Tuesday, April 12, 2016

लेख : रघुवीराच्या देहत्यागाचा साईडइफेक्ट

मरिनड्राइव्ह. सुर्य धुवुन पिळुन दोरीवर वाळत घालावा , त्याच्यातुन थेंब थेंब केशरी रंग पसरत रहावा , अाजुबाजुला सबंध पिवळसर केसरी रंग अशी रात्र अाणि संध्याकाळच्या उंबठ्यावरची वेळ होती. घरात साचलेलं लोटा-लोटा पाणी कितीही वेळ बाहेर फेकत रहावं तरी पावसामुळे घरात पाणी कमी होत नाही तसं समुद्राची भरती काठावर लोटा-लोटा पाणी फेकत होती. संध्याकाळ सरली, रात्र सुरु झाली अाणि सगळी कडे गर्द दाट पिवळसर केसरी रंग पसरु लागला. रस्त्याच्या कडेचे स्ट्रिटलाईट सुरु झाले होते. प्रत्येक पाच फुटावर एक मुठभर सुर्यगोळा उगवावा तसे प्रत्येक पाच फुटावर स्ट्रिटलाईट सुरु झाले होते. तुम्ही लोकलच्या दाराशी उभे असतांना अचानक समोरुन दुसरी लोकल भरधावावी तसा वारा बेफाट वहात होता. समुद्र , वारा अाणि वळणदार रस्त्यावरुन डोकावणारा स्ट्रिटलाईटचा तरंगणारं प्रतिबिंब जणु काही स्ट्रिटलाईटचा अोला पिवळसर रंग वितळुन पाण्यापर्यंत अोघळलाय. मरिनड्राइव्ह. 

हेच मरिनड्राइव्ह अनेकांचं एसी बेडरुम अाहे.  मी अाणि सच्या कितेकदा तिथे रात्रभर गप्पा मारत बसतो अाणि अामच्या साथीला हातातल्या काळ्या गंड्यासारखी रात्र सोबत झुलत राहते. दिवसभर राबुन काही लोकं तिथे कठड्यावर पाठ टेकवुन देतात अाणि उठतात ते सकाळी सायकलवर चहावाला चहा द्यायला येतो तेव्हाच. लंबगोलाकार सिमेंटच्या दगडांचा कृत्रिम काठ तिथे तयार केलाय. तो तिथल्या सौदर्यात भर घालतो. उसळुन अालेलं पाणी त्या दगडांच्या खाच खळग्यात जाऊन बसतं. अाता रात्र उलटुन गडदरात्र सुरु झाली होती. समुद्राची गाज अाणि एक्कादुक्का गाड्यांचे अावाज इतकंच एेकु येत होतं. मी तिथेच कठड्यावर रेलुन तितक्यात एक न्युज चॅनलची ‘अोबी वॅन’ अाली अाणि एक वार्ताहर माईक घेऊन माझ्याकडे येतोय असं वाटत असतांना त्याने माझ्या शेजारी बसुन खाली सिमेंटच्या खडकामध्ये असलेल्या एका खळग्यातल्या गढुळ साचलेल्या लाटेला प्रश्न विचारायला सुरवात केली.
“अथांगतेचा घटक , परंतु असले जगणे , कसे वाटते? सखोलतेशी नाते , किन्तु चुळ असावी , असले जगणे , कसे वाटते? ,अगाधतेचे अंग, तरिही द्रोण पुरावा , असले जगणे , कसे वाटते? "

शेंगा,टरकल,थुंकी,चिंगम अशा बरबटलेल्या त्या गढुळ पाण्याला तो प्रश्न विचारत होता. मला अाश्चर्य वाटले . पण नंतर विचार केला कि प्रश्नही तसा चुक नाही. तिकडे अथांग, सखोल, अगाध अशा समुद्राचा भाग असलेल्या लाटेने असे कोप-यात घाणीत जगणे कंठावे हे जरा दुर्दैवीच नाही का ?
घनगंभीर थरथरता अावजात डुचमळती लाट बोलु लागली “ प्रायश्चित्त अाहे हे. केलेल्या कर्माचं परिमार्जन अाहे हे. “ वार्ताहर म्हणाला ,” जरा उलगडुन सांगा, तुमचं दु:ख जगा समोर येऊ द्या”
दूरुन मोठी भरती अाली. लाट जागीच डुचमळली. अात मधल्या गढुळतेमध्ये नवी गढुळता विसळली. पोटात ढवळल्यासारखं झालं. लाट पुढे सांगु लागली , “ लोकांचे बोल,टोमणे एेकवेनासे झाले. दुस-यांचे टोमणे एकवेळ सहन करु अापण पण अापल्या लोकांचा अबोला नाही सहन होत अाता. अनेक हजारो वर्षांपुर्वीची गोष्ट अाहे हि. मी अवखळ होते ,लहान होते. त्यावेळी समुद्र नव्हते. त्यावेळी मी ‘शरयू’ होते.

अवधची  शरयू. सकाळी सकाळी भरत, लक्ष्मण, शत्रु अाणि राम माझ्या काठाशी येऊन  उंच बाण मारायचे अाणि कुणाचा बाण सगळ्यात लांब जातो अशी शर्यत लागायची. अात नदीमध्ये त्यांचा निषाद कुळातील मित्र गुहा एक नाव घेऊन तरंगत असायचा. तो लांबुन अचुक सांगायचा कि कोणाचा बाण किती लांब गेलाय. अनेकदा भरतच जिंकायचा. लक्ष्मण नेहमीप्रमाणे चिडचिड करायचा. राम भरतला शाबाशी द्यायचा. अनेकदा असं वाटायचं राम मुद्दाम भरतला जिंकु देतोय. 

