Saturday, October 29, 2016

जन्म ते जन्म व्हाया मृत्यु (मटा मोहर)

असं कसं? एकुणातच एकमेकांना एकमेकांचा संबंध नसतो असं कसं म्हणतात तुम्ही
हे असे एक ना अनेक विचार डोक्यात उठत असतांना त्याचे पाय धुळमाखल्या वाटेवरुन झपाझपा चालले होते. बुडाला कळ लागल्याने सायकल उजव्या बाजुला धरुन तो अाता पायीपायीच चालत होता. पायातली चप्पल फट्टफट्ट अावाज करत प्रत्येक पावलाला मुठभर वादळ उठवुन लगेच शमवत होती. शामा नदीच्या शेजारीच एक लहानसं टेकाड होतं. तिथे पायथ्याशी पोचताच त्याने पिचलेलं राखाडी भुरकटं घमेल खाली टाकलं. घमेल्यापुरतं वादळ उठुन परत निमालं. कमरेच्या उपरण्यात अडकवलेलं पोतं उपसुन बाजुला टाकलंडाव्या खांद्याला अडकवलेलं फावडं एका झटक्यात हवेत उडवलं अाणि हवेतल्या हवेतच परत झेललं. एखाद्या सिनेमात हा प्रसंग स्लो मोशन मध्ये घेऊन तीन वेगवेगळ्या एॅंगलने दाखवला असता. पण जगणं स्टंट असलेल्या लोकांना बघ्यांच्या एॅंगलची पर्वा नसते. भसाभस उकरुन झाल्यावर त्याने माती भरलेलं पोतडं सायकलच्या मागे लादलं. अाणि परत टांग टाकुन निघाला. सायकलवर बसल्या बसल्या एव्हाना फिकट झालेली दोन टांगातली बुडाची कळ परत फुरफुरायला लागली. कोसभर जवळच असलेल्या त्याच्या कुंभारवाड्याच्या झोपड्यात परतला. तिथंच केलेल्या चिखलखळग्यात बदाबदा सगळी पोतडी उरफाटी केली अाणि अंगातला पायजमा काढुन शेजारी चिंचेच्या खोडाच्या खोबणीत सवयी प्रमाणे खुपसुन त्याने चिखल तुडवायला सुरुवात केली. घराजवळंच तशी एक जागा होती पण तिथुन सहसा तो कमी पडली तरच माती अाणायचा. नाहीतर शामा नदीजवळच्या मातीचा पोत जास्त चिक्कण असतो अशी त्याची धारणा होती. अाणि ते खरं हि होतं. तिथल्या मातीचे रंग जातीवंत लालतांबडट रंग घेऊन अाकार घ्यायचे. त्यामुळै गेरुचा खर्चही वाचायचा. नंतर त्याच्या बायकोने अाणि त्याने मिळुन भराभर पणत्या तयार केल्या. मूद मूद चिकणगोळा घेऊन अोल्या घमेल्यात हात बुचकळुन तळहाताचा अाकाराच्या पणत्यांची रासच लावली. चिप्पी खेळतांना पायात बाभुळ रुतल्यानंतर कालपासुन दुडक्या चालीने चालणा-या त्याच्या पोरीने सवयीने पुठ्याच्या ट्रे मध्ये पणत्या घेऊन घरामागाच्या परसात उन्हात ठेवल्या. तिथली उन्हं वाडाच्या झाडातुन चाळुन येत असल्याने अाज तुकड्या तुकड्यात होती
सवयीनुसार माळविठोबा देवळामागुन उगवलेला सुर्य शामा नदीत छिस्स् