Monday, May 21, 2012
अलिकडे नाशकात पाऊस कमी का पडतो ?
____________________________________________________________________________________________________________________
पुर्वी वर्गात भुगोलाच्या काटकुळ्या सरांनी प्रश्न विचारला की "सांगा पाऊस कधी येतो ?"
सोमीगोमी पोरंसुद्धा एका सुरात म्हणायची "सा.....त...जुन !! "
आत विचारलं तर फ़क्त खुसफ़ुस ऐकु येईल किंवा ती पोरं वर्गाच्या तुटक्या खिडकीतुन
वर बघतील की "आता पण येऊ शकतो काय भरवसा ? "
आधी कसं व्हायचं....
पावसाळा सोप्यामधे आपल्या चपला काढायचे..खुंटीवर आभाळाची टोपी अडकवुन, हातपाय पसरुन नाशकात बि-हाड टाकायचा मामाच्या घरी आल्यासारखा.
पावसाआधी सगळं भरुन यायचं.पुलावरुन काळारामाच्या कळसाकडे पाहिलं की आभाळ कुठे सुरु होतं आणि काळ्यारामाचा काळा कातळ कुठे सुरु व्हायचा
हे कळायलासुद्धा वेळ लागायचा. गंगेतीरावर नारोशंकराची घंटा गार हवेने हलल्याचा भास व्हायचा. तिकडे त्रंबकराजाला थेंबांचा अभिषेक करुन
हळुहळु पुढे ‘अंजनी’सुताची विचारपुस करत पांडवलेण्यांवरचा ‘लव्हबर्ड्स’च्या खुडुबाजी पुसुन टाकायचा.पलीकडुन सप्तशृंगीच्या भुरकट पाय-यांना
नवा काळारंग द्यायचा. सगळ्या देवांचे आयास सायास झाले की मग आभाळ दुस-या टोकाला भगुरला तात्यारावांच्या अंगणातली मातीच्या गंध
छातीत भरुन घ्यायचा.आणि सज्ज व्हायचा धुमाकुळ घालायला.
मग पहिली धार ‘दुस-या’ तात्यारावांच्या घराबाहेरच्या ‘जगण्यासाठी माझी कविता कधीच नव्हती...’
ह्या बोर्डावर.... तिथुन जो अलिप्तपणा पावसाळा अंगात भिनवायचा तो त्याला पुढचे चार महिने पुरायचा.मग सिबीएस-शालिमारची अचानक
धावपळ व्हायची. सोमेश्वराच्या धबधब्याला नवीन फ़ेस यायचा.गंगापुर रोड वहात रहायचा.नाशिकरोडला चौकाचौकाचे आडोसे धरुन डोक्यावर रुमालाची बांधाबांध सुरु व्हायची.
मग मेनरोड्ला डोकी कमी छत्र्यां जास्त. सरकारवाड्याच्या शेजारची कौल टपटप ताल धरायचे.जवळच आनंदीबाईची हवेली अंबाडा सोडुन
परत सारखा करायची. सकाळी अंघोळ करुन सुद्धा बसल्या बसल्या जरा झोपेची लहर आल्यावर नव्या हिमतीने तोंडावर स्वच्छपाणी मारल्यागत..
नाशिक नवं नवं नटायचं.
पण आताशा...
भरुन आलेले ढग वरुनच बेशिस्त माजोरड्या रिक्षावाल्यासारखं "अय येता का ? " असं विचारणा-या नाशिककडे तोंड फ़िरवतं.मग पाऊस राग उतरल्यावर उगाच अंदाज घेण्यासाठी चारदोन थेंब टाकुन
पाहतो तर तेही जमीनीवर कमी आणि बेढब काळ्याबिंद्र्या भाऊ-दादांच्या फ़्लेक्सवर जाऊन पडतात.गोदेमध्ये पहिली डुबकी मारावी तर सर्वांगाला शेवाळाची घाण , धुणेक-यांचे ‘मांगल्य’ आणि
पुन्हा ‘स्वच्छताप्रिय’वाहनांचे ‘सर्वमांगल्य’.इतकं करुनसुद्धा जर "तुला जावंच लागेल" अशी त्रंबकराज शंकराने दटावणी दिली तर उगाच तो पाऊस शाळेला कावलेल्या मुलासारखा हो-नाही करत
पाट्या टाकल्यागत शिंपण करतो.