राम….रघुवीर …अगाध मस्तक, भव्य ललाट, ललाटावर भुरभुरणारे केश, टपोरे डोळे, मध्यम उंचीचा, सर्व देहावर अवर्णनीय कांती असलेला, विद्यपारंगत, राजनीतिज्ञ, सज्जनांचा संग्रह आणि दुर्जनांचा निग्रह करणारा, धर्म-अर्थ व काम या तिन्ही पुरूषार्थाचे योग्य पद्धतीने सेवन करणारा, प्रजाहितदक्ष व प्रजाजनांना अत्यंत प्रिय, देवासुरांना ज्ञात असलेली सर्व अस्त्रे जाणणारा व संग्रमात अजिंक्य, असा रघुवीर.मी लांबुन पहायचे अनेकदा एकटाच माझ्या तीरावर येऊन पाय सोडुन बसायचा. कमळासारखे ते मऊशार पाय मी अोंजळीत घ्यायचा अनेकदा प्रयत्न करायचे पण मी लहान लाट होते म्हणुन सगळे मला मागेच  ठेवायचे. मग अनेक दिवस मला कुणीच दिसलं नाही. अनेक वर्ष. सालाबादाने पाऊस यायचा तेव्हा समुद्रातुन वाफ झालेल्या सरी नदीत बातम्या घेऊन कोसळायच्या कि ‘अाज रघुवीर पश्चिमेला दिसले ,अाज दक्षिणेला दिसले’ मग तिकडे लांब युद्ध कि काय झालं म्हणे अाणि सगळं अालबेल होऊन रघुवीर अाणि जानकी परतले. राजपुरोहितांनी विजयी रघुवीराच्या पाद्यपुजेसाठी शरयूतुन कमंडलु भरला . मी तेव्हा पण घाई करुन त्या कमंडलुत जायचा प्रयत्न केला पण मला इतर मोठ्या लाटांनी मागे सारलं. काठावरुन गुलाल,फुलं उधळंत रघुवीराचे अागमन झाले. मी नदीतुन सगळं पहात होते. असं समजा कि करोडोंच्या गर्दीतली मी एक डोकावुन डोकावुन काठावरुन अायोध्येत नाचत जाणारा सोहळा पहात होते.
काही दिवसमास अाणखी उलटले. मी रोज काठावर येऊन परतायचे कि एकदा तरी रघुवीराचा स्पर्श होईल. मला सगळे हसायचे. एकदा मला झोपी लावतांना मी मोठ्या, पुढे समुद्रात जाणा-या लाटेला थांबवलं अाणि विचारलं,”मी म्हटलं “मी अात्ताच का नाही चंद्राला हात लाऊ शकत ?” त्या खळखळ हसल्या म्हणाल्या “असं वेड्यागत करु नये बये. थोडी मोठी झाली कि तुला पुढे जाऊन दर्या व्हायचंय. मग हवं ते कर. अाणि रघुवीर जाऊ दे तुला ना चंद्राला हात लावता येईल. कारण रघुवीर पण तसाच शितल अाहे. बघ तो चंद्र दिसतोय का? तो वर पांढरा शुभ्र गरगरीत चंद्र? दर्या झाली ना कि मोठ्यापणी तुला अाभाळा इतकी उंच झेप घेऊन त्याला हात लावता येईल. भरतीवेळा असतात त्या.पण त्यासाठी शहाणं हो! सांगेल ते एेक हां ? असं उठसुठ कुठेही पळु नको रघुवीर रामाला हात लावायला जाऊ नकोस. अादराने वाग त्यांच्याशी. युगपुरुष अाहे ते अाणि तू अजुन अवखळ अाहेस.” मला डुलकी लागली अाणि मी तिथेच तरंगत राहिले . वर निळंशार चांदणं पडलं. माझ्या डोक्याखालुन अलगद हात काढुन मोठ्या लाटा प्रवाहाला निघाल्या. पुढे जाऊन त्यांना गंगार्पण व्हायचं होतं. गंगार्पण झालं कि जन्ममरणाचा फेरा सुटतो अाणि अाम्ही नद्यांना दर्याचं अथांग अमरत्व प्राप्त होतं. हे तितकं सोपं नाही त्याला मोठी तपश्चर्या लागते."
"किर्रर्र रात्र होती. वातावरण जरा उदास उदास होतं. मला पावलांचा अावाज अाला. मी हळुच उचंबळुन पाहिलं. सगळे सवयीने, मिटल्या डोळ्याने प्रवाहत होते. अवचित भुरभरु पावसाला सुरवात झाली. मी कुस बदलली. दूर पाहते तर काय ? एक तेज:पुंज अाकृती चालत येत होती. खांद्यावर रुळणारे केस , खांद्यावरुन खाली तरंगणारं उत्तरीय, नदीच्या प्रवाहात एकएक पाऊल उचलुन ती अाकृती धीरगंभीर चालत होती. जोर लाऊन चालावं लागत असल्याने खांदे मागेपुढे होत होते. मी संमोहित होऊन पहात राहिले. ती अाकृती चालत येत होती पण जशी पुढे येत होती तितकी ती खोल जात नव्हती. कदाचित शरयूमधील इतर सख्या अादराने बाजु होत किंवा जमिनीचा भर वाढवत नदीची खोली जाणवु देत नसेल. पावसाचा जोर वाढला मी पुढे पुढे जाऊ लागले. संमोहन कि काय असेल ते होत होतं. हळुहळु अाजुबाजुला गलका सुरु झाला अाता मला अडवणं शक्य नसल्याने सगळ्याजणी अोरडु लागल्या. ‘फिर मागे तू . अगं हा जो दिसतो, तो चंद्रासम, दिसतो केवळ, नसे चंद्र तो, फिर मागे तू.’ मी अापले दर्या होण्याच्या अाधीच चंद्राला हात लावायया कल्पनेने शहारले. अाता तो अाणि मी समोरासमोर होते. कुजबुज एेकु अाली. रघुवीर!! एका शब्दाने माझ्यातला थेंबन्थेंब शहारला. रघुवीर ! 
मी अावेगाने पुढे गेले अाणि त्या अाकृतीला कवेत घेतले. सगळी कडे हल्लकल्लोळ झाला. दर्या प्रवाहाला निघालेल्या नद्यांचा प्रवाह मागे फिरला मला थांबवायला. पावसाने जोर धरला. क्षितीज थरथरलं. अाभाळात गडगड झाली. मी स्वत:ला विसरुन गेले. भानावर अाले तेव्हा सकाळी सगळे जण माझ्याकडे पहात होते. काठावर कुजबुज होती. ‘रघुवीराने देहत्याग केला’
मग शरयू नदीतल्या सगळ्या जेष्ठांनी निर्णय घेतला अाणि मला शिक्षा म्हणुन पुढे पाठवायचं ठरवलं. मी जिथे जिथे प्रवाहत पुढे गेले तिथे तिथे सगळ्यांच्या खोचक नजरा माझ्यावरच असायच्या. “ हिच ती ! ह्याच लाटेने सुरवात केली,हिनेच रघुवीराला बुडवलं.” मी मुकाट खाली मान घालत प्रवाहत राहिले .युगानुयुगे. 
अाता मला नको झाल्यात सगळ्याच्या नजरा म्हणुन प्रायश्चित्त म्हणुन मी इथे कोप-यात येऊन अोंजळभर जागेत डुचमळते. मला वाफ व्हायचं अाहे. पण नव्याने एक लाट येते थोडी भर घालुन जाते अाणि मी अाहे तशीच राहते.” अाणि ती पुटपुटत राहिली श्रीरामजयराम जयजयराम! 
 सकाळी सकाळी एक मोठ्ठा पाण्याच्या बंबाची गाडी भरधावत मरिन ड्राईव्ह च्या रस्त्यावरुन गेली अाणि माझी झोप मोडली. शेजारी सायकलच्या कॅरिअयवर चहावाला हसत माझ्याकडे पहात होता. मला विचारलं “साब चाय लोगे ?” मी चहा घेतला. मी पैसे द्यायला लागलो तर म्हणाला “नही साब दिन कि शुरवात कि प्याली मै दिल से किसी दिलवाले को देता हुं, पैसे नही लेता” मी हसलो अाणि सहज म्हणुन विचारलं “ किधरसे अाए हो दोस्त ? क्या नाम ?”
तो म्हणाला “ युप्पीसे हुं ,अायोध्या. रघ्घु नाम है. चलो निकलता हुं. जय रामजीकी!”  

- प्राजक्त 
१२ एप्रिल २०१६

Sunday, April 10, 2016

गप्पा टप्पा : मुलाखत : म.टा.

1. नाटकाची सुरूवात कोठून झाली?
तसं 'पुरे झाली रे तुझी नाटकं चल अभ्यासाला बस' हे शाळेत असतांना पासुन ऐकत आलोय.  गंमतीचा भाग सोडला तर माझ्या काही धुरकट आठवणी आहे आणि आई-वडीलही सांगतात कि माझी नाटकं लहानपणी पासुनचीच . कसंय घरी बरंच धार्मिक वातावरण आहे. लहानपणी त्यांच्या सोबत कुठे जाऊन आलो कि तिथल्या प्रवचनकाराची कपड्या आणि लकबींसहीत हुबेहुब नक्कल करायचो. टिव्ही वर त्याकाळी पंकज कपुरची डिटेक्टीव्ह मालिका 'फटीचर' लागायची. तेव्हा तसा कोट-मफलर घालुन काॅलनीतल्या मोठ्यामुलांसमोर गाजर खात खात 'केसेस सोल्व्ह' करायचो. पण इतकं असलं तरी कधी शाळेत कोणत्याच नाटकात भाग घेता आला नाही.नंतर १९९९-२००० मध्ये माझा मित्र श्रीपादमुळे मी पहिल्यांदा मी रंगभुमीवर पाऊल ठेवलं. त्याच्या सोबत मी फक्त सोबत म्हणुन दौरे करायचो. दिग्दर्शक निरंतर सर म्हणाले हा नुसताच  सोबत येतो तर याला गर्दीचा भाग करू. मग मी हो ला हो करणारा गर्दी झाले . तिथे फक्त प्रेतावर रडायचं होतं. जीव ओतुन 'खरा' रडलो. सरांनी पोटतिडकी ओळखली आणि पुढच्याच प्रयोगात बदली कलाकार म्हणुन त्याचा नाटकात महत्वाची भूमिका दिली. नंतर प्रणव मी आणि श्रीपाद 
आम्ही तिघांच्या कल्पनेतुन आणि  इतर जिगरी मित्रांय्चा साथीने स्वत:ची नाट्यसंस्था सुरु केली. 

2. अभिनयाची शिबिरे कितपत दिशादर्शक ठरतात?
अभिनयाची शिबीरे दिशादर्शक आहेत पण अशा लोकांना जे प्रवासाला निघाले आहेत. ज्यांना घरी घ्यायला जाण्यापासुन सुरुवात आहे अशांबाबतीत हे सांगणं कठीण आहे. ह्याचा अर्थ असा कि मुर्ती बनवायची असेल तर मुळात तो दगड पण तशा स्वभावाचा हवा. ढेकळाला छिन्नी हातोडा सोसत नाही आणि दगडाला कोंब येत नाही. मागे एकदा हृषीकेश जोशी म्हणाले होते बहुतांशी कलाकार 
शिबीरात देवाचं वलय असल्यासारखे 'अहं ब्रम्हास्मी' अविर्भावात फिरत असतात. हे ऐकुन खुप हसलो होतो. कसंय कि स्शिबीरात स्पंज म्हणुन गेलं तर शोषता येतं. बरं परत 'काय' शोषताय हे ही महत्वाचं. म्हणजे शिबीरं कोणाची आहे हेही महत्वाचे. कारण आजकाल बिझनेस म्हणुन अशा शिबीरांच्या जाहिराती कमी नाही.
थोडक्यात चांगल्या शिबीरात चांगली दिशा मिळु शकते पण शिबीरं म्हणजे कच्चा माल टाकला आणि प्रोडक्ट बाहेर आलं अशी मॅन्युफॅक्चरींग कंपनी नाही. गुंता सोडवायचा असेल तर आपण आधी आतली गाठ शोधतो. त्यासाठी बाहेर बाहेर उसवणं म्हणजे गुंता वाढत स्वत:ला फसवणं. आणि कसंय बुद्ध आतुन प्राप्त होतो त्यासाठी कुठेही शिबीरं नाही. 

3. प्रायोगिकमधील आव्हाने व व्यावसायिक मधील कस?
खरं तर व्यावसायिक आणि प्रायोगिक असं विभाजन मला फारसं पटत नाही. कारण व्यावसायिक म्हणजे फक्त मनोरंजन हि संकल्पना समुद्र , दोन स्पेशल, शिवाजी अंडरग्राउंड .. ते आपल्या नाशिकचं गढीवरच्या पोरी असा दर्जेदार नाटकांनी पचवुन दिलंय. त्यामुळे प्रायोगिक आणि व्यावसायिक पेक्षा एकांकिका, दीर्घांक आणि दोन अंकी इतकंच वर्गीकरण जास्त संयुक्तिक वाटतं . त्यात दीर्घांक हा प्रकार जास्त लोकप्रिय होऊ लागलाय. आणि मला ही तो जवळचा वाटतो. 
हा प्रकार अजुन रुजायला हवा. 
तंत्राने भारावून आजकाल गिमीक्स कडे ओढा वाढलेला दिसतो. पुर्वीच्या नाटकांमध्ये कलाकार, लेखक, दिग्दर्शकांपेक्षा नाटकाचा विषय हा 'हिरो' असायचा. आजकाल आधीच ओरिजीनलची वाणवा झालीय त्यात गिमीक्सची भर. मी आणि मित्र अजुनही फक्त नाटक पहायला मुंबई/पुण्याला जातो. आताशा बोलणारा ऐकत नाही. तो समोरचा बोलत असतांना मला पुढे काय बोलायचंय ह्याचा विचार करतो . अगदी तसंच आता बहुतांशी फक्त लोकं आपलं नाटक सादर करतात पण नाटक बघायला कमी जातात.
आणि जसं पुण्यात सुदर्शन आहे , मुंबईत टॅग आणि अस्तित्व ह्या संस्था जशा काम करताय तसं एक छोटेखानी थिएटर किंवा तसं काम नाशकातही व्हायला हवं जेणे करुन आणखी समजुतदार ,जातिवंत प्रेक्षकवर्ग तयार होईल. 


4. नाटक करिअर म्हणून की कला म्हणून?
माझ्यासाठी नाटक व्यसन म्हणुन. गायकाला  गायकातून , संताला चिंतनातून , नर्तकाला नाचण्यातुन, गांजेवाल्याला चिलीमीतुन , वाचकाला अस्सल कथा वाचुन जी झिंग येते ती मला नाटकातुन व्यक्त झाल्यावर येते. एखादी कानफडात बसल्यावर जो कानात कुईऽऽऽऽ आवाज येत राहतो तसा अनुभव नाटकानंतर येतो. मग मी अभिनेता असो, दिग्दर्शक असो वा प्रकाशयोजना करत असो तो येतोच. तेच संवाद , तेच प्रतिसंवाद , त्याच जागी जाऊन आनंदी होणं वा कोसळणं हे सगळं तेच तेच असुनही दरवेळी अंगावर नवा काटा कसा उभा राहतो ? हे मला कळतं नाही. मी तो शोध घेतोय. प्रयोग सुरु असतांना आपणं तुकाराम होऊन समोरच्या काळ्या अंधाराकडे पांडुरंग समजुन व्यक्त होत राहणं ह्याला 'करियर' , 'कला' ह्या व्याख्येत कसा बांधु ? पण हे ही खरं कि करियर म्हणुन फक्त आणि फक्त नाटकावर चरितार्थ चालेल अशी अजुन तरी रंगभुमी श्रीमंती देत नाही. ऊस लावणारा शेतकरी कोप-यात तुकडाभर वावरात मेथी,शेपु,कोबी काहीतरी 'कॅशक्राॅप' लावतो तसं आहे हे. नाटक हा रिचार्ज आहे . ते करणं गरज झाली आहे बॅटरी 'डेड' होईपर्यंत. 

5. नाटकाकडे तरूणाई कोणत्या दृष्टीकोनातून पाहते?
 बरेच जण टिव्ही मालिका आणि चित्रपटाची पहीली पायरी म्हणुन नाटकाकडे बघतात. ह्यात तसं काही गैर नाही. कारण आधी म्हटलं तसं तुलनेने नाटकात पैसा कमीच आहे जो जगायला लागतो. 
पण नाटकात मिळणा-या समाधानाची तुलना ध्यान घारणेतही नाही. पण दुर्दैव हे कि आईबाप,बायको,नातेवाईक,लाॅंड्रीवाला, साखर मागायला आलेल्या काकु हे लोकं 'मुलगा किती कमावतो?' हे विचारतात 'किती समाधानी आहे ?' हे नाही . 
 तरुणाई खुप मनस्वीपणे नाटकाकडे बघतात हे आजुबाजूला बघताना जाणवतं. त्याबाबतीत खुपच अाशादायी वाटतं. गेल्या काही वर्षात खुप सुंदर विषय आणि कलाकृती  बघायला मिळाल्या. त्याची संख्या वाढावी इतकीच इच्छा. पण नाटकाबाबतीत तरुणाई लांब जातेय किंवा निराशावादी आहे वगैरे मी साफ नाकारतो . अत्यंत ऊर्जीत अवस्था आहे आणि यातुन सकसच बाहेर येईल हि आशा आहे . 

Saturday, March 26, 2016

रंगवारकरी : कविता

एकेका लेव्हलची
होत जाते विट....
समोरचा अंधार जणु
पांडुरंगाच्या माथीचा
अबीरबुक्का .....

विंगेतल्या झोताने
हळुहळु उजळु लागतो स्वत: 
हळुहळु आपण तुकाराम होत जातो

टाळ्यांचा गजर टिपेला पोहचत
चिंचोळा होत जातो....
अन् कळस दिसल्यागत 
वाढत जातात
काळीज ठोक्यांची आंदोलनं

तिस-या घंटेतुन
टाळमृदुंग ऐकु येऊ लागतात
मखमल पडदा उलगडतो 
अन् 
एक वारी सुरु होते

- प्राजक्त 
२६/०३/१६
International Theater day 


Friday, March 25, 2016

निंबाच्या पानांच्या पावसात



“धुक्यात गोठलेलं गाव. टेकडी चढुन पलीकडे उतरलं कि पोस्टअॉफिस लागायचं. कौलारु पोस्टअॉफिस. लाकडी कुंपण ,मातीमधे गचके खात खात उघडबंद होणारं लाकडी बसकं गेट, गर्द वडाच्या सावलीत कुशीवर रेलुन बसलेलं पोस्ट अॉफिस. टेकडीवरचं ते वडाचं झाड पण फकिरासारखं… टेकडीच्या टोकाशी पाय सोडुन बसलेलं. अाठवड्यातुन एकदा भल्या पहाटे कुणीतरी येऊन पोस्ट अॉफिसचं अंगण शेणाने सारवुन घ्यायचं. अाताशा फोन मेलच्या जमान्यात कोण कशाला पोस्टाकडे वळतो. पण डोंगरद-यात , गर्द जंगलाच्या वस्तीत अजुन सुर्य न पाहिलेली माती अाहे तिथे फोनमेलीच्या गोष्टी कशाला करतो,बाप्पा?“  हे एेकुन असं वाटलं हातातली सगळी कामं सोडावी अाणि बाबांना घेऊन थेट त्यांचं ते ‘धुक्यात गोठलेलं गाव’ गाठावं.  

बाबा बोलत होता “पुर्वी प्रत्येक पोस्टाबाहेर एक माणुस चारअाठ अाण्याला पत्र वाचुन पण द्यायचे अाणि अापण सांगु ते उत्तर लिहुन पण द्यायचे. अाता सगळं गेलं. मला एवढं पत्र लिहुन देतो का ? अाणि एवढं वाचुन पण दाखव ” बॅंकेत ‘पेन अाहे का’ विचारणारे भेटतात तसे पोस्टात ‘पत्र लिहुन देता का’ भेटतील याची मला कल्पना नव्हती. पण हा मात्र अपवाद होता हे मला नंतर नंतर जशी वेळ कलंडायला लागली तसं कळायला लागलं. 

मी विचारलं “ पत्र ?”

बाबा म्हणाला “बायकोचं अाहे. खाजगी काही नसतं ह्या वयात वाचा. वाचा. ”

तिथेच अावारात निंबाच्या झाडाखाली अाम्ही दोघं सावलीला कठड्यावर बसलो. मध्येमध्ये पिवळी सुकलेली निंबाची पानं फेर धरुन गरगरत खाली पडत होती. अाजुबाजुला तुरळक ये-जा करणा-यांची गर्दी होती. अजुनही इतके लोक पोस्टात येतात हेच माझ्यासाठी नवल होतं. मी कसलंस कुरिअर अालं म्हणुन मी तिथे गेलो होतो. बाबांनी चुरगळलेलं पत्र माझ्या पुढ्यात ठेवलं. कदाचित येऊन चारदोन दिवस झाले असतील पण वाचुन दिलं नसेल. किंवा असं म्हणुन बाबांचीच हिम्मत नसेल झाली पत्र लिहुन घ्यायची.(दुस-याला दोष देणं सोपं असतं) पत्राची सुरवातच वेगळी होती. 

“ 

अहोकाय ? चमकलात ना ? मी पण काय वेंधळी अाहे नाहां सनविविपत्रास कारण कि... हां अाता सांगा चमकलात ना ? मी कसं लिहलं पत्रते सांगेन सावकाशअाधी महत्वाचं सगळं बोलुन घेऊ दे,नाहीतर विसरायला होतंपुढच्या महिन्यात गावात वीज येणार अाहे म्हणेतशी ती तुम्ही गेल्यापासुनच येणार होती पण अाता खरंच येते कि काय अशा चर्चा चालु झाल्यातयेऊ दे बाप्पा,मला भुरकीला कायगडप अंधार भुरकट दिसलं इतकंचपरवा वेंधळेपणातुन धक्का लागला अाणि काच फुटली खिडकीची.. यंदा किराणवाल्याची चिंता करु नका.  तुम्ही येऊस्तोवर काही पैसे मागायचा नाहीकारण मागच्या अाठवड्यात थोडे दिलेत मी पैसेते कसला कार्यक्रम होता काय कि म्हणुन काही लोकांनी टोपल्या बनवुन नेल्याकसला तरी सरकारी कार्यक्रम होता म्हणे म्हणुन जरा जास्तच टोपल्या बनवाव्या लागल्यात्याचे अाले थोडे पैसे काळजी करु नका . तेवढ्या वेताच्या काड्या होत्या घरात अाधीपासुन....अाप्पा बिचारा देतो गुमान सगळं अाणुन . कधी कंटाळा करत नाहीमाझं मेलीच लक्षच नसतं परवा वेंधळेपणातुन धक्का लागला अाणि काच फुटली खिडकीचीपुर्वी रेडिअोतले गाणे पुढे असायचे अाणि खरखर मागे चालु असायचीअाता खरखर पुढं अाणि मागं अंधुक गाणं चालु असतंइकडे अाले कि तेवढं पाहुन घ्या त्यालाअापलं लेकरु सापडलं का ? दरवेळेस हा प्रश्न विचारणार नाही ,विचारणार नाही असं मनाला बजबजावुन ठेवतेपण माया ,इच्छेसाठी टक लावुन बसलेल्या ता-यासारखी तुटता तुटत नाही बघाइतक्या मोठ्या शहरात कसा सापडेलकधी सापडेलपण सापडेलहोऊ दे नऊ वर्ष झाली तर दहाव्यात सापडेलतुम्ही यायची घाई करु नकामी अगदी बरी अाहे इथेफक्त परवा वेंधळेपणातुन धक्का लागला अाणि काच फुटली खिडकीचीते तुमच्या सोबत असतं ते टिल्लं लेकरु कसंय ? त्याच्यावर फार माया लावु नका बरं !पण काळजी घ्या त्याचीअापल्या सारखंच त्याचे अाईवडील एकदिवस त्याला घेऊन जातील मग काय करालअाणि नेतील त्याला शोधत असत बिचारे.  इथं समोरच्या खोलीत एक नवीन भाडेकरु पोरगी अालीयएकटीच अाहेफार गुणी पोरगी अाहेहे पत्र तिनेच लिहुन दिलंयपडला जीव भांड्यात ? फारच लाघवी पोर अाहे.येता जाता चौकशी करत राहतेअाणि बरंका माझ्या वेंधळेपणातुन धक्का लागला अाणि काच फुटली खिडकीचीबाहेर बर्फ पडायला सुरुवात झालीय.  वारा झोंबायचा रात्रीचाअाणि कसंय ना सबंध उघड्या खिडकीतुन थंडी जितकी त्रास देते त्यापेक्षा जास्त फटीतुन येणारी टोचणी त्रास देते.. म्हणुन म्हणते शोधत रहा अापल्या लेकराला एकदाचा मिळु तरी दे किंवा मेलाय हे तरी कळु दे.येईल कधीतरी,येईल कधीतरीबोचरी थंडी जास्त झोंबतेअाणि हो तुटक्या खिडकीचं निमित्त काढुन लगेच येऊ नकात्या नविन भाडेकरु पोरीनं तिचं पावसाचं जाकेट लावलंय तिथं व्यवस्थितती म्हणते तशीही ती पाऊसात बाहेर नाही पडत कधीतुम्ही ठरल्याप्रमाणे नेहमी सारखे दिवाळीतच या..... दोन दिवसासाठीमनीअॉर्डरा बिर्डरा काही नको इतक्यातपहिलंच पत्र अाहे . माझ्या स्वभावपेक्षा वेगळं काही वाचायला मिळालं तर समजुन घ्या कि पत्र लिहणा-या पोरीने खोड काढलीतशी बदमाश अाहे तीकळावेलव यू . तुमची.

बाबा वरमला अाणि म्हणला “ते शेवटचं इंग्रजी त्या पोरीचंच असेलं..अामच्या मंडळीला कसलं येतंय इंग्रजी”

मी म्हटलं “ अाजींचा स्वभाव फार छान अाहे हो”

बाबाची छाती फुगली “मग ! दिसायला पण फार सुंदर अाहे ती. ती खुप नाजुक अाहेचहात टाकायला दुधाची साय बोटाने बाजुला करायला जाते तर तिचा गुलाबी रंग उतरतो दुधातनासतं मग दुधझाडावरची फुलं तोडतांना बोट खरचटतं म्हणुन म्हटलं तोडायच्या भानगडीत पडु नको , खाली पडलेला प्राजक्त वेचत जा तर एक दिवस फुलांवर पाय पडुन मुरगळला ना बाईचा पायइतकी नाजुकएकदा पहाटे कुस बदलली तर खरचटलं डाव्या खांद्याला .” 

 मी डोळे विस्फारुन बघतचं राहिलो. मग बाबांनी ‘गंमत केली रे” अशा अर्थी डोळे मिचकावले अाणि खोखो हसले. मग अाम्ही उत्तर लिहु लागलो.

“तुझं पत्र मिळालंवाचुन अानंद झालाअौषधांबद्दल काहीच का लिहलं नाहीसंपले असतील तर मागवुन घेमनीअॉर्डर पाठवतो लौकरच.  माझ्याबद्दलची तुझी नेहमीची जागरणाची तक्रार मिटल्यात जमा अाहेगेल्यावेळी तू बोहारणीला साड्या देऊन भांडे घेण़्यासाठी ज्या दोन साड्या दिल्या होत्या त्याचे उशांचे खोळ शिवुन घेतले मीम्हणुन अाता लवकर झोपी जातोनाही वाटले बोहारणीला द्यावेसेभांड्यांची व्यवस्था केली मी माझ्या हिशोबाने…..”मी बाबांना मध्येच थांबवलं अाणि विचारलं “ त्यांना दिसत नाही ?ती मुलगी अात्ता अालीमग पुर्वी का पत्र लिहायचे तुम्हीकोण वाचुन दाखवायचं ? “

“मीच” बाबा म्हणाले. मी न कळाल्याची मुद्रा केली. बाबा सविस्तर सांगतो अशा पद्धतीने बसले अाणि म्हणाले “अरे नीट दिसत नाही माझ्या बायकोलाचिडवायचो तिला ‘चंद्रासारखे डोळे’मग एकदिवस एका डोळ्यात खरोखर पोर्णिमेचा शुभ्र चंद्र उतरलाकाहीतरी पडद्याचा अाजारअॉपरेशन खर्च फार. एकदा घेऊन गेलो होतो. अौषधांची जंत्री पाहुन म्हातारी गावी पळुन गेली. तिला म्हटलं तिकडे तरी जा सरकारी दवाखान्यात. पण म्हातारी काय जात नाही घाबरते कि काय. अाणि इकडं ये म्हटलं सोबत तर तेही नाही. अाणि मला ही तिकडे थांबु देत नाही. इकडे म्हटलं तर इकडे हि येत नाही. इथे जमिनीचा कोर्टकटला चालु अाहे. महिनाभरात मिटेल असं वकिल लोकं दोन वर्षापासुन सांगताय. बापाने मरतांना सांगितलं होतं तेवढी मोकळी कर जमीन. त्याच्या शेवटच्या इच्छेत मला बांधुन गेला. त्यात माझ्या म्हातारीचा हट्ट त्यांचा शब्द खाली पडु नका देऊ..अाता हळुहळु दोन चंद्र झालेअाता अजुन भुरकट भुरकट दिसतं तिलामहिनाभर थांबेल अाणि जाईल निघुन कायमचाअाता नाही थांबवतती तर अाता म्हणते ‘गरज काय अापरेशनची?’ . अंधार अोळखीचा झालायअंदाज जवळचा झालायअौषधाला पैसाच इतका लागतो तर अॉपरेशनला किती लागेलमी पण नीच मला माहितीय ती नाहीच म्हणेल म्हणुन तिला दरवेळेस अाग्रह करतोती पण समंजस माझा पोकळ अाग्रह कळतो तिला म्हणुन दरडावुन,अादळ अापट करुन नाही म्हणतेमोठी बनेल अाहे म्हातारीतिच्याच्याने घर काही सुटत नाही.पैसा वाचवुन मग सहाएक महिन्यातुन एकदा जातो घरी तिला भेटायलापत्र लिहुन पाठवायचोती जपुन ठेवायचीमग अाम्ही अामच्या घरामागे हे ss अस्सा !  अाभाळा इतका जुनाट पिंपळ अाहेत्याच्या खोडात एक सिंहासनासारखा खोपा तयार झालायझाडाची ढोलीमी तिकडे गेलो कि तिथे बसवतो महाराणी साहेबांनाअाणि मी पाठवलेले अाणि तिने जपुन ठेवलेले पत्र वाचुन दाखवतोमला ही सोपं पडतं अाताशा अाठवायला जड जातं अाणि वर्षभरातलं काय काय लक्षात ठेवणार ना. अाणि तिला पण पत्र येताय म्हणजे मी इकडे सुखरुप असल्याची मुक पावती . हे तिचं पत्र अालं म्हणुन म्हटलं उत्तर द्यावं. 

बाबा अजुन बोलतंच होते “अाम्हाल सवय अाहे ह्या अशा चिठ्ठ्यांची.  अामच्या काळी पत्र किंवा चिट्ठ्या असायच्याप्रेमात होतो तेव्हा पण लिहुन घ्यायचो छोटंसं चिटूरं. “जय दशभुजा माता कि जय” , “ त्रिशूलशंखधारिणी दशभुजा माता प्रसन् , अाणि देवीचं चित्र काढायचो. 

मी हे असं  चिठ्ठीत? लवलेटर मध्ये?

बाबा हसले “दशभुजा माता म्हणजे अाज देवी मंदिरा मागे भेटत्रिशूलशंखधारिणी दशभुजा म्हणजे देवीच्या दहा हात असतात ना ? इकडे पाच तिकडे पाचमग शंख ‘ह्या’ हातात होतं ‘ह्या’. अाणि त्रिशूल हा ‘असा’ हात म्हणजे किती ? कितीअहो घड्याळातले ‘चार’!  . म्हणजे ‘देवी मंदीरामागे चार वाजता भेट अाणि देवीचं चित्रम्हणजे कोणाला शंका पण नाही यायची “

मी म्हणालो “अच्छा ! अशी सुरवात झाली होती तर तुमच्या ह्या प्रेमकथेला !” बाबा म्हणाले “नाही नाही , ती चिठ्ठीवाली वेगळी होतीमाझी अवस्था तीच जी अाता तुमची अाहेमुद्दा असा अाहे अाहे कि ,चिठ्ठीची गंमत काही संपत नाही कधीचते प्रेम जे अपुर्ण राहिलंतुम्हाला काय वाटतं तुम्हीच प्रेमवीर अाहात?  पण तेव्हा सुद्धा कसं होतंती चिट्ठी ज्याच्याकडे द्यायचो त्याच्यानुसार अामच्या मनातला प्रवास सुरु व्हायचा . अाता इथे गेली असेल चिट्टीअाता तिथे गेली असेल चिट्ठी ,  अाता चौकात पर्यंत , अाता नाक्यापयंत , अाता घराजवळ , अाता तिच्या हातात अाली असेलअाता तीने भरभर वाचुन कुणी पाहुन नये म्हणुन पटकन काळजाशी ठेवली असेल . मग असं सगळं उलटं गणित मांडुन अाम्ही मंदिरापाशी ताटकळत बसायचोपण ती काही यायचीच नाहीनंतर दुस-या दिवशी कळायचं चिठ्ठी मिळालीच नाही . पण अाली नाही अाम्ही वाट पहात बसलो म्हणुन शक्य तितके पॉझिटीव रहायचोमिळाली असेल पण बाप अाडवा अाला असेलमिळाली असेल पण अाईने स्वैपाकाला लावलं असेलम्हणजे थोडक्यात काय तर ‘ती’ का अाली नाही ह्याच्या शक्यातांची जेव्हा अाम्ही यादी करायचो तेव्हा सगळ्या शक्यतांमध्ये अाधी तिला वाचवायचोतीची बापुडीची काही चुक नाहीहे अमुक अमुक तमुक तमुक झालं असेलहाच काय तो अामचा कयासदोष तीचा नाही अाजुबाजुचा असायचाती अाली नाही , तुमच्या भाषेत’ टप्पा दिला’ म्हणुन तिचा ‘राग-राग’ नाही केला कधी . मग चोरुन चोरुन बघायचोअाणि हौस भागवुन घ्यायचोत्या काळची चोरुन बघायची मजा अाजच्या मिठीलासुद्धा नाही बघा.

अाणि तुम्ही म्हणजे असं कि “ दोन ब्लु टिक दिसले तरी रिप्लाय का देत नाही “ , “अॉनलाईन दिसते पण माझ़याशी का बोलत नाही” अाजच्या शक्यतांमध्ये तुम्ही लोकं सगळ्यात अाधी दोष देता तो जोडीदाराला. “ मी बाबांचं मोबाईल ॹान पाहुन मनातच हसलो अाणि म्हटलं “बरं मग तिचं काय झालंदशभुजा मातेचं ?”

बाबा म्हणाले “पुढे काय तीच घिसीपिटी कहानीती होती ‘महालक्ष्मी बंपर करोडपती सोडत’ अाणि अाम्ही अापले ‘दिवाळीची सोरट’ कुठून मेळ लागेल होपोरीचं मिशीवाल्या बापासमोर चालायचं नाहीनंतर एकदिवस मी भरपावसात अोथंबलेल्या अंगाने , वेशीवरच्या गढीत लपुन बसुन मग गाव सोडणारं अाख्खं -हाडं पाहिलंतिला पाहुन घरच्यांना वाटत असेल त्यांची पोरगी घरापासुन लांब चाल्ली म्हणुन रडतेयपण मला कळायची ना तिच्या अश्रुंची भाषा. ‘मी चाल्ले , तुझं कसं होणार अाता?’ हे अश्रु होते ते . देवा शप्पथ खोटं नाहीतेच होते ते . मग शिक्षण सोडलं ,घर सोडलंगाव सोडलंतिच्या गावी भटकलोती अाधी दिसायची अधे मधेअाता नंतर तिने पण सोडलं असावंबिचारी काय करणार नव-यासमोर चालत नसेल काही . “

मी चकित , “अजुनही तीची चुक नसावी म्हणताय ? तुम्ही रस्त्यावर अालात . अायुष्य फुकट गेलं तुमचं तिच्यापायी.  तरी तीची चुक नाही ?”

बाबा परत तसाच हसला  “जोडीदाराच्या चुका पदरात घालायचं वचन देतो ना अापणचुक-बरोबर माणसं नसतात हो . हि साली हरामी वेळ चुकीची असतेसमोरुन कुणी घाव घातला तर अापल्या माणसाला पुढे करायचं कि अापण तो घाव अापल्या छातीवर झेलायचा ? हे अापण अापलं ठेवायचं.  तसंच अाहे हे समोरुन निरोप नाही अाला तर अापण अाधी अापल्या माणसाला दोष द्यायचा कि त्याला सांभाळायचं ? “

बाबाने मी लिहलेलं पत्र पेटीत टाकलंमाझ़या डोक्यावरुन हात फिरवुन कडाकड माया मोडली अणि निघुन गेलाथोड्यावेळात एका पोस्टमन ने त्या पेटीतले सगळे पत्र पोचवण़यासाठी बाहेर काढलेमी बघतच होतोअाता माझ्या मनातला प्रवास त्या खाकी पिशवीत बसुन सुरु झाला.बाबाच्या गावाच्या पोस्टअॉफिसचं धुकं माझˇया भोवती जमल्यासारखा भास झालामी पिवळसर निंबाच्या पानांच्या पावसात कितीतरी वेळ नुसता बसुन होतो

 
 

Monday, February 1, 2016

वैजयंती

संध्याकाळी राईजवळच्या सगळ्यात गर्द झाडाखाली खुप दाटी होती. सगळे जण डोकावुन,वाकुन पहात होते. हे तेच झाड होतं…वैजयंतीच.

तीच वैजयंती जी तीच्या मैत्रिणीला,चांगुणाला म्हणायची “मला खात्री अाहे, शांत डोळे मिटुन अच्युताचे नामस्मरण करत,मी जेव्हा ठरवेन तेव्हा माझ्यातला अात्मा ह्या देहाला सोडु शकतो. हे जग मरण मरण ज्याला म्हणतं ते माझ्या मर्जीत अाहे. पण मी वाट पहातेय ‘त्या'ने माझ्याकडे एकदा फक्त बघायची. मग ह्या जन्माचं सार्थक झाल्यासारखंच अाहे.”  

वैजयंती माळरानच्या पलीकडल्या पाणवठ्यावर जातायेता लागणा-या गुलमोहराखाली नेहमी दिसायची. नीटंस नाकीडोळी, इवलीशी हनुवटी, पायात पैंजण, अशी इतर गोपिकांसारखीच दिसणारी ,किंवा त्यांच्यापेक्षा किंचीत डावीच अशी ,  हातावर नावाचं गोंदण असलेली ‘वैजयंती’.

रोज सकाळी सगळ्याजणी घोळक्या घोळक्याने गावातल्या चौकात रासचबुत-याजवळ थांबायच्या अाणि पाणी भरायला निघायच्या. गावातल्या गल्लीबोळांतुन वाट काढत , माळरान तुडवत सगळ्याजणी अाभाळात ढगांचे जत्थे विशिष्ट लयीत सरकावे तशा सवयीने पाण्याला निघतसे. गाव अोलांडल्यानंतर अाणि पाणवठ्याच्या अाधी गर्द अांबेराईतुन वाट जायची. तिथुन जातांना सगळ्यांचा वेग मंदावायचा तर काहींचा वेग भरभरायचा..त्याच कारणही तसंच होतं म्हणा. तरी एक साम्य मात्र सगऴयांच्यात असायचं ते म्हणजे सगळ्यांचे लाजुन लालबुंद झालेले गाल,  भिरभिर नजर अाणि कसल्याशा अनामिक हुरहुरीने धपापणारा ऊर,

