Thursday, January 7, 2016

बॅकबेंचर्स २५ जिप्सी ( दै सामना ९ जानेवारी १६)

"हि मागची पोरं म्हणजे निव्वळ भटकी जिप्सी ,अभ्यास नको यांना " हा नेहमीचा अपमान नंतर अाम्हाला हळुहळु अपमान वाटेनासा झाला.
शाळा नेमकी कधी सुरु झाली ह्याचा मागोवा घेतला तर प्रत्येकाचं कागदी विमान एका गाण्याच्या झाडावर येऊन अडकेल किंवा विसावेल ते गाणं म्हणजे "सांग सांग भोलानाथ , पाऊस पडेल का ?" शनिवारची संध्याकाळ असो , गणिताच्या पेपरच्या अादला दिवस असो , उन्हाळ्याच्या /दिवाळीच्या सुट्टीचा शेवटचा दिवस असो ..ह्या दिवसांत राष्ट्रगीत म्हणावं तसं शाळेत असतांना काहीतरी जादू व्हावी अाणि उद्या शाळा नसावी हि इच्छा व्यक्त करायला अाम्ही मुलं कर्कश अावाजात ढगातल्या देवाला एेकु जावं अशा अार्ततेने "सांग सांग भोलानाथ , पाऊस पडेल का ?' गायचो.

 " बरंका, भाषेच्या चर्‍हाटाला , कधीही अंत नसतो  | सारखी बडबड करणारा , चुकूनही संत नसतो || " असं अामचे मास्तर वर्गातल्या मागच्या रांगेकडे डोळे वटारुन म्हणायचे. पण हि बडबड 'चिऊताई चिऊताई दार उघड कविता शिकवतांना एकदम शांत होती हे अावर्जुन अाठवतं. त्या दिवशी घरी गेलो तेव्हा दार वाजवतांना 'अाई अालोय ग' असं सवयीने बोंबलण्याच्याएेवजी 'चिऊताई चिऊताई दार उघड' असं घशाची निळसर शीर टपटपेपर्यत अोरडल्याचंही अाठवतं. 
लहान असतांना मी रुसुन बसल्यावर माझी समजुत काढतांना हळुहळु अावाजात अाणि नंतर वेग अाणि स्वर वाढवत ,दबक्या पावलांनी येत वडिल 'टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले' म्हणत गुदगुल्या करायचे. त्यात 'प्राजक्ताची फुssssले' याच्यावर त्यांचा विशेष जोर असायचा.
 मागच्या बाकासहित सगऴयाच बुडत्यांना चाचणी निकालच्या नंतर ' मोर धुंद नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं?  । कोकीळ सुंदर गातो म्हणून आपण का खिन्न व्हायचं ? । तुलना करित बसायचं नसतं  , प्रत्येकाचं वेगळेपण असतं !' असं सांगणा-या मास्तरिण बाईंच्या चेह-याच रेष न रेष दिसते.  सकाळी सकाळी जेव्हा  अंगावरचं पांघरुण काढुन 'चला शाळेची वेळ होईल घाई करा , उठा ! ' असा हुकूम व्हायचा तेव्हा शेवटचे पाच मिनीटाची अधाशी झोप उपभोगतांना ' हो उठलेलोच अाहे' अाणि 'प्रत्यक्ष उठणे' ह्या दोघांच्या मधल्यावेळेत हाॅलमधुन रेडिअोतुन "दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचुन झुलायचेsss " हे एेकु यायचं तेव्हा वाटायचं उजाडलंय' कधी रविवारी दुपारीची झोप रेडिअोच्याच ' डोळ्यात सांजवेळी, आणू नकोस पाणी । त्या दूरच्या दिव्यांना, सांगू नको कहाणी ' ह्या स्वरांनी चळावायची.
शाळेतल्या हाफ चड्डया फुल झाल्या अाणि 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं' ह्या अोळींनी भाबड्या जिवाला अाजुबाजुची हिरवळ बघायची हिम्मत अाली. हिम्मत फळाला नाही लागली तेव्हा 'भातुकलीच्या खेळामधले राजा अाणिक राणी' ने अाधार दिला.
मरण्यावरही शतदा प्रेम करायला लावणारा हा 'अानंदयात्री' जो नकळत्या वयापासुन नेहमीच जवळ होता तो 'गेला' तेव्हा अचानक मागच्या बाकावरची माझ्या शेजारची जागा कायमची अोकीबोकी झाल्या सारखं वाटलं. अाम्हा जिप्सीच्या टोळक्यातुन एक जिप्सी उठुन निघुन गेला.

