Thursday, July 6, 2017

औरंगाबाद एकनाथ रंगमंदिराला सांस्कृतिक अनास्थेचा विंचू चावला.


विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला हो ऽऽ ! 
हा विंचू चावल्यावर 'काय मी करु?' अशी निदान विचारणा तरी होते. मग एकनाथ बुवा कोणता विंचू चावल्यावर काय उतारा घ्यायचा ते सांगतात.
पण औरंगाबादच्या 'संत एकनाथ नाट्यमंदीराच्या' ढिसाळ नियोजनाचा आणि सांस्कृतिक अनास्थेचा विंचू कितेक रंगकर्मींना चावुन झाला. चावलेल्यांनी बोंबाबोंब करुन ठणाणा करुन झाले. पण उतारा सोडाच निदान 'कोण बोंबलतोय' ह्याकडे साधे ढुंकूनही पहाण्याचे धारीष्ट्य औरंगाबाद महानगरपालिकेकडे नसावे हे अगम्य अाहे.
प्रशांत दामलेंनी मागे ह्याच रंगमंदिराच्या मोडक्या व्यवस्थेचे फोटो टाकले होते. पण हाविंचुचावापालिकेला इतका सवयीचा झाला असावा कि विंचवाच्या ह्या विषाची पालिकेच्या निबर शरीराला सवय झाली असावी. ह्या विषाबद्दल पालिकेच्या शरीरात आताअॅन्टीरेझिसटन्सी’ तयार झाली आहे.
दामलेंनी एकदा नाशिकच्या कालिदास बाबत हेच केले होते. पण तिथली यंत्रणा खडबडून जागी झाली आणि काही कोटी रुपये पालिकेने मंजुर करुन आता जुलै २०१७ पासुन कालिदास रंगमंदिर नुतनीकरणासाठी बंद होत आहे. ह्यात दामलेंची रंगभुमीविषयची अास्था अाहेच पण स्थानिक रंगकर्मी, महत्वाची वृत्तपत्रे यांनी हा विषय एेरणीवर घेतल्यामुळे हे शक्य झाले. अाणि अर्थात नाशिक पालिका यंत्रणेने हि टिका जिव्हारी लावुन घेतली अाणि लागलीच कामाला लागले हेही नसे थोडके. 

नाशिक पालिका जागी झाली कारण ती झोपली होती. औरंगाबाद पालिका झोपेचं सोंग घेत असावी अशी दाट शंका येते.

'हंडाभर चांदण्या'च्या प्रयोगाच्या निमीत्ताने हा अनुभव आला. प्रवेशालाच जाहिरातीसाठी बोर्ड ठेवण्याच्या जागेपासुनच आबाळ सुरु होते. आत गेल्यावर सगळीकडे धुळीचं साम्राज्य. संडास बाथरूममधली दुर्गंधी, बॅसिनचे भांडे गायब, दुस-या ठिकाणी बेसिन होते पण नळ गायब, मोढे-लेव्हल्सची दुर्दशा तर अफाट, पाण्याचे मशिन धुळखात, नाटकासाठी लागणारे साधे टेबल-खुर्ची उपलब्ध नाही, प्रकाशयोजना हा प्रकार रंगमंदिरात प्रयोगासाठी आवश्यक असतो हेच ह्यांना ठाऊक नसावे की काय अशी शंका येण्याइतपत भीषण परिस्थिती आहे. पर्यायी बाहेरुन प्रकाशयोजना मागवावी लागते पण ती पुरवणारे पण निव्वळ कामचलाऊ अाणि मद्दड, त्यात परत रंगमंदिराच्या वायरीच्या जंजाळात शॉर्टसर्किट, चालु प्रयोग अंधार झाल्यामुळे थांबावावा लागणं आणि स्टेजवर शिडी(घोडा) आणुन वायरींगच्या जाळ्यातुन दुरुस्ती करणे आणि पुन्हा 'पाॅज' वर असलेले नाटक सुरु होणे हे नाट्यमंदीरासाठी किती लाजिरवाणे आहे अाणि नाटकाच्या फ्लोसाठी किती किळसवाणे अाहे. एखादे मांजर चालू नाटकात राजरोसपणे शतपावली करत रंगमंचावर फिरत असते. मनपाच्या शाळेतले तांदळांचे गोदाम आहे कि रंगमंदीराचे ग्रीनरुम? अशी बकाल अवस्था. खुर्च्यांचा पत्ताच नाही, जमिनीवर फतकल घालुन बसा अाणि करा मेकअप.

असे असुनही हि अडथळ्याची शर्यत पार करत नाटकानंतर औरंगाबादकरांनी उभे राहुन मानवंदना दिली. एक स्थानिक ज्येष्ठ रंगकर्मीं ताईंनी सर्वांसमक्ष 'रंगकर्मी म्हणुन हे नाटक पहाता आलं हे भाग्य आहे पण औरंगाबादकर म्हणुन नाट्यगृहामुळे तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल लाज वाटते.’ असे जाहिर उद्गार काढले.
एका स्थानिक नाट्यकर्मीला समस्त औरंगाबादकरांतर्फे बाहेरुन येणा-या संघाची रंगमंदिरच्या आबाळतेमुळे जाहीर माफी मागावी लागते हे एका शहरासाठी किती दुर्देवी आहे. प्रयोगानंतर प्रत्येक रसिक येऊन कौतुक करत होता पण एकनाथच्या दुरावस्थेबद्दल शहराचा नागरिक म्हणुन खजिल होत उसासे सोडत होता.

'
किती वर्षापासुन पालिका एकाच पक्षाकडे आहे' असं काही बोललं तर मग त्याला राजकिय स्वरुप प्राप्त होईल. पण ते ही वास्तव आहे. इतकी वर्ष शहराच्या सांस्कृतिक उत्थानासाठी रंगमंदीरांचे रुपडे पालटण्यापेक्षा शहराच्या नामकरणावर शक्ती खर्च करण्यात वाफा दवडणा-यांकडुन फार अपेक्षा ठेवणे उचित नाही.
शहराची एक सांस्कृतिक भुक असते जी पुर्ण झाल्यास शहराचे बौद्धीक कुपोषण वाढायला लागते. शहरातले रंगकर्मी, नाट्यरसिक ह्यांना आवाज बुलंद करण्याची गरज आहे.
समाजाला मनोरंजनातुन प्रबोधन करणारे आणि भारुडं लिहणा-या, एकनाथांचा वारसा सांगणा-या शहराला आणि रंगमंदीराला हे दिवस यावे हे अनाकलनीय आहे.
औरंगाबाद नाट्यरसिकांनी दिलेल्या प्रतिसादाला नमन. त्यांचा हा रंगमंदिराच वनवास लौकर संपो हि संत एकनाथाकडे प्रार्थना.

एकनाथ रंगमंदिर म्हणत असेल ...
विंचू चावला वृश्चिक चावला अनास्थेचा विंचू चावला तम घाम शहरासी आला धृ॥
पंचप्राण व्याकुळ झाला त्याने माझा प्राण चालिला सर्वांगाचा दाह झाला १॥
पालिका इंगळी अति दारुण मज नांगा मारिला तिने सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची २॥
ह्या विंचवाला उतारा आळसगुण मागे सारा इच्छाशक्ती लावा अंगारा विंचू इंगळी उतरे झरझरा ३॥

कर्म उतारा देऊन अवघा सारिला आळसगुण किंचित राहिली फुणफुण शांत केली जनार्दने ४॥

- प्राजक्त २६ जुन २०१७

Saturday, July 1, 2017

अाषाढ दृष्टांत (मटा लेख )

दिवस अाषाढीचा. वर्ष अाजचं, कदाचित चार वर्षापुर्वीचं, पन्नास वर्षापुर्वीचं ,किंवा जे तुम्हाला सोयीचं वाटेल ते.
शेकडो कोसांची पायपीट, हजारो दिंड्या, कोट्यावधी पाऊलं तुडवत, अब्जावधी नामस्मरणाचे मोहोळ ज्या दिवसासाठी ज्या क्षणासाठी अलंकापुरीत येऊन थबकले त्यांना अाणखी थोडं ताटकळत बसावं लागलं कारण राज्याचे मा.मुख्यमंत्री साहेब राज्यातर्फे अाणि राज्याच्या समस्त जनते तर्फै ‘शासकीय महापुजा’ करायला अाले होते. प्रसन्न मुद्रेच्या शासकिय दांपत्यांच्या चेह-यावर सकाळी लवकर उठल्याचा शीण अाणि प्रवासामुळे डोळ्यात अालेलं तारवटलेपण दोन्ही मेकअपच्या अाड झाकल्या गेलं होतं.
गाभा-यात प्रवेश करण्याअगोदर साहेबांच्या सेक्रेटरीने साहेबांकडे एक मळकट, सेलोटेपने चिकटवलेला जीर्ण कागद सरकवला. साहेबांनी फक्त नजरेनं ‘काये?’ विचारलं. सेक्रेटरी कानात खुसफुसला “ दर्शनपुजेनंतरचा मुख्यमंत्र्यांचा ‘न्युज बाईटे’ सर तो. साहेब चमकलेच “ हा असा?” सेक्रेटरी उद्गगारला “दिंडी इतकीच जुनी परंपरा अाहे साहेब ती. बाईट मध्ये बदल नसतो होत. प्रोटोकॉलच्चे तसा” अाता प्रोटोकॉलचा दांडा अाडवा केल्यामुळे साहेबांना थोडं वाकावच लागलं. तत्पुर्वी झेड सिक्युरिटीवाल्यांनी अाधी गाभा-यात जाऊन सगळी सिक्युरिटी चेक केली. तुकोबांनी ज्याच्यासाठी “करिसी आमुचा सांभाळ । तूं रे माउली स्नेहाळ” असे लिहुन ठेवलेय त्या पांडुरंगाच्या गाभा-यात सगळं सुरक्षीत अाहे ह्याची खात्री झाल्यावर झेड सिक्युरिटीवाल्यांनी हिरवा कंदील दिला अाणि साहेब गाभा-यात अाले.
साहेब गाभा-यात अाल्यानंतर लगबग सुरु झाली.. काही तरुण पुजारी लोकांनी अदबीने नमस्कार केला, काही अनुभवी पुजा-यांनी अापल्या ज्युनिअर पुजा-यांवर प्रौढी मिरवायला नुसतंच स्मित करुन ‘असे लई पाहिले’ अशा अविर्भावात ‘इथे उभे रहा, तिथे उभे रहा’ अशा नम्रपणे सुचना केल्या. साहेबांनी अाणि ताईसाहेबांनी नम्रतेने त्या स्विकारल्या. सर्व सोपस्कर भक्तिभावात पार पडले. जिथे जिथे अावश्यक तिथे तिथे ताईसाहेब साहेबांच्या हाताला हात लावत होत्या. जिथे जिथे अावश्यक तिथे तिथे साहेब अाचमन करत कधी पाणी डोळ्याला लावत होते तर कधी ‘हस्त प्रक्षाल्य’ म्हटलं कि पाणी बाजुल जमिनीवर सोडुन देत होते. गंध-टिळा, अबीर-बुक्का, महावस्त्र, तुळसचाफ्याच्या माळा असं सगळं सगळं काही झालं. साहेबांनी सवयीने मनगटाकडे पाहिले. सकाळचे ९ वाजुन ९ मिनीट झाले होते. साहेबांनी लीनपणे विटेवर डोकं टेकवलं. 
.,…अाणि जेव्हा साहेबांनी डोकं वर उचललं तेव्हा अाजुबाजुला अचानक पुर्ण शुकशुकाट होता. ताईसाहेब नाही, सेक्रेटरी नाही,  पुजारी नाही, गर्दी नाही. साहेबांनी बाहेर अंदाज घेतला तर भाविकांची झुंबड नाही, झेड सिक्युरिटी नाही. अात्ता होते अाणि अाता नाही ? असं कसं? 
साहेबांनी अात वळुन पाहिलं तेव्हा गाभा-यात फक्त एक काळीसावळी वृद्ध व्यक्ती होती. पांढरा धोतर, सदरा, पांढरट भुरके विस्कटलेले केस, वेशीवरच्या पिंपळाखाली गप्पा ठोकायला चार म्हातारी टाळकी बसतात अगदी तसाच. चेह-यावर चौ-यांशी लक्ष सुरकुत्या. पण चेह-यावर विलक्षण समाधान अाणि डोळे म्हणजे जणू काय खोल देवडोह. साहेब म्हणाले “बाबा कोण अापण? कुठं गेले सगळे?”.  बाबा म्हणाला “ हां चालंल , बाबा पण चालंल. त्यात काय इतकं !” . साहेब म्हणाले “ सगळे कुठे गेले अचानक?” बाबा म्हणाला “ तुम्हाला जरा चक्कर अाली हुती. वैद्य येऊन पाहुन गेल्ये. समदे त्यांनला सोडायला बाहिर गेल्याती अान थोडायेळ विश्राम घेयला सांगुन गेल्याती वैद्यबुवा. येतील इतक्यात. मी हाय तुमच्या दिमतीला, येत्याती चार दहा मिन्टात सगदे.”  साहेबांचा मनातला शीण जरा कमी झाला. परत एकदा बाहेर पाहुन अचानक सगळे भाविक गेले कुठे असं विचारावंसं वाटलं त्यांना पण राज्याचा मुख्यमंत्री चक्कर येऊन पडला म्हणुन सगळी जागा इव्हॅक्युएट केली असेल असं स्वत:च पुटपुटले ते. खरंतर बाबाने जे सांगितलं त्यांनंतर अनेक प्रश्न पडायला पाहिजे होते पण बाबाच्या वाणीत इतकी शाश्वती होती कि त्यांनी सांगितल्यानंतर फार प्रश्न विचारणं रास्त नाही वाटलं साहेबांना. “काय म्हणतंय पीकपाणी?” साहेबांनी दौ-यावर असलेल्या शेतक-याला सवयीने काहीतरी विचारावं तसं विचारलं. “चाल्लंय, सायेब” साहेबांनी उगाच सदरा सारखा केला अाणि सवयीचं हसले. बाबा म्हणाला “तुमी दरवर्षी इठ्ठलाकडं ‘बळीचं राज्य येऊ दे, पाऊसपाणी भरपूर पडु दे’ हे असं सगळं खरंच मागतेत काय?” साहेब अात्मविश्वासाने म्हणाले “ हो मग ! अर्थातच. एकदम मनोभावे. पण का असं का विचारलं?.”  बाबा म्हणाले “न्हाई अापलं सहज.”
अचानक एखादी लिफ्ट बंद पडावी अाणि लिफ्टमध्ये असलेल्या दोन अनोळखी लोकांना बोलायला समान विषय नसावे. तसं चाललं होतं सगळं. अाजुबाजुला बरंच अवघडलेपणाचं मळभ दाटलं होतं. 
मग बाबांनीच परत विषय घेतला “म्हंजे देवबिव नाहीच ब्वा.सब झुठ !” साहेब जरा चिडलेच “ असं कसं म्हणता तुम्ही?” बाबा म्हणाले “राग अालाय का ? बरं देव अासंल पण मंग हा ईठ्ठल वगैरे देवात काही दम नसावा कि काय जणू?” साहेब अाणखी वैतागले “ बाबा अहो, त्याच्याच मंदीरात उभे राहुन त्याला काय नको नको ते बोलताय ? हे पहा तुम्ही नास्तिक असण्याला माझा विरोध नाही. लोकशाहीत सगळ्यांना सगळे हक्क असतात. पण निदान माझ्या समोर माझ्या देवाला काही बोलु नका. अशाप्रकारे अास्तिकांच्या भावना दुखवू नये. समाजाने घालुन दिलेले माणुसकीचे संकेत असतात ते.”
बाबांना साहेबांच्या अभ्यासु प्रत्युत्तराचं नवल वाटलं. बाबा म्हणाले “ अाहो पण वर्षानुवर्ष त्येच साकडं घालताय. तरी का सुधरं ना शेतक-यांची अाबाळ? हे पहा ,येक तं तुमच्या साकड्यात तरी दम नै किंवा तुमच्या देवात तरी. काहीतरी एक नसल्याशिवाये का हा खेळखंडोबा ? ” अाता साहेब वैतागलेच “हे पहा अामचे साकडे बेंबीच्या देठापासुन सत्य अाहे अाणि अामचा देवावरही अामची शंभर टक्के श्रद्धा अाहे. हे पहा निसर्गाच्या अवकृपेचा काही भरवसा नसतो. अाणि अामच्या यंत्रणेतही काही लुपहोल्स असतील अाम्ही नकार देत नाही.”  परत एकदा अाजुबाजुला डोकावुन साहेबांनी कुणी येतंय का ह्याचा अंदाज घेतला. गाभा-याच्या समोरचं ग्रील बंद दिसतं असल्याने साहेबांनी ‘बाहेर जाण्यात काही हाशिल नाही’ हे अाधीच लक्षात घेतलं होतं. 

बाबा “निसर्गाचं ठिक अाहे पण देवावर श्रद्धा ठेऊन यंत्रणेतले लुपहोल्स मिटतील? बरं अाता ब्वा जर पाऊस न्हाईच अाला तर दुष्काळाचा इव्हेंट कराला दौरे निंगतील. मग विरोधातले बी अापापल्या पद्धतीने दुष्काळ साजरा करतील. मला येक कळं ना झालंय कि दुष्काळ कै वादळ-गिदळ थोडीच असतंय अचानक येला. ते येतांना अंदाज देतंय, कोप-यावर अालेलं दिसतंय , दारावर अालेलं बी दिसतं अान मंग घरात ठाण मांडुन बसलेलं पण दिसतं. मंग अचानक पाहुणे अाल्यासारखी पळापळ कशापाय हुती हो?  बरं अगदी सालाबादाप्रमाणे अगदी दोन-चार वर्षात एखांदा दुष्काळ येतोच कि अो ! दुष्काळनिवारण म्हंजी मोडल्याली पिकं उभी करणं न्हाई, मोडलेली माणसं उभी करणं म्हंजी दुष्काळनिवारण,  हे कधी करणार तुमी? योजना-योजना करत कोटीने पैका अोतला कि दुष्काळनिवारण हुतंय व्हय ? उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिशी रातीची प्हाट अाणि प्हाटेची सकाळ हुते पण तरी बी तुम्हाला जर एबी फॉर्म मिळाला नाही तर कसं गुदमरलेपण येतंय ? तसं हुतं काढणीच्या अाधीच पिकांची माती होतांना जेव्हा शेतकरी बघतो. तुमाला निदान येगळे मार्ग तरी असत्यात पण त्याच्याकडं तेवढा येकंच जमिनीतुन उगवायचा मार्ग.” साहेबाला जरा अारसा पाहिल्यासारखं अोशाळवाणं झालं. बाबानी काखेतलं बोचकं काढलं. गाठ उघडली. “या जरा मिरची भाकरी घेऊ जराशीक. शुगरबिगर अासंल ना? वेळ पाळावी लागते म्हणं त्याला” अाता साहेब अाणि बाबा जमिनीवर फतकल मारुन न्याहारीला बसले. बाबांनी एक बुक्की मारली अाणि एक कांद्याची फोड साहेबांकडे सरकवली. जेवता जेवता बाबा बोलतच होते. “सगळ्यात अाधी काही गैरसमज तुमी काढुन टाका बरं, सायेब. पहिलं असं कि ‘बळीराजाच्या घामाच्या सुगंधाने फुललेली जमिन वगैरे बोलणं बंद कराय सांगा सगळ्यांना. कोणत्याच घामाला सुगंध नसतोय. लोकायच्या कष्टीपणाला चांदण्यांचं रुपक देऊन बोथट कहाला करत्या सगळे? दुसरं म्हणजे अाभाळातल्या चांदण्यांखाली पहुडलेला बळीराजा वगैरे हा रॉमेंटीसिझम बी पुसुन टाका. उघड्या अाभाळात चांण्या पाहुन कोणत्याच शेतक-याला बरं वाटत नसतंय. चांण्या दिसल्या ह्याचा अर्थ म्हंजी अाभाळात ढग नाही असा होतो म्हाराजा ! जमिनीच्या पोटात स्वप्न पेरल्यानंतर जर वरती ढग नसेल तर शेतक-याच्या पोटात खड्डा नाई तं काय पडंल?  तितक्यात अनेक लोकांची कुजबुज एेकु यायला लागली. बाबानी साहेबांना खिडकीजवळ अाणलं अाणि म्हणाला “ ते पहा रांगेत वाट पाहणारे वारकरी. काय वाटतं ह्या दिंड्या, ह्या वा-या म्हणजे भक्तिरसाचा अोतप्रोत संगम बिंगम अाहे? तर नाही !  जातिवंत दु:खांचे तांडे अाहेत त्ये, सायेब. ल्हानपणी छडी उगारलेल्या मास्तरासमोर अापण डोळे गच्च मिटुन उभे रायचो. ते डोळ्यांचं मिटणं म्हंजे छडीचा त्रास वाचावा किंवा कमी व्हावा ह्या भाबडेपणात अालेलं असतं. बी जमिनीत पेरुन पाऊस येईल हे स्वप्न पहात पंढरीला मार्गस्थ होणं म्हंजे तसलंच डोळ्याचं मिटणं असतंय सायेब. पांढ-या पेहरावातला ढगाळ गावक-याचा दिंडीत करडा वारकरी हुतो अान पंढरीत काळ्या पांडुरंगासोबत काळाभोर ढग बरसायचे स्वप्न पाहतोय. एक एक नक्षत्रांचे दान कोरडं पडायला लागलं कि शेतक-यांच्या विश्वासाच्या सोंगट्या दुस-याच्या घरात सरकत नाहीत. अान अशा सोंगट्यांना परतणं माहीत नसतंय. अाणि परतणं माहीत नसलेलं पाखरु विजेच्या हायवॉल्टेज तारेत स्वत:ला झोकुन देतंय. एक सांगु? एकदा अाषाढी एकादशी चुकवाच अाणि अलिकडचे एखादे रिंगणातले खेळ पहायला जा साहेब कधीतरी. सगळे पाश सुटल्याच्या भ्रमात, सगळी कर्ज, सगळी देणी फिटल्याच्या अाभासात वेडावुन नाचत असतात सगळे.  ‘भीमा’सारखे बलदंड दु:ख पुढ्यात असुनही फक्त शेकडो कोसावरचा चंद्र पाहुन त्याचं भागतं असा भोळसट माणुस अाहे ह्यो. उगाच भीमा नदीला पंढरपुराच्या वळणापुरती चंद्रभागा म्हणत्यात का? अापल्याकडं बारा वर्षातुन एकदा कुंभमेळा हुतो अान लोकं अमृतबिमृतात पापं मोकळी करत्यात. केवढा ढोलगाजा तेचा? चंद्रभागा हेच दरवर्षाला करतीय दरवर्षाला. काढा कडवट अासंल तर पाणी घालुन कडवटपणा कमी करतेत. वारी म्हणजे एकट्यातली कडवट कळ दिंडीत फिकी करायची प्रक्रिया हाय सायेब, इतकंच.”  साहेब म्हणाले” बाबा खरंय पण कसंय कि अडचणी येतात, प्रश्नही खुप अाहे पण खरी अडचण हि अाहे कि अापण देव नाही ते पटकन सोडवायला, थोडावेळ लागतोच ना ? ” 
बाबा हसला म्हणाला “ एक करा सायेब कि एकदा हेलिकॅप्टर ने नाही रस्त्याने या पंढरीला अाणि इतके वर्ष झाले राज्याच्या ‘अाराध्य बिराध्य दैवताच्या’ पंढरपुराकडे येणारे महामार्ग अजुनही एकपदरी अाणि खड्डेदार अाहे त्याचं काहीतरी करा अाधी. अाणि हो  देव असाया हातात चक्र , खांद्यावर धनुक्ष, डोसक्यामागं वलय ,अाजुबाजुला गदा ,शंख असल्याचा फील असाय पाहिजे अासं काही नसतं सायेब. तुमी निस्ती कमरेवर हात ठेवलेली यंत्रणा जागी करा. अान सायेब , एकदा मनापासुन डोळे मिटा अाणि पायाच्या अंगठ्याने खालची जमीन चापसा…… पायाला विट लागली कि समजा देव झालेच तुमी. फक्त कमरेचे हात तेवढे हालवले कि मिळवलं. यू का मी ? जरा पाहुन येतो इतका येळ का झाला ते ?”  साहेबांनी भारावुन विचारलं “ काय करतात बाबा ? शेतीबिती अाहे का ? काही मदत लागली तर कळवा” बाबा म्हणाले “ शेतीगिती काय नाय अापली, मदतगिदत पण नको. अापल्याला तुमच्या सल्लागार समितीवर ठेवता का?” बाबा म्हातारं बोळकं अाणि साहेब खुप दिवसांनी निरागस खळखळुन हसले. बाबाने परत निरोप घेतला. साहेबांनी भारावल्या मनाने त्यांना संमती दिली अाणि नमस्काराला डोकं झुकवलं.  
साहेबांनी टेकवलेलं डोकं वर घेतलं तेव्हा अाजुबाजुला प्रचंड गजबज होती, ताईसाहेब, सेक्रेटरी, पुजारी, झेड सिक्युरिटी सगळे अाहे तसेच होते. साहेबांनी सवयीनं मनगटाकडे पाहिलं. सकाळचे ९ वाजुन ९ मिनीट अाणि दोन सेकंद झाले होते. 


