Friday, September 25, 2015

बॅकबेंचर्स : १० शार्पशुटर ( सामना २६ सप्टेंबर १५)

वर्गात गणपतीची प्रतिष्ठापना हा शाळेतला दरवर्षी उत्सव असे. अाईने बनवलेल्या चवदार स्वैपाकात ताटाच्या कडेला मीठासारखा कार्यानुभव नावाचा एक अत्यंत दुर्लक्षित विषय होता. तो दुर्लक्षित का अाहे हे मला अजुन तरी कळालं नाही. 'करा अाणि स्वत:च्या चुकांपासुन शिका' इतकं खोल तत्वज्ञान शिकवणारा विषयाला शाळेने दिलेली अशी वागणुक मला कधीच अावडली नाही. तर अामचे कार्यानुभवचे मास्तर होते. त्याच्याकडे ह्या उत्सवाचा कारभार असायचा. मग जस जसा उत्सव जवळ यायचा तसा पोरांचा सरांकडे 'मास्तर, यंदा काय करायचं?" असा धोशा चालु व्हायचा. एकदा वर्ग चालु असतांना कुणीतरी शिक्षक बाहेरुन जाता जाता मास्तरांना म्हणाले " मग गणपती बसवताय ना यंदा ? रिटायरमेंटची तारिख अाधी अाहे कि नंतर ?"
अामचे मास्तर म्हणाले "अाहे अाहे काळजी नको" मग राग गिळावा तसे डोळे मिटुन त्यांनी दिर्घ श्वास घेतला अाणि अाम्हाला म्हणाले  "कसंय बाळांनो, एक लक्षात घ्या गणपती 'बसवायचा' नसतो. प्रतिष्ठपना असते त्याची. बसवायला तो काही अट्टल गुन्हेगार नाही कि त्याला तुम्ही चौकशीसाठी दहा दिवस बसवाल"
दरवर्षी अामचा गणपती मास्तरांनी स्वत: हाताने बनवलेला असायचा. सजावटीला मास्तर सांगायचे "हा तर डावी कडुन उजवीकडे , लाल , हिरवा ,जांभळा , पिवळा, केशरी असे रंग घ्या अाणि पताके बनवा. अापण काय करतो अाहोत? का करतो अाहोत ? याकडे ते नेहमी लक्ष द्यायला सांगायचे. "भानावर....भानावर.....भानावर..... फक्त सांगितलं म्हणुन करु नका. अाधी लक्षात घ्या. हे असंच का करायचं." हे त्यांच नेहमीच वाक्य. हेच मास्तर शाळेतल्या नाटकाचे दिग्दर्शक असायचे. तालमीच्या पहिल्या दिवशीच त्यांच पहिलं वाक्य " अापण अाजपासुन नाटक 'उभं' करतो अाहे. नाटक 'बसवत' नाही अाहोत.कळलं?" मास्तरांमुळेच तेव्हापासुन 'भानावर' राहुन काम करायचं शिकलो. सरांचा मागच्या बेंचवर भारी जीव असायचा. एकदा गणिताच्या मास्तरिण बाई गप्पा मारतांना म्हणाल्या " बाई ! हे मागच्या बेंचवाल्यानी उच्छाद मांडलाय. अाळशी नुसते " तेव्हा मास्तर म्हणाले होते " बेंचनुसार स्कॉलरपणाचे निकष ठरलेले असतात यावर माझा विश्वास नाही. तुम्ही म्हणता तसा तो ठेवायचा झाला तर माझ्या वर्गात पुढचे स्कॉलर पोरं , बॅकबेंचर असतात. अाणि बॅकबेंचर्स हे स्कॉलर. एकदम शार्प. " वर्गात मागच्या पोरांना ते शार्पशुटर म्हणायचे. एकदा गणपती अारती चालु होती.मुख्याध्यापक माईकवर अारती म्हणत होते. अाणि सगळे जण त्याच्या मागे म्हणत होते. सगळे शिक्षक उपस्थित होते. अामच्या बेंच जवळच मागे मराठीच्या मास्तरिण अाणि अामचे कार्यानुभवचे मास्तर उभे होते. मास्तरिण बाई हळुच म्हणाल्या " काय बाई अशुद्धपणा साहेबांचा. संकष्टी पावावे नसतं संकटी पावावे अाहे ते काsssय ?. दाश्रामाचा म्हणजे काय असतं ? दास रामाचा अाहे ते.काsssय ? अाणि हिरे जडित मुकूट अाहे पानाचा विडा नाही तोबरा भरायला.काsssय ?" मास्तरिण बाईंचा काsssय ? मजेशीर असायचा. अामचे मास्तर हसले अाणि म्हणाले "जाऊ द्या हो. विठ्ठलाच्या अारती मध्ये ' असो नसो भाव अालो तुझिया ठाया' पण म्हटलं कि त्यांनी. श्रद्धेत काय व्याकरण पाहता". अारती झाली. कर्पुर अारती सुरु झाली. मी अाणि अामचे मास्तर सगऴयात शेवटी होतो. अामच्या पुढे मास्तरिण बाई मास्तरिण बाईंनी स्वत: भोवती फेरा मारुन 'घालीन लोटांगण' केलं. मी सरांना कानात काहीतरी सांगण्यासाठी खाली वाका अशी खुण केली. मी म्हणालो " मास्तर ,घालीन 'लोटांगण' अाहे ते घालीन 'प्रदक्षिणा नव्हे , काsssय ? " मास्तरांनी टाळी दिली अाणि दिलखुलास हसुन म्हणाले " बिलकुल शार्पशुटर !!! "


- प्राजक्त २० सप्टेंबर १६




Friday, September 18, 2015

वैकुंठवारी ( मटा मैफल १९ / ०९/१५ )

मरण प्रत्येकाच्या वाट्याला येतं पण 'जगणं' येतंच असं नाही. ह्या विचारांची कुशी घेऊन माझी 'ती' रात्र पेंगुळली.
अाजाराला नातवंडा-पतवंडांसारखं जोजवत ९२व्या वर्षी अाजी गेली. ती रात्र.  अाजी जाता जाता पांडुरंगाला जाब विचारत गेली. 'का इतके दिवस वाट पहायला लावतोय हा?, ह्याला काही कमी केलं होतं का मी?'  तिच्यासकट सगळ्यांना ठाऊक होतं कि तीची यात्रा कधीही थांबेल. पण ती गेलीही अगदी सगळ्याच्या बेसावध क्षणी. तिच्या स्वभाव धर्मानुसार तीने शेवटच्या क्षणी एक हक्काचा श्वास मागुन समोरच्या अोलसर भिंतीवर लावलेल्या पांडुरंगाला अाणि 'तिच्या आधीच निरोप घेतलेल्या विठ्ठलाला' हात जोडुन निरोप घेतला असेल.
अाताशा गावी रहायचा विषय जवळ जवळ संपल्यातच जमा होता. लहानपणी महिनोंमहिने इथे रहिल्याचं अाठवतं. पण जसं जसं मोठे झालो तसं तसं वेळ,व्याप,अावड बदलत गेली अाणि गावाची भेट 'वन-डे रिटर्न' झाली. पण अजुनही इथे अालो कि
अंधा-या पाय-या चढुन वर शेण सारवलेल्या माडीवर जाण्याची इच्छा होते. तिथल्या दिड फुटी उंची च्या खिडकीतुन बघत घोंगडीवर तासनतास लोळत बसावसं वाटतं. माडीच्या कौलांमधुन येणारी तिरीप हळुहळु सरकत भिंतीवरच्या मारुतीच्या जुनाट फोटोवरच्या फाडलेल्या छातीतुन अाशिर्वाद देणा-या राम-सीतेवर यायचा अाणि माझ्या बाळबोध अंगावर अाध्यात्मिक काटा यायचा. तेव्हा वाटायचं काय ही जादु अाहे ? 'देव अाहे देव अाहे म्हणतात ते हेच' मग तो कवडसा तिथुन सरकला कि उशीवर यायचा. मग उगाच उशीवर दणके द्यायचा खेळ सुरु व्हायचा अाणि धुळकणांचा बॅले बघत कधी झोप लागायची कळायचं पण नाही.
अापण जितकं जास्त निसर्गाच्या सान्निध्यात येऊ तितक्या अापल्या समाधानाच्या व्याख्या  सोप्प्या होत जातात. खुप काही मागत बसण्याच्या ऎवजी अापल्या इच्छा अाहे त्यात समाधान मानतात हे मला तिथेच रात्री अंगणात बाजेवर पडल्या पडल्या जाणवलं.  बोचणारा गारठा, घुप्प अंधारी रात्र, दुर मारोतीच्या देवळातुन येणा-या भजनाचे पुसट स्वर, शेण सारवलेलं अंगण, सुतळ्यांनी कसलेल्या बाजेवर डोक्यामागे हात बांधुन अाभाळावरच्या चांदण्यांचं झुंबर पहात बसलो होतो. कुठे फोर-फाईव्ह स्टार हॉटेलची गुबगुबीत झोप असेल तर असोत पण ह्या लक्षावधी स्टार्स खाली झोपायची सर कुठे नाही. तितक्यात एक तारा 'माग रे, इच्छा माग' म्हणत तुटला. तेव्हा काहीही न मागता फक्त हलकं हसल्याचं अाणि कुस बदलुन समोर गोठ्यात अावडत्या वासराच्या गळ्यातली घंटा ऎकत झोपी गेल्याचं अाठवतं. ह्याच त्या समाधानच्या बदलत्या व्याख्या.
ह्याच अाठवणी घेऊन परत अाजी निर्वतल्याच्या दिवशी गावाकडे रहायची वेळ अाली.
गावाकडच्या कौलारु, शेण सारवल्या घरापासुन रात्री मिणमिणत्या बत्तीप्रकाशात तिचा 'शेवटचा प्रवास' सुरु झाला. तीनेक किलोमीटरची अंत्ययात्रा, मी एक खांदेकरी. सकाळी हातात पुजापरडी घेऊन नदीला वळसा घालत ज्या वाटेची उतरंड तीला कोतुळेश्वराच्या राऊळापर्यंत न्यायची त्याच वाटेवरचा तीचा शेवटचा प्रवास.ज्या वाटेने तीचा रोजचा दिवस उगवायचा त्याच वाटेवर तीची मावळण होत होती. प्रवास सुरु झाला. ग्यानबा-तुकाराम, पांडुरंग-हरी-विठ्ठल-माऊली, अशा जयघोषात. ठरावीक रामानामा ऎवजी वारक-यांचा जो 'राम' अाहे त्यांचं नाम घेत संथ गतीने तीचा प्रवास सुरु होता.अनवानी पायाला टोचणा-या कच्च्या वाटेत,बत्तीच्या धुरात, विठुनामात अाजीला दिलेल्या माझ्या उजव्या खांद्याच्या कळेपेक्षा तीच्या विरहाची कळ जास्त होती. हिच कळ म्हणजे रुख्माईला सलणार अठ्ठावीस युगांचं दु:ख असेल का ? चालतांना घामाची गारट धार पाठीवरुन सापासारखी वळवळत गेली.मानेला कळ म्हणुन क्षणभर अाभाळाकडे पाहिलं तेव्हा पुढून फेकलेले मुरमूरे तोंडावर पडले. चांदण्या बघत विचार अाला, अापल्या प्रवासाला अशाच चांदण्या दिसतील, असेच मुरमुरे तोंडावर पडतील, जाणीव नसेल इतकंच.  तडतडत्या अग्नीशिखांमध्ये 'शेवटचा प्रवास' संपला. जो मी शेवटच्या बाकावरुन बघावा तसा शेवटच्या बाजुला खांदा देत बघितला.
परतीला पायाखालची टोचणी अाता सवयीची झाली होती. घर जवळ अालं तेव्हा अंगणात वाट बघणारी लोकं होती. चरायला गेलेली गुरांची परतीची वाट पाहतात तशी.कडुनिंबाचं पान चघळत शेवटच्या प्रवासात अाम्ही तिच्या अाठवणींच्या कुरणात चरणारी गुरंच तर होतो.
वारी निघावी असा तिचा शेवटचा प्रवास. वारीच ती. नामघोष तोच, तिथेही इथेही. तिथेही शेवट वैकुंठ अाणि इथेही वैंकुंठच, तिथे ही पांडुरंग भेटणार अाणि इथेही अाधीच वर वाट बघणारा 'तिचा विठ्ठल' भेटणार.
ब्याण्णव वर्ष सरली. एक वारी संपली. 


- प्राजक्त २४ अॉगस्ट २०१५



बॅकबेंचर्स : ९ पिशाच्च पिवळे (१९ सप्टेंबर १५)


ताप अाला ? मग समोरच्याचं वाक्य असतं. "काळजी घेरे बाबा" पण जर कावीळ झाली असेल तर विषय तिथेच संपत नाही. जसं समोरच्याला तुम्हाला कावीळ झाल्याचं कळतं अर्धवट गुंगीत , गळालेल्या अवस्थेत तापाने फणफणले असतांना पुढिलप्रमाणे सुचना येऊ लागतात.
लोणावळ्याला जा पहाटे सहाच्या अात जा बरका. अाता लोणावळ्याला पहाटे सहाच्या अात जा म्हणजे निघा कितीला ? बरं अाजारी अाहे हा मुद्दा लक्षात घेतलाय का कुणी. अाडगावला जा तिथे एक बाबा काळं सरबत देतो. काविळ मेलीच म्हणुन समजा. भेंडा फॅक्टरीला जा तिथे एकजण नाकात अौषध देतो. मग तुम्हाला सर्दी होते तुम्ही रात्रभर शिंकत राहतात. पाठ टेकवायची नाही. परत कावीळ होत नाही. अरे पण त्राण नाही अंगात पाठ टेकवायची नाही काय. गंगेवर जा तिथे एक मावशी अाहे त्या दह्यामध्ये अौषध देतात हो पण पहाटे सहालाच जा. मला एक कळत नाही पहाटे सहा वाजेला काय अनन्यसाधारण महत्व अाहे. कावीळच्या मुख्य लक्षणात पिवळेपणा नंतर त्राण जाणे ,मरणाचा थंडी-ताप येणे हे अाहे मग पहाटे कुठे जायला लावताय हे लोकं? पण एक खरं कि ह्या सुचना सांगणा-यांचा तुमच्यावर अातोनात  जीव असतो. काळजी अाणि प्रेमापोटी ह्या तिरपांगड्या सुचना येत असतात.
कावीळ म्हटलं कि परत एकदा शाळेचा शेवटचा बेंच अाठवतो. एकदा कावीळ झाल्यावर शेवटच्या बेंचवरच्या चार पोरांना उठवुन मागे झोपायला सांगितलं होतं मोरेबाईंनी. घरुन कुणी येऊ पर्यंत मागच्या बेंचवर पडल्या पडल्या मोरेबाईंचा बालभारतीचा वर्ग ऎकला होता. बाई कविता शिकवत होत्या. अाणि जाता येता डोक्याला हात लाऊन "निघालिय अाई हां , येतेच अाहे अाराम कर " असं म्हणत होत्या. कविता गदिमांची....शेजा-यांचे शूर शिपाई ,सिमारेषा पुसुनी पायी ,लूटू पाहती तुमची अाई , त्या ढोंगांच्या मुसक्या बांधा, भ्याडा हाती भरा चुडा...लढा वीरहो लढा लढा.. गदिमांच्या शब्दांनी छत बघता बघता ,चिमण्या कोप-यात घरटं बनवतांना दिसत होत्या. अाणि शब्द होते लढा वीर हो लढा लढा.
बाईंनी हाताची बोटं पाहिली " बाई ग पिवळे पिवळे झालेय, थांब हा राजा थोडं येतच असेल अाई " कविता शिकवण चालु होतं.
मी लहान होतो. कावीळ प्रकार नविन होता. तेव्हा एकक्षणी वाटलं होतं झालं माणुस मरतांना असंच होत असेल. अापण मरणार अाता. पण गदिमाच्या शब्दांनी अाणि मोरेबाईंच्या अावाजाने तग धरायला मदत केली. कविता संपताच अाई अाली अाणि मी अाठवडाभर दवाखान्यात हजेरीला होतो. सलाईनचा एक एक थेंब बघतांना एकच गोष्ट अाठवायची शाळेतल्या मागल्या बेंचवर झोपलेलो अाहे अाणि बाईं ताप तपासत गदिमांच्या कवितेचं शेवटचं कडवं म्हणताय.:
 रणमर्दांनो तुमच्या पाठी , मारीत मारीत मरणासाठी, उभा भारतीय चाळीस कोटी, हटवा मागे पिशाच्च पिवळे , उडु द्या तोफा धडधडा...... लढा वीर हो लढा लढा.
- प्राजक्त 



