Tuesday, November 4, 2014

बे साले बुरा लगा क्या ?

बे साले बुरा लगा क्या ?

अब बैठेगी धुल 
जिसको बहुत ही दी थी तूल
बजी थी बीन चुनावी
धरपकड खिंचातानी
खिंचातानी से 
पतलुने फट गई
और सीटें बट गई
चीट मचाओ 
अब तो सीट जिताओ 
अपोझीशन के सामने जाओ 
उसकी करतूतें 
भद्दे सूर में गाओ 
गाओ और फिर पुछो,
बेसुरा लगा क्या ?
बे साले बुरा लगा क्या? 

छनछन कि लक्ष्मी
मनमन कि लक्ष्मी 
अब बारिश होगी
वो भी इंग्लीश होगी
अब हाथ जुडेंगे
वो पुरी बात सुनेंगे
सब का थाट दिखेगा
'उंगली डॉट' बिकेगा
इन्सान पटेगा
इन्सान बटेगा
इन्सान कि कसम
इन्सान कटेगा

जानबुझके 
खंजर घोपेंगे
घोप के फिर वो 
ये पुंछेगे 
उप्स ! साब जी, छुरा लगा क्या ?
बे साले बुरा लगा क्या? 

फिर ये जितेंगे
और वो हारेंगे
हारनेवाले आगबबुला 
आगबबुला निले पिले
फिर अंधीयारोंमे होंगी डीले
टेंडर मेरा , तूम म्युनसिपल
डील भी ऎसी सिम्पल सिम्पल
तू झुठमूठ का "मारों” कहना
हम बिना वजह ही उई करेंगे
खा-पी के फिर जम्हाई देंगे
उस्ताद-बंदरीया ,खेल-तमाशा
पब्लिक के मुंहपर इक और तमाचा
खेल खत्म फिर बोला मालिक 
देख बंदरीया देख वो पब्लिक 

जिसको भेजा था उस्ताद बनाके
हालत से तुझको जंबुरा लगा क्या ?

बे साले बुरा लगा क्या ? 

Monday, September 29, 2014

कभिन्न काळ्या तमामध्ये....



ह्या धरेवर नाचणारे, आणि तिजवर पोसणारे,
स्वैर फ़क्त बागडे, राबुन ज्यांना भ्रांत पुढे,
काळ-वेळे पुढती धावणारे, सवे तयांच्या चालणारे,
अन केवळ कुंठीत पाहणारे, सकळ हरदिन माळणारे,
निद्रिस्त थकुनी भागुनी, वा केवळ एक रोजनिशी,
शांत सारे एकीकडे, कभिन्न काळ्या तमामध्ये.....

वाटे स्थिर वेळ जाहली, शांत रात आळसावली,
परि फ़क्त थकणे तुमच्याकडे, स्थिर अन आळसावणे,
पण ह्या धरेच्या वर जरा, ग्रह नक्षत्रादि तारका,
ना थांबती आळसावती, स्थिर ना त्यांची गती,
दिवस त्यांना तोकडे, परि प्रकटती दुसरीकडे,
घेत नशिबे आपुले उरी, पंडिते हे कथन करी,
ध्रुव वा सप्तरुषी मुनी, तेज शलाकेचे धनी,
अविरत टिमटिमणे ज्यांच्या कडे, कभिन्न काळ्या तमामध्ये.....

उण्या नशिबाचे धनी, चांदण्या ज्यांच्या मनी,
तेच नशीब आजमावण्या, दुजे पुण्य माथी लाटण्या,
दिवा स्वप्नाची करण्या पुर्ती, भल्यभल्यांचे अरी,
सुर्य उगे ज्यांच्या कडे, कभिन्न काळ्या तमामध्ये...

कुठे उसासे दिर्घ अन, पाणवायू विरघळे,
पाठमोरया आक्रुतीवर, शुन्य नजरंची खिळे
काट्यांची राहुटी वा , मध्यजनांचा महल
उंची राजवाड्याच्या दालनी, असु द्या कुणाचीही पहल
रंग प्रणयाराधना उधळ्तसे, कभिन्न काळ्या तमामध्ये....


चांदण्यानी धवल शिंपडले, वड विराटतेने नटलेले,
धवलधुंदसे रेखाटले, वा समंधाने झपाटले?
अशीच सारी ती वलये, "त्या वडानजीक जाऊ नये.."
भय भागाबाईच्या काळजामधे, कभिन्न काळ्या तमामध्ये.........