- प्राजक्त 

Friday, January 1, 2016

रुक्माईच्या सावलीत : मटा मैफल २ जानेवारी १६

" किती ही काम येऊ , माझ्याच्यानं उरकतं नीट व्यवस्थित. आषाढाला तर केवढी लेकरं येतात! , एकपण जेवल्या बिगर जात नाही. तसंही रायांना पण आवडणार नाई कुणी उपाशी पोटी माघारी गेलं तर" अठ्ठावीस युगांच्या अनुभवामुळे जरास्सं रापलेलं विस्तिर्ण कपाळ, कपाळी रुपया शिक्क्या इतकं भलं मोठं कुंकू , त्यावर ठसठशीत तीन रेषा. पांढ-या केसांवर विसावलेला पदर, ठराविक वेळेनंतर डोक्यावरचं पदर सारखा करण्याची लकब अाणि पदर सारखा करतांना येणा-या बांगड्यांची किण्किण सावरत रूक्माई बोलत होती.

झालं असं कि पंढरीत गेलो तेव्हा नेहमीची वाट मोडुन आधी रुख्मायकडे गेलो. दिंडीरवनातुन रुक्मीणी रुसुन आली आणि लखुबाई झाली. मग लखुबाईला कुणी रुख्माई म्हणेल, कुणी रखुमाई, कुणी रुक्मीणीच. शांत बसुन राहीलो. वेळ कसा गेला कळालं नाही. भान आलं तेव्हा दर्शन वेळ संपुन  मंदिर दरवाजे बंद झाले होते. मी डावीकडच्या कोप-यातल्या मिठीभर मोठ्या दगडी खांबा पल्याड असल्याने कोणाला दिसलो नाही. थोडं इकडे तिकडे वाट शोधून शेवटी मी गाभा-यात शिरलो. तिथे जास्त आश्वस्थ ,शांत वाटायला लागलं मग विचार आला इथेच पडी टाकु आणि पहाटे काकडा आटोपून परतीला निघु. 

झोपण्याआधी परवानगी घ्यावी म्हणुन म्हटलं " रखुमाई , आज रात्रीपुरती विठ्ठल होती का? म्हणजे झोपायला आजचा आसरा देती का ?" माई म्हणाली ," वा रे लेका ! आसरा देणार मी आणि तरी 'विठ्ठल होता का?' विचारुन शेवटी सगळं पुण्य त्यांच्या खात्यात ना ? लई शाहजोग झालाय हो तू " मी  म्हणालो " तसं नाही आई , आपली एक पद्धत म्हणुन बोललो ग " मग ती 'गम्मत केली रे' अशा अर्थाने डोळे मिचकावत डोकीपदर सारखा करत हसली. तिथेच कोप-यात घोंगडी आंथरुन देत म्हणाली " हां , तू पड इथं. संकोचु नको .तो वर मी काहीतरी खायचं पाहते तुझं" मला भूक लागलीय हे तिला कसं कळालं वगैरे असले फालतू प्रश्न मला पडले नाही. पण जे प्रश्न पडले होते ते तिच्या नजरेतून सुटले नाही. ती पीठ मळत म्हणाली 'हां बोल बोल ...कशाला अडखळलाय? " 
मी विचारलं "माई, फोटो,ग्रंथ-गाथा,आख्यायिका-भजनात सगळीकडे विठ्ठल-रुख्माई असंच ऐकलं - वाचलंय पण पंढरीत तुम्ही वेगळाले का? "