गर्द राईच्या एखाद्या झुपक्यातुन अाधी ‘साट्’ अावाज यायचा मग पुढच्याच क्षणी ह्या गर्दीमधल्या एखाद्या हंड्यांला भिडायचा…’ठप्प् !’.जणू मधलं अंतर नव्हतंच त्या दगडाला ,इतका वेग. जिच्या डोक्यावरचे अाभाळ फुटायचे तिच्या अंगभर पाणीच पाणी. मग सुक्या असलेल्या सगळ्या जणी अोल्या पदराने तोंड दाबुन फिदीफिदी हसायच्या अाणि हि जिचा एव्हाना वा-यावर फरफरणारा पदर अाता अोला झाल्याने अंगभर चिकटला होता ,ती अाधी लाजायची पण नंतर लगेचच लटक्या रागाने बडबड सुरु करी,”मेला चेटक्या  ! एकतर दिसतही नाही” मग खालच्या अोल्या मातीतलाच एखादा दगड उचलुन जिथुन तिला लागलेला दगड अाला असावा अशा अंदाजाने दिशाहिनपणे नुसता भिरकावत असे. फार फार तर पंधरा पावलांवर तो दगड जाऊन पडायचा पण फेकणारीचा राग क्षणभर शांतावायचा. हवेने म्हणा किंवा अजुन कशाने, पण कुठलं तरी झाडं मग नुसतं सळसळायचं जणू ह्या पंधरा पावलांवर पडलेल्या दगडावर नुसतं हसायचं. त्यामुळे ती देखील अजुन चडफडायची. मग बाकीच्या सख्या तिला हाताला धरुन अोढुन न्यायच्या. ह्या सगऴया सख्यांना हे माहिती असायचं कि कुणातरी एक अाज भिजणार. म्हणुन घरात जितके हंडे पाणी लागणार त्यापेक्षा प्रत्येक जण एक हंडा सोबतीला जास्त घ्यायच्या. अाणि गाव लागायच्या अाधी वेशीजवळच भिजलेल्या गोपिकेला द्यायच्या. म्हणजे घरी गेल्यावर अोरडा नको. असं सगळं अगदी ठरल्याप्रमाणै ,खेळीमेळीने,समंजस त्रागा चालु असायचा. प्रत्येकी ७-७ वेळी भिजुन गेल्या तरी वैजयंती अजुनही कोरडीच होती. 

सगळ्या मैत्रिणी दिवसभरात कधीही भेटल्या तर ‘त्या’ दिवशी कनुने मला कसं अडवलं , ‘त्या’दिवशी केशाने कसं भिजवलं ह्याच्याच चर्चा रंगायच्या अाणि वैजयंती त्याच्यात मूक सहभागी व्हायची. ह्या गप्पांमध्ये सहभागी होता यावं म्हणुन वैजयंतीने एकदोन वेळा ‘पाण्याला जाण्याच्या वेळेच्या' खुप लौकर  जायचा प्रयत्न ही केला होता. म्हणजे पाण्यावरुन येतांना गावगल्ली सुरु होण्याच्या अाधीच्या वळणावर हाताल्या कड्याने टचकन् हंडा फोडायचा म्हणजे जाता येता सगळे बघुन विचारतील कि काय झालं,कसं झालं वगैरे.आणि वैजयंती लग्नात 'नाव घेताना' नववधु जितकी लाजेल तशी लाजत नाव सांगेल.हे सगळ्यांची तिने कितीतरीदा मनात उजळणी केली होती. पण एेनवेळेस ती डुचकी चांगुणा तिथे अाली होती. मग वैजयंतीचा हा बनाव पण विनापावसाच्या नुसत्या भरल्या अाभाळासारखा सरुन गेला. 

वैजयंती गुरांना चरायला पण नेतसे. मग सख्या राईजवळ अाल्या कि ती त्यांच्यात मिसळुन पुढे पाण्याला जात असे. ब-याचदा ती राईतल्या वेगवेगळ्या झाडापाशी रेंगाळत बसायची. सकाळी कधी कधी थकुन झाडाला टेकुन बसायची तेव्हा पायाजवळ हंडा अाणि खांद्याला काठी टेकवुन उभी ठेवलेली असायची तेव्हा दुरुन सुर्यडुबीच्या पार्श्वभुमीवर झाडाला टेकलेली तिची केवळ एक काळी अाकृती दिसायची. तेव्हा ती अगदी एकतारी घेऊन बसलेल्या जोगिणी सारखी भासायची.

सुर्यडुबीच्या अात घरी परतायची सगळ्या मुलींना घरातुन तंबी होती पण वैजयंती गुरांसोबत असल्याने तिला कधी कधी जर्राशी मुभा असायची.हो पण जराशीच. कधी कधी सावळ्याच्या तंद्रीत ती हरवुन जायची .भानावर अाली कि वेळ टळुन गेलेली असायची. मग घरी उशीर का झाला हि विचारणा झाली कि ‘हरवले होते’ इतकं कारण पुरेसं होतं. घरच्यांना तिच्या अावडत्या वासरा विषयीचा,वासंतीविषयीचा लळा माहिती होता.त्यांना वाटे हि म्हणतेय कि वासरु हरवले होते. अगदी त्याच वेळी गोठ्यातुन वासंती मान हलवुन ,घंटी किण्किणत नाही-नाही म्हणत असे पण वासरांची अन् पाखरांची हि असली भाषा फक्त वैजूलाच माहित होती. वैजू तुळशीजवळुनच डोळे वटारुन ‘श्श्श् !’ करुन वासंतीला दरडावायची.

तसं पाहिलं तर वैजयंतीची भिजण्याची तयारी खुप अाधी पासुन सुरु व्हायची.हो तयारीच. दररोज चुन्याने हंडा माखुन ती अाधी पांढरा लख्ख करतसे. नंतर त्यावर कधी काजळाने , कधी गेरुने , कधी हिरवी पानं वाटुन , कधी कोळशाने , कधी लाल जास्वंद चोळुन वेगवेगळ्या रंगाची नक्षी बनवत असे. अाणि सगळ्या गोपिकांमध्ये अापला हंडा सगऴयात अाकर्षक कसा दिसेल याची तयारी ती रोज संध्याकाळी पाण्यावरुन हिरमुसुन अाली कि करतसे. हंडा नक्षीदार करतांना तिची मनातल्या मनात बडबड चालु असायची ,” अाज त्या कौशीचा हंडा फोडला , परवा गौराचा, मागे मंगलाचा, त्याअाधी एकदा लक्षीचा, त्याअाधी…..सगळे सगळे झाले पण माझा ना कधी हंडा फुटला ,ना कधी माधोने अडवलं. एकदा तर चांगुणाची मटकी लागोपाठ दोनदा फुटली. ती पण अशी कि चांगुणाला समोरुन पत्थर येताना दिसला अाणि तो मागे जाणार ह्याचा अंदाज येताच चांगुणा जराशी तिरपी झाली अाणि स्वत:हुन तो पत्थर स्वत:च्या हंड्यावर झेलुन घेतला. 