-प्राजक्त
08 / Nov / 2007

Friday, July 18, 2014

पावसाची फॅण्टसी

दुरदुरवर फक्त कौलारु घरं , स्वत:ची सावली अापल्याच पायाशी सावलीला यावी असं माथ्यावरचं टळटळीत ऊन, अाणि ह्या राखाडी रुक्ष गराड्यात एक टंच लालकेशरी गुलमोहराचं झाडं. मागच्या जुलै-अॉगस्ट मधली गोष्ट. एका डॉक्युमेंट्रीच्या चित्रीकरणासाठी बुलढाण्याजवळच्या एका गावात गेलो होतो.रात्रीच्या विजेच्या लपंडावात निम्मी शिम्मी चार्ज झालेली बॅटरी परत चार्जींग करण्यासाठी अाम्ही ब्रेक घेतला. त्यावेळी गुलमोहराच्या झाडाखाली अाम्ही थकुन अक्षरश: मेल्यासारखे झोपलो. जरावेळाने शाळेच्या घंटेच्या अावाजाने मित्रांनी फक्त कुस बदलली पण मी डोळे किलकिले करत उठलो. मुलांचा फसफसणारा विजयोत्सव सांगत होता कि ती मधली सुट्टी होती. अगदी साध्या बसक्या चारअाठ खोल्याची शाळा, भिंतींवर भारतमाता, महाराष्ट्राचा नकाशा,पठडीतले सुविचार, बोसबाबु, गांधीबापु, डॉ अांबेडकर, शिवाजी महाराज, गाडगेबाबा इ. ठरलेली भित्तीचित्रं, मध्यभागी झेंडावंदनाची सोय,त्या भोवती गोलगोल खेळणारी मुलं, असं सगळं दृष्य. काही मुलं डबे खातं होती ,काही खेळत होती , काही मुलांची हचाबचा डबे खात कधी उँडारायला जातो अशी घाई दिसत होती. एका ठिकाणी अाभाळाला खोड अाणि पानं फुटावे असे पिंपळाचे झाड होते. त्या खाली दोन-तीन मुलं मला चक्क अभ्यास करतांना दिसली. मधल्यासुट्टीत अभ्यास करणारी मुलं अाणि गर्द झाडाखालची गच्च सावलीचा अानंद घेण्यासाठी मी तिथे गेलो. तिथं कळालं कि मास्तरांनी गृहपाठ म्हणुन निबंध लिहुन अाणायला लावला होता अाणि ह्या तीन बहाद्दरांनी काल शाळेला सुट्टी मारली होती म्हणुन अंगठे धरण्यापेक्षा ही मुलं मधलीसुट्टी सत्कार्णी लावतं होती. त्यातल्या एकाने वहीत पेन्सील टाकुन टपकन उडी मारली अाणि " झाsssलं ! म्हणत तो खेळण्यासाठी धावत सुटला अाणि जातांना बोंबलत गेला. "पंक्या, माझ्या वहीकडं लक्ष ठेव बेsss !  अालोच एक लिंगोरच्या हाणुन!" मी हळुच वही उघडुन त्याचा निबंध वाचायला सुरवात केली.
"माझा अावडता ऋतू"
शाळेत शिकवत जरी असले तरी जन्माला अाल्यापासुन मी कधी तीन ऋतू पाहिले नाही. अामच्या विदर्भाकडं फक्त उन्हाळा असतो. अाणि हिवाळ्यात रात्रीपुरता गारवा असतो. बाकी भुगोलात शिकवलेलं खरं असंल तर पावसाळा हा माझा सगळ्यात अावडता ऋतू असु शकतो. पावसात उभं राहिलं कि म्हणे अंगावरुन थेंब निथळतात. दिन्या,पंक्या अाम्ही पकडा-पकडी खेळुन दमलो की घामाच्या धारा लागतात अाणि अंगावरुन जमीनीवर थेंब निथळतात तेव्हा अाम्ही "पाउस अाला,पाउस अाला" असं म्हणतो. तेव्हा खुप मजा येते म्हणुन मला पावसाळा अावडतं असावा. माझ्यामध्ये कधी कधी जादु अाहे असं वाटतं,कारण माझ्या घामाचा थेंब जमिनीवर पडल्यावर तसाच वाफ होऊन गायब होतो जसा अाईचा गरम तव्यावरचा पाण्याचा शिपकारा गायब होतो. पावसात म्हणे सगळीकडे हिरवं हिरवं होतं. मी एकदा चित्रकलेच्या तासाला तसं चित्र पण काढुन पाहिलं. अामच्या कडे जे तेलकट खडु अाहे त्यात पांढरा अाणि हिरवा खडु कशाला अाहे हे मला अाज पर्यंत कळालंच नाहीए. म्हणुन मी मित्रांचे पण हिरवे खडु घेऊन सगळीकडे हिरवळ दाखवली.पण पोरं खुप हसले म्हणाले 'असं हिरवं कधी असतं का?' म्हणुन मी ते चित्र माझ्या उशीच्या खोळात लपवुन ठेवलं अाहे.मला ते चित्र अावडतं, म्हणुन मला पावसाळा अावडतं असावा. अामच्या इथं एक किराणा दुकानदार दर जून मधे रंगीत छत्र्या विकायला अाणतो. त्या दुकानदाराला अाम्ही नेहमी "सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का?" असं चिडवतो. तो खुप चिडतो अाणि दगडं घेऊन  अामच्या मागे लागतो. तेव्हा पंक्या हळुच बरणीतुन चार-पाच खोब-या गोळ्या काढतो. फुकटच्या खोब-या गोळ्या जास्त गोड का लागतात माहित नाही पण अाम्हाला त्या खुप अावडतात. हे फक्त ह्याच ऋतुत घडतं म्हणुन मला पावसाळा अावडत असावा. 
अाप्पा म्हणतात त्यांच्या लहानपणी पाऊस यायचा तेव्हा ते खालच्या मळ्यात सायकलीवरुन रपेट मारायचे अाणि गार वारा अंगाला झोंबायचा. मी पण कधीकधी गुपचूप थोडं पाणी डोक्यावर अोतुन सायकलीची रपेट मारतो. मग नुकत्याच अोसरलेल्या पावसातुन फिरल्यासारखं वाटतं अाणि लहानपणीचा अाप्पा झाल्याचा भास होतो. मला अाप्पा अावडतात,म्हणुन कदाचित मला पावसाळा अावडत असावा.
जून मध्ये पाऊसाची सुरवात होते असं पुस्तकात लिहलं अाहे. पण अामच्याकडे जून मध्ये साथीचा रोग येतो.त्या रोगाला काय म्हणतात माहित नाही पण लोक इकडे तिकडे फोन करुन "अाला का?" "कुठवर अाला?" "ह्या वेळेला असावा हो ना?" , "थोडथिडका का होईना पण अाहेच " असं बरळायला लागतात. काही लोक तर मुर्खासारखा पैसा खर्च करुन कौलाच्या अाणि घराच्या फटी पक्क्या सिमेंटने बुजवतात. ह्या साथीच्या रोगामुळे दरवर्षी ह्याच ऋतुत खुप लोकं मरतात. सुरेखाचा बाबा असाच साथीच्या रोगामुळे मेला. पण सकाळी त्याला म्हणे झाडावरुन खाली उतरवला असं कळालं. इतकं अाजारी असतांना झाडावर जाऊच नये असं मला तरी वाटतं. ह्या साथीचं रोगाच एक सोडलं तर बाकी नावं ठेवण्यासारखं काही नाही.म्हणुन मला असं वाटतं कि मला बहुतेक पावसाळा हा ऋतु अावडत असावा.
                                                                     जय हिंद. 

- प्राजक्त 












Friday, July 11, 2014

दोष

“सगळाच दोष कृष्णावर कसा टाकायचा ना ? काही गोष्टी घडायच्या थोडीच टळतात. अाणि खरंतर सगळे म्हणतात कि तो देव अाहे म्हणजे कृष्णाला म्हणे सगळं जमतं त्याला दरी ही होता येतं अाणि उंच टोकावरचं अाभाळ सुद्धा , त्याला परकाया प्रवेश ही जमतो अाणि अदृश्य होणंही जमतं. , त्याला सातासमुद्रापलीकडंच जिथल्या तिथं बसुन कळतं , त्याला भविष्यही दिसतं , विश्व व्यापुनही श्रीशिल्लक उरणारा असा अाहे तो. पण असं असतं तर त्या दिवशी यमुनेवर सोबत जातांना त्याला लागलेली ठेच कशी चुकवता नाही अाली ? तो दगड कसा नाही दिसला ? सातासमुद्रापलीकडंच दिसणा-याला सातव्या वळणावरच दिसु नये ? मी त्याची बासरी गुलमोहराच्या उत्तरेकडच्या वडाच्या ढोलीत लपवली अाहे हे कळायला त्याला शोधाशोध का करावी लागली ? कसंय कि एखाद्याला सगळ्यांनीच धीट म्हटल्यावर थोडासा निधडं व्हावं लागतं तसं झालं असेल त्याचं.
कारण स्वत:च स्वत:ला विचारुन-विचारुन थकलेल्या कृष्णाला मी अगतिक होऊन कुशीत रडतांना पाहिलंय. तो खेळिया असेलही पण डबडबत त्याच्या गालांवरुन अोघळणा-या पाण्याची चव मला खेळवु नाही शकत.कारण कुणी रोपटं जमीनीत लावुन 'इथं पुर्वीपासुन कशी हिरवळ अाहे' असं सांगुन फसवु शकतं पण त्याच्याच खोलात गेलं तर सगळं खरं-खोटं कळेल, कारण तुम्ही वरचेवर रोपटं लावु शकतात पण रोपट्याची मुळं कुणी खोलवर पसरवु नाही शकतं.म्हणुनच कान्हा जगाला फसवु शकतो मला नाही. देव केल्यावर देवागत वागावं लागतं म्हणुन त्याला मला सोडुन जावं लागलं असेल.
तो मला एकदा म्हणालाही होता "लोक मला असामान्य म्हणतात. मी आज तुला सांगतो मी आहे असामान्य. म्हणजे अतिसामान्य आहे मी.
रंगांमधला फक्त मुळ रंग मला माहित अाहे.लाल किंवा पिवळ. मला तितकंच होता येतं. अधला मधला नारिंगी रंग मला कळत नाही. मनुष्याच्या स्वभावगुणाचे सर्वात शुद्ध स्वरुप माझ्याठायी आहे. म्हणजे थोडा आनंदी, काहीसा ख़ुश होणं नाही असे मिश्रण मला कळत नाही. मी होतो फक्त आनंदी ज़रा वाईट वाटणं काय असतं मला ठाऊक नाही मी होतो फक्त दु:खी. सगळ्यात शुद्ध स्वरुप असलेला स्वभाव. एखादी व्यक्ती चांगली वाटणं म्हणजे माझ्यालेखी फक्त प्रेम.निखालस प्रेम. " ज्यांना दिवस सोबत नेत नाही आणि रात्र  सोबत देत नाही अशांची संध्याकाळ होतो कृष्ण.मग संध्येकडे कुणी वेळचं बंधन घालतं का?
प्रत्येक येणा-या लाटेचं परतणं येण्याआधीच ठरलेलं असतं पण म्हणुन किना-यावरच्या  रेतीनं भिजणं थांबवावं का? मग सगळाच दोष कृष्णावर कसा टाकायचा ना ?