Sunday, September 6, 2015

बॅकबेंचर : ८ बॅकबेंचर मोरया


मच्छी बाजारात जसा गोंधळ व्हावा तसा गोंधळ चालु होता.पण तरी अासमंतात चैतन्य होतं. असंख्य गराड्यातुन दुकानदार हात उंचावत गळ्याच्या शिरा ताणत अोरडत होते. छोट्या छोट्या पाय-या करुन त्यावर शाळेतली मुलं रांगेत उभी करावी तशा रांगेत मुर्त्या ठेवलेल्या होत्या. " घ्या नवीन स्टाईलवाला जय मल्हार घ्या" , " घ्या पीळदार बाहुबली घ्या" ,दबंग नको असेल तर सिंघम घ्या"  काहीकाळ मी स्वत:ला प्रश्न केला कि मी ज्या कामासाठी अालोय तिथेच पोहोचलोय कि चुकलोय ? जेव्हा सगळीकडेच चूक दिसु लागते तेव्हा कालांतराने स्वत:च्या बरोबर असण्यावर शंका निर्माण होते. जरा मागे सरकलो तर मागच्या हात गाड्यावरचं केवड्याच्या पानाचा काटा कोपराला टोचला. अगरबत्तीचा वास दरवळत होता, पाच भाज्याचा वाटा, पुजा सामान, पितांबर , रेडीमेड मोदक, बॅटरी अॉपरेटेड चक्र, थर्माकॉलचं मखर, चांदीचा वर्ख असलेला कळस काय नव्हत त्या रस्त्याच्या कडेला. ह्मम ! रस्ता ? रस्ता राहिलाच नव्हता तो अाता. एखाद्या गाडीवाल्याने गाडी घातली तर तोच शरमेने मान खाली घालुन कसाबसा वाट काढत अपराधी भावनेने तिथुन जात होता.सगळीकडे चूक असेल तर तुमचं बरोबर वागणं शंकास्पद ठरतं.पुन:प्रत्यय. 

अाधी मुद्द्यात हात घालु असं ठरवुन मुर्ती घ्यायची ठरवली. कसाबसा गर्दीतुन वाट काढत दोन पावलंं स्थिर ठेवतील अशी जागा शोधुन मी समोरच्या मुर्त्यांमधुन कोणता देव घरी न्यायचा याचा 'चॉईस' करायला लागलो. "देवा रे, मीच का ? माझ्या बरोबरच का घडतं असं? त्या अट्टल चोराला सगळं माफ मग सुख देतांना माझी निवड का नाही करत तू " असं ज्याला लोक विचारतात तीच लोकं अाता त्या देवाची निवड करत होते. मग पाच हजार जास्त होतात , तीन हजार ठिक अाहे, इतकुसा तर अाहे , रंग जाणार नाही ना, भंगलेली अाहे का ? सोंड नक्की उजवीकडे अाहे कि डावी कडे वगैरे शंभर चौकशी वजा भावतोल अाजुबाजुला घडत होता. विचार अाला भक्त निवडण्यात देवाने इतक्या चाळण्या लावल्या असत्या तर नास्तिकता प्रमुख धर्म झाला असता. " नीट बुडेल ना ?" ह्या प्रश्नाने मी माझ्याच मुठी अावळल्या अाणी परत अागतिकपणे राग गिळुन शांत उभा राहिलो. 
दगडूशेठ, लोडाला रेलुन बसलेला, उंदरासोबत सिसॉ खेळणारा, बालाजी, विठ्ठलरुप, साईरुप, छत्रपती शिवाजीरुप अशा अनेक रुपांचे लहानथोर मुलांचे वर्ग भरावे तशा मुर्त्या समोर शहाण्या मुलांसारख्या बसल्या होत्या. प्रत्येकाच्या हाताला 'प्राईज टॅग' होता. ह्या वर्गाच्या सगळ्यात शेवटी माझी नजर स्थिरावली. 
शेवटच्या बेंचवर. अाजुबाजुच्या गोंगाटापासुन अलिप्त, कोणी मागितला नाही म्हणुन अाशिर्वाद मुद्रा न देणारा , लहानपणी मुनिमजींचा लिहायचा टेबल असायचा तशा लहानशा टेबलवर चोपडीवर काहीतरी वाचत बसलेली एक उंदराची निरागस मुर्ती. अाणि तो जे वाचतोय ते तन्मतेने ऎकत बसलेली श्रीमुर्ती बॅकबेंचवर सुट्टीच्या दिवशी अभ्यासात मग्न. सोंडेंची दिशा, हातात मोदक , अाशिर्वादाचा हात इत्यादी 'फॉरमॅलिटी' न पाळणारा , बॅकबेंचरचा नियम असलेला ' नियम धाब्यावर' हा नियम पाळणारी मुर्ती. 
कोणताही मोलभाव न करता. तो बॅकबेंचर मी त्याच्या ऎकण्यात व्यत्यय येणार नाही इतक्या अलगद हाताने घरी अाणला.अाणि त्याच्या कामात खोळंबा नको म्हणुन खुसफुसत्या अावाजात स्वागत म्हणुन म्हणालो "गणपती बाप्पा मोरया"