दुस-या दिवशी अनेक पेपरला हेडलाईन होत्या. “मुख्यमंत्र्यांचं पांडुरंगाकडे साकडं, सुजलाम सुफलामचं मागणं, बळीराजाचं राज्य येऊ दे, पाऊस पडू दे अाणि राज्यावरचं अवर्षणाचं सावट दूर करायची मागणी”

१   जुले २०१७

Thursday, June 1, 2017

कुसुमाग्रजांच्या अखेर कमाईवरुन (विडंबन कि वास्तव)


मध्यरात्र उलटल्यावर
मंत्रालयातील पाच फायली
एका पायरीवर बसल्या
आणि टिपं गाळू लागल्या .
बीफबंदी म्हणाली," शेवटी मी झाले,
फक्त बेअकली जमावाची.”
नोटबंदी म्हणाली,"मी
फक्त डिजिटल धनदांडग्यांची."
सेंसोरबोर्ड म्हणाली," मी
फक्त असंस्कृत संस्कृतीरक्षकांची ."
दारूबंदी उद्गारली," मी तर
फक्त ५००मीटर अातल्यांची.”

शेतकरी हमीभावच्या फाईलने गळ्यातील गहिवर आवरला
आणि ती म्हणाली,
‘तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक वजन तरी
तुमच्या फायलीच्या पानांशी आहे.
माझ्या पानांशी मात्र
फ़क्त सरकारी धांडोळ्यातील लालफिती’
- प्राजक्त देशमुख


( तात्यासाहेबांचा आाशिर्वाद घेऊन)

Sunday, April 16, 2017

झालं अास्सं अासलं कि.... ( मटा मोहर१७ एप्रिल)

.... झालं फक्त असं आसंल कि तो गारपीटग्रस्त शेतकरी वावरात गेला आसंलमुताचा पण ओघळ हू देणारी, पाण्यासारखं जे पाताळ येईल त्याला पाऊस म्हुन प्यून घेणारी मराठवाडी जमीन. त्यांचं कणीस पण कापूस आणि ऊस पण कापूस. वावरात पांढरं प्हाची सवय हुती त्याच्या डोळ्यांनला. ह्या खेपेला पण त्याला गेल्या गेल्या ह्येss सग्गळीकडं पांढरं पांढरं दिसलं आसंल. वितभर जमिनीत एवढाल्ले कापुस? माॅलमधल्या सिनेमाच्या इंटरवलीला पाॅपकाॅर्न फसफसावे तसे ? गडी हरखला आसंल. पैसाच पैसा. तोंडात चिरुट शिलगल्याचं स्वप्न पहात त्यानं कानाची बिडी फेकुनच दिली आलं. एवढाल्लं पांढरं पाहुन जाऊन बिलगलाच आसंल. पण येरवी 'ममईला जाताना काम हू दे रे' असं म्हणीत जी वावरातली मुठभर माती कपाळाला लावयचा तिथंच आता ओंजळभर थंड बर्फ हाती लागला आसंल. म्हणजे लुकसानीच कि परत !
आता लुकसानीला राजाच्या कानी घालणं गरजेचं असतंय कि नाई
मग तोच ओंजळभर बर्फ पुरावा म्हणुन मंत्रालयात घ्यून गेला आसंल. आता त्याचंच शेत आस्तं तर ठाऊक आस्तं कि व्हिर कुटंय, बुजगावनं कुटंय. तिथं मंत्रालयाच्या बिल्डींगीत राजाचं दालंन हुडकाया टाईम गेला आसनंच कि ? हुडकल्यावर बोंबला आसंल "लुकसानी द्या !" 
राजानं अदबीने विचारलं आसंलहे बळीराजा सर्वात अाधी नमन तुला. अाता सांग, कसली नुकसानी हवी रे तुला ? "
हा बोंबला आसंल " हे प्हा ! याची." पण तिथं मुठ उघडून पाहतो तो काय 'मुठ मोकळी?' हाय का अाता झाली ना पंचाईत.
आत्ता तर गार चटका होता हाताला, हात बधिरुन गेलेले.
मग गारा गेल्या कुठं?
आता लुकसानीची भरपाई कोणत्या तोंडानं मागणार?  'मंत्रालयाच्या साव्व्या मजल्यावर येईस्तो मुठ पॅकबंद ठुवाची' ह्या प्रतिज्ञेत कुठंच कसुर नव्हती तरी पण हे आक्रीत घडलं कसं?
'पांढरा कापुस नाही, बर्फ हुता' हे कळाल्यावर जसा भैसाटला तसाच 'मुठीत बर्फ नाही, गारट बधीरता हुती' हे कळाल्यावर भैसाटला आसंल
मंग क्येला आकांडतांडवघोष्णा-बिष्णा धील्या अासंन, ईंड्रेल प्युन घ्यायची धमकी धीली अासंल, बिल्डिंगीच्या गच्चीवरुन उडी मारायची धम्की धीली अासंल. मोक्कार अाकांडतांडव.
अय ! मंत्रालयाच्या साव्व्या मजल्यावर यून आकांडतांडव? संविदानाच्या विरोदाते हे ? हाणतेच्यायलातेचा ! निबार हाणला
एका फटक्यात मातकट शर्टावर(जो पुर्वी ढवळा आसंल) लाल लाल डाग. आणि आपल्याकडं फेल आत्महत्यावाल्याच्या हातात मानसोपचार मददीवाल्याचा पत्ता देण्याआधी आत्महत्याच्या  गुन्ह्याची नोंद टेकवली जाते. हे माहीत नसेल त्याला. नवखं दिसतंय ते. गेलं परत. ममईला यायचे दोन कारणं झाल्ये अासतीन त्याला एक मंत्रालयात अाणि एक पोलीस टेशनात हजेरी.
 अाता वावरात बसल्या बसल्या एका हाता गुन्हा नोंदवल्याचा कागद अाणि गारांचा केलेला बर्फगोळा हातात धरुन बसल्यावर त्याला कागद जास्त गारधोंड वाटला अासंन.
उद्या देवबिवकृपेने त्याच्या फूटभर जमिनीत खंडीभर कापुस उगला तरी तो कापुसच आहे कि बर्फ ह्याची शहानिशा त्याने आधी करायलाच हवी कि नको. अाणि खिशात दोनशे रुपायची गोची अासली तरी बर्फ नेतांना तिनशे ब्हात्तर रुपायचा बेसिक थरमासामधी न्यायला पाहिजे कि नको ? तर असंय सगळंम्हून त्याला झालेली मारहाण ही बरोबरचे म्हना असं प्रायमरीत तरी वाट्टंय

तर येकंदरीत असं झालं असंल असं आपलं मला वाटतंय ब्वा ! ते मरो दे ! अायपेल च्या एॅडा सुरु झाल्या टिव्हीवर पाहिल्या का ? यंदा निस्ता धुमशान अासंन प्हायं !