परकाया प्रवेश जमणा-या कृष्णाची प्रत्येक रात्र अशी 'राधा होऊन' स्वत:ची समजुन घातल्यागत खिडकीशी वितळत रहायची अाणि सकाळी रुक्मीणी कृष्णाला म्हणायची "हल्ली झोप वाढलीय तुझी , डोळे बघ किती लाल झालेत"

- प्राजक्त
दै सामना १२ जुलै २०१४




http://216.15.199.42/dainiksaamana/Details.aspx?id=51137&boxid=23019625 )

Friday, July 4, 2014

सावली

निसर्गाने झोपडपलं अाणि राजाने दुर लोटलं तर कुठं जायचं ? हा प्रश्न त्यावेळेस प्रजेला नव्हता. तात्यासाहेब ह्यांचा शब्द प्रमाण होता. कोणत्याही सरकारी पदावर नसतांना केवळ कर्ण म्हणुन पदरचं देत देत त्यांचा अादरयुक्त दरारा सगळीकडे झाला होता. एखाद्याचं काम करुन दिल्यानंतर जर त्याने अाग्रहाने काही देऊ केलं तर तात्यासाहेब नाकारात अाणि म्हणायचे " उपकार नाही केले मी , ह्याचा मोबदलाही मी घेईन. योग्यवेळी , तुला झेपेल इतका मोबदला मागेल तेव्हा वेळेवर फिरु नकोस इतकंच." मग एखाद्या दुस-या गरजुला परस्पर ह्याचा पत्ता देउन त्याची गरज भागेल असं काम करवुन घेतलं कि साटंलोटं होऊन जायचं.
एकदा डोळ्यादेखत एक गाडी बस स्थानकावर जाऊन अादळली तेव्हा तिथे फक्त बाहेरगावाहुन उदरनिर्वाह करायला अालेलं एक कुटूंब होतं.दत्ता अाणि त्याची बायको अाणि त्यांचा कमरेइतका पोरगा अाणि दोन बोचके बस्स इतकाच संसार. तेव्हा तात्यासाहेबांनी त्या कुटूंबाचा ब्रम्हासारखा सांभाळ केला. अाणि दत्ताने त्याचे सगळे अायुष्य तात्यासाहेबांची सावली म्हणुन जगायला सुरुवात केली. उन्हापावसात नको नको म्हणत असतांना छत्री , पाण्याची बाटली अाणि अगदी जंग जंग पछाडुन,लायसन मिळवुन तात्यांसाहेबांच्या सुरक्षेसाठी मागे खोचलेली पिस्तुल. असा लवाजमा जवळ बाळगत, प्रसंगी तात्यासाहेबांच्या तापट स्वभावाच्या