- प्राजक्त

Sunday, August 23, 2015

बॅक बेंचर्स : ६ अायझॅक

वस्तुमान असलेल्या कोणत्याही दोन वस्तूंच्या एकमेकांकडे आकर्षिल्या जाण्याच्या प्रवृत्तीला गुरुत्वाकर्षण असे म्हणतात. उदाहरणार्थ हे डस्टर जर मी एक विशिष्ट बल लावुन फेकलं तर एका सरळ रेषेत जाऊन जसे जसे ते बल कमी होईल तसे तसे ते खाली अोढले जाईल अाणि शेवटी खाली पडेल. धाssssड ! " शेवटच्या बेंचवरच्या अायझॅकच्या डोक्यात डस्टर जाऊन पडलं. त्याचं नाव अायझॅक नव्हतं . पण ते नाव ह्याच प्रसंगामुळे पडलं. समस्त भुतलावरच्या गणित अाणि विज्ञानाचे मास्तर जर मास्तर नसते तर थाळीफेक, भालाफेक,नेमबाजीमध्ये तरबेज असते असा शालेय कालापासुनचा माझा समज दहावीत येता येता तेव्हा दुढ झाला जेव्हा मी एका मास्तराच्या डस्टरपासुन लपायला दप्तराची ढाल केली होती अाणि मास्तरांनी शेजारच्या भितीवरुन डस्टर अादळवुन तो मला बाजुनं खांद्यावर मारला. नंतर हीच क्लृप्ती मी कॅरममध्ये बापरु लागलो.  अशा प्रकारे 'क्लृप्ती' हा शब्द वापरण्याचा माझा या जन्मीचा प्रथम अाणि अंतिम अट्टहास मी इथे केलेला अाहे. जसा गाणितातला साईन,थिटा दैनंदिन जीवनात नेमके कुठे येतात हा माझा कळीचा प्रश्न अाहे तसाच काही मराठीच्या शब्दांबद्दलसुद्धा 'क्लृप्ती' हा त्यातलाच एक शब्द.असो. हा शब्द अाता इथे मी माझ्या बालभारतीच्या मास्तरांना दिलेली अादरांजली समजा. तर असे हे विज्ञान मास्तर एखाद्या कलावंतासारखे विक्षिप्त अाणि लहरी वाटतात. कधी पुर्ण वर्गाची मंडई होते पण यांना फरक पडत नाही. अाणि कधी यांना टाचणीचा अावाज पाहिजे असतो.मुळात अती हुशार , अती कलासक्त लोक हे थोडे लहरीच असतात. अाईनस्टाईनने त्याच्या मांजरीला येजा करायला त्याच्या लॅबच्या दाराला एक मोठं भोक केलं होतं. कलांतरांनं त्या मांजरीला पिल्लु झालं. मग अाईनस्टाईनने त्या भोकाशेजारी छोटं भोक केलं अशी अाख्यायिका अाहे. अाता हे पाहुन जर त्याला कोणी 'तू येडा अाहे का रे' म्हटंल असेलच. तेव्हा पासुन 'तू येडा अाहे का रे?' असं मला कुणी म्हटलं तर राग न येता अभिमान येऊ लागला. तर विषय असा कि गुरुत्वाकर्षणचा धडा शिकवुन झाल्यावर मास्तरांनी शेवटी विचारलं " या प्रकरणाबद्दल कोणाला काही प्रश्न? तर अायझॅकने शेवटच्या बेंचवरुन हातवर केला अाणि म्हणाला "मास्तर, सफरचंद पडल्यामुळे गुरुत्वशक्तीबद्दलचा प्रश्न न्युटनला पडला तर इतके वर्ष त्याची लघवी काय वर उडत होती का? "  पुढे काय झालं हे सांगणे नलगे. त्या दिवसापासुन त्याला अामचं अखिल गाव अयझॅक नावाने अोळखु लागलं


-प्राजक्त २४/०८/२०१५ 



Sunday, August 16, 2015

बॅक बेंचर्स : ५ Whats in the Bench ?


रेल्वेमध्ये बसायला जागा न मिळणं हा काळाने तुमच्यावर हलगर्जीपणा केल्याचा उगवलेला सुड असतो. हो म्हणजे एक लोकल चा विषय सोडुन देऊ कारण तिथे मुळातच गर्दी असते. चाळीसेक हजार लोकांसाठी ती केलेली सुविधा होती अाता चाळीसेक लाख लोक 'सुविधा' उपभोगल्यावर अाणखी काय होणार. तर अशा उगवलेल्या सुडामुळे तुम्हाला रेल्वेच्या दाराशी उभं राहुन करावा लागलेला प्रवास हाही बॅक बाकावर बसल्याचा प्रकार. त्यापेक्षा मास्तरांनी शिक्षा म्हणुन मागल्या बाकावर उभं रहायची शिक्षा दिल्यासारखा प्रकार.
असाच दारात बसुन एक प्रवास सुरु झाला. मध्ये एका ठिकाणी एकजण चालत्या गाडीत सराईतपणे लटकुन मला 'थोडं अडजस्ट' खुणावत बसुन राहिला. मग तो म्हणाला 'घरातलं शेंडेफळ अाणि शाळा कॉलेजातला शेवटच्या बाकावरचा दिसतो'.पांढरे केस,पांढरी दाढी, बाह्या वळलेला चेक्सचा शर्ट, अाता फॅशन नसलेलं ससपेंडर, पट्टीने अाखाव्या तशा ठसठशीत कपाळावर चार रेषा अाणि तंबो-याला चुकून हात लागल्यावर कितीतरी वेळ घुमत राहावा तसा घनगंभीर 'बेस'चा अावाज. असा माणुस मी पहिल्यादा पहात होतो. मी म्हणालो 'हो,कसं अोळखलं?'
" शाळेत अाणि घरात शेवटी असलेले जरा शेफारलेले असतात. म्हणुन निघायला उशीर होतो.अाणि दारात बसावं लागतं.पण याची चिडचिड कमी असते अापल्याला. हो अापल्यालाच म्हणालो मी. कारण दारात बसता येतं.मिळाली जागा तर ठिक नाही तर हवेचा प्रवास.दोन्ही बाजुने जिंकल्याची भावना नाही का?  तुझं नाव सांगु नको,माझं विचारु नको. शेक्सपिअर म्हणतो,नावात काय अाहे? हाच नियम बाकाला पण लागु होतो बरका. बाकात काय अाहे? पहिला-शेवटचा. तुम्ही काय शिकला ते महत्वाचं.बरं पेपर वाचतो का ? मागच्या महिन्यात भारत-पाक युद्ध संपलं. काय वाटतं ? सोड,अाता कोणाला वाटुन काय फायदा म्हणा. "
मी बोलायच्या अात तो बोलत होता जणू त्याला फक्त कुणीतरी ऎकणारं पाहिजे होतं. मी फक्त ऎकायचं ठरवलं. " See, Wars are not won on Field , my son. (हृदयाकडे हात नेत) Real war is here" अातला लढा जिंकला तरच जिंकला तू. अाणि मारायला काय लागतं? सांग, बंदुक?रायफलं? नाही. कोणाला मारायला लागतात फक्त "steady hands".अाणि जेव्हा तू चारीबाजुने घेरला जातो तेव्हा देश,प्रदेश,मान,सन्मान हे सगळं सारुन तू लढतो फक्त स्वत:साठी.जगण्याची लढाई. War is old man talking & young ones dying.मग सगळं जिंकल्यावर हाताशी येतात पडलेल्या इमारती,लाल जमिनी वगैरे. मग वाटतं हे जिंकायला लढलो अापण? मग शोध सुरु होतो काय जिंकल्याचा. पण शोधल्यावर हरवलेलं मिळतं बदलेलं नाही. एनी वे, टू मच फिलॉसोफी इन वन जर्नी. हे सगळं तुला का सांगतोय मी? कारण यू अार अ बॅकबेंचर."
बाहेर धुकं,पाऊस अाणि मधेच घाटात इमरजंसी गाडी थांबली.. तो उतरुन सिगारेट पिऊ लागला. गाडी सुरु झाली. मी त्याला अावाज दिला. त्याने बेफिकीरपणे मला टाटा केलं.मी त्याला नाव विचारलं. त्याने उत्तर दिलं. Nobody, बाकात काय अाहे?  
 
