Saturday, March 26, 2016
रंगवारकरी : कविता
Friday, March 25, 2016
निंबाच्या पानांच्या पावसात
“धुक्यात गोठलेलं गाव. टेकडी चढुन पलीकडे उतरलं कि पोस्टअॉफिस लागायचं. कौलारु पोस्टअॉफिस. लाकडी कुंपण ,मातीमधे गचके खात खात उघडबंद होणारं लाकडी बसकं गेट, गर्द वडाच्या सावलीत कुशीवर रेलुन बसलेलं पोस्ट अॉफिस. टेकडीवरचं ते वडाचं झाड पण फकिरासारखं… टेकडीच्या टोकाशी पाय सोडुन बसलेलं. अाठवड्यातुन एकदा भल्या पहाटे कुणीतरी येऊन पोस्ट अॉफिसचं अंगण शेणाने सारवुन घ्यायचं. अाताशा फोन मेलच्या जमान्यात कोण कशाला पोस्टाकडे वळतो. पण डोंगरद-यात , गर्द जंगलाच्या वस्तीत अजुन सुर्य न पाहिलेली माती अाहे तिथे फोनमेलीच्या गोष्टी कशाला करतो,बाप्पा?“ हे एेकुन असं वाटलं हातातली सगळी कामं सोडावी अाणि बाबांना घेऊन थेट त्यांचं ते ‘धुक्यात गोठलेलं गाव’ गाठावं.
बाबा बोलत होता “पुर्वी प्रत्येक पोस्टाबाहेर एक माणुस चारअाठ अाण्याला पत्र वाचुन पण द्यायचे अाणि अापण सांगु ते उत्तर लिहुन पण द्यायचे. अाता सगळं गेलं. मला एवढं पत्र लिहुन देतो का ? अाणि एवढं वाचुन पण दाखव ” बॅंकेत ‘पेन अाहे का’ विचारणारे भेटतात तसे पोस्टात ‘पत्र लिहुन देता का’ भेटतील याची मला कल्पना नव्हती. पण हा मात्र अपवाद होता हे मला नंतर नंतर जशी वेळ कलंडायला लागली तसं कळायला लागलं.
मी विचारलं “ पत्र ?”
बाबा म्हणाला “बायकोचं अाहे. खाजगी काही नसतं ह्या वयात वाचा. वाचा. ”
तिथेच अावारात निंबाच्या झाडाखाली अाम्ही दोघं सावलीला कठड्यावर बसलो. मध्येमध्ये पिवळी सुकलेली निंबाची पानं फेर धरुन गरगरत खाली पडत होती. अाजुबाजुला तुरळक ये-जा करणा-यांची गर्दी होती. अजुनही इतके लोक पोस्टात येतात हेच माझ्यासाठी नवल होतं. मी कसलंस कुरिअर अालं म्हणुन मी तिथे गेलो होतो. बाबांनी चुरगळलेलं पत्र माझ्या पुढ्यात ठेवलं. कदाचित येऊन चारदोन दिवस झाले असतील पण वाचुन दिलं नसेल. किंवा असं म्हणुन बाबांचीच हिम्मत नसेल झाली पत्र लिहुन घ्यायची.(दुस-याला दोष देणं सोपं असतं) पत्राची सुरवातच वेगळी होती.
