालतु थिल्लर दिखाऊपणा नाही म्हणत मी. पण नुसती उघडी खिडकी , मागे जाणारं जग अाणि अापलाच अापल्याशी चालेल्ला ‘ ते बघ , हे बघ,  हे काय असेल ? तिकडे एकदा जाऊया ‘ असा संवाद. हे मजेशीर असतं.
बाहेर डोकावत असतांना मध्येच एखादं लहानसं गावं , पडकी भिंत, गर्द पारंब्यांच झाडं लागतं हे सगळं अगदी हिरवंशार. शेवाळाच्या नावाखाली का होईना पावसात पडक्या दुर्लक्षित भिंतींना पालवीचा मोह होतो. हे पाहुन कधीही विस्मरणात न जाणारा ताजेपणा मनामध्ये भरुन राहतो. कधी कधी निराश व्हायला झालं कि हे क्षण अाठवल्या बरोबर परत रिचार्ज मिळतो. अाणि हे चालु असतांना अापल्यामागे कुणीच नसतं कारण अापणच सर्वात शेवटचे असतो. अाणि त्यामुळे खिडकीतुन येणारा पाऊस, वारा यांचावर फक्त अापलाच निर्विवाद हक्क असतो. ह्या शेवटाबद्दलच्या अोढीचं मुळ खुप जुन्या लहानपणीपासुनच्या प्रसंगांमध्ये अाहे.

वडिल लहानपणी गोष्ट सांगायचे राजपुत्राची. तो तलवार घेऊन निघतो वाटेत त्याला कोण कोण भेटतं त्यांना तो सवयीने मदत करतो अाणि ते लोक अानंदी होऊन राजपुत्राला अशी एकएक जादुई वस्तु देतात ज्याचा फायदा राजपुत्राला पुढे राक्षसासोबत लढतांना होणार असतो. कमीत कमी शंभरेक वेळा ही गोष्ट ऎकली असेल पण दरवेळी नवे प्रश्न पडायचे अाणि नेहमी त्याची मजेशीर उत्तरं मिळायची. गोष्टीच्या शेवटी एक वाक्य ठरलेलं असायचं ‘… अाणि ‘शेवटी' सगळं ठिक झालं.’ मी म्हणायचो ‘ पण एखादा दुसरा राजपुत्र असता अाणि शेवटी ठिक नसतं झालं तर?’. उत्तर यायचं ‘कधी कधी सुरवात-मध्य बिघडु शकतो पण शेवट ठिक नसेल तर तो शेवट नसतो.'

-प्राजक्त ९ अॉगस्ट २०१५


Saturday, August 1, 2015

बॅकबेंचर्स : ३ डोपलर इफेक्ट

"कल्पना करा तुम्ही रस्त्याच्याकडेला ऊभे आहात लांबुन येणा-या गाडीकडे एकटक बघताय. गाडी समोरुन भरधाव जाते. वेगाकडे लक्ष दिलं तर कळेल की पलीकडून येणारी गाडी समोरुन जातांना वेगाच्या मानाने भुर्रकन निघुन जाते. हेच आता रस्त्यापासुन फर्लाँगभर दुर उभं रहा. आता तो वेग कमी असेल. तीच गाडी आता अम्ब्युलंस आहे अस समजा, आता आवाजातुन अंतराची गंमत कळेल. ह्याला डोपलर इफेक्ट म्हणतात. बाकीचं उद्या बघु" विज्ञानाचा तास संपला. तेव्हापासुन मला खिडकीतून येत्या जात्या गाड्यांना बघायचा छंद लागला. रविवारीची दुपार अर्ध्यावर सोडुन दिलेल्या लिंगोरचाच्या खेळासारखी निपचीत वाटायची. अशावेळी आमचा जादा तास असायचा. त्यावेळी लांबुन येणा-या बैलगाडीच्या डोपलर इफेक्टमध्ये रमुन जायला व्हायचं.
लास्टबेंचवर बसायचे हे काही फायदे. म्हणजे खिडकीच्या बाहेर रमता येतं, भुक लागेल तेव्हा डबा खाता येतो, सुचेल तेव्हा कविता लिहता येते, वहीच्या मागल्या पानावर फुल्या-गोलचा खेळ खेळता येतो. आणि इतकं करुन परत समोर काय शिकवताय त्याकडे लक्षही देता येतं. किंवा तसं निदान दाखवता तरी येतं. हा शेवटचा फायदा खरंच फायदा आहे की तोटा हा वेगळा भाग आहे.
पण दुरुन जर कोणाला तो तोटा वाटत असला तरी जवळून पाहीलं तर कळेल की तो फायदा आहे. ती थियरी तर हे प्रॅक्टिकल. आपलं ते डोपलर इफेक्ट ? हां बरोबर.
ठरवुन खुप लक्ष दिलं ना कि डोक्याला झिणझण्या येतात आणि डोक्यात काही घुसेनासं होतं. दर्यावरची रेती कशी जितकी घट्ट पकडाल तितकी निसटते ना तशी. एकदा जीव धोक्यात घालुन पहिल्या बेंचवर बसायचा योग आला होता. त्यात इतिहासाचा तास. अरेरेरे महाराज आणि मावळे दिल्लीतून निसटले तेव्हा काय ती धुळदाण..., काय तो टापांचा आवाज...  त्यात अगदी पुढे रस्त्याच्याकडेला असल्यासारखं पुढच्या बेंचवर बसलेलो त्यामुळे समोरुन ते कधी भर्रकन् गेले ते कळालंच नाही इतकं अंगावर आलं सगळं. तेव्हा वाटलं हेच मागे बसलो असतो तर लांबुन येणारी, लांब जाणारी घौडदौड दिसली असती.
अजुन अाठवतं....तो विज्ञानाच्या मास्तरांचा शेवटचा तास होता. मास्तर निवृत्त होणार होते. टोपीखाली कानशीलाची पांढरी चांदी लपवत, पाणावल्या डोळ्यांनी , थरथरत्या हाताने फळ्यावर मास्तरांनी लिहले 'निरोप'. मग पुढे चाळीसेक मिनीटं मास्तर भुतकाळ-भविष्यकाळाबद्दल बोलत होते. जाता जाता म्हणाले " ते करायचं राहीलं आणि हे करणार ह्या दोन विचारांमध्ये जे भुर्रकन निघुन जात ना मुलांनो ते म्हणजे ...? " " आयुष्य ! " सगळी मुलं एकसुरात ओरडली.
" अहं.... चूक . ते करायचं राहीलं आणि हे करणार ह्या दोन विचारांमध्ये जो भुर्रकन निघुन जातो तो म्हणजे ... डोपलर इफेक्ट."
घंटा झाली. मास्तर काठी टेकवत निघुन गेले. काठी टेकवायचा टक्कंटक्कं आवाज जवळुन दुरदुर जात राहिला.