" बाईईई..., एवढ्याशा जीवाला पेच किती रे ?  डोक्यात इतक्या बाभळी ठेऊ नये. चल ,आधी जेवून घे" असं म्हणत रुख्माई चुलीत निखारे फुंकत आणि पुनव-अवस,पुनव-अवस करत भाक-या आलथ्या पालथ्या करत बोलायला लागली . " इतक्या वेळ डोक्यात बाभळ ठेउ नये. पिकेस्तोवर काटा पायात ठेउ नये. बघं कसंय थोडं चिडले होते त्यांच्या वर एकदा उगा. म्हणुन तडक रुसुन मागे जाऊन बसले. खरं सांगु का हे रुसणं-बिसणं निमित्त होतं .खरं माझ्या डोक्यात होतं कि कृष्ण जन्माच्या वेळी मी रुक्मीणी होते पण जगात नाव त्या राधीचंच झालं. मनात सुप्त इच्छा होती कि असं प्राकृतपेक्षा नावारुपाने युगानुयुगं राया सोबत नाव जोडुन पहावं.भले मग लांब राहु पण जसं राधाकृष्ण आहे तसं विठ्ठोबा-रखुमाई पाहु. मग तसं झालंही . पण तुला सांगते आपल्याला चांदण्यांचं अप्रुप पण त्यासाठी आभाळाला अंधार भोगावा लागतो तसंय हे. माझ्या वाटेला नावासकट जगणं अालं पण ती राधी काय भोगत असेल तिची तिच जाणो. मी मागे बसुन सगळं बघत असते. हेऽऽ गर्दीचे लोट पंढरीरायांच्या मागच्या दरवाजातुन माझ्या दारी येतात . त्याच्या चेह-यावरचं भारावलंपण लपत नाही. माझ्यासमोर येऊनही त्यांचं रुप पाहिल्याचा आनंद त्यांच्या चेह-यांवर दिसतो मला. 'तिथं' गेलं कि भारावणं अालंच मग तो निळसर कान्हा असो कि काळा विठू. कधी कधी हेच वैष्णव लोक भजनात दंग होऊन तल्लीन होतात अाणि नाचु लागतात तेव्हा त्या गर्दीत कोणाच्या तरी मागे येऊन विठुराया डोकावुन गेल्याचा भास होतो . नाचता नाचता कंबरेवर हात ठेऊन उंच उड्या मारत 'ठ्ठला ईठ्ठला' ह्या तालावर नाचणारे बालगोपाल पाहिले कि डोळ्यासमोर सहस्त्र पांडुरंग असल्याचा भास होतो. भास ? " मी म्हणालो " पण माई , देवाला राग,लोभ नसतो ना मग तू तरी चिडली कशी ?" " रुख्माई हसली म्हणाली , दैवबिव वलंय सारुन बरं का चिडता येतं , अंतर असलं तरच अावेगाने भिडता येतं. दोन बोटांमध्ये अंतर अाहे म्हणुन सख्याची बोटं त्यात मावतात अाणि एकवेळ सांधता येते हे द्वापारयुगात शिकवलंय यांनीच मला . आणि तेव्हा शिकले ही बरंच . वारक-यांची भरल्या डोळ्यांची गर्दी माझ्या समोर येते.तेव्हा त्याच्या भारावल्या डोळ्यात त्यांनी अात्ताच पाहुन अालेला पांडुरंग तरळत राहतो. मग मी बुचकाळ्यात पडते. कारण त्यांच्या डोळ्यात जर पांडुरंग दिसतो तर मी म्हणजे पांडुरंग कि पांडुरंग म्हणजे मी? मग मी उभ्या उभ्या पायच्या अंगठ्याने खाली वीट चपापते. वीट असली तर ? पण इतक्या वर्षात ठिसुळ झालेली वीट आता असेल नसेल ?   मग वैष्णवांनी टेकवलेलं डोकं उचलंल कि मी त्याच्या डोळ्यातले सावळे ढग पाहुन मनोमन त्याच्या पाया पडते.हे  असं सगळं समाधान लाभतं आणि  असा सगळा त्रासही..." 