“
अहो, काय ? चमकलात ना ? मी पण काय वेंधळी अाहे ना. हां सनविवि, पत्रास कारण कि... हां अाता सांगा चमकलात ना ? मी कसं लिहलं पत्र? ते सांगेन सावकाश. अाधी महत्वाचं सगळं बोलुन घेऊ दे,नाहीतर विसरायला होतं. पुढच्या महिन्यात गावात वीज येणार अाहे म्हणे. तशी ती तुम्ही गेल्यापासुनच येणार होती पण अाता खरंच येते कि काय अशा चर्चा चालु झाल्यात. येऊ दे बाप्पा,मला भुरकीला काय? गडप अंधार भुरकट दिसलं इतकंच. परवा वेंधळेपणातुन धक्का लागला अाणि काच फुटली खिडकीची.. यंदा किराणवाल्याची चिंता करु नका. तुम्ही येऊस्तोवर काही पैसे मागायचा नाही. कारण मागच्या अाठवड्यात थोडे दिलेत मी पैसे. ते कसला कार्यक्रम होता काय कि म्हणुन काही लोकांनी टोपल्या बनवुन नेल्या. कसला तरी सरकारी कार्यक्रम होता म्हणे म्हणुन जरा जास्तच टोपल्या बनवाव्या लागल्या. त्याचे अाले थोडे पैसे काळजी करु नका . तेवढ्या वेताच्या काड्या होत्या घरात अाधीपासुन....अाप्पा बिचारा देतो गुमान सगळं अाणुन . कधी कंटाळा करत नाही. माझं मेलीच लक्षच नसतं परवा वेंधळेपणातुन धक्का लागला अाणि काच फुटली खिडकीची. पुर्वी रेडिअोतले गाणे पुढे असायचे अाणि खरखर मागे चालु असायची. अाता खरखर पुढं अाणि मागं अंधुक गाणं चालु असतं. इकडे अाले कि तेवढं पाहुन घ्या त्याला. अापलं लेकरु सापडलं का ? दरवेळेस हा प्रश्न विचारणार नाही ,विचारणार नाही असं मनाला बजबजावुन ठेवते. पण माया ,इच्छेसाठी टक लावुन बसलेल्या ता-यासारखी तुटता तुटत नाही बघा. इतक्या मोठ्या शहरात कसा सापडेल, कधी सापडेल? पण सापडेल. होऊ दे नऊ वर्ष झाली तर दहाव्यात सापडेल. तुम्ही यायची घाई करु नका. मी अगदी बरी अाहे इथे. फक्त परवा वेंधळेपणातुन धक्का लागला अाणि काच फुटली खिडकीची. ते तुमच्या सोबत असतं ते टिल्लं लेकरु कसंय ? त्याच्यावर फार माया लावु नका बरं !पण काळजी घ्या त्याची. अापल्या सारखंच त्याचे अाईवडील एकदिवस त्याला घेऊन जातील मग काय कराल? अाणि नेतील त्याला शोधत असत बिचारे. इथं समोरच्या खोलीत एक नवीन भाडेकरु पोरगी अालीय. एकटीच अाहे. फार गुणी पोरगी अाहे. हे पत्र तिनेच लिहुन दिलंय. पडला जीव भांड्यात ? फारच लाघवी पोर अाहे.येता जाता चौकशी करत राहते. अाणि बरंका माझ्या वेंधळेपणातुन धक्का लागला अाणि काच फुटली खिडकीची. बाहेर बर्फ पडायला सुरुवात झालीय. वारा झोंबायचा रात्रीचा. अाणि कसंय ना सबंध उघड्या खिडकीतुन थंडी जितकी त्रास देते त्यापेक्षा जास्त फटीतुन येणारी टोचणी त्रास देते.. म्हणुन म्हणते शोधत रहा अापल्या लेकराला एकदाचा मिळु तरी दे किंवा मेलाय हे तरी कळु दे.येईल कधीतरी,येईल कधीतरी. बोचरी थंडी जास्त झोंबते. अाणि हो तुटक्या खिडकीचं निमित्त काढुन लगेच येऊ नका. त्या नविन भाडेकरु पोरीनं तिचं पावसाचं जाकेट लावलंय तिथं व्यवस्थित. ती म्हणते तशीही ती पाऊसात बाहेर नाही पडत कधी. तुम्ही ठरल्याप्रमाणे नेहमी सारखे दिवाळीतच या..... दोन दिवसासाठी. मनीअॉर्डरा बिर्डरा काही नको इतक्यात. पहिलंच पत्र अाहे . माझ्या स्वभावपेक्षा वेगळं काही वाचायला मिळालं तर समजुन घ्या कि पत्र लिहणा-या पोरीने खोड काढली. तशी बदमाश अाहे ती. कळावे. लव यू . तुमची.
“
बाबा वरमला अाणि म्हणला “ते शेवटचं इंग्रजी त्या पोरीचंच असेलं..अामच्या मंडळीला कसलं येतंय इंग्रजी”
मी म्हटलं “ अाजींचा स्वभाव फार छान अाहे हो”
बाबाची छाती फुगली “मग ! दिसायला पण फार सुंदर अाहे ती. ती खुप नाजुक अाहे, चहात टाकायला दुधाची साय बोटाने बाजुला करायला जाते तर तिचा गुलाबी रंग उतरतो दुधात, नासतं मग दुध. झाडावरची फुलं तोडतांना बोट खरचटतं म्हणुन म्हटलं तोडायच्या भानगडीत पडु नको , खाली पडलेला प्राजक्त वेचत जा तर एक दिवस फुलांवर पाय पडुन मुरगळला ना बाईचा पाय, इतकी नाजुक. एकदा पहाटे कुस बदलली तर खरचटलं डाव्या खांद्याला .”