ती शिंपणसुद्धा काही वेळातच भुरभुर करत स्वत:च अंग आकसुन घेते...कारण चारदोन थेंब गाडीच्या लोगोवरुन घसरण्याऐवजी लोगो चोरलेल्या
खरबुड्या जागेत अडकुन राहतात, काही थेंब चौकामधल्या बेशिस्त आक्रस्ताळी रिक्षावाल्यांच्या थुंकीत अडकुन भिंतींला तर काही थेंब रस्त्याच्या कोप-यात दडतात,उरलेले थेंब राजीवगांधी भवन बाहेरच्या
‘फ़ुलटाईम दुर्लक्षित’आंदोलन करणा-या मंडपावर अडतात. काही थेंब कॉलेजरोडच्या‘विली’ला दड्पुन रस्ताबदलुन पलीकडच्या गंगापुर रोडकडे जातात पण तिथेही सोनसाखळी चोराच्या तोंड
लपलेल्या रुमालात थिजतात.उरलेले थेंब दत्तमंदिरच्या ट्राफिक पोलीस नसलेल्या सिग्नलवरुन ओघळतात तर काही थेंब बिटको चौकातल्या सिग्नल तोडुन ,
१०-१२ प्रवासी कोंबलेली रिक्षा पाहुनसुद्धा दुर्लक्ष करणा-या षंढ ट्राफ़िक पोलिसच्या बिल्ल्यावर पडतात. गल्लीबोळातल्या अतिक्रमणात अडकुन पडतात , अन काही थेंब दिशादर्शक कमानींवर
गलेलठ्ठ थोबांडांचे अभिनंदन बॅनर असल्यामुळे रस्ता चुकतात आणि भलत्याच माळरानावर जाऊन बरसतात.त्याचा आपल्या नाशिकला फ़ायदा शुन्य.
असा हा उशीरा उगवलेला पाऊस चार महिने सत्राशे साठ ठिकाणी अडकतो,हिरमुसतो आणि पुढल्यावेळी आणखी जास्त अंग चोरत पायातल्या चपलाही न काढता नुसता डोकवतो.
मधल्यासुटीत शाळेच्या अंगणात डोळे किलकिले करत ‘आ’करुन उभं असलेल्या चार दोन पोरांच्या तोंडात गेल्याचे...चार आणे समाधान उराशी घेउन .पाऊस नाशकातुन काढता पाय घेतो आणि
पुढे कुठल्याशा गर्दरानात जाउन पडत नाही तर जुन्या नाशिकच्या हिरव्या आठवणी आठवत धो धो रडत राहतो.
- प्राजक्त देशमुख
deshmukh.praj@gmail.com
Wednesday, February 1, 2012
सावली
सावल्यांनी मनावर घेतलं तर,
क्षितीजभर लांबोळक्या होतात
सावल्यांनी मनावर घेतलं तर,
पायाखाली ठिपक्याभर दिसतात
.
सावलीचं बरं आहे,
सालं,आभाळालाच थोरलेपण चिकटलंय !
क्षितीजभर लांबोळक्या होतात
सावल्यांनी मनावर घेतलं तर,
पायाखाली ठिपक्याभर दिसतात
.
सावलीचं बरं आहे,
सालं,आभाळालाच थोरलेपण चिकटलंय !
Thursday, February 17, 2011
मंत्रालयास....