- प्राजक्त । २५ मार्च २०१७


Thursday, March 23, 2017

लेख : तिच्या असण्या नसण्याचे मोंटाजेस्

ती दुसरं काहीही झाली असतीस तरी चाललं असतं. पण ती नको त्याच क्षणांची झाली अाणि सगळाच गोंधळ होऊन बसला.
ती देव्हारा होत समईची झाली असती तरी चाललं असतं. म्हणजे ती तेवत राहिली असती अाणि ह्याला घरातल्या कुठल्या तरी कोप-यात एक स्निग्धता तेवतेय हि अाणि इतकीच अाठवण राहिली असती. किंवा ती भिंत होऊन सवयीची झाली असतीस तरी चाललं असतं. म्हणजे त्याच्या छताला तेवढंच घर म्हणुन मिरवता अालं असतं. घरासाठी छतापेक्षा भिंत महत्वाची असते हे छताच्या पुरुषत्वाला कळायला जरा वेळच लागतो. किंवा ती जिना होऊन कलंडत्या पेल्याची झाली असती तरी चाललं असतं. म्हणजे चटका बसावा तसा अादळण्याचा अावाज क्षणभरानंतर विझला असता किंवा घरातलंच एखादं बंद घड्याळ ज्याला पुन्हा चालु करण्याच्या भानगडीत कुणी पडत नाही. अशा अडकल्यावेळेची जरी ती झाली असती तरी त्याला चाललं असतं मग येता जाता त्याला त्रास झाला नसता. किंवा त्रास सवयीचा झाला असता. 
पण एकदा तीने अंगणात हौसेने पारिजात लावला होता.  मग दारात येता जाता पायाखाली पारीजात यायचा. पाय अडखळायचा, जीव हळहळयचा. ती पायदळी येणारा प्राजक्त झाली होती .
तीने प्राजक्त व्हायला नको होतं. ती दुसरं काहीही झाली असती तरी चाललं असतं त्याला.
ती वेणू होत त्याच्या अोठांची झाली असती तरी कृष्णसुख होतं. किंवा तीने रागारागात अंगठ्याला होणारी एखादी जीवघेणी ठेच व्हायला पण हरकत नव्हती. ती रुक्मा होत प्रश्नांची ही होऊ शकली असती किंवा राधा होत अाठवांची होऊ शकली असती. 
पण ती काहीही अपेक्षा नसणारी,निरपेक्ष पण तरीही त्याच्याच नावात तल्लीन होणा-या मीरेच्या एकतारीचा अखंड सूर झाली. तीने तो सूर व्हायला नको होतं. ती दुसरं काहीही झाली असती तरी चाललं असतं त्याला.
ती डुगडुगत्या टेबलावर ठेवलेल्या जुन्या ग्रामोफोनची झाली असती तरी चाललं असतं. तिथेच ठेवलेल्या रॅकॉर्डस् मधल्या मेहंदीच्या ‘रंजिश हि सही’ च्या मखमली अार्जवाची झाली असतीस तर चिंता नव्हती. कारण ‘तू भी तो कभी मुझको मनाने के लिए अाss’ ह्या उतरंडीवर अाश्वस्थ होता येतं होतं त्याला. किंवा ती पुस्तकाच्या शेल्फमधल्या डावीकडुन नवव्या जागीच्या दिवान ए गालिबच्या एकशे अडुसष्टाव्या मुडपलेल्या पानावरच्या “…कि समझ नही अाता ज़िंदगी सासों सें है या तेरी याद से” ह्या अोळीची झाली असती तरी खपवुन घेतलं असतं त्याने. कारण शक्यतांचं अर्ध अांदोलन 'सासों से है' वर टिकलेलं होतं.
पण मग नंतर रात्र झाली अाणि त्याल्या अातुनच अोळ सुचली “तेरी याद नब्ज होती तो ठिक होता , ये रात बनी बैठी है। नही कटती”
तीने ‘रात’ व्हायला नको होतं. ती दुसरं काहीही झाली असती तरी चाललं असतं त्याला.
ती ठसका होत पाण्याची झाली असती तरी चालणार होतं. मग तहानेच्या नावाखाली झाकली असती. किंवा डोळ्यांत चूरचूर होत वेगळ्या पाण्याची झाली असती तरी ठिक होतं. मग धुळीच्या नावाखाली टाळता अाली असती. 
पण ती चार चौघात घशातला शब्द थोपवणारा गच्च अावंढा झाली. तीने शब्द थोपवायला नको होतं. ती दुसरं काहीही झाली असती तरी चाललं असतं त्याला
‘पेपर नाही’ , ‘दुध अर्धा लिटर’ , ‘भिशी’ , ‘किराणा भरला’. ती कॅलेंडरवरच्या खुणांची झाली असती तरी चालणार होतं त्याला. कामाच्या जात्यात भरडणारा  लाल खुणांनी सुखावणारा जीव कॅलेंडरवरचे तीचे टिपणं फारसे निरखत नाही.  किंवा मागच्या खिडकीतुन डोकावणारा गुलमोहर होत ती सावळ्या उन्हाची झाली असती तरी चाललं असतं. किंवा कवीतेच्या वहीच्या मागे फावल्या चिन्हाची झाली असती तरी चाललं असतं त्याला किंवा ढग पसरलेल्या रविवारच्या मध्यान्हाची झाली असती तरी हरकत शुन्य होती. 
पण अशाच मध्यान्ही, जेव्हा तो तीच्या भिंतीवरच्या चंदनाच्या हारामागे दडलेल्या फोटोवर तंद्री लावुन बसलेला असतो… तेव्हा ती रद्दीवाल्याचा दर रविवारी मध्यान्हाचा प्रश्न झाली. “बाईसाहेब अाहे का घरी ?” तीने तो प्रश्न व्हायला नको होतं. ती दुसरं काहीही झाली असती तरी चाललं असतं त्याला.
थोडक्यात , ती दुसरं काहीही झाली असतीस तरी चाललं असतं. पण ती त्याच्या नको त्याच क्षणांची झाली अाणि सगळाच गोंधळ होऊन बसला.

- प्राजक्त २३ मार्च २०१७



Friday, March 17, 2017

देवबाभळी प्रतिक्रिया

1) Shripad Deshpande : 

काही-काही गोष्टी लहानपणापासून माझी तंद्री लावणाऱ्या.
म्हणजे गरम गरम कातळावर तांब्याच्या पेल्यातून पाणी सोडलं तर येणारी वाफ .. ऐन श्रावणात बावडीचं डोळा टीपणारं चमचम पाणी .. देवडीच्या तड्यातून दुपारभर येणारे-जाणारे मुंगळे .. कुठल्याश्या ओसाड गावातून उशिराने तडतडत येणाऱ्या लाल बसच्या आतले निळे-निळे लाईट .. नदीवर पितळाच्या घागरी चुबकून घेताना घडघडणारे आवाज .. देवघराच्या वस्त्रांवरचे तेलकट डाग .. आईच्या झुब्यांची कचकडीची डबी .. एकट्या राहणाऱ्या स्टीव्हन्स काकांच्या घरावर येणारे भारद्वाजाचे जोडपे आणि असं बरंच काही ..
ह्या तंद्री लावणाऱ्या गोष्टींमध्ये भर पडत चालली आहे.
काल पुन्हा एकदा “देवबाभळी” बघितलं आणि पुन्हा एकदा तंद्री लागली .. प्राजक्तच्या लिखाणाने तंद्री लावली. ह्याच तंद्रीमध्ये संहितेमधून तुकारामाचे अभंग वेगळे काढायला घेतले तर चुकून प्राजक्तचे अभंग वेगळे काढले गेले .. नंतर लक्षात आलं. ( नशीब तुकारामाने “तुका म्हणे ” असं त्याच्या अभंगाच्या शेवटी लिहून ठेवलंय ) ..
ढगांच्या गडगडाटाने इवल्याश्या विठ्ठलावर येणारा प्रकाश आणला कुठून बाबा ह्या विचाराने तंद्री लागली. विरक्तीचे-भक्तीचे अभंग लिहिण्यासाठी असलेल्या तुकारामाच्या डेस्कवर , ऐटीत बोरू म्हणून ठेवलेल्या मोरपिसावर .. गडद गुलाबी Romantic रंग उधळण्याचा आगावूपणा का केलास प्रफुल्ल .. कुठे जायचं आम्ही देहभर भिनलेला हा रंग घेवून ..
पितळी पराती .. लोखंडी खलबत्ते .. रिकामे डबे .. सारवून घट्ट बांधली चूल वापरली रे .. तुला कसं कळत नाही प्रणव त्या सगळ्या नेपथ्याच सुद्धा संगीत होतं आणि मी तिथे जातो त्याच तंद्रीत .. तिथून मला परत आणण्यासाठी मिठी मारून जा .. !
श्वास गुदमरेपर्यंत आरोह अवरोहांमध्ये बुचकळून ठेवणाऱ्या , संगीताचा डोह गाठीशी घेवून बसलेल्या आनंदला माफ करण्याइतका मी तुकाराम नाही .. अवली आणि लखूमाई गाताना अश्याच दिसतात का .. तर अश्याच दिसतात .. आता ..
.. तुकारामाच्या चिपळ्या .. खणखणणारे टाळ .. अर्ध्या-मुर्ध्या धुपाच्या कांड्या .. मोरपंखी अर्धवट जळालेले जिलेटीन पेपर .. मागे उरल्या स्टेजवरच्या जोंधळ्याच्या भाकऱ्या .. खलबत्ते .. पराती .. पायाला बांधली चमचम चिंधी .. असा सगळा पसारा ह्या तंद्रीत मांडून बसलोय !
.. ह्या सगळ्या पसार्याच आता काय करू .. ?