मी डोळे विस्फारुन बघतचं राहिलो. मग बाबांनी ‘गंमत केली रे” अशा अर्थी डोळे मिचकावले अाणि खोखो हसले. मग अाम्ही उत्तर लिहु लागलो.
“तुझं पत्र मिळालं. वाचुन अानंद झाला. अौषधांबद्दल काहीच का लिहलं नाही? संपले असतील तर मागवुन घे. मनीअॉर्डर पाठवतो लौकरच. माझ्याबद्दलची तुझी नेहमीची जागरणाची तक्रार मिटल्यात जमा अाहे. गेल्यावेळी तू बोहारणीला साड्या देऊन भांडे घेण़्यासाठी ज्या दोन साड्या दिल्या होत्या त्याचे उशांचे खोळ शिवुन घेतले मी. म्हणुन अाता लवकर झोपी जातो. नाही वाटले बोहारणीला द्यावेसे. भांड्यांची व्यवस्था केली मी माझ्या हिशोबाने…..”मी बाबांना मध्येच थांबवलं अाणि विचारलं “ त्यांना दिसत नाही ?ती मुलगी अात्ता अाली. मग पुर्वी का पत्र लिहायचे तुम्ही? कोण वाचुन दाखवायचं ? “
“मीच” बाबा म्हणाले. मी न कळाल्याची मुद्रा केली. बाबा सविस्तर सांगतो अशा पद्धतीने बसले अाणि म्हणाले “अरे नीट दिसत नाही माझ्या बायकोला. चिडवायचो तिला ‘चंद्रासारखे डोळे’. मग एकदिवस एका डोळ्यात खरोखर पोर्णिमेचा शुभ्र चंद्र उतरला. काहीतरी पडद्याचा अाजार. अॉपरेशन खर्च फार. एकदा घेऊन गेलो होतो. अौषधांची जंत्री पाहुन म्हातारी गावी पळुन गेली. तिला म्हटलं तिकडे तरी जा सरकारी दवाखान्यात. पण म्हातारी काय जात नाही घाबरते कि काय. अाणि इकडं ये म्हटलं सोबत तर तेही नाही. अाणि मला ही तिकडे थांबु देत नाही. इकडे म्हटलं तर इकडे हि येत नाही. इथे जमिनीचा कोर्टकटला चालु अाहे. महिनाभरात मिटेल असं वकिल लोकं दोन वर्षापासुन सांगताय. बापाने मरतांना सांगितलं होतं तेवढी मोकळी कर जमीन. त्याच्या शेवटच्या इच्छेत मला बांधुन गेला. त्यात माझ्या म्हातारीचा हट्ट त्यांचा शब्द खाली पडु नका देऊ... अाता हळुहळु दोन चंद्र झाले. अाता अजुन भुरकट भुरकट दिसतं तिला. महिनाभर थांबेल अाणि जाईल निघुन कायमचा. अाता नाही थांबवत. ती तर अाता म्हणते ‘गरज काय अापरेशनची?’ . अंधार अोळखीचा झालाय. अंदाज जवळचा झालाय. अौषधाला पैसाच इतका लागतो तर अॉपरेशनला किती लागेल. मी पण नीच मला माहितीय ती नाहीच म्हणेल म्हणुन तिला दरवेळेस अाग्रह करतो. ती पण समंजस माझा पोकळ अाग्रह कळतो तिला म्हणुन दरडावुन,अादळ अापट करुन नाही म्हणते. मोठी बनेल अाहे म्हातारी. तिच्याच्याने घर काही सुटत नाही.पैसा वाचवुन मग सहाएक महिन्यातुन एकदा जातो घरी तिला भेटायला. पत्र लिहुन पाठवायचो. ती जपुन ठेवायची. मग अाम्ही अामच्या घरामागे हे ss अस्सा ! अाभाळा इतका जुनाट पिंपळ अाहे. त्याच्या खोडात एक सिंहासनासारखा खोपा तयार झालाय. झाडाची ढोली. मी तिकडे गेलो कि तिथे बसवतो महाराणी साहेबांना. अाणि मी पाठवलेले अाणि तिने जपुन ठेवलेले पत्र वाचुन दाखवतो. मला ही सोपं पडतं अाताशा अाठवायला जड जातं अाणि वर्षभरातलं काय काय लक्षात ठेवणार ना. अाणि तिला पण पत्र येताय म्हणजे मी इकडे सुखरुप असल्याची मुक पावती . हे तिचं पत्र अालं म्हणुन म्हटलं उत्तर द्यावं. “
बाबा अजुन बोलतंच होते “अाम्हाल सवय अाहे ह्या अशा चिठ्ठ्यांची. अामच्या काळी पत्र किंवा चिट्ठ्या असायच्या. प्रेमात होतो तेव्हा पण लिहुन घ्यायचो छोटंसं चिटूरं. “जय दशभुजा माता कि जय” , “ त्रिशूलशंखधारिणी दशभुजा माता प्रसन् , अाणि देवीचं चित्र काढायचो. ”
मी “हे असं चिठ्ठीत? लवलेटर मध्ये?”