एकदाच घोषितच करुन टाका
कळ्यांनी आणि काकणांनी
फुलायचच नाही
फुलाल तर रातराणीगत रात्री
पण राहु द्या एवढी खात्री
सुगंध जागच्या जागी विरेल
काकणं वाजुन भोवतीच फ़िरेल
काकण आणि कळ्या
चोळामोळा चारचौघात...
त्याला उलटुन ना जाब ना फ़िर्याद
हे एकदाच घोषित तरी करुन टाका.
-प्राजक्त
०५।०२।११
कळ्यांनी आणि काकणांनी
फुलायचच नाही
फुलाल तर रातराणीगत रात्री
पण राहु द्या एवढी खात्री
सुगंध जागच्या जागी विरेल
काकणं वाजुन भोवतीच फ़िरेल
काकण आणि कळ्या
चोळामोळा चारचौघात...
त्याला उलटुन ना जाब ना फ़िर्याद
हे एकदाच घोषित तरी करुन टाका.
-प्राजक्त
०५।०२।११
Wednesday, October 6, 2010
स्वच्छ चौकोन
काल परवाच्या भांडणात
भिंतीवरचा फ़ोटॊ निखळुन
जमीनीवर खळाळला...
आता तिथे फ़ोटो नाही
उरलाय फ़क्त
स्वच्छ चौकोन...
जो आठवण करुन देतो...
आपल्या क्षुल्लक भांडणाची
.
.
.
.
आणि तु नसण्याची.
- प्राजक्त ।०६।१०।१०
भिंतीवरचा फ़ोटॊ निखळुन
जमीनीवर खळाळला...
आता तिथे फ़ोटो नाही
उरलाय फ़क्त
स्वच्छ चौकोन...
जो आठवण करुन देतो...
आपल्या क्षुल्लक भांडणाची
.
.
.
.
आणि तु नसण्याची.
- प्राजक्त ।०६।१०।१०
Wednesday, August 4, 2010
झोप आता....
मी: झोप येत नाहिये आज
विदुषक: गोष्ट सांगु ?
मी: हम्म...!
विदुषक :
ती चालायची....
मी :एक...एक एक मिनीट...हि गोष्ट आहे कि कविता ?
विदुषक : गोष्ट असेल तर हजार आणि कवितेला लाख मोजणार आहेस का ?
मी : हम्म सांगा....
विदुषक :
ती चालायची...
आपल्या अंगठ्याकडे बघत
आजुबाजु वाहत्या वा-याकडे सुद्धा
डोळॆ वर करुन न बघत
चालायची ती...
वाहत्या वा-याकडे
दुर्लक्ष केले चालले असते
घुटमळत्या वा-यांना वेळीच
डोळॆ वटारुन घाबरवलं असतं वा
चकवलं असतं तर जास्त काळ
चालली असती अजुन
कित्येक वर्ष...
आता
घुटमळत्या वा-याने
तिला पिंजुन काढले आणि
ती उपडी जमीनीवरुन भरलं आभाळ
बघत शेवटले श्वास मोजत
विचार करतेय
की,
अंगठ्याकडुन
आभाळापर्यंतचा
कसला प्रवास जिवघेणा ठरला
मी : ....... !!!!!
विदुषक : झोप आता....
मी : ....!!!
-प्राजक्त
विदुषक: गोष्ट सांगु ?
मी: हम्म...!
विदुषक :
ती चालायची....
मी :एक...एक एक मिनीट...हि गोष्ट आहे कि कविता ?
विदुषक : गोष्ट असेल तर हजार आणि कवितेला लाख मोजणार आहेस का ?
मी : हम्म सांगा....
विदुषक :
ती चालायची...
आपल्या अंगठ्याकडे बघत
आजुबाजु वाहत्या वा-याकडे सुद्धा
डोळॆ वर करुन न बघत
चालायची ती...
वाहत्या वा-याकडे
दुर्लक्ष केले चालले असते
घुटमळत्या वा-यांना वेळीच
डोळॆ वटारुन घाबरवलं असतं वा
चकवलं असतं तर जास्त काळ
चालली असती अजुन
कित्येक वर्ष...