लाखोल्या खाल्या पण दत्ताने कधी तात्यांची सावली होणं थांबवलं नाही. कधी धुळीमुळे त्यांना खोकला अाला , कधी चुकून ठेच लागली तरी दत्ताला अपराध्यासारखं वाटायचं. त्याच्या मते हवेने जरी तात्यांचा भांग विस्कटला तरी त्याची जबाबदारी त्याची होती. एक नक्की की तात्यांचा भार डोक्यावरुन खांद्यावर अाला होता. छोट्या छोट्या गोष्टी अाता दत्ताच बघुन घेतसे. दत्ता अाला कि सगळ्यांना ठाऊक होतं कि अाता दहाव्या मिनीटाला तात्यासाहेब येणार. तात्यांना नेहमी दत्ताची मस्करी करायची लहर असायची. ते म्हणायचे " तुझं नाव दत्ता नाही सांब पाहिजे होतं. इतकं कुणी सरळ असतं का रे ?" ते त्याला कधी दत्ता नावाने हाक मारत नसे. कधी गुरुदेव तर कधी गुरुजी . कोणत्याही देवाचे नाव असलेल्या व्यक्तीला त्यांनी एकेरी हाक मारली नव्हती. त्यांच्या मते मुळात देवाची नावं मुलांना ठेउच नये. उगाच चिडचिड झाली तर मुलांसोबत देवाचाही उद्धार होतो. म्हणुन द्न्यानेश्वर नाव असेल तर माऊली , विठ्ठल असेल तर देवा , गजानन असेल तर पितांबर , लक्ष्मी असेल तर अाई , अशी टोपणनावं ठरलेली होती. तात्यांकडे येणार माणुस त्याचं शिक्षण, हुशारी ,जात, अोळख सगळं बाजुला ठेऊन येतसे. गरजवंताला तात्यांनी कधी मोकळ्या हाताने माघारी पाठवल्याच दत्ताने पाहिलं नाही. सगळ्यांना पंखाखाली घेणार अाभाळ काही काळाने जरा थकलं अाणि भुरकट भुरकट झालं. केसात अाता चांदी चमकु लागली अाणि दत्ताच्या खिशात तातडीला लागतील अशा अौषधांचा भार वाढला. एकदा भर उन्हात छत्री खाली बसलेल्या तात्यांनी दत्ताला सांगितलं " जा पलीकडुन एक ग्लास लिंबु सरबत घेउन ये" दत्ता दुस-या क्षणाला रस्त्याच्या पलिकडे अाणि चौथ्या क्षणाला ग्लास घेऊन हजर झाला. तात्या म्हणाले "हां अाता पिऊन घे. बराच वेळ झालाय तुला उन्हात उभ्या उभ्याने." असे अजब रसायन असलेले तात्या अाता अंथरुणाला खिळले तेव्हा जत्रेसारखी गर्दी त्यांच्या घराबाहेर उभी रहात. दररोजचा नित्यक्रम म्हणुन तात्या पुर्वी जसे बाल्कनीमधुन सगळ्यांना अभिवादन करत तो नित्यक्रम अाता बंद झाला. तात्यासाहेब नसलेला दत्ता अाणि दत्ताशिवाय तात्यासाहेब हे गेले कितेक दिवसात दिसलं नव्हतं अाणि कुणाच्या डोक्यात तसा विचारही नव्हता. अाता तात्यांसाहेब हेच जग असलेली भोवतीची अवघी दुनिया श्वास रोखुन ,देव पाण्यात ठेउन बसली होती. घराला इस्पितळाचं रुप अालं होतं अाणि घराबाहेर छावणीचं. शेवटी निसर्ग नियमाप्रमाणे तात्यांसाहेबांनी निरोप घेतला. अाणि सगळ्यांना पंखाखाली घेणारे पंख अाभाळात नाहिसे झाले.
दत्ताने खिडकीतुन बाहेर पाहिलं तर वरुन रस्ता दिसतच नव्हता जिथे नजर जाईल तिथे फक्त डोकीच डोकी. तोबा गर्दी. अंत्ययात्रा निघाली. सवयी प्रमाणे दत्ता छत्री घेऊन त्यांच्या डोक्याशीच होता. दोन दिवस अंत्यदर्शन चाललं. सामाजिक,राजकिय अाणि सांस्कृतिक दबदबा असलेले तात्यासाहेब ह्या लोकांसाठी देव होते.
तात्यांसाहेबांना जेव्हा अंत्यविधीसाठी सरणावर ठेवलं तेव्हा तात्यासाहेबांपेक्षा दत्ता जास्त मृत वाटत होता. अखेरीस जेव्हा तडतडत्या अावाजात सरणाने पेट घेतला त्यानंतर गर्दीतुन दत्ता कायमचा नाहीसा झाला. दुस-या दिवशी काही लोकांनी शोध सुरु केला तेव्हा घरामागच्या पटांगणावर तात्यासाहेबांच्या नेहमीच्या बसायच्या ठिकाणी जिथे लोक भेटायला यायचे तिथे एक उपडी छत्री पडलेली सापडली. ऎन मध्यान्ह होती अाणि सुर्य अगदी माथ्यावरच असल्याने तिथे शोधत येणा-यांची सुद्धा अाणि पडलेल्या छत्रीचीसुद्धा सावली कुठेच नव्हती.    - प्राजक्त दै सामना ५ जुलै १४
http://216.15.199.42/dainiksaamana/Details.aspx?id=50918&boxid=233320250 )