बाबा हसले “दशभुजा माता म्हणजे अाज देवी मंदिरा मागे भेट. त्रिशूलशंखधारिणी दशभुजा म्हणजे देवीच्या दहा हात असतात ना ? इकडे पाच तिकडे पाच. मग शंख ‘ह्या’ हातात होतं ‘ह्या’. अाणि त्रिशूल हा ‘असा’ हात म्हणजे किती ? किती? अहो घड्याळातले ‘चार’! . म्हणजे ‘देवी मंदीरामागे चार वाजता भेट अाणि देवीचं चित्र. म्हणजे कोणाला शंका पण नाही यायची “
मी म्हणालो “अच्छा ! अशी सुरवात झाली होती तर तुमच्या ह्या प्रेमकथेला !” बाबा म्हणाले “नाही नाही , ती चिठ्ठीवाली वेगळी होती. माझी अवस्था तीच जी अाता तुमची अाहे. मुद्दा असा अाहे अाहे कि ,चिठ्ठीची गंमत काही संपत नाही कधीच. ते प्रेम जे अपुर्ण राहिलं. तुम्हाला काय वाटतं तुम्हीच प्रेमवीर अाहात? पण तेव्हा सुद्धा कसं होतं, ती चिट्ठी ज्याच्याकडे द्यायचो त्याच्यानुसार अामच्या मनातला प्रवास सुरु व्हायचा . अाता इथे गेली असेल चिट्टी, अाता तिथे गेली असेल चिट्ठी , अाता चौकात पर्यंत , अाता नाक्यापयंत , अाता घराजवळ , अाता तिच्या हातात अाली असेल. अाता तीने भरभर वाचुन कुणी पाहुन नये म्हणुन पटकन काळजाशी ठेवली असेल . मग असं सगळं उलटं गणित मांडुन अाम्ही मंदिरापाशी ताटकळत बसायचो. पण ती काही यायचीच नाही. नंतर दुस-या दिवशी कळायचं चिठ्ठी मिळालीच नाही . पण अाली नाही अाम्ही वाट पहात बसलो म्हणुन शक्य तितके पॉझिटीव रहायचो. मिळाली असेल पण बाप अाडवा अाला असेल, मिळाली असेल पण अाईने स्वैपाकाला लावलं असेल. म्हणजे थोडक्यात काय तर ‘ती’ का अाली नाही ह्याच्या शक्यातांची जेव्हा अाम्ही यादी करायचो तेव्हा सगळ्या शक्यतांमध्ये अाधी तिला वाचवायचो. तीची बापुडीची काही चुक नाही. हे अमुक अमुक तमुक तमुक झालं असेल, हाच काय तो अामचा कयास. दोष तीचा नाही अाजुबाजुचा असायचा. ती अाली नाही , तुमच्या भाषेत’ टप्पा दिला’ म्हणुन तिचा ‘राग-राग’ नाही केला कधी . मग चोरुन चोरुन बघायचो. अाणि हौस भागवुन घ्यायचो. त्या काळची चोरुन बघायची मजा अाजच्या मिठीलासुद्धा नाही बघा.
अाणि तुम्ही म्हणजे असं कि “ दोन ब्लु टिक दिसले तरी रिप्लाय का देत नाही “ , “अॉनलाईन दिसते पण माझ़याशी का बोलत नाही” अाजच्या शक्यतांमध्ये तुम्ही लोकं सगळ्यात अाधी दोष देता तो जोडीदाराला. “ मी बाबांचं मोबाईल ॹान पाहुन मनातच हसलो अाणि म्हटलं “बरं मग तिचं काय झालं? दशभुजा मातेचं ?”