एकदा वैजयंतीने ज्वर असल्याचं नाटक करुन घरीच थांबुन घेतलं अाणि त्या दिवशी लपुन शुभ्र पांढ-या हंड्यावर रानफुल चोळुन असा काही किरमिजी रंग तयार केला कि सगऴयांचे डोळे विस्फारले. जिवघेण्या मोरपीसाचे चित्र बनवले होते तिने हंड्यावर. रस्त्याने जाताना चौकाचौकात, नाक्यानाक्यावर लोक तिला थांबवत होते. काहीजण वळुन वळुन पहात होते. एकजण तर वळुन पाहतांना वाटेत बसलेल्या कुंकमभांडारावाल्याच्या टोपलीत तोल जाऊन लाल झाला. तेव्हा चिडलेला कुंकुमभांडारवाला अाणि लालबुंद गृहस्थ सोडुन सगळं वृंदावन हसुन बेभान झालं होतं. नेहमी सारख्या सगळ्याजणी रांगेने राईजवळुन जाऊ लागल्या. पाऊल पाऊल नदीत उतरत गळाभर पाण्याशी उभं राहिल्यावर जसा श्वास भरुन रहातो तशा सगळ्याजणी उर भरुन श्वास घेत होत्या…..ह्या अनामिक चैतन्याने कि कधीही हंडाफुटीची वेळ येईल. सगऴयांनाच अाज असं वाटत होतं कि अाज वैजयंतीच भिजणार. सगळ्यांच्यात इतकी उठून जी दिसत होती. पण सावळ्याने नेम धरला तो कावेरीवर. हिरमुसुन हंडा तसाच  टाकुन वैजयंतीने घराकडे उरफुटी धाव घेतली. अाणि घरी बसुन  रडत राहिली. दोन दिवस. शेवटी सख्यांनी खुप मनवल्यावर ती तिस-यादिवशी उठली. अाणि अायुष्यात पहिल्यादाच वैजयंतीच्या कटीवर अाणि डोक्यावर बिननक्षीचा हंडा होता. सगऴयांच्या डोळ्यांना तिच्याकडे पाहिलं कि चुकचुकल्या सारखं वाटावं इतकी सवय झाली होती तिच्या नक्षीदार हंड्याची. सगळ्या सख्यांनी पाणी भरलं अाणि त्या परतीला निघाल्या तितक्यात “ साट्” अावाज अाला अाणि पुढच्या क्षणी वैजयंती नखशिखांत भिजलेली होती. वैजयंतीच्या मुखातुन “कान्हा !” अस्फुट स्वर उमटले.

कान्हाचं लक्ष वेधण्यासाठी रोज नक्षीदार हंडे बनवणा-या वैजयंतीला अखेर साध्या हंड्याने भिजवलं. जणू देवकीनंदन सांगु पहात होता कि देखावा म्हणुन केलेल्या भक्तीपेक्षा त्याला साधंसरळ मिटल्या डोळ्यांचं मनस्वी नामस्मरण मला अधीक प्रिय अाहे.

नंतर काही दिवस इतर सख्यासारखीच नित्यनियमाने वैजयंती भिजत राहिली.

एकदा संध्याकाळी राईजवळच्या सगळ्यात गर्द झाडाखाली खुप दाटी होती. सगळे जण डोकावुन,वाकुन पहात होते. हे तेच झाड होतं…वैजयंतीच. गर्दीत विचारणा होत होती कि नेमकं काय झालं वैजयंतीला ? तेव्हा चांगुणा म्हणाली “ काहीच नाही ! मी तिलाच शोधायला घरी अाणि मग पाण्याजवळ गेले तर हि इथे बसली होती” कुणीतरी म्हणालं , “ अगं हो पण तू तिला का शोधत होतीस? काय सांगितलं तू तिला? ” 

चांगुणा म्हणाली ,” मी तर तिला हेच सांगितलं कि मला अात्ताच महालातल्या दासी कडुन कळालं कि श्रीकृष्ण नुकतेच स्नानादिक अाटोपुन अाले होते अाणि तयार होतांना समोरच्या तबकात मोरपिस,मोत्यांची माळ, तुळशीची माळ असा त्याचा नेहमीचा साज होता. त्यांचा सेवक एकएक करुन त्यांना साज देत होता तेव्हा ते तुळशीमाळे कडे बोट दाखवुन म्हणाले कि ‘ ती वैजयंतीमाळ’ द्या घालायला.

सगळे म्हणाले “ मग?

चांगुणा म्हणाली,” मग ? मग काहीच नाही . वैजू ने ते एेकुन डोळे झाकले ते शेवटचेच……"


- प्राजक्त २ फेब २०१६ 
१:५७ am


Friday, January 22, 2016

सणवार

पुर्वी कसं होतं जानेवारीच्या दुस-या तिस-या दिवशी कॅलेंडर घरी यायचं . मग नंतरचा अर्धापाऊण तास लाल तारखा शोधण्यात जायचा. त्यात रविवारला जोडुन आलेल्या लाल तारखा किती ह्याची मोजदाद वेगळी .लाल तारखांसोबत सणावारांची मनातल्या मनात उजळणी व्हायची. जानेवारीत प्रजासत्ताकाच्या वक्तृत्व स्पर्धेत यंदा कोणत्या महापुरुषावर बोलायचं ? मग कोणालाच माहीत नाही असे महापुरुषांचा शोध सुरु व्हायचा. फेब्रुवारी मध्ये हसु यायचं कि लोक परत कार्य विसरुन ह्या प्रश्नात पडतील कि महाराजांचा जन्म तारखेनुसार कि तिथीनुसार ? मार्चमध्ये होळीला कोणाच्या नावे बोंबामारायच्या? रंगपंचमीला कोणता रंग शोंधायचा जो दहा दा अंग घासुन जाणार नाही आणि गेला तरी कानात दडुन राहील. एप्रिलचं पान आलं कि पाडव्यात पलिकडे गोदाक्काचा अंगणातला अांबा मनात तरळून जायचा.... आंबेतोरणासाठी. मग अाज जसे मेच्या पहिल्याच दिवशी टिव्हीवर मराठी भाषामागे का ह्याविषयी ‘टॉक शो’ लागतात तसे त्यावेळी शाळेत याच विषयी वादविवाद स्पर्धा व्हायच्या. स्वातंत्र्य अाणि प्रजासत्ताक दिनी वक्तृत्व स्पर्धा अाणि महाराष्ट्र दिनी ‘वादविवाद’ स्पर्धा ही परंपरा सगळ्याच शाळांनी जोपासली होती. ७ जुन हि तारीख कधीच लाल नसायची पण नेहमी लाल दिसायची ती भूगोलातल्या धड्यातमधल्या एका अोळीमुळे ‘भारतात मान्सुनची सुरवात ७ जुन तारखेला होते’. कॅलेंडरवरजुलैचं पान अालं कि शाळेतले मित्र जुम्म्या, ममद्या कडे रमजानाची ईदी ठरलेली. अाणि अाषाढवारीला वाटेत अामचं घर येतं म्हणुन अाजोबांचा एकदिवस मुक्काम पडायचा.अाजोबा झोपतांना अांथरुणाची वळकटी पसरवुन झोपायचे तेव्हा डोक्याजवळ विठ्ठलाची काळीभोर मुर्ती ठेवायची. लहानचे मोठे झालो , नंतर पंढरपुरी कितेक चक्रा झाल्या पण पांडुरंग नावाचा उल्लेख जरी झाला तरी अजुनही डोळ्यासमोर अाकृती येते ती ‘तीच'
अॉगस्ट अाला कि नेहमी कला मास्तरांनी एकदा सांगितलेल्या रोमन कथेतला अॉगस्टस राजाचा पुसट उल्लेख अाठवतो. रक्षाबंधनच्या लालखुणेत राखीच्या सोनेरी कागदाखालचा लाल स्पंज दिसायचा.सप्टेंबरात , पोळ्याला यंदा तरी अाईला मातीचे मोठ्ठाले बैल घ्यायला मनवु असा चंग बांधायचो. गणपतीचे दहा दिवस त्यात जेष्ठा-कनिष्ठासोबत संपुर्ण घराण्याचा गोतावळा यायचा ती जणू दुसरी दिवाळीच.
अॉक्टोबर-नोव्हेंबर महीन्याचं पान आलं कि दिवाळीत यंदा कोणता किल्ला ? नेहमीपैकी एखादा कि नवीन आपल्याच सुपीक डोक्यातुन घडवावा एखादा किल्ला ? डिसेंबरात पलिकडच्या दत्त देवळातली पहाटेची लगबग दिसायची अाणि नाताळाच्या लाल टोप्या दिसायच्या त्या लाल खुणेत. अाणि ह्या सगळ्याची यादी अाम्ही वहिच्या शेवटच्या पुठ्ठ्यावर शेवटच्या बाकावर बसुन करायचो. 
पुर्वी सणांसाठी सुट्ट्या यायच्या . अाताशा सुट्टी येते फक्त. 

- प्राजक्त


अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...