Friday, June 27, 2014

पैलतीर

सोबत दोन बॅग,दोन्ही हातात एक वितभर हिरव्या बांगड्या अाणि दोन वितभर मेहंदी.कपाळावर अाठ्या,मोठ्या प्रयासाने थांबवलेल्या हुंदक्यामुळे थरथरणारी हनुवटी.अशी ती एकटी.तिचा पती अाधीच नव्या घरी गेला होता अाणि नविन कंपनी असल्यामुळे अाणि नविन घराच्या कागदपत्रांच्या तजविज करायला तो जरा लौकरच गेला होता.अाणि अाता ती अाठवड्याच्या अंतराने चालली होती
.विमानतळाच्या चेक-इन काऊंटरवर तिला विचारलं "लगेज अाणि हॅंडबॅग्ज् किती?" तीने फक्त हाताने दाखवलं.तिथेच सुचना म्हणुन हॅंडबॅगमध्ये कोणत्या गोष्टी वर्ज्य अाहे ते लिहलं होतं.काही रोजच्या वापरातल्या वस्तु पण त्यासुद्धा स्फोटक ठरु शकतात म्हणुन त्या न्यायला मनाई होती.तीला जुने दिवस अाठवले,'तो' म्हणायचा "डोकं शांत ठेव नाहीतर एअरपोर्टवर जातांना "content can be explosive" असा शिक्का मारुन नेऊ देणार नाही. पहाट अाणि सकाळच्या मधला जो न सांगता येणारा प्रहर असतो तसंच न सांगता येणार नातं होतं त्या दोघांमध्ये. मग नंतर दोघांनी एकाच अाभाळाखाली वेगवेगळी गावं वसवली. काही दिवसांपुर्वी तीला जेव्हा सांगण्यात अालं कि तीला तिचा नव्यानेच सुरु केलेला संसार (काळजातल्या धाकधुकीसहित) दुरदेशी करायचाय तेव्हा तिच्या श्वासांची थरथर वाढली.तिचं असं व्हायचं.....कधी कधी अपरिचीत अानंदाच्या किंवा अपरिचीत चिंतेच्या अाधी थरथर व्हायची. तिला जेव्हा हे कळालं तेव्हा ती अंगणात बसुन कागदाच्या होड्या सोडत होती.पावसाने नुकतेच डोळे मिटावे तसा पाऊस अोसरला होता पण बोचरी भूरभूर चालु होती. मग तिने शेवटची होडी बनवली अाणि डोळे मिटले.डोळे मिटल्यामुळे डोळ्यातुन पाझरणा-या धारेचा अोघ तुटला अाणि एक थेंब बनुन होडीत पडला. किती तरी वेळ ती त्या जाणा-या होडीकडे बघत बसली. मध्ये होडी थांबली,कलंडली कि अधीर राधेसारखी धावत जाऊन ती सरळ करायची.तिच्या मैत्रीणीने ते पाहिलं अाणि म्हणाली "निरोप दिल्यानंतर प्रवासाभर सोबत करशील तर निरोपाला काय अर्थ राहतो ग" अाता पर्यंत रोखुन धरलेला डोळ्याचा बांध,मोठी लाट यावा तसा फुटला अाणि ती अाल्या पावली धावत माघारी पळाली. ती पळतांना पावसाचे थेंब पैंजणासारखा अावाज करताय कि पैंजणातले घुंगरु पाऊसथेंबासारखे निथळताय इतकी गल्लत व्हायला झाली तिच्या धावणा-या पायांकडे बघतांना. "प्रवासात एखादं गाव जर अावडलं तर अापण कायमचं मुक्कामी राहतो का ? म्हणुन तुला इथलं सगळं इथेच विसरावं लागेल" तीची मैत्रीण तिला म्हणाली. त्यावर ती म्हणाली " प्रवासात गाव अावडला म्हणुन माझ्याकडंच सगळं बोचकं तिथेच ठेउन प्रवास सुरु करायचा ठरवलाय मी.कधी माहित नाही पण परतायचं ठरलं तर हक्काचं अाभाळ हवं म्हणुन.पुर्णत्वाला पोचल्यावर तसाही नंतरचा प्रवास , हा प्रवास नाही अौपचारिकता उरते." ह्या विचारांचे चक्र अविरत चालु असतांना एव्हाना विमानतळावरच्या सुरक्षेच्या अाणि सामानाच्या सगळ्या अौपचारिकता पुर्ण करुन ती अाता विमान येण्याची वाट बघत वेटिंग रुम मध्ये बसली होती. परत अनाउंसमेट झाली कि विमान गेट नं अाय-२ वरुन अाय-१ ला येणार अाहे तरी प्रवाशांनी तशी नोंद घ्यावी. तिने परत विचार केला कि तेच तर झालंय दोनातून एक अाणि पुन्हा एकाचे दोन. तिचा प्रवास सुरु झाला.अाणि सुसाट वा-यामुळे पिंपळपानाने हवेत गिरकी घ्यावी अाणि अाता प्रवास कोणत्याही पैलतीराशी संपेल ह्या समर्पण भावनेत तीचा प्रवास सुरु झाला. नवीन घरात पोचल्यावर सगळंच को-या को-या वहीसारखं वाटायला लागलं. तिकडच्या पावसाने परत इकडे तिच्या अंगणात हजेरी लावली तेव्हा उगाच कुणीतरी अोळखीच भेटल्याचा अानंद तिला झाला. तिची मैत्रीण , म्हणजेच तीचं प्रतिबिंब जे कधी पावसाच्या साचलेल्या पाण्यातुन तिच्याशी बोलायचं ,कधी अारशामधुन बोलायचं ,कधी खिडकिच्या काचेतुन बोलायचं , ती मैत्रीणीने तिला विचारलं "अाल्या अाल्या सगळ्यात अाधी काय थाटणार ? स्वैपाकघर कि अंगण? " ही म्हणाली "देवघर" तीने विचारलं "पण देव-देव्हारा तर अाणलाच नाहीस तू.ठेवणार काय?" ती म्हणाली "मोरपीस" अाणि तीने एक मोरपीस दाखवलं. तीची मैत्रीण म्हणाली "सगळ्या जुन्या गाठ्योड्याला गाठ मारुन यायाला लावलं होतं ना मी ? " तितक्यात पलीकडच्या गल्लीत पावसात खेळणा-या मुलांनी सोडलेली एक कागदी होडी तिच्या पायाशी येउन थांबली. ती उचलतांना ही म्हणाली "दुसरी गाठ मारतांना कितीही बोट ठेवलं तरी पहिली गाठ जराशी सैल होतेच ना?"