बाबा म्हणाले “पुढे काय तीच घिसीपिटी कहानी. ती होती ‘महालक्ष्मी बंपर करोडपती सोडत’ अाणि अाम्ही अापले ‘दिवाळीची सोरट’ कुठून मेळ लागेल हो? पोरीचं मिशीवाल्या बापासमोर चालायचं नाही. नंतर एकदिवस मी भरपावसात अोथंबलेल्या अंगाने , वेशीवरच्या गढीत लपुन बसुन मग गाव सोडणारं अाख्खं व-हाडं पाहिलं. तिला पाहुन घरच्यांना वाटत असेल त्यांची पोरगी घरापासुन लांब चाल्ली म्हणुन रडतेय. पण मला कळायची ना तिच्या अश्रुंची भाषा. ‘मी चाल्ले , तुझं कसं होणार अाता?’ हे अश्रु होते ते . देवा शप्पथ खोटं नाही. तेच होते ते . मग शिक्षण सोडलं ,घर सोडलं, गाव सोडलं, तिच्या गावी भटकलो. ती अाधी दिसायची अधे मधे. अाता नंतर तिने पण सोडलं असावं. बिचारी काय करणार नव-यासमोर चालत नसेल काही . “
मी चकित , “अजुनही तीची चुक नसावी म्हणताय ? तुम्ही रस्त्यावर अालात . अायुष्य फुकट गेलं तुमचं तिच्यापायी. तरी तीची चुक नाही ?”
बाबा परत तसाच हसला “जोडीदाराच्या चुका पदरात घालायचं वचन देतो ना अापण? चुक-बरोबर माणसं नसतात हो . हि साली हरामी वेळ चुकीची असते. समोरुन कुणी घाव घातला तर अापल्या माणसाला पुढे करायचं कि अापण तो घाव अापल्या छातीवर झेलायचा ? हे अापण अापलं ठेवायचं. तसंच अाहे हे समोरुन निरोप नाही अाला तर अापण अाधी अापल्या माणसाला दोष द्यायचा कि त्याला सांभाळायचं ? “
बाबाने मी लिहलेलं पत्र पेटीत टाकलं. माझ़या डोक्यावरुन हात फिरवुन कडाकड माया मोडली अणि निघुन गेला. थोड्यावेळात एका पोस्टमन ने त्या पेटीतले सगळे पत्र पोचवण़यासाठी बाहेर काढले. मी बघतच होतो. अाता माझ्या मनातला प्रवास त्या खाकी पिशवीत बसुन सुरु झाला.बाबाच्या गावाच्या पोस्टअॉफिसचं धुकं माझˇया भोवती जमल्यासारखा भास झाला. मी पिवळसर निंबाच्या पानांच्या पावसात कितीतरी वेळ नुसता बसुन होतो.
Monday, February 1, 2016
वैजयंती
संध्याकाळी राईजवळच्या सगळ्यात गर्द झाडाखाली खुप दाटी होती. सगळे जण डोकावुन,वाकुन पहात होते. हे तेच झाड होतं…वैजयंतीच.
तीच वैजयंती जी तीच्या मैत्रिणीला,चांगुणाला म्हणायची “मला खात्री अाहे, शांत डोळे मिटुन अच्युताचे नामस्मरण करत,मी जेव्हा ठरवेन तेव्हा माझ्यातला अात्मा ह्या देहाला सोडु शकतो. हे जग मरण मरण ज्याला म्हणतं ते माझ्या मर्जीत अाहे. पण मी वाट पहातेय ‘त्या'ने माझ्याकडे एकदा फक्त बघायची. मग ह्या जन्माचं सार्थक झाल्यासारखंच अाहे.”
वैजयंती माळरानच्या पलीकडल्या पाणवठ्यावर जातायेता लागणा-या गुलमोहराखाली नेहमी दिसायची. नीटंस नाकीडोळी, इवलीशी हनुवटी, पायात पैंजण, अशी इतर गोपिकांसारखीच दिसणारी ,किंवा त्यांच्यापेक्षा किंचीत डावीच अशी , हातावर नावाचं गोंदण असलेली ‘वैजयंती’.