 - प्राजक्त / ०१ / ०८ /१५



Thursday, July 23, 2015

बॅकबेंचर्स : २. ज्याचा त्याचा विठ्ठल

प्रिय तुक्या ,

  सनविवि  अरे हो नव्हत लिहायचं ना. काय म्हणतंय शहर लेका ? माझं कॉलेज अजुन सुरु नाही झालं. म्हणजे कागदोपत्री झालंही असेल पण इकडे पंचायतीच्या निवडणुकीच्या धामधुमीत अापल्या शाळा कॉलेजांच्या बिल्डींगी दिल्या अाहे. त्यामुळे इथे सध्या फक्त राजकीय वर्ग भरताय. माझ्या चांगल्या अक्षरामुळे मला याद्या करायला बसवतात कधीकधी. मी अापल्या वर्गाच्याच शेवटच्या बेंचवर बसुन ते काम करतोय सध्या. खिडकीमधुन टोळक्यांच्या गप्पा अाणि सुध्या चहावाल्याच्या टपरीच्या रेडिअोमधले रफी-मेंहदी हसनचे अमृतगाणी ऎकु येतात. तुला सांगतो मला जाम डाऊट अाहे कि रफीची गाणी गुणगुणत हा चहा बनवतो म्हणुन याचा चहाला वेगळी चव अाहे, लय अाहे. तो सांगतो ते अालं-इलायची सब झुट ! लास्टबेंच वर बसुन याद्या लिहता लिहता टोळक्यांच्या गप्पा ऎकुन एक नक्की कि काही लोक बिनबुडाचे तांबे अाहेत. 
परवा अापल्या शाळेच्या पटांगणात एका दिंडीचा थांबा होता. किर्तन-हरिपाठाच्या तालावर मी नकळत अाठ पानं लिहली बोल. जरा वेळाने अचानक पाऊस अाला सगळी लोकं झाडाच्या अाडोशाला किंवा तंबुत घुसली. ह्या गदारोळात पांडुरंगाची तीनेक फुटी पितळी मुर्ती तशीच पाऊसात कटीवर हात ठेऊन मनसोक्त भिजत होती. मी भरपावसात जाऊन सुध्याच्या टपरीवरुन एक चहा अाणि येता येता विठ्ठलाची मुर्ती उचलुन अाणली. अाता लास्ट बेंचच्या खिडकीतुन मी अाणि पांडुरंग निथळत बाहेर बाहेरचा पाऊस डोळ्यात साठवत होतो अाणि सोबत चहाची वाफ. तुका म्हणे आम्ही बैसलों शेजारीं । करील तें हरी पाहों आतां । तंबूत टाळगाथा सुरु केली होती कुणीतरी. काय योग !
अापल्या लास्टबेंच वर विठ्ठलाला बसवलं,लेका. अाहेस कुठे ? त्याच्या शेजारुन खिडकीत पाहतांना 'तो वरतुन बघतांना' कसा बघत असेल याचा फिल अाला. पाऊस, तंबु, पलिकडे टपरीवर चहाचा ढग, छत्रीत डोकं लपल्यामुळे पाय असलेल्या छत्र्या झपझप चालतांना दिसत होत्या. अाहे कि नाही जादु ? तू विचारतो ना अनूभुती म्हणजे काय हेच ते. तेच हे. मग काय गणिताचा तास संपावा तसा जरावेळाने पाऊस संपला. अाणि मी निमूटपणे ज्याचा विठ्ठल त्यांना सुपूर्द करुन अालो.तिथे अाजीबाईं त्यांच्या नातवाचं डोकं पदराने पुसत होत्या. मी विठ्ठल दिल्यावर नातवाला सारुन त्यांनी ह्या माऊलीला पुसायला घेतलं.शेवटी ज्याचा त्याचा विठ्ठल. काय !