- प्राजक्त
दै सामना २८ जून १४
http://216.15.199.42/dainiksaamana/Details.aspx?id=50698&boxid=221742187 )



Friday, June 20, 2014

पाऊसवेळा

त्याने नोकरी शोधतांना सोयीच्या शहरांची जेव्हा यादी केली तेव्हा त्या यादीमध्ये पुढे कंसात सरासरी पावसाचे प्रमाण पण लिहलं होतं. इतका त्याला पाऊस जवळचा होता. जन्मत:च त्याच्या तब्येतीमुळे त्याला काही दिवस काचेच्या पेटीत ठेवलं होतं तेव्हा अाजुबाजुला कापसाची गादी केली होती. कदाचित त्यामुळे त्याला ढगांची इतकी अोढ असावी ,असा माझा अापला अंदाज. पाऊस अाला कि हातातलं काम सोडुन पाहुणा अाल्यागत त्याचा पाहुणचार करायचा. म्हणे "पाऊस चालु असतांना जर भिजलं नाही किंवा खिडकीत बसुन पाऊस पाहिला नाही तर पावसाचा अनादर होतो" . मी म्हणालो "राया, मग थंडीत स्वेटर नको घालु, उन्हाळ्यात दुपारच्याला टळटळीत ऊन खा. ह्यांना अनादर नाही होय ?" मग तो म्हणायचा "कर मस्करी पण माझ्या अायुष्यातल्या महत्वाच्या गोष्टी पावसातच झाल्याय म्हणुन .... " त्याचं वाक्य अर्धवट राहिलं किंवा त्याने तसं ठेवलं. मग थोड्या वेळात तो परत बोलायला लागला " कुठल्याशा वैदुच्या नादी लागुन अाप्पांनी घरातल्या बाळंतपणं घरीच केली. बाळाच जन्म नैसर्गिकचं व्हायला हवा असा त्यांचा हट्ट.तसंही अामच्या खेड्यामध्ये फार सुविधा नव्हत्या. शहरात जायला अाधी कच्ची पायवाट मग बैलगाडी अाणि नंतर दोन बस अासा प्रवास करावा लागे. अाधीच दोनदा मेलेले थंड गोळे जन्माला घातले म्हणुन अामच्या अाईला शंभर बोल ऎकावे लागायचे. माझ्यावेळी तसं झालं नाही. थडथडत्या उडत्या टाळु ने मी जन्म-मृत्यु मधला तोल सांभाळला. अाणि अंगावर हिरव्या टपो-या नसा मोजत अाई झोपी गेली. परत माझे रडणे थांबेना म्हणुन विरोध पत्करुन मला जगवायला अाईने शहराचा रस्ता धरला. तेव्हा वाटेत पाऊस होता. नंतर मोठा होत गेलो. उनाड होतोच पण अभ्यास कधी चुकवला नाही. पण एकदा शाळेची पिशवी अाणि पुस्तकं अोली केली म्हणुन शिक्षकाने अंगठे धरुन शाळेच्या पटांगणात उभं केलं.अाणि पहिल्यांदा शिक्षा झाली. तेव्हा पाऊस होता. डॉक्टर जसे दिवसातुन दोन-तीन वेळा अौषध देतो तसा अौषधाला अामच्या गावात तीन वेळा वीज यायची. त्यातही रात्री नसायचीच. तेव्हा दुर खिडकीत 'ती' पहिल्यांदा दिसली अाणि कंदिलाची ज्योत वर-खाली करुन अामचे सावल्यांचे संवाद रंगले. तेव्हा पाऊस होता. दुरुन बघण्या-लाजण्या पलिकडे काही झालं नाही.ती वेळ-वय-काळ तसाच होता. मी पुढच्या शिक्षणासाठी शहरी अालो. तीच्याही दारात मंडप सजला. मी लग्नाला जाऊ शकलो नाही पण सुमीने पत्रात तिच्या लग्नाबद्दल कळवलं होतं.अाणि हे ही कळवलं होतं कि तिच्या निरोपाच्या वेळी पाऊस होता. नोकरीही शोधली मनासारखी , मनासारख्या शहरात शोधली. मुलाखतीच्या पहिल्या दिवशी सगळ्या टापटिप गर्दीमध्ये मीच एकटा मार्तंडबा दिसत होतो. कारण त्या दिवशीही पाऊस होता. अाताशा दहा वर्ष झाली नोकरीला. काम-पगार-जबाबदा-या वाढत गेल्या. फक्त त्यांचा क्रम उलट-पालट झाला इतकंच. मग अाई-अाप्पानी स्थळं शोधलं अाणि एक चंद्र माझ्या अाभाळात चिकटवुन दिला. अाई-बाप म्हणाले बस झालं अाता जवळपासच्या शहरात नोकरी शोध. दुरच्या शहरात वेगळी भाषा, वेगळे वळण , वेगळ्या पद्धती ह्या भोळीला मानवतील नाही मानवतील देव जाणे. पण अामच्या गावी म्हणावा तसा पाऊस नाही पण हे कारण देणंही शक्य तर नव्हतं.माझाही चंग नव्हता पण प्रयत्न करायला काय जातंय म्हणुन तिला विचारुन पाहिलं. ती तशी शिकली सवरलेली पण खुप नोकरी वैगेरेचा तिचा अट्टहास नव्हता.अगदी साधारण चारचौघाचं असतं तसं अामचं जोडपं. तिच्या अाणि घरच्या संमतीने अाहे त्याच पावसात ...अ ! अाय मीन अाहे त्याच शहरात अाम्ही राहु लागलो. तीला हवं तसं हवं तितकं घर सजवु दिलं. संगीताची अावड म्हणुन तशी शिकवणी सुरु केली. पण अगदीच गावाकडुन नव्या शहरात ते ही तिस-याच भाषेत त्या मुळे हळुहळु तिची छुपी नाराजी दिसु लागली. तशी तीने कधी बोलुनही दाखवली नाही.पण मलाच ती गोष्ट कधी कधी खटकायची. सवय झालं की सगळं सुरळीत होईल ह्या अाशेवर अाम्ही दोघेही होतो. ती जिव
तोडुन सवय लाऊ पहात होती अाणि तिचा हा असा जिव तोडणं मला अावडत नव्हतं. मग शेवटी निर्णय घेतला माझं अावडतं शहर जिथे मी म्हातारा होण्याचे स्वप्न पाहिले होते ते सोडायचा अाणि तिला विचारलं " राणी, हे शहर सोडुया का? अापण अापल्या गावाजवळच्या शहरात जाऊया ? हे बघ अाजच पेपरला एक जाहिरात अालीय. मोठ्या कंपनीत ,माझ्याच हुद्दयाचे अाणि इतक्या किंवा देवाच्या कृपेने जास्त पगारात मिळु शकेल नोकरी. पुढच्या अाठवड्यात मुलाखत अाहे. तू म्हणत असशील तर जाऊया का? " ती जास्त काही बोल्ली नाही पण तीच्या डोळ्यात पाऊस होता.
 - प्राजक्त
दै सामना-२१/जून'१४


http://epaper.saamana.com/Details.aspx?id=50478&boxid=235445234 )



अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...