रोज सकाळी सगळ्याजणी घोळक्या घोळक्याने गावातल्या चौकात रासचबुत-याजवळ थांबायच्या अाणि पाणी भरायला निघायच्या. गावातल्या गल्लीबोळांतुन वाट काढत , माळरान तुडवत सगळ्याजणी अाभाळात ढगांचे जत्थे विशिष्ट लयीत सरकावे तशा सवयीने पाण्याला निघतसे. गाव अोलांडल्यानंतर अाणि पाणवठ्याच्या अाधी गर्द अांबेराईतुन वाट जायची. तिथुन जातांना सगळ्यांचा वेग मंदावायचा तर काहींचा वेग भरभरायचा..त्याच कारणही तसंच होतं म्हणा. तरी एक साम्य मात्र सगऴयांच्यात असायचं ते म्हणजे सगळ्यांचे लाजुन लालबुंद झालेले गाल, भिरभिर नजर अाणि कसल्याशा अनामिक हुरहुरीने धपापणारा ऊर,
गर्द राईच्या एखाद्या झुपक्यातुन अाधी ‘साट्’ अावाज यायचा मग पुढच्याच क्षणी ह्या गर्दीमधल्या एखाद्या हंड्यांला भिडायचा…’ठप्प् !’.जणू मधलं अंतर नव्हतंच त्या दगडाला ,इतका वेग. जिच्या डोक्यावरचे अाभाळ फुटायचे तिच्या अंगभर पाणीच पाणी. मग सुक्या असलेल्या सगळ्या जणी अोल्या पदराने तोंड दाबुन फिदीफिदी हसायच्या अाणि हि जिचा एव्हाना वा-यावर फरफरणारा पदर अाता अोला झाल्याने अंगभर चिकटला होता ,ती अाधी लाजायची पण नंतर लगेचच लटक्या रागाने बडबड सुरु करी,”मेला चेटक्या ! एकतर दिसतही नाही” मग खालच्या अोल्या मातीतलाच एखादा दगड उचलुन जिथुन तिला लागलेला दगड अाला असावा अशा अंदाजाने दिशाहिनपणे नुसता भिरकावत असे. फार फार तर पंधरा पावलांवर तो दगड जाऊन पडायचा पण फेकणारीचा राग क्षणभर शांतावायचा. हवेने म्हणा किंवा अजुन कशाने, पण कुठलं तरी झाडं मग नुसतं सळसळायचं जणू ह्या पंधरा पावलांवर पडलेल्या दगडावर नुसतं हसायचं. त्यामुळे ती देखील अजुन चडफडायची. मग बाकीच्या सख्या तिला हाताला धरुन अोढुन न्यायच्या. ह्या सगऴया सख्यांना हे माहिती असायचं कि कुणातरी एक अाज भिजणार. म्हणुन घरात जितके हंडे पाणी लागणार त्यापेक्षा प्रत्येक जण एक हंडा सोबतीला जास्त घ्यायच्या. अाणि गाव लागायच्या अाधी वेशीजवळच भिजलेल्या गोपिकेला द्यायच्या. म्हणजे घरी गेल्यावर अोरडा नको. असं सगळं अगदी ठरल्याप्रमाणै ,खेळीमेळीने,समंजस त्रागा चालु असायचा. प्रत्येकी ७-७ वेळी भिजुन गेल्या तरी वैजयंती अजुनही कोरडीच होती.
सगळ्या मैत्रिणी दिवसभरात कधीही भेटल्या तर ‘त्या’ दिवशी कनुने मला कसं अडवलं , ‘त्या’दिवशी केशाने कसं भिजवलं ह्याच्याच चर्चा रंगायच्या अाणि वैजयंती त्याच्यात मूक सहभागी व्हायची. ह्या गप्पांमध्ये सहभागी होता यावं म्हणुन वैजयंतीने एकदोन वेळा ‘पाण्याला जाण्याच्या वेळेच्या' खुप लौकर जायचा प्रयत्न ही केला होता. म्हणजे पाण्यावरुन येतांना गावगल्ली सुरु होण्याच्या अाधीच्या वळणावर हाताल्या कड्याने टचकन् हंडा फोडायचा म्हणजे जाता येता सगळे बघुन विचारतील कि काय झालं,कसं झालं वगैरे.आणि वैजयंती लग्नात 'नाव घेताना' नववधु जितकी लाजेल तशी लाजत नाव सांगेल.हे सगळ्यांची तिने कितीतरीदा मनात उजळणी केली होती. पण एेनवेळेस ती डुचकी चांगुणा तिथे अाली होती. मग वैजयंतीचा हा बनाव पण विनापावसाच्या नुसत्या भरल्या अाभाळासारखा सरुन गेला.
वैजयंती गुरांना चरायला पण नेतसे. मग सख्या राईजवळ अाल्या कि ती त्यांच्यात मिसळुन पुढे पाण्याला जात असे. ब-याचदा ती राईतल्या वेगवेगळ्या झाडापाशी रेंगाळत बसायची. सकाळी कधी कधी थकुन झाडाला टेकुन बसायची तेव्हा पायाजवळ हंडा अाणि खांद्याला काठी टेकवुन उभी ठेवलेली असायची तेव्हा दुरुन सुर्यडुबीच्या पार्श्वभुमीवर झाडाला टेकलेली तिची केवळ एक काळी अाकृती दिसायची. तेव्हा ती अगदी एकतारी घेऊन बसलेल्या जोगिणी सारखी भासायची.