तुझा 
माऊल्या

Wednesday, July 15, 2015

बॅकबेंचर्स - १ टॅंजंट

प्रस्तावना : दोन गावाकडचे घनिष्ठ मित्र. त्यातला एक शहराकडे शिकायला गेला अाहे. एक गावातच. त्याच्यातला ह्या पत्रव्यवहाराची मालिका. अाणि मागल्या बेचंवरुन उलगडणारे त्याचे भावविश्व 


प्रिय माऊल्या , 

सनविवि लिहायचा नियम शाळेत मारोती मास्तरांनी सांगितला असला तरी मला तो अापल्यात पाळायची गरज नाही वाटत. पण बरका तुझी पत्राची कल्पना भन्नाट अाहे. अापण एकमेकांना नेहमी पत्रच लिहित जाऊ. अाज कॉलेजाचा पहिला दिवस संपल्या संपल्या खोलीवर येऊन तुला पत्र लिहायला घेतलं. तू इथं पाहिजे होता. इथं शहरात पोरंसुद्धा जंटलमंटल दिसतात म्हणुन मी अापला गुमान मागल्या बेंचावर जाऊन बसलो. दिवसभर फक्त सर लोकांनी अोळखीपाळखी करुन घेतल्या. इथं खिडकीतुन काहीच दिसत नाही. अापल्या शाळेतल्या प्रत्येक खिडकीतुन गुलमोहर, सावळ्या अाईचं देऊळ, शिवाईची टेकडी ह्यापैकी काहीतरी दिसायचंच. इथंल्या खिडक्यांमधुन पलिकडच्या इमारतीची खिडकी, गिरणीची चिमणी अाणि जास्त डोकावुन पाहिलं तर फुंकर मारल्यावर पळुन जाणा-या मुंग्यासारख्या सिग्नलवरच्या गाडया दिसतात. पहिल्या दिवस होता म्हणुन जरा टरकलीच होती. इथले वर्ग खुप मोठे अाहे. एखाद्या मास्तराने लक्ष नाही म्हणुन खडु मारला तर पोहचेल कि नाही हि शंकाच वाटते. तुला पाठवलेलं पत्र घरी पोहोयच्या अात पोस्टातुन घेऊन टाकत जाशील का ? नाही म्हणजे इथल्या पोरींबद्दल सांगायचं होतं. तू इंग्लिश शिकवायचा त्यामुळे फिजिक्स,केमेस्ट्री समजायला सोप्प जातंय. तुझं कॉलेज सुरु झालं का ? तू सोबतीला नसल्यामुळे कोणताच वर्ग बुडवायचा नाही ठरवलंय. तू इथं पाहिजे होता. सोबत असता तर जोडीने 'टॅंजंट' मारला असता. खोलीवर पार्टनर म्हणुन एक 'जेजे'चा पोरगा अाहे. जादु अाहे जादू. कसली चित्र काढतो. पण कमी बोलतो. जे बोलतो ते तुझ्यासारखं.माझ्या तर साला एकदम टॅंजंट जातं कधी कधी. म्हणजे निर्वात, क्षितीज, अाणीबाणी, सुर्यडुबी, लॅंपपोस्ट असं सगळं बोलतो तो. काल शेवटल्या बेंचावर माझ्या शेजारी एक पोरगा होता त्याने चालु वर्गात तंबाखु मळली. मला ही म्हणाला 'डबल मळू का?' खरं सांगतो टरकली माझी त्यात पलिकडची दोन वेण्याची.... नाही ते नंतर सांगतो. गोदीला वासरु झालं का? उत्तराची वाट पाहतोय. पुढल्या अाठवड्यापर्यंत लिही. सोप्पं लिही.
इथं सगळं ठिक अाहे. वर्ग तसेच पण थोडे मोठे, गोंधळ तोच पण अनोळखी, अाणि शेवटचा बेंच तोच पण शेजारी तू नाही.

तुझा दोस्त
तुक्या

ताक : सोबत जेजेवाल्या मित्राचं एक छोटं स्केच पाठवतोय. जादू रे साला जादू.


- प्राजक्त १५ जुलै १५

(दै सामना २५ जुलै फुलोरा )

अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...