Sunday, November 6, 2016

कोलाज : ( मोहर : मटा)

रात्री मोकळ्या अाकाशाखाली पहुडलो अमावस्या होतीदु:ख अाणि अमावस्या जास्त काळ टिकत नाही मास्तर 
म्हणायचेटिकत वरुन अाठवलंमित्राच्या अारशाला टिकली लावलेली अाहे ती त्याने काढली नाही कधीच तिची
अाठवण म्हणुन राहु दिली अाहेअारशावरुन अाठवलंअाताशाबाजारात पुर्वी सारखे हसतमुख अारसे मिळत नाही म्हणे?
बाजारावरुन अाठवलंसगळ्याचाच बाजार मांडलाय अाजकाल ...मैत्रीचा,भावनेचा,नात्यांचा सगळाचनात्यांवरुन 
अाठवलंपरवा जाॅगिंग ट्रॅकवर एक भणंग माणुस दिसला शुन्यात नजर लावुन बसला होताकुणीतरी म्हणे तो 
जिच्यासाठी इथे अाला ती कधीच त्याची नव्हतीचजॉगिंग ट्रॅक वरुन अाठवलंअाजकाल सगळेच पळताय कशाचा तरी मागे,काही तरी शोधायला ,काही तरी पकडायलाकोणापासुन तरी लांब जायला पण पळताय फक्त
कुठे जायचं माहित नाही पण डोक्यात एकच मंत्र घुमत असावा त्यांच्या कि पळत रहामंत्रावरुन अाठवलं अामचे एक सरहोते त्यांनी एक मंत्र दिला होता "हा हि काळ निघुन जाईलहा मंत्र लिहुन ठेवा असं म्हणायचे ते अाणि अति दु:खातअसलात किंवा अति अानंदाच्या माजात असलात कि हा मंत्र एकदा वाचा असं ते सांगायचेमी त्याला 'महामृत्यंजय मंत्र' म्हणायचोदु:खावरुन अाठवलं
राधेचं पुढे काय झालं हे शोधता येईल , कृष्णाचं काय झालं हे माहितीच अाहे पण अनयचं पुढं काय झालं हे कुणी
शोधलंय का ? त्याचं दु: मोठं कि त्याचं सुख
कृष्णावरुन अाठवलंकाल मुर्तीवाल्याची एक हातगाडी रस्त्यावरुन जात होती सगळ्या मुर्त्यांवर कपडा टाकुन ठेवला
होताकदाचित गोडवुन मधुन दुकानात नेत असावा तोत्यात नाक्यावरल्या कृष्णाच्या देवळासमोरुन जातांना त्याला
एक दगड दिसला नाही अाणि हातगाडी किंचीत वरखाली झाली. तेव्हा मीरेच्या मुर्तीच्या हातातली एकतारी खाली 
पडलीती त्याला दिसली नाही मला दिसलीअंगावर काटा अाला. ती एकतारी मी कृष्णाच्या देवळात नेउन ठेवली
तेव्हा कृष्णाच्या डोक्यावरचं जास्वंदीचं फुल वारा वाहत नसतांना खाली पडलंजास्वंदावरुन अाठवलं एका मित्राचा
घराबाहेर खुप जास्वंद लावलेले होतेत्याला जास्वंद खुप अावडायचा . इतकाकि त्याच्या त्या घराचं नाव पण 
जास्वंदच होतंपण जेव्हा मला कळालं कि जास्वंद लावायला त्याने तिथला खुप अाधीपासुनचा बहरलेला गुलमोहर
तोडलाय तेव्हापासुन मी त्याच्या घरी जाणं कमी केलंगुलमोहरावरुन अाठवलं यंदा ऊन जास्त होतं त्यामुळे 
गुलमोहराची सावली जास्त थंड जाणवायची त्या झाडाखालीभगभगत्या उन्हामुळे अचानक झाडाने पेट घेतल्यासारखा दिसतो मला गुलमोहर नेहमी.
भगभगण्या वरुन अाठवलंराणी पद्मिनीने चित्तोडगडावर सोळा हजार रजपुत सख्यांसोबत जौहर केला होता तेव्हा त्या तडतडत्या अग्निशिखांमध्ये भगभगतांना कुणी साधा चित्कारही काढला नव्हताराणी पद्मिनीवरुन अाठवलं.
अाता प्रत्येकीनेच जौहर पेटावावा पण त्यांना त्रास देणा-याला त्यात ढकलण्यासाठी स्वतजळुन जाण्यासाठी नाही.
ढकलण्यावरुन अाठवलं मला अाठवीमधुन नववीत ढकलं होतं तेव्हा मास्तरीण बाई म्हणाल्या होत्या अाता तरी अभ्यासकरशील ना रे ? मी तुझ्या घरी नाही सांगणार हं !त्यांचा मुलाने मागच्याच महिन्यात नापास व्हायच्या भितीने अात्महत्या केली हे मला नंतर कळालंनापास वरुन अाठवलं पुढच्या अाणि मधल्या बेंचवरचे अभ्यासात पुढे असतात म्हणुन अायुष्यात पण पुढे असतातपण मागच्या बेंचवरचे 
अभ्यासात जरी मागे असले तरी अायुष्यात मागे असतीलच हा नेम नाहीस्वानुभव
स्वानुभवावरुन आठवलं .. जास्त एकटं राहु नयेप्रत्येकवेळी 'डोळ्यात काहीतरी गेलंहे कितीदा पटणार ना लोकांनालोकांवरुन आठवलं .. मांजर आडवं गेल्यावर साताठ पावलं मागेबिगे जातात म्हणे लोकंतेवढ्यात तिला गाडीने वगैरे 
उडवलच तर मग खरं अपशकुन कोणाचा ? मांजरीवरुन आठवलं... तिच्या उरातली घरघर आणि 'मौतं का कुआं
मधल्या फटफटीची घरघर ही आपल्या जगण्याची घरघरी सारखीच ऐकु येत असेल का ?
जगण्याच्या घरघरीवरुन आठवलं... सितेच्या त्यागाचा उहापोह करणारे उर्मिलेबद्दल अवाक्षर का काढत नसावे ?
लक्ष्माणाचा निरोप जाऊ दे पण निदान वनवासाला जातानाची पाठमोरी आकृती तरी तिला पहायला मिळाली असेल?
किंवा धुळीतली पावलंनसेलचकारण अयोध्येत त्या दिवशी वादळ होतं म्हणे
वादळावरुन आठवलं -याचं दिवसात कविता लिहणं झालं नाही.
कवितेवरुन आठवलं मागे मी चारचौघात माझी जखम उघडी केली तर चारचौघांसोबत येणारे जाणारेही थांबुन "वाह क्या बात हैम्हणाले होतेजखमेवरुन आठवलं... 
अश्वत्थामाने एकदा वाळु रगडुन पहायला काय हरकत आहे ? हा विचार करुन मी एकदा गर्दीत आवाज दिला होता. 'अश्वत्थामाऽऽऽ'. तेव्हा सगळीच कारुण्यमय गर्दी वळुन माझ्याकडे पहायला लागली.
गर्दीवरुन आठवलं... एकदा हातातुन आरसा पडला तेव्हा तुकड्या तुकड्यांमधली माझीच गर्दी चांदण्यासारखी पसरली होतीइच्छा मागायला आकाशातला एखादा 'मीतुटायची वाट पाहीली असती पण विरक्तीला पोचुन 
तुटण्या-यापुढे इच्छा मांडल्या तर त्याला, ता-याला डिवचल्यासारखं होईल ह्या विचाराने मी गप राहतो
ता-यावरुन आठवली रात्र.

रात्री मोकळ्या अाकाशाखाली पहुडलो अमावस्या होतीदु:ख अाणि अमावस्या जास्त काळ टिकत नाही.
मास्तर म्हणायचे....

- प्राजक्त ५ नोव्हेंबर २०१६

Saturday, October 29, 2016

जन्म ते जन्म व्हाया मृत्यु (मटा मोहर)

असं कसं? एकुणातच एकमेकांना एकमेकांचा संबंध नसतो असं कसं म्हणतात तुम्ही
हे असे एक ना अनेक विचार डोक्यात उठत असतांना त्याचे पाय धुळमाखल्या वाटेवरुन झपाझपा चालले होते. बुडाला कळ लागल्याने सायकल उजव्या बाजुला धरुन तो अाता पायीपायीच चालत होता. पायातली चप्पल फट्टफट्ट अावाज करत प्रत्येक पावलाला मुठभर वादळ उठवुन लगेच शमवत होती. शामा नदीच्या शेजारीच एक लहानसं टेकाड होतं. तिथे पायथ्याशी पोचताच त्याने पिचलेलं राखाडी भुरकटं घमेल खाली टाकलं. घमेल्यापुरतं वादळ उठुन परत निमालं. कमरेच्या उपरण्यात अडकवलेलं पोतं उपसुन बाजुला टाकलंडाव्या खांद्याला अडकवलेलं फावडं एका झटक्यात हवेत उडवलं अाणि हवेतल्या हवेतच परत झेललं. एखाद्या सिनेमात हा प्रसंग स्लो मोशन मध्ये घेऊन तीन वेगवेगळ्या एॅंगलने दाखवला असता. पण जगणं स्टंट असलेल्या लोकांना बघ्यांच्या एॅंगलची पर्वा नसते. भसाभस उकरुन झाल्यावर त्याने माती भरलेलं पोतडं सायकलच्या मागे लादलं. अाणि परत टांग टाकुन निघाला. सायकलवर बसल्या बसल्या एव्हाना फिकट झालेली दोन टांगातली बुडाची कळ परत फुरफुरायला लागली. कोसभर जवळच असलेल्या त्याच्या कुंभारवाड्याच्या झोपड्यात परतला. तिथंच केलेल्या चिखलखळग्यात बदाबदा सगळी पोतडी उरफाटी केली अाणि अंगातला पायजमा काढुन शेजारी चिंचेच्या खोडाच्या खोबणीत सवयी प्रमाणे खुपसुन त्याने चिखल तुडवायला सुरुवात केली. घराजवळंच तशी एक जागा होती पण तिथुन सहसा तो कमी पडली तरच माती अाणायचा. नाहीतर शामा नदीजवळच्या मातीचा पोत जास्त चिक्कण असतो अशी त्याची धारणा होती. अाणि ते खरं हि होतं. तिथल्या मातीचे रंग जातीवंत लालतांबडट रंग घेऊन अाकार घ्यायचे. त्यामुळै गेरुचा खर्चही वाचायचा. नंतर त्याच्या बायकोने अाणि त्याने मिळुन भराभर पणत्या तयार केल्या. मूद मूद चिकणगोळा घेऊन अोल्या घमेल्यात हात बुचकळुन तळहाताचा अाकाराच्या पणत्यांची रासच लावली. चिप्पी खेळतांना पायात बाभुळ रुतल्यानंतर कालपासुन दुडक्या चालीने चालणा-या त्याच्या पोरीने सवयीने पुठ्याच्या ट्रे मध्ये पणत्या घेऊन घरामागाच्या परसात उन्हात ठेवल्या. तिथली उन्हं वाडाच्या झाडातुन चाळुन येत असल्याने अाज तुकड्या तुकड्यात होती
सवयीनुसार माळविठोबा देवळामागुन उगवलेला सुर्य शामा नदीत छिस्स् विझला. तो उठला तेव्हा गुढघ्यातुन कडाडकट् झालं. उरकल्याचे हात त्याने जेव्हा विसळले तेव्हा त्याला घमेल्यात छोटा मूद दिसला. मग उगा अाता दिसलच अाहे तरी दुर्लक्ष कसा करायचा म्हणुन त्याने त्या घासभर मूदेची एक छोटी पणती करुन टाकली. अाणि हुश्श करत हात विसळले.
दुस-या पहाटे माळविठोबा मागुन जेव्हा सुर्य अाला तेव्हा भट्टीतुन खरपुस भाजलेल्या पणत्या सायकलीच्या मागे उभट टोपल्यात भरुन त्याची बाजाराला निघायची वेळ झाली होती. तालुक्यात दिवाळसणाला बाजारपाटी लावयची म्हणजे सक्काळी सक्काळी तुम्ही अाधी बाजाराला सगऴयात अाधी हजर पाहिजे हे त्याला माहीत होते. नदीला अाल्यावर गुढघाभर पाण्यात उभं राहुन त्याने अाधी टोपलं नावाड्याकडे सरकवलं अाणि नंतर खांद्यावर सायकल घेऊन तो होडीत बसला. होडी जरा हिंदकळलीच. काल जवळच्या गावात लग्न झालेल नवं जोडपं अाणि सोबतची बुजूर्ग मंडळी होडीत बसलेली होती. नवपरिणेतेचं अवघडलेपण पदर हनुवटीपर्यंत अोढलेलं असुनही लपत नव्हतं. नवरदेवाच्या कपाळाला कालची चमकी अजुनही दिसत होती. कोणाचं लक्ष नाही पाहुन नवरदेवाने दोन बोटाने नदीतुन शिंतोडे बुज-या पदरावर शिंपले. ती तशातही हसली वगैरे असावी. पणत्यांच्या टोपल उगाच सरळ करुन त्याने वरचं फडकं सरळ केलं. टोपल्याच्या खाचेतुन कालची लहानगी पणती डोकावत होती. वल्हवतांना काही शिंपण त्या टोपलातुन डोकावणा-या त्या छोट्या पणतीवरही झाली. होडी काठाला लागली तसा तो टोपलं घेऊन टप्पकन खाली उतरला. इतर लोकं लगबगीने उतरण्याचा सोहळा पार पाडे पर्यंत तो सायकलीला टोपलं डकवुन निघालासुद्धा. बाजार नाही नाही म्हणता हा हा भरुन गेला अाणि संध्याकाळी रांगोळी नकळत पुसत जावी तसा विझायला पण लागला. पणती घ्यायला अालेल्या एका बाई सोबत एक दोन वेण्यांच्या बाहुलीची नजर छोट्या पणती कडे गेली पण नुकतेच काही वेळापुर्वी खालेल्या फटक्याचे हुंदके अाटोक्यात अालेल्यानंतर परत नव्याने अाईला मागणी कशी घालावी ह्या पेचात ती होती. त्याने ते हेरलं अाणि ती लहानगी पणती त्या बाहुलीला तशीच देऊन टाकली
बाहुली खुशीत होती. वा-याला जमीन समजुन उड्या माराव्या तशी उडत उडत चालायला लागली. घरी पोचताच तिने ती पणती पेटवली. तिच्यासाठी अाजच पाडवा होता. तिथेच शेणसारवलेल्या भिंतीवर तिने सावल्याचे ससे,मोर,बदकं बनवत त्या पणतीला जिवाभावाची मैत्रीण करुन घेतली. त्या रात्रीची त्या बाहुलीची झोप चाळावली ती सकाळी झालेल्या रडारडीनेच. ती धावत धावत माजघरात गेली. जातांना तिने तुळशीचा कोनाडा पाहिला तो रिकामा होता. तिची पणती नव्हती तिथे. समोर पाहते तर बाहुलीच्या अाजोबांच्या डोक्याशी ती पणती लावलेली होती अाणि अजुबाजुला लोकांच्या भावनेला बांध नव्हता. बाहुली तशीच कोनाड्यात जाऊन बसली . भरभर लोक येत गेले अाणि गेले सुद्धा. त्यातले काही अाजोबांना पांढ-या फडक्यात खांद्यावर घेऊन गेले अाणि दुपार कलायला लागली तेव्हा परतले. काही काळ लोटला. डोक्याजवळ पहा-याची पणती घरात पुन्हा पेटवत नाही म्हणे. घरातला केर काढतांना तीच पणती घरातल्या केरासोबत चौकाजवळ कोनाड्यात फेकली. 
चौकात बसलेल्या पोरांना काय सकाळ अाणि काय दुपार. हुक्की अाली म्हणुन. तिथुन उठले अाणि बॉल बॅट घेऊन शेजारी मोकळ्या जागेत खेळायला सुरवात केली. स्टंप म्हणुन भिंतीवर अाखायला काहीतरी शोधणा-या पोराच्या टाचे खाली ठिसुळसा ठप्प अावाज झाला. पाय उचलुन पाहिलं तर उपड्या पडलेल्या पणतीचे चार तिकडे होते. एक तुकडा भिंतीवर स्टंप अाखायला घेतला. एक तुकडा खिशात अोलीसुकी करायला घेतला. खेळ रंगत गेला. भिंतीवरचे अाखलेले स्टंप गडद करण्यात एक पणती तुकड्याचा जन्म खर्ची गेला. दुसरा पणती तुकडा अोलीसुकी झाल्यानंतर तसाच पडुन राहिला अाणि मातीमध्ये माती होत राहिला. खेळ रंगात अाला असतांनाच पोरांना तिथुन कुणीतरी हटकलं. खेळ थांबला. एक म्हातारी टोपलं घेउन त्यांच्या खेळाच्या मधोमध अाली . खेळ थांबवत म्हणाली “जराकं कमी पडतेय माती घेऊन जाते इठलीच” . तिथलीच माती मुठ मुठ करुन टोपलीत भरुन ती निघुन गेली. नव्या जागेत,नव्या गावात,नव्या मातीत,नवा श्वास जन्माला अाला होता.

असं कसं? एकुणातच एकमेकांना एकमेकांचा संबंध नसतो असं कसं म्हणतात तुम्ही


- प्राजक्त २९ अॉक्टोबर २०१६



अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...