जेवणखान आटोपत हात धुवून निवांत बसतांना मी म्हटलं " आई ? जर द्वापारवेळी इतका त्रास झाला होता तर आता पुन्हा त्यालाच का निवडावं ग तू  ? " 

रुख्माई म्हणाली " पुन्हा ? पुन्हा वगैरे असं काही नसतं रे. पारिजातकाच्या खाली बसल्यावर हि ओंजळीत फुलं पडणार आणि झाडाखाली बसलेला नसाल तरी वा-याचा झुळूकेने ते ओंजळीत येणारंच. एकदा झोकुन द्यायचं म्हटलं कि तीर काय आणि तळ काय. 
मुकामार 'निळा'शार निबर होत 'काळा' होतो. "
 इतकंच.

-प्राजक्त देशमुख




बॅकबेंचर्स : २४ कोलाज ( सामना २/०१/१६)

रात्री मोकळ्या अाकाशाखाली पहुडलो अमावस्या होती.दुख:अाणि अमावस्या जास्त काळ टिकत नाही मास्तर म्हणायचे. टिकत वरुन अाठवलं , त्याच्या अारशाला टिकली लावलेली अाहे ती त्याने काढली नाही कधीच तिची अाठवण म्हणुन राहु दिली अाहे. अारशावरुन अाठवलं, अाताशा बाजारात पुर्वी सारखे हसतमुख अारसे मिळत नाही म्हणे ? बाजारावरुन अाठवलं , सगळ्याचाच बाजार मांडलाय अाजकाल ...मैत्रीचा,भावनेचा, नात्यांचा सगळाच. नात्यांवरुन अाठवलं, परवा जाॅगिंग ट्रॅकवर एक भणंग माणुस दिसला शुन्यात नजर लावुन बसला होता. कुणीतरी म्हणे तो जिच्यासाठी इथे अाला ती कधीच त्याची नव्हतीच. जॉगिंग ट्रॅक वरुन अाठवलं , अाजकाल सगळेच पळताय कशाचा तरी मागे ,काही तरी शोधायला ,काही तरी पकडायला , कोणापासुन तरी लांब जायला पण पळताय फक्त. कुठे जायचं माहित नाही पण डोक्यात एकच मंत्र घुमत असावा त्यांच्या कि पळत रहा. मंत्रावरुन अाठवलं अामचे एक सर होते त्यांनी एक मंत्र दिला होता " हा हि काळ निघुन जाईल" हा मंत्र लिहुन ठेवा असं म्हणायचे ते अाणि अति दु:खात असला किंवा अति अानंदाच्या माजात असला कि हा मंत्र एकदा वाचा असं ते सांगायचे. मी त्याला महामृत्यंजय मंत्र म्हणायचो. दु:खावरुन अाठवलं. राधेचं पुढे काय झालं हे शोधता येईल , कृष्णाचं काय झालं हे माहितीच अाहे पण अनय पुढे काय झालं हे कुणी शोधलंय का ? त्याचं दु:ख मोठ कि त्याचं सुख? कृष्णावरुन अाठवलं , काल मुर्तीवाल्याची एक हातगाडी रस्त्यावरुन जात होती सगळ्या मुर्त्यांवर कपडा टाकुन ठेवला होता , कदाचित गोडवुन मधुन दुकानात नेत असावा तो. त्यात नाक्यावरल्या कृष्णाच्या देवळासमोरुन जातांना त्याला एक दगड दिसला नाही अाणि हातगाडी किंचीत वरखाली झाली तेव्हा मीरेच्या मुर्तीच्या हातातली एकतारी खाली पडली.ती त्याला दिसली नाही मला दिसली. अंगावर काटा अाला ती एकतारी मी कृष्णाच्या देवळात नेउन ठेवली तेव्हा कृष्णाच्या डोक्यावरचं जास्वंदीच फुल वारा वाहत नसतांना खाली पडलं. जास्वंदीवरुन अाठवलं एका मित्राचा घराबाहेर खुप जास्वंद लावलेले होते ,त्याला जास्वंद खुप अावडायचा .इतका त्याच्या त्या घराचं नाव पण जास्वंदच होतं. पण जेव्हा मला कळालं कि जास्वंद लावायला त्याने तिथला खुप अाधीपासुनचा बहरलेला गुलमोहर तोडला तेव्हापासुन मी त्याच्या घरी जाणं कमी केलं.गुलमोहर वरुन अाठवलं यंदा ऊन जास्त होतं त्यामुळे गुलमोहराची सावली जास्त थंड जाणवायची त्या झाडाखाली. भगभगत्या उन्हामुळे अचानक झाडाने पेट घेतल्यासारखा दिसतो मला गुलमोहर नेहमी. भगभगण्या वरुन अाठवलं, राणी पद्मिनीने चित्तोडगडात सोळा हजार रजपुत सख्यांसोबत जौहर केला होता तेव्हा त्या तडतडत्या अग्निशिखांमध्ये भगभगतांना कुणी चित्कारही काढला नव्हता. राणी पद्मिनीवरुन अाठवलं अाता प्रत्येकीने जौहर पेटावावा पण त्यांना त्रास देणा-याला त्यात ढकलण्यासाठी स्वत: जळुन जाण्यासाठी नाही. ढकलण्यावरुन अाठवलं मला अाठवी मधुन नववीत ढकलं होतं तेव्हा मास्तरीण बाई म्हणाल्या होत्या अाता तरी अाभ्यास करशील ना रे ? मी तुझ्याघरी नाही सांगणार हं . त्यांचा मुलाने मागच्याच महिन्यात नापास व्हायच्या भितीने अात्महत्या केली हे मला नंतर कळालं. नापास वरुन अाठवलं  पुढच्या अाणि मधल्या बेंचवरचे अभ्यासात पुढे असतात म्हणुन अायुष्यात पण पुढे असतात पण मागच्या बेंचवरचे अभ्यासात जरी मागे असले तरी अायुष्यात मागे कधीच नसतात.