सुर्यडुबीच्या अात घरी परतायची सगळ्या मुलींना घरातुन तंबी होती पण वैजयंती गुरांसोबत असल्याने तिला कधी कधी जर्राशी मुभा असायची.हो पण जराशीच. कधी कधी सावळ्याच्या तंद्रीत ती हरवुन जायची .भानावर अाली कि वेळ टळुन गेलेली असायची. मग घरी उशीर का झाला हि विचारणा झाली कि ‘हरवले होते’ इतकं कारण पुरेसं होतं. घरच्यांना तिच्या अावडत्या वासरा विषयीचा,वासंतीविषयीचा लळा माहिती होता.त्यांना वाटे हि म्हणतेय कि वासरु हरवले होते. अगदी त्याच वेळी गोठ्यातुन वासंती मान हलवुन ,घंटी किण्किणत नाही-नाही म्हणत असे पण वासरांची अन् पाखरांची हि असली भाषा फक्त वैजूलाच माहित होती. वैजू तुळशीजवळुनच डोळे वटारुन ‘श्श्श् !’ करुन वासंतीला दरडावायची.
तसं पाहिलं तर वैजयंतीची भिजण्याची तयारी खुप अाधी पासुन सुरु व्हायची.हो तयारीच. दररोज चुन्याने हंडा माखुन ती अाधी पांढरा लख्ख करतसे. नंतर त्यावर कधी काजळाने , कधी गेरुने , कधी हिरवी पानं वाटुन , कधी कोळशाने , कधी लाल जास्वंद चोळुन वेगवेगळ्या रंगाची नक्षी बनवत असे. अाणि सगळ्या गोपिकांमध्ये अापला हंडा सगऴयात अाकर्षक कसा दिसेल याची तयारी ती रोज संध्याकाळी पाण्यावरुन हिरमुसुन अाली कि करतसे. हंडा नक्षीदार करतांना तिची मनातल्या मनात बडबड चालु असायची ,” अाज त्या कौशीचा हंडा फोडला , परवा गौराचा, मागे मंगलाचा, त्याअाधी एकदा लक्षीचा, त्याअाधी…..सगळे सगळे झाले पण माझा ना कधी हंडा फुटला ,ना कधी माधोने अडवलं. एकदा तर चांगुणाची मटकी लागोपाठ दोनदा फुटली. ती पण अशी कि चांगुणाला समोरुन पत्थर येताना दिसला अाणि तो मागे जाणार ह्याचा अंदाज येताच चांगुणा जराशी तिरपी झाली अाणि स्वत:हुन तो पत्थर स्वत:च्या हंड्यावर झेलुन घेतला.
एकदा वैजयंतीने ज्वर असल्याचं नाटक करुन घरीच थांबुन घेतलं अाणि त्या दिवशी लपुन शुभ्र पांढ-या हंड्यावर रानफुल चोळुन असा काही किरमिजी रंग तयार केला कि सगऴयांचे डोळे विस्फारले. जिवघेण्या मोरपीसाचे चित्र बनवले होते तिने हंड्यावर. रस्त्याने जाताना चौकाचौकात, नाक्यानाक्यावर लोक तिला थांबवत होते. काहीजण वळुन वळुन पहात होते. एकजण तर वळुन पाहतांना वाटेत बसलेल्या कुंकमभांडारावाल्याच्या टोपलीत तोल जाऊन लाल झाला. तेव्हा चिडलेला कुंकुमभांडारवाला अाणि लालबुंद गृहस्थ सोडुन सगळं वृंदावन हसुन बेभान झालं होतं. नेहमी सारख्या सगळ्याजणी रांगेने राईजवळुन जाऊ लागल्या. पाऊल पाऊल नदीत उतरत गळाभर पाण्याशी उभं राहिल्यावर जसा श्वास भरुन रहातो तशा सगळ्याजणी उर भरुन श्वास घेत होत्या…..ह्या अनामिक चैतन्याने कि कधीही हंडाफुटीची वेळ येईल. सगऴयांनाच अाज असं वाटत होतं कि अाज वैजयंतीच भिजणार. सगळ्यांच्यात इतकी उठून जी दिसत होती. पण सावळ्याने नेम धरला तो कावेरीवर. हिरमुसुन हंडा तसाच टाकुन वैजयंतीने घराकडे उरफुटी धाव घेतली. अाणि घरी बसुन रडत राहिली. दोन दिवस. शेवटी सख्यांनी खुप मनवल्यावर ती तिस-यादिवशी उठली. अाणि अायुष्यात पहिल्यादाच वैजयंतीच्या कटीवर अाणि डोक्यावर बिननक्षीचा हंडा होता. सगऴयांच्या डोळ्यांना तिच्याकडे पाहिलं कि चुकचुकल्या सारखं वाटावं इतकी सवय झाली होती तिच्या नक्षीदार हंड्याची. सगळ्या सख्यांनी पाणी भरलं अाणि त्या परतीला निघाल्या तितक्यात “ साट्” अावाज अाला अाणि पुढच्या क्षणी वैजयंती नखशिखांत भिजलेली होती. वैजयंतीच्या मुखातुन “कान्हा !” अस्फुट स्वर उमटले.