-प्राजक्त १७/०८/१५

Monday, August 10, 2015

बॅकबेंचर : ४ शेवटची खिडकी

बसमध्ये सहसा शेवटी कोणी बसतं नाही. कंडक्टरने मागे जाऊन बसा असा इशारा केला कि ‘शेवटची सीट ? नको रे देवा’ असे यांत्रिक शब्द नेहमीच कानावर पडतात. पण मी बसमध्ये सुद्धा ‘लास्ट बेंचर’च. बसमध्ये पुढे बसलं कि जरावेळाने मागुन कुणीतरी अातला राग दाबत उसन्या-खोट्या अादरयुक्त अवसानात अापल्याला म्हणतं ‘ अहो जरा खिडकी लावता का प्लिज’.  झालं ! संपला कि हो विषय. बंद खिडकीचा प्रवास म्हणजे छळ अाहे. त्यात पावसाळा असेल तर ते पाप ही असु शकतं. नाही ते चित्रपटात वगैरे दाखवतात तसं  अर्ध अंग बाहेर काढुन , तळहातावर अाणि चेह-यावर पावसाचे थेंब झेलत “ अहा अहा रम्य निसर्ग “ असा फालतु थिल्लर दिखाऊपणा नाही म्हणत मी. पण नुसती उघडी खिडकी , मागे जाणारं जग अाणि अापलाच अापल्याशी चालेल्ला ‘ ते बघ , हे बघ,  हे काय असेल ? तिकडे एकदा जाऊया ‘ असा संवाद. हे मजेशीर असतं.
बाहेर डोकावत असतांना मध्येच एखादं लहानसं गावं , पडकी भिंत, गर्द पारंब्यांच झाडं लागतं हे सगळं अगदी हिरवंशार. शेवाळाच्या नावाखाली का होईना पावसात पडक्या दुर्लक्षित भिंतींना पालवीचा मोह होतो. हे पाहुन कधीही विस्मरणात न जाणारा ताजेपणा मनामध्ये भरुन राहतो. कधी कधी निराश व्हायला झालं कि हे क्षण अाठवल्या बरोबर परत रिचार्ज मिळतो. अाणि हे चालु असतांना अापल्यामागे कुणीच नसतं कारण अापणच सर्वात शेवटचे असतो. अाणि त्यामुळे खिडकीतुन येणारा पाऊस, वारा यांचावर फक्त अापलाच निर्विवाद हक्क असतो. ह्या शेवटाबद्दलच्या अोढीचं मुळ खुप जुन्या लहानपणीपासुनच्या प्रसंगांमध्ये अाहे.

वडिल लहानपणी गोष्ट सांगायचे राजपुत्राची. तो तलवार घेऊन निघतो वाटेत त्याला कोण कोण भेटतं त्यांना तो सवयीने मदत करतो अाणि ते लोक अानंदी होऊन राजपुत्राला अशी एकएक जादुई वस्तु देतात ज्याचा फायदा राजपुत्राला पुढे राक्षसासोबत लढतांना होणार असतो. कमीत कमी शंभरेक वेळा ही गोष्ट ऎकली असेल पण दरवेळी नवे प्रश्न पडायचे अाणि नेहमी त्याची मजेशीर उत्तरं मिळायची. गोष्टीच्या शेवटी एक वाक्य ठरलेलं असायचं ‘… अाणि ‘शेवटी' सगळं ठिक झालं.’ मी म्हणायचो ‘ पण एखादा दुसरा राजपुत्र असता अाणि शेवटी ठिक नसतं झालं तर?’. उत्तर यायचं ‘कधी कधी सुरवात-मध्य बिघडु शकतो पण शेवट ठिक नसेल तर तो शेवट नसतो.'

-प्राजक्त ९ अॉगस्ट २०१५


अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...