आता
घुटमळत्या वा-याने
तिला पिंजुन काढले आणि
ती उपडी जमीनीवरुन भरलं आभाळ
बघत शेवटले श्वास मोजत
विचार करतेय
की,
अंगठ्याकडुन
आभाळापर्यंतचा
कसला प्रवास जिवघेणा ठरला
मी : ....... !!!!!
विदुषक : झोप आता....
मी : ....!!!
-प्राजक्त
Thursday, July 22, 2010
वरचढ
मी :
लाल्या मी कविता करतो आणि तु बडबड.... आपल्यात कोण वरचढ...
विदुषक :
मिजास इतकी..दुस-या वरचढ
दुस-यालाही विकायचे
आपण इतरांपेक्षा हुशार आहोत
हेच खरे शिकायचे |
-प्राजक्त । २३।०७।२०१०
लाल्या मी कविता करतो आणि तु बडबड.... आपल्यात कोण वरचढ...
विदुषक :
मिजास इतकी..दुस-या वरचढ
दुस-यालाही विकायचे
आपण इतरांपेक्षा हुशार आहोत
हेच खरे शिकायचे |
-प्राजक्त । २३।०७।२०१०
असं ही असावं कधी कधी..
मी : हसुन कामं होतात तर मग चिडुन बोलण्यात काय अर्थ आहे ?
विदुषक : हसुन बोलतांना किंवा चिडुन बोलतांना ...भुवई वाकडी करावीच लागते..
मी : म्हणजे ?
विदुषक : (भुवई वाकडी करुन) ...तुला इतकं साधं कळतं नाही का रे....???
मी : (हसत...) हा हा अच्छा कळालं....
विदुषक : बघ आपल्या भुवया वाकड्याच..येड्या कधी कधी कामं होण्याशी मतलब....
मी : ओके ....आत्ता कळालं..
विदुषक : मला माहिती होतं . आधी कळालं म्हणटला तेव्हा वाकड्या भुवईला घाबरुन हो म्हणाला होतास..
मी: (वाकडी भुवई करुन) काम करु दे रे लालनाक्या जा......!
-प्राजक्त।२३।०७।२०१०
विदुषक : हसुन बोलतांना किंवा चिडुन बोलतांना ...भुवई वाकडी करावीच लागते..
मी : म्हणजे ?
विदुषक : (भुवई वाकडी करुन) ...तुला इतकं साधं कळतं नाही का रे....???
मी : (हसत...) हा हा अच्छा कळालं....
विदुषक : बघ आपल्या भुवया वाकड्याच..येड्या कधी कधी कामं होण्याशी मतलब....
मी : ओके ....आत्ता कळालं..
विदुषक : मला माहिती होतं . आधी कळालं म्हणटला तेव्हा वाकड्या भुवईला घाबरुन हो म्हणाला होतास..
मी: (वाकडी भुवई करुन) काम करु दे रे लालनाक्या जा......!
-प्राजक्त।२३।०७।२०१०
Subscribe to:
Posts (Atom)
अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)
मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...
-
1) Shripad Deshpande : काही-काही गोष्टी लहानपणापासून माझी तंद्री लावणाऱ्या. म्हणजे गरम गरम कातळावर तांब्याच्या पेल्यातून पाणी सोडलं त...
-
संगीत देवबाभळी... रंगभूमीचे अायाम बदलणारी एक विठूसावळी कलाकृती. मच्छिंद्र कांबळींच्या अाणि अाता प्रसाद कांबळींच्या भद्रकाली प्राॅडक्शनने म...
-
‘अंधाराला अंधाराला, दिशा नाही मेली ठेचकळ्या आभाळाला, मलमपट्टी केली।। हात रंगल्याले, शेणाच्या रंगात कपिलेचा गंध येतो माझ्याही अंगात।।...