कान्हाचं लक्ष वेधण्यासाठी रोज नक्षीदार हंडे बनवणा-या वैजयंतीला अखेर साध्या हंड्याने भिजवलं. जणू देवकीनंदन सांगु पहात होता कि देखावा म्हणुन केलेल्या भक्तीपेक्षा त्याला साधंसरळ मिटल्या डोळ्यांचं मनस्वी नामस्मरण मला अधीक प्रिय अाहे.
नंतर काही दिवस इतर सख्यासारखीच नित्यनियमाने वैजयंती भिजत राहिली.
एकदा संध्याकाळी राईजवळच्या सगळ्यात गर्द झाडाखाली खुप दाटी होती. सगळे जण डोकावुन,वाकुन पहात होते. हे तेच झाड होतं…वैजयंतीच. गर्दीत विचारणा होत होती कि नेमकं काय झालं वैजयंतीला ? तेव्हा चांगुणा म्हणाली “ काहीच नाही ! मी तिलाच शोधायला घरी अाणि मग पाण्याजवळ गेले तर हि इथे बसली होती” कुणीतरी म्हणालं , “ अगं हो पण तू तिला का शोधत होतीस? काय सांगितलं तू तिला? ”
चांगुणा म्हणाली ,” मी तर तिला हेच सांगितलं कि मला अात्ताच महालातल्या दासी कडुन कळालं कि श्रीकृष्ण नुकतेच स्नानादिक अाटोपुन अाले होते अाणि तयार होतांना समोरच्या तबकात मोरपिस,मोत्यांची माळ, तुळशीची माळ असा त्याचा नेहमीचा साज होता. त्यांचा सेवक एकएक करुन त्यांना साज देत होता तेव्हा ते तुळशीमाळे कडे बोट दाखवुन म्हणाले कि ‘ ती वैजयंतीमाळ’ द्या घालायला.
सगळे म्हणाले “ मग?
चांगुणा म्हणाली,” मग ? मग काहीच नाही . वैजू ने ते एेकुन डोळे झाकले ते शेवटचेच……"
Friday, January 22, 2016
सणवार
Thursday, January 7, 2016
बॅकबेंचर्स २५ जिप्सी ( दै सामना ९ जानेवारी १६)
Friday, January 1, 2016
रुक्माईच्या सावलीत : मटा मैफल २ जानेवारी १६
झोपण्याआधी परवानगी घ्यावी म्हणुन म्हटलं " रखुमाई , आज रात्रीपुरती विठ्ठल होती का? म्हणजे झोपायला आजचा आसरा देती का ?" माई म्हणाली ," वा रे लेका ! आसरा देणार मी आणि तरी 'विठ्ठल होता का?' विचारुन शेवटी सगळं पुण्य त्यांच्या खात्यात ना ? लई शाहजोग झालाय हो तू " मी म्हणालो " तसं नाही आई , आपली एक पद्धत म्हणुन बोललो ग " मग ती 'गम्मत केली रे' अशा अर्थाने डोळे मिचकावत डोकीपदर सारखा करत हसली. तिथेच कोप-यात घोंगडी आंथरुन देत म्हणाली " हां , तू पड इथं. संकोचु नको .तो वर मी काहीतरी खायचं पाहते तुझं" मला भूक लागलीय हे तिला कसं कळालं वगैरे असले फालतू प्रश्न मला पडले नाही. पण जे प्रश्न पडले होते ते तिच्या नजरेतून सुटले नाही. ती पीठ मळत म्हणाली 'हां बोल बोल ...कशाला अडखळलाय? "
इतकंच.
-प्राजक्त देशमुख
बॅकबेंचर्स : २४ कोलाज ( सामना २/०१/१६)
अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)
मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...