Friday, December 25, 2015

बॅकबेंचर्स : २३ निबंध ( सामना २६ डिंसेबर )

तो पावसाळा अाला कि कागदी होड्या वाटायचा , हिवाळा अाला कि इवलुश्शे हातमोजे वाटायचा, उन्हाळा अाला कि छोट्याशा टोप्या वाटायचा. कुणी ते हसत हसत घेतसे , कुणी प्रश्न नजरेने बघतसे ,कुणी घाबरुन त्याला टाळत असे , कुणी त्याला तुच्छतेने झिडकारत असे पण त्याचा हा नित्यक्रम चालुच होता. पांढरी स्वच्छ दाढी पांढरे अस्ताव्यस्त केस, तेल नसल्याने भुरकट भुरकट. पांढरा स्वच्छ सदरा , भटकुन अाताशा धुरकट धुरकट. 
एकदा असं झालं , एेन उन्हाळात पाऊस अाला . बिचा-याची धांदल उडाली.. मग त्याने छोट्या टोप्यांना पालथं करुन होड्या म्हणुन वाटल्या. नंतर असं झालं एेन हिवाळ्यात रांजण उलथावं तशी उन्हं सांडली त्याने हातमोज्यांची विण उसवुन टोपी केली. एकदा तर एेन पावसाळ्यात कोरडी ठाक थंडी पडली. मग त्याने त्याच्याकडच्या सगळ्या कागदी होड्या शेकोटीत भस्म केल्या अाणि त्याभोवती शेकत बसला.
माणसांच ठिक होतं पण अाता ऋतुंचा पण भरवसा नाही ह्या विचाराने तो व्यथित होता. त्याच्या जवळच्या पोटलीत तो अाताशा तिनही वस्तु जपुन ठेवत असतो. कोणी सांगावं कधी कोणता ऋतु सुरु होईल.
हळुहळु त्यांचा ह्या सगळ्यावरचा विश्वास उडु लागला. आणि फक्त कागदी होड्या बनवण्याचा सपाटा सुरु केला. एक होडी तर खरीखुरी बनवली. आणि तेच घर. दिवसभर त्याच बसायचा. रात्री होडी उपडी करुन त्याखाली झोपायचा. येणाजाणा-यांच्या लेखी तो वेडा होताच, आता ठार वेडा झाला. मग त्याने कुठल्या तरी मरणासन्न अवस्थेत पडलेल्या एका कुत्र्याच्या छोट्या पिल्लाचा जीव वाचवला.आणि आपल्या घासातला घास त्याला काढुन दिला . नंतर एखाद्या नाक्यावरच्या जाहीरातीतल्या पोस्टरवर दिसावं तितकं ते पिलू गुटगुटीत दिसु लागलं. आता तो , त्याच्या होड्या आणि कुत्र्याचं पिलु असे तिघं नांदत होते. त्या कुत्र्याचं नावं ठेवलं हेत पृथ्वी, सगळ्या कागदी होड्यांवर एकच शब्द लिहला होता. ग्लोबल वाॅर्मिंग ग्लोबल वाॅर्मिंग. ग्लोबल वाॅर्मिंग.
" हि मागच्या बाकाची पोरं म्हणजे अगदीच डॅंबिस आहे. आता हा पहा , असा कधी निबंध असतो? ग्लोबल वाॅर्मिंग विषय दिला होता."
मॅडमने त्या बॅकबेंचरच्या निबंधाला शून्य मार्क दिले .



Friday, December 18, 2015

बॅकबेंचर्स : २२ अखिल अाटपाट साहित्य संमेलन

तर झालं असं कि अाटपाट नगरात मराठी साहित्य संमेलन येऊ घातलं होतं. त्या निमित्ताने अध्यक्षांसोबत छोटेखानी चर्चासत्र अायोजित झालं. नगरात मी साहित्यिक असल्याची दबकी चर्चा होती. म्हणुन मला तिथे बोलवलं. चर्चासत्र सुरु झाले. अापापले प्रश्न विचारा असा एक अावाज अाला. सर, तुमचे साहित्य क्षेत्रातले योगदान काय? अध्यक्षश्री वदले " कित्येक साहित्य संमेलानात मी वक्ता म्हणुन गेलोय ,परिसंवादात सहभागी होतो, अनेक साहित्यिकांचे प्रश्न अाणि मुळ म्हणजे साहित्याच्या मुळप्रवाहात नसलेले ज्वलंत प्रश्नांना अाणण्यासंदर्भात मी विचारप्रबोधन करतो" ( माझे कान एेकलेल्या गोष्टींची टोटल लावत बसलेले) दुसरा प्रश्न : सर, तरुणांना मराठी साहित्याकडे वळवण्यासाठी काय करतो अाहोत ? " "तरुण ही अाजची शक्ती अाहे ,तरुणांचे प्रश्न ज्वलंत अाहे पण तरुणांना शेतक-यांचे प्रश्न माहित अाहे का ? का वंचित अाहे शेतकरी ? खेड्यातील साहित्य कुठे अाहे ? ( माझा मेंदू एेकलेल्या गोष्टींची सुसुत्रता लावत बसलेला ) तिसरा : सर, अचानक राजकारणातुन साहित्य क्षेत्रात यावंस का वाटलं ? " माझं मन नेहमीच हळवं होतं, अामचे श्रेष्ठी नेहमीच म्हणतसे कि पंत ,तुम्ही बुवा फारच हळवे. म्हणुन अाम्ही साहित्यात अालो. ( माझ्या मेंदूतले दोन्ही, डावे अाणि उजवे लोब्स् शहारले) चौथा प्रश्न : सर ,तुमची मराठी साहित्या समृद्धीसाठी पुढिल उपाययोजना काय ?  " शेतकरी कुठे अाहे ? शेतातली अोल कुठे अाहे ? शेताच्या वंचना कुठे अाहे ? कुठे अाहे मातीचं संचित ? अामच्या पक्षा....अापलं ते हे अामच्या साहित्य संमेलनाच्या नियामक मंडळाने काही ठोस पावलं उचलायचे ठरवले अाहे ते अाम्ही उचलुच पण सांस्कृतिक विण कशी अाणखी घट्ट होईल तेही अाम्ही बघु , इतकेच नाहीतर सांस्कृतिक अस्पृश्यता म्हणुन जी काही ह्या साहित्याला किड लागु पाहतेय त्याचं अाम्ही समुळ उच्चाटन करु अाणि त्यासाठी भरघोस निधीची मागणी अाम्ही केली देखील अाहे" ( माझा कानातुन रक्त येतंय का हे मी हळुच चपापलं )
पाचवा प्रश्न : तुमचा अावडता साहित्यिक कोण ? " अापल्या नांगराच्या लेखणीने जो जमिनीच्या पानावर सुंदर काव्य लिहतो तो प्रत्येक शेतकरी माझा अावडता साहित्यिक अाहे ( मी बसल्या बसल्या खुर्चीचा कापुस उकरला) चला चहा घेऊ या ! असं म्हणत ह्या चर्चासत्र नावाच्या लघुकथेचा शेवट झाला. अाणि हे सगळं मी तिथेच 'शेवटच्या खुर्चीवर' बसुन फक्त टिपत होतो. गेल्या तासाभरात नवोदित अप्रकाशित लेखकांचं भांबावले पण संमेलन कसं सोडवेल ?,  ज्यांच्या जिवावर साहित्य पसरतंय त्या प्रकाशकांची मदत कशी करता येईल ? काळाच्या पडद्या अाड जाणारं कुठेही लिखित नसलेलं लोकसाहित्याचं काय ? ह्याचा पुसट उल्लेख कुठेही अाला का हा विचार मी शेवटच्या खुर्चीवर करतच राहिलो.


- प्राजक्त (दै सामना )
१५ डिसेंबर १५

बॅकबेंचर्स : २१ राधागूज ( दै सामना )

सगळ्यात शेवटच्या दगडावर बसुन राधी कान्ह्याबद्दल विचार करायची. “सगळाच दोष कृष्णावर कसा टाकायचा ना ? काही गोष्टी घडायच्या थोडीच टळतात. अाणि खरंतर सगळे म्हणतात कि तो देव अाहे , त्याला सातासमुद्रापलीकडंच जिथल्या तिथं बसुन कळतं , त्याला भविष्यही दिसतं , विश्व व्यापुनही श्रीशिल्लक उरणारा असा अाहे तो. पण असं असतं तर त्या दिवशी यमुनेवर सोबत जातांना त्याला लागलेली ठेच कशी चुकवता नाही अाली ? तो दगड कसा नाही दिसला ? सातासमुद्रापलीकडंच दिसणा-याला सातव्या वळणावरच दिसु नये ? मी त्याची बासरी गुलमोहराच्या उत्तरेकडच्या वडाच्या ढोलीत लपवली अाहे हे कळायला त्याला शोधा शोधा का करावी लागली ? कसंय कि एखाद्याला सगळ्यांनीच धीट म्हटल्यावर थोडासा निधडं व्हावं लागतं तसं झालं असेल त्याचं ।
कारण स्वत:च स्वत:ला विचारुन विचारुन थकलेल्या कृष्णाला मी अगतिक होऊन कुशीत रडतांना पाहिलंय । तो खेळिया असेलही पण डबडबत त्याच्या गालांवरुन अोघळणा-या पाण्याची चव मला खेळवु नाही शकत। कारण कुणी रोपटं जमीनीत लावुन 'इथं पुर्वीपासुन कशी हिरवळ अाहे' असं सांगुन फसवु शकतं पण त्याच्याच खोलात गेलं तर सगळं खरं-खोटं कळेल, कारण तुम्ही वरचेवर रोपटं लावु शकतात पण रोपट्याची मुळं कुणी खोलवर पसरवु नाही शकतं । म्हणुनच कान्हा जगाला फसवु शकतो मला नाही । देव केल्यावर देवागत वागावं लागतं म्हणुन त्याला मला सोडुन जावं लागलं असेल। 
ज्यांना दिवस सोबत नेत नाही आणि रात्र  सोबत देत नाही अशांची संध्याकाळ होतो कृष्ण.
आणि मग संध्येकडे कुणी वेळचं बंधन घालतं का? प्रत्येक येणा-या लाटेचं परतणं येण्याआधीच ठरलेलं असतं पण म्हणुन किना-यावरच्या  रेतीनं भिजणं थांबवावं का? 
तो मला एकदा म्हणालाही होता "लोक मला असामान्य म्हणतात. मी आज तुला सांगतो मी आहे असामान्य. म्हणजे अतिसामान्य आहे मी. 
स्वभावगुणाच्या सर्वात वरच्या थराचा स्वभावच माझ्याठायी आहे. म्हणजे थोडा आनंदी, काहीसा ख़ुश होणं नाही येत मला. मी होतो आनंदी. ज़रा वाईट होणं मला ठाऊक नाही मी होतो फक्त दुखी. सगळ्यात वरच्या थराचा स्वभाव. कुणी चांगलं वाटणं म्हणजे म्हणजे माझ्यालेखी फक्त प्रेम."

- प्राजक्त १२ डिसेंबर १५ 
दै सामना

बॅकबेंचर्स :२० ग ( दै सामना ५ डिसेंबर १५)

 तू मला नेमकी कुठे भेटलीस?' ह्याचा मी जेव्हा जेव्हा शोध घ्यायला जातो तेव्हा तेव्हा मला सगऴयात अाधी अाठवतात त्या तू निसटल्याच्या खुणा. थोडं मोठं झालो तेव्हा पावसात कागदाच्या बोटीत, वहीतुन अस्ताव्यस्त फाडलेल्या पानांच्या उरलेल्या चुरगळीत सापडलीस. सायकलीच्या निसटल्या चैनीत , तिस-या दिवशी नखात अडकलेल्या ग्रिसच्या काजळीत सापडलीस. पहिल्यांदा जमलेल्या शिट्टीत, रात्री येळंमाळं शिट्टी वाजवतो म्हणुन अाजीने मारलेल्या टपलीत सापडलीस.एकदा रानात सापडलेल्या किड्याच्या शेपटाला दोरी लाऊन हॅलीकॉप्टर म्हणुन उडवण़्यात दोरी सकट तो किडा सकाळी कोळी जाळ्यात सापडला तिथं तू परत हरवलीस.
मधल्या काळात चहाकपाच्या गोल शिक्कयात , दोन बोटांमधल्या धुरातुनही भेटत राहिलीस तू. नंतर  कुणाकडुन काहीतरी हिसकवल्या गेल्यानंतरच्या विद्रोहातही तू भेटलीस. नाकारल्या, टाळल्या गेलेल्या दु:खातही मी म्हणत राहिलो कि “ त्यांना तर कुठेतरी रमायचं होतं पण अाता त्यांचा प्रवासपक्षी तुमच्याकडे जपा किंवा उडवुन द्या.एक दिवस माझीही हिच गत होईल त्या अाधी …. घ्या हा माझा उर अाणि मलाही माझ्या हक्काचा सूरा एकदाचा देऊन टाका." तेव्हा तू निश्चयाने भेटलीस.त्यावेळी तू निसटल्याची नोंद नाही माझ्याकडे.पण धुरकटल्याची अाहे.
मग काळाने घात केला अाणि अापण मोठे झालो. कुणीतरी डोळ्यात पाहिलं अाणि काळजात भरती अोहोटी झाली. मग त्याच कोणीतरी कायमचा निरोप घेतला तेव्हा अावेगाने भिडली अाणि तू सापडली परत. मग सावरीच्या झाडाची पांढरी म्हातारी जशी हळुहळु उडुन जाते तशी तू अलगद नकळत निसटत राहिलीस.अाणि पुन्हा बोटाला धरुन घेऊन गेलीस ते शेवटच्या बाकावर.
मोराचा जन्म लांडोराने प्राशान केलेल्या मोराच्या अश्रुने होतो तसं कारुण्यात गवसणा-या चैतन्यासारखी तू भेटली असावी असंही राहुन राहुन वाटतं. पण मोर म्हटलं कि लोकांना मोरपिस अाठवतो अाणि मोरपिस म्हटलं कि कृष्ण. पण मला मात्र कृष्ण म्हटलं कि रानावनात हरवलेलं,निसटलेलं एक मोरपीस शोधणारा मोरच अाठवतो. हि अजुन एक निसटल्याची खुण.
पण ह्या गवसण्या निसटण़्याच्या लपंडावात……. ग ‘कविते’ तू मला नेमकी कुठे भेटलीस?' ह्याचा मी जेव्हा जेव्हा शोध घ्यायला जातो तेव्हा तेव्हा मला सगऴयात अाधी अाठवतात त्या तू निसटल्याच्या खुणा. 


- प्राजक्त दै सामना 
५ डिसेंबर

अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...