2)Simparpal Birdi 
 The true Alchemists do not change Lead into Gold, they Change world into WORDS...!!
You are the Truely Alchemist#PrajaktDeshmukh
देवबाभळी ~ a musical play
An Experience blended with Divine, Engaging Performances, Mesmerizing Music and the most important Soulful Words.
An Aura of Spirituality created by the Brilliant writer Prajakt Deshmukh.
Your writing do touch the strings of HUMAN SPIRIT. THOUGHT perceived from this play will take you down to your roots of Feelings, Memories, Emotions and FAITH.
PS : Goosebumps assure (Epitome of Your emotions will lead you to cry) when the curtain comes down. 


3)
संत तुकारामांचं अफाट आयुष्य आकाशाएवढं! प्रत्येक संवेदनशील लेखक कवींना या आकाशानं नेहमीच साद घातलीये. तुकोबांच्या जगण्याच्या एकेका क्षणावर चिंतन करीत लिहित बोलत राहिलं तर बरेच जन्म खर्ची पडतील... या आकाशाकडे झेपावण्याचं आकर्षण संवेदनशील लेखक कवीच्या मनात असणं हेच त्याच्या माणूसपणाचं लक्षण... नाशिकचा आमचा युवा मित्र प्राजक्त देशमुख हा याच वर्गातला. तरल आणि हळुवारपणे विषय निष्णात सर्जकागत उलगडत नेणं ही त्याची खासीयत. त्याच्या सध्याच्या वयाला साजेसा रोमॅंटिसिझम त्याच्या लेखनात येणं स्वाभाविक! काल त्यानं लिहिलेलं व दिग्दर्शिक केलेलं "देवबाभळी" नाटक पाहिलं. आवली आणि लखूमा (रखुमाई) यांच्या भेटीचं. संवादाचं. आवलीतील वरवर कजाग, शिवराळ स्त्रीच्या काळजातील देवळीत खोलवर शांत तेवणारी अध्यात्माची अढळ ज्योत आणि दुसऱ्या बाजूला रखुमाईच्या दयार्द्र प्रेमळ डोळ्यांच्या कडेला विठ्ठलाबाबतची अनाकलनीय हलकीशी काजळी.. दोघींच्या तरल संवादातून प्राजक्तनं चांगल्या विषयाला हात घातलाय. संगीत नाटक असल्याने नकळत कृतकतेची छाया सबंध नाटकभर जाणवत असली तरी दोघींचा वावर आणि गायन छान शिडकावा करीत राहते. आनंद ओक याने लेखनाला पूरक असा तरल संगीतसाज चढवलाय. प्रफुल्लची प्रकाशयोजना दाद देण्यासारखी !
संगीत देवबाभळीच्या निमित्ताने नाशिकच्या रंगभूमीवरची नवी पिढी केवढ्या संवेदनशील विचारातून नवनिर्मिती करू पहातेय, हे पाहून खूपच आनंद झाला.
संपूर्ण टीमचं मनापासून कौतुक!
- दत्ता पाटील

४) 
दोन स्त्रियांच्या अंतर्मनाचा ठाव घेणारी *देवबाभळी*.!
राज्य नाट्य स्पर्धेत *गांधीहत्या आणि मी*ने मिळविलेलं घवघवीत यश व *हंडाभर चांदण्या*ने राष्ट्रीय पातळीवर रचलेला एक नवा इतिहास आणि या नाटकाला झी गौरव व मटा सन्मान या पुरस्कारांत विविध श्रेणीत मिळालेली नामांकने पाहता नाशिकच्या प्रायोगिक रंगभुमीची सर्वत्र विजयी घोडदौड सुरु असल्याचं चित्र दिसुन येत आहे.
या यादीत आणखी एका कलाक्रुतीचा आवर्जुन समावेश करावा लागेल. ती म्हणजे संगीत *देवबाभळी*.!
स्पंदन| परिवार आणि अश्वमेध थिएटर्स या नाट्यक्षेत्रातल्या दोन नावाजलेल्या संस्थांची संयुक्त निर्मिती असलेल्या, वोडाफोन - थिएटर ॲकॅडमी, पुणे आयोजीत रंगसंगीत स्पर्धेत सर्वोत्कृष्ट संगीत नाटकाच्या प्रथम पारितोषिकासह ७ पारितोषिके पटकवणार्या या दिर्घाकाचा नाशकातील शुभारंभाचा प्रयोग रसिक प्रेक्षकांच्या मोठ्यासंख्येच्या उपस्थितीत व उदंड प्रतिसादात नुकताच पार पडला. प्रेक्षकांमधे *देवबाभळी* पाहण्याची किती कमालीची उत्सुकता होती हेच यावेळी दिसुन आले. *देवबाभळी* या नावावरुन तरी नाटकाच्या आशय, विषयाचा काहीही बोध होत नसला तरी एक दर्जेदार कलाक्रुती पहायला मिळणार याची खात्री होतीच.
पडदा उघडतो तेव्हा रंगमंचावर एका तरुण स्त्रीची दैनंदीन दिनचर्या सुरु असल्याचं दिसतं. तिचं घर सावरणं, चुलीसमोर बसुन भाकरी थापणं, नदीवर जाऊन कपडे धुणं आणि त्याचबरोबर मुखातुन ओवी, अभंग गुणगुणणं सुरु आहे. त्यानंतर तिच्या धन्यासाठी शिदोरी घेऊन ती निघते. माळरान, डोंगरमाथा असा ठिकठिकाणी त्याचा शोध घेते, आरोळ्या देते. आणि अचानक, तिच्याही नकळत तिच्या नाजुक पायाच्या टाचेत काटा रुततो. हाच ते 'देवबाभळी'. ती काटा काढते. वेदनेने कळवळते आणि ग्लानी येऊन क्षणार्धात कोसळते.
शुध्दीवर आल्यावर पाहते तर ती तिच्याच घरात. पण तिच्या घरातील चुलीचा ताबा दुसर्याच एका स्त्रीने घेतलाय. ती स्त्री एकटी आलेली नाही तर तिच्यासोबत येतांना तिने दोन्ही हात कटेवर ठेऊन उभा असलेल्या विठ्ठलाची मुर्ती आणलेली आहे. आणि मग प्रेक्षकांना त्या दोन स्त्रीयांची ओळख पटते. असामान्य व्यक्तिमत्वांच्या सहचारिणी वरवर जरी सामान्य भासत असल्या तरी असामान्यच असतात. त्यातील एक स्त्री आहे आवली, विठ्ठल भक्त संत तुकारामांची पत्नी आणि दुसरी स्त्री आहे साक्षात विठ्ठलाची रखुमाई. पुढे या दोन स्त्रीयांच्या आपसातील संवादांतुन त्यांची अंतर्मने अलगदपणे उलगडत जातात. दोघींचा स्वभाव परस्परांशी भिन्न. मात्र एका गोष्टीचे दोघींमधे साम्य आहे. दोघीही आपापल्या पतींवर जीवापाड प्रेम करत त्यांच्याशी पुर्णपणे समरस झालेल्या आहेत.
सावकारी गेल्याने आलेली निर्धनता, संसाराची, ग्रुहस्थीची झालेली परवड याला कारणीभुत समजुन विठ्ठलाचा, विठ्ठल नामाचाही द्वेष करणारी आवली तर आवलीला जखम झाली म्हणुन विठ्ठलाच्या सांगण्यावरुन तुकारामाच्या घरी येऊन त्याचं घरदार सांभाळणारी संयमी, तेजस्वी रखुमाई. आवलीच्या रोजरोज विठ्ठलाला कोसत राहण्याने तिची आतुन घुसमट होत राहते. कधी एकदा गर्भवती असलेल्या आवलीच्या पायाची जखम भरते आणि ती जाते असे झालेली रखुमाई तर द्वेष करुन का होईना पण दिवसातुन हजारदा विठ्ठल नामाचे नामस्मरण करणारी आवली अशी द्रुश्य स्वरुपातील ही दोनच पात्रं या दिर्घाकांत आहेत. विठ्ठल आणि तुकाराम प्रत्यक्ष दिसत नाहीत. पण दोघांचं अस्तित्व या दोन स्त्री व्यक्तीरेखांमुळे जाणवर रहातं. विठ्ठलाची निदान मुर्ती तरी दिसते पण तुकाराम मात्र त्यांच्या अभंगातुनच डोकावतात.
तुकारामांवर दोन चित्रपट येऊन गेलेत. एक दैनंदीन मालिकाही सुरु आहे. पण त्याचविषयावरील *देवबाभळी* मात्र वेगळ्या अंगाने जातो. विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या तुकारामांची गाथा असली तरी आवली आणि रखुमाई या दोन स्त्री व्यक्तीरेखांवरच लक्ष केंद्रीत करण्यात आलेलं आहे. त्यामुळे यात तुकारामांचे तथाकथित चमत्कारही दिसत नाहीत. लेखकाने जाणिवपुर्वक विषयाच्या मांडणीत वेगळेपण ठेवलेल्याचं जाणवत रहातं. प्राजक्त देशमुख याचं लेखन-दिग्दर्शन सशक्त आणि प्रचंड ताकदीचं आहे. भक्तीप्रधान विषयात स्वारस्य असणारा एक मर्यादीत प्रेक्षक असतो. परंतु *देवबाभळी* त्याला अपवाद ठरणार आहे. सर्व थरांतील, सर्व वयोगटांतील प्रेक्षकांच्या पसंतीला उतरण्याची क्षमता या दिर्घाकांच्या संहितेत आणि सादरीकरणात आहे. प्राजक्तने लेखक म्हणुन केलेली आशयाची मांडणी आणि दिग्दर्शक म्हणुन केलेली विषयाची हाताळणी दोन्हीही निव्वळ लाजवाब.! आवली-रखुमाई यांच्यातील प्रसंग खुमासदार संवादांद्वारे छान खुलवले आहेत. आवलीच्या तोंडी असणारी शिवराळ ग्रामीण भाषा अत्यंत चपखल वाटली आहे.
संगीत हा तर *देवबाभळी*चा आत्मा आहे. आनंद ओक या तरुण संगीत दिग्दर्शकाने तुकारामांच्या आणि प्राजक्तच्या अभंगांना सुश्राव्य चाली बांधल्या आहेत. त्या ऐकतांना प्रेक्षक भक्तीरसात अक्षरश: न्हाऊन निघतो. आनंदचा शास्त्रीय संगीत देण्याचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचं मात्र जराही कुठे जाणवत नाही. देवबाभळीत संवांदांपेक्षाही संगीत अधिक प्रमाणावर आहे. आनंद ओकने त्याचं काम अत्यंत चोखपणे केलं आहे. प्रेक्षक संगीताच्या तालावर डोलायला लागतात आणि मंत्रमुग्ध होऊन जातात. अमित चंद्रमोरे, भुषण काळोखे, सौरभ कुलकर्णी, रोहन कानडे, मयुर भालेराव, अभिषेक दांडेकर या सर्वांची उत्तम संगीत साथसंगत देवबाभळीला लाभलेली आहे.
प्रणव प्रभाकरच्या नेपथ्याला आणि प्रफुल्ल दीक्षितच्या प्रकाश योजनेला पुर्ण गुण द्यावेच लागतील. चुल, पितळी परात, लोखंडी खलबत्ता, रिकामे डबे असं मोजकंच सामान दाखवत तुकारामांची खालावलेली आर्थिक परिस्तिथी तसेच इंद्रायणी नदीचा काठ कल्पकतेने उभे केले आहेत. प्रकाश योजना तर या एकांकिकेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. साक्षात विठ्ठलाचे दर्शन घडविण्याची किमया याच प्रकाश योजनेची.
शुभांगी सदावर्ते आणि रसिका नातु यांनी आवली आणि रखुमाई या व्यक्तीरेखा जिवंतपणे साकारल्या आहेत. दोघीही उत्तम अभिनेत्री तर आहेतच त्याचबरोबर उत्तम गायिका देखील आहेत. दोघींनी आपापल्या भुमिका समजुन-उमजुन व पुर्णपणे समरसुन केलेल्या आहेत. स्नेहल एकबोटे यांची वेशभुषा तसेच पात्रांची रंगभुषा त्यांच्या व्यक्तीरेखांना अनुरुप आहेत. पुर्वा सावजी आणि अभिषेक वालझाडे यांनी रंगमंच व्यवस्था सांभाळली आहे. तर राजेश भुसारे व श्रीपाद देशपांडे हे या देवबाभळीचे सुत्रधार अाहेत. हेमंत महाजन आणि गिरीष गर्गे यांच्या निर्मिती सहाय्यातुन एक दैवी अनुभुती देणारी अद्भुत कलाक्रुती उभी राहीली आहे. महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे आयोजित रंगमहोत्सवात सादरीकरण झालेल्या या दिर्घांकाने अहमदनगर महाकरंडक स्पर्धेत सर्वोत्कृष्ट संगीतासह दोन पुरस्कार पटकावले आहेत.
संगीत नाटकांचा काळ पुन्हा आला तर *देवबाभळी* नक्कीच मैलाचा एक दगड ठरणार आहे.
-श्रीराम वाघमारे

18 sept 2017

काल 'सं. देवबाभळी' पाहिलं.. अतिशय वेगळा पण आपल्या मातीतला विषय, उत्तम बांधणी आणि अप्रतिम सादरीकरण.. प्राजक्त देशमुख कवितेतून जितका सहज, सुंदर व्यक्त होतो, त्याच सहजतेने लेखक-दिग्दर्शक म्हणून या नाटकातून भेटतो.. आणि ही सहजता संपूर्ण नाटकात जाणवत राहते.. त्यामुळे प्रेक्षक आणि कलाकार यांच्यातलं अंतर नाहीसं होतं. नाटक मनाला भिडतं. हे नाटकाचं आणि संपूर्ण टीमचं यश आहे. यातल्या ओेव्या , अभंग नाटकाचा अविभाज्य भाग आहेत. आणि आनंद ओक याच्या संगीताने त्या काव्याची परिणामकारकता राखली आहे.. केवळ दोन स्त्रीपात्र असलेल्या या नाटकातल्या या दोन अभिनेत्रींचं कौतुक केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. शुभांगी सदावर्ते आणि रसिका नातू.. दोघीही अप्रतिम गातात. आणि अतिशय सहजपणे अभिनय आणि गाण्यात संचार करतात.. सर्वात महत्वाचं म्हणजे या transition मध्ये क्षणाकरता सुद्धा त्या भूमिकेपासून वेगळ्या होत नाहीत. अनेक ओव्या डोळे भिजवतात. अनेक गोष्टींचं खोलात शिरून आणखी कौतुक करण्यासारखं आहे.. पण त्या वेगळ्या पाहण्याकरिता याचे आणखी प्रयोग पाहायला हवेत.. सगळ्या बाजू उत्तम जुळून आल्याने एकसंधपणाची खूप मजा येते.. मूळ दीर्घांकाचं सादरीकरण काल जरी एकांकिका स्वरूपात झालं असलं तरी त्याची परिणामकारकता कमी होत नाही. या नाटकाचे अधिकाधिक आणि उत्तमोत्तम प्रयोग होवोत , अशी इच्छा!
बाकी कालच्या बक्षीसाबद्दलही अभिनंदन!
- अानंदी जोशी



Friday, January 20, 2017

मी रॉमेंटिक नसण्याची कारणं



माझी चूक काय ? खरंच सांग माझी काय चूक
नाही म्हणजे…… जेव्हा हळुहळु हळूहळु दर्यामध्ये संध्याकाळ विसावत असेल , तेव्हा मी ती संध्याकाळ पाहुन तुला म्हणु शकलो असतो किअगं ! बघ तुझ्या रुपानेच केशरी-किरमीजी रंगाची संध्याकाळ जणू पश्मिना शाल होउन पसरतेस माझ्यावर….. होना
पण त्या क्षितीजकडेचा केसरसर पिवळ्या रंगामुळे मला पायाला ठेच लागलेला मजूर अाठवतो. सकाळी दुधाची उबळ, पोराचा झोका , दोरीवर बाहेर पावसात भिजणारे कपडे अाणि कामाला यायची घाई ह्या गडबडीत तुळशीला ठेच लागली होती त्याला. तिथे जरा रेंगाळायला झालं त्याला. मग पुढे कामाला उशीर झाला म्हणुन मुकादमाने चार पैसे कापलेही त्याचे.अं ? हां….! थोडं वहावत गेलो होतो. तर त्या मजूराच्या पायाला बांधलेलं फडकं अाठवतं, अात दाबुन धरलेली उबळ अाणि अात दाबुन धरलेली हळद किती नाही म्हटलं तरी बाहेर येतेच कधीतरी. अाणि ते पांढरं फडकं अाता झालेल्या लाल-पिवळ्या सरमिसळीमुळे अाणि संध्याकाळच्या हवेमुळे जरा केसरसर पडलंय पायाला बांधलेलं फडकं. म्हणुनअशीसंध्याकाळ झाली कि मलातसंअाठवतं. सांग य़ात माझी काय चूक?
हे बघ झोकात अालेला पाऊस पाहुन मी असंही म्हणु शकतो किअाभाळतुन पाऊस उगु लागला कि असं वाटतं प्रत्येक थेंबाचं एकेक अलिंगन व्हावं अाणि प्रत्येक थेंबाने बहात्तर वादळं निर्माण करावी अाणि तुला बिलगावंखरंच म्हणु शकतो मी असं पण……पाऊस सुरु झाल्या झाल्या मला अाठवतात त्या फ्लायअोवरच्या टॉप अॅंगलने दिसण्या-या झोपड्या. ज्या मधल्या एका झोपडीत मी एका पावसाळ्यातसोशल थ्रीलकरायचं म्हणुन डोकावलो होतो. तिथल्या छप्राखाली मला सगळी मिळुन बहात्तर भांडी पसरवुन ठेवलेली दिसली. सगळी भांडी वर अा वासुन बसले होते. घमेले, पातेले, लोट्या, कढया, टिनाचे डबे, तवेसुद्धा वगैरे वगैरे. अाणि त्या झोपडीत कुटूंब म्हणुन राहणारे गचपण समोर पसरवलेले भांडे पाहात होते. मला त्यांच्या डोळ्यातला प्रश्न दिसला होताअाज भुक कशात रांधायचीजितका जास्त झोकात पाऊस येतो तितकी जास्त पसरवलेली भांडी दिसतात मला. सांग ह्यात माझी काय चूक ?
अगदीच नास्तिक वगैरे असं नाही पण कुणाच्या नामस्मरणातही देवादिकांची नावं घेतली कि मला त्याच्या डोक्यामागचा तेजोमय सुर्य नाही दिसतं. त्यांच्या तशा सुर्याअाड उभं राहिल्याने समोर पडलेला अंधारसावली म्हणुया हवं तर , अंधार फार नकारात्मक वगैरे वाटत असेल तर. राम म्हटलं कि शरयुची ती लाट अाठवते जी अाजरामाला गिळलं ss’ म्हणत समुद्र होऊन कुठल्याशा किनारी डोकं अादळत असेल. तुम्हीअाम्ही खुळे ! त्यालाभरतीम्हणतो. अाणि समुद्राचा हा अात्मक्लेश पाहुन चंद्र छातीतपुर्णहवा घेत ढगामागे स्फुंदुन रडतो. त्याला अापण वेंधळेपुनवम्हणतोअाणि तू म्हणतेसमाझ्यासाठी पुनवेच्या रुपकांच्या कविता का नाही” ….काय चूक ? माझी काय चूक ?
राधाकृष्ण ? कृष्ण म्हणावं तर रानावनात अापलं हरवलेलं एक मोरपीस शोधत भटकणारा सैरभैर मोर दिसत राहतो मनातल्या मनात. हांराधा म्हटलं कि राधाच अाठवते अाणि अातड्यात एक नवा पीळ येतो म्हणा. पण ह्यातही माझी चूक नाही.
तुझ्या कपाळी दोन भिवयांतुन जेव्हा चंद्रकोर डोकावते ना तेव्हा ….धगी पल्याडचा निर्वात …..लाव्ह्यामधली धग….जमीनखालचा लाव्हा….पायाखालची जमीन…. ती जमीन भस्सकन नाहीशी होते अाणि काळजात धस्स् होतं”.........असंही मी म्हणु शकलो असतो मीपण भिवईपासुन अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं तुझं सौभाग्य गुरूत्वाचे नियम लागु करतात. अाणि मला पुन्हा जमिनीचा शाप देतात. ह्यात माझी चूक ?
 अजुन सांगु ? .....मीराने कृष्ण मुर्तीला कवटाळलं अाहे , सहस्त्र झोत त्या मुर्तीअातुन प्रकटले अाहे अाणि मीरा त्या मुर्तीत लुप्त झाली अाहेमीरा कृष्णात लुप्त झाली म्हणुन अापल्याला राधेच्याही वरचं रुपक मिळाल्याचा मंदीरात जल्लोष चालु अाहे. पण त्या जल्लोषात कोप-यात हुंदके देत मृच्छित पडलेला एक पुरोहित दिसतो मला. मीरा कृष्णमुर्तीत लुप्त झाल्यानंतर त्या मुर्तीला तडा गेलाय म्हणे. त्या पुरोहीताला त्याच्या अभंग कृष्णकायेवर पडलेला तो मीरामुक्तीचा तडा बघवला नसावा. मीरा म्हटलं कि तो मृच्छित पुरोहित दिसतो मला तर सांग ह्यात माझी काय चूक ?
क्षितीजावर उमटलेला इंद्रधनुचा सप्तरंगी चाप तस्साच्या तस्सा तोडुन , तुझ्या गळयाभोती मढवेन नेकलेस म्हणुन अन् हुक म्हणुन शुक्राची कडी अडकवेलअसंही रंगवता येतं मदहोष चित्र मला. पण……त्या सप्तरंगात ज्याने त्याने गिरवलेला अाणित त्या रंगात बरबटवलेला देवधर्म दिसतो त्यात मला.
माझं लहानपणी पासुन असंच होतं. खेळातांना अाधी कोणाचा डाव म्हणुन अाम्ही पोरसोरं नाणं उडवायचो. जेव्हा अामचा संघछाप अाला’,टॉस जिंकल्याचा अानंदात उन्मादत असायचा तेव्हा मी ते नाणं उचलुनकाट्याची धूळ साफ करायचो. एखादा दिवस ,एखादा संघ येईल अाणि कधीतरी तोही अाशाळभूत पणकाटाअोरडुन त्याच्यासाठी जल्लोष करेल असं त्याचं सांत्वन करायचो.
मग छाप्याचं काय ? हां कदाचित ह्यात माझी चूक असेल ! सगळं लहानपणीच्या छापा-काट्यात दडलं असेल का?

पण खरं सांग ह्यात तरी माझी काय चूक ?

- प्राजक्त २० जानेवारी २०१७


अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...