राधेचं पुढे काय झालं हे शोधता येईल , कृष्णाचं काय झालं हे माहितीच अाहे पण अनयचं पुढं काय झालं हे कुणी
शोधलंय का ? त्याचं दु:ख मोठं कि त्याचं सुख?
कृष्णावरुन अाठवलं, काल मुर्तीवाल्याची एक हातगाडी रस्त्यावरुन जात होती सगळ्या मुर्त्यांवर कपडा टाकुन ठेवला
होता, कदाचित गोडवुन मधुन दुकानात नेत असावा तो. त्यात नाक्यावरल्या कृष्णाच्या देवळासमोरुन जातांना त्याला
एक दगड दिसला नाही अाणि हातगाडी किंचीत वरखाली झाली. तेव्हा मीरेच्या मुर्तीच्या हातातली एकतारी खाली
पडली. ती त्याला दिसली नाही मला दिसली. अंगावर काटा अाला. ती एकतारी मी कृष्णाच्या देवळात नेउन ठेवली
तेव्हा कृष्णाच्या डोक्यावरचं जास्वंदीचं फुल वारा वाहत नसतांना खाली पडलं. जास्वंदावरुन अाठवलं एका मित्राचा
घराबाहेर खुप जास्वंद लावलेले होते, त्याला जास्वंद खुप अावडायचा . इतकाकि त्याच्या त्या घराचं नाव पण
जास्वंदच होतं. पण जेव्हा मला कळालं कि जास्वंद लावायला त्याने तिथला खुप अाधीपासुनचा बहरलेला गुलमोहर
तोडलाय तेव्हापासुन मी त्याच्या घरी जाणं कमी केलं. गुलमोहरावरुन अाठवलं यंदा ऊन जास्त होतं त्यामुळे
गुलमोहराची सावली जास्त थंड जाणवायची त्या झाडाखाली. भगभगत्या उन्हामुळे अचानक झाडाने पेट घेतल्यासारखा दिसतो मला गुलमोहर नेहमी.
भगभगण्या वरुन अाठवलं, राणी पद्मिनीने चित्तोडगडावर सोळा हजार रजपुत सख्यांसोबत जौहर केला होता तेव्हा त्या तडतडत्या अग्निशिखांमध्ये भगभगतांना कुणी साधा चित्कारही काढला नव्हता. राणी पद्मिनीवरुन अाठवलं.
अाता प्रत्येकीनेच जौहर पेटावावा पण त्यांना त्रास देणा-याला त्यात ढकलण्यासाठी स्वत: जळुन जाण्यासाठी नाही.
ढकलण्यावरुन अाठवलं मला अाठवीमधुन नववीत ढकलं होतं तेव्हा मास्तरीण बाई म्हणाल्या होत्या अाता तरी अभ्यासकरशील ना रे ? मी तुझ्या घरी नाही सांगणार हं !त्यांचा मुलाने मागच्याच महिन्यात नापास व्हायच्या भितीने अात्महत्या केली हे मला नंतर कळालं. नापास वरुन अाठवलं पुढच्या अाणि मधल्या बेंचवरचे अभ्यासात पुढे असतात म्हणुन अायुष्यात पण पुढे असतातपण मागच्या बेंचवरचे
अभ्यासात जरी मागे असले तरी अायुष्यात मागे असतीलच हा नेम नाही. स्वानुभव.
स्वानुभवावरुन आठवलं .. जास्त एकटं राहु नये. प्रत्येकवेळी 'डोळ्यात काहीतरी गेलं' हे कितीदा पटणार ना लोकांना? लोकांवरुन आठवलं .. मांजर आडवं गेल्यावर साताठ पावलं मागेबिगे जातात म्हणे लोकं. तेवढ्यात तिला गाडीने वगैरे
उडवलच तर मग खरं अपशकुन कोणाचा ? मांजरीवरुन आठवलं... तिच्या उरातली घरघर आणि 'मौतं का कुआं'
मधल्या फटफटीची घरघर ही आपल्या जगण्याची घरघरी सारखीच ऐकु येत असेल का ?
जगण्याच्या घरघरीवरुन आठवलं... सितेच्या त्यागाचा उहापोह करणारे उर्मिलेबद्दल अवाक्षर का काढत नसावे ?
लक्ष्माणाचा निरोप जाऊ दे पण निदान वनवासाला जातानाची पाठमोरी आकृती तरी तिला पहायला मिळाली असेल?
किंवा धुळीतली पावलं? नसेलच. कारण अयोध्येत त्या दिवशी वादळ होतं म्हणे!
अश्वत्थामाने एकदा वाळु रगडुन पहायला काय हरकत आहे ? हा विचार करुन मी एकदा गर्दीत आवाज दिला होता. 'अश्वत्थामाऽऽऽ'. तेव्हा सगळीच कारुण्यमय गर्दी वळुन माझ्याकडे पहायला लागली.
गर्दीवरुन आठवलं... एकदा हातातुन आरसा पडला तेव्हा तुकड्या तुकड्यांमधली माझीच गर्दी चांदण्यासारखी पसरली होती. इच्छा मागायला आकाशातला एखादा 'मी' तुटायची वाट पाहीली असती पण विरक्तीला पोचुन
तुटण्या-यापुढे इच्छा मांडल्या तर त्याला, ता-याला डिवचल्यासारखं होईल ह्या विचाराने मी गप राहतो.
ता-यावरुन आठवली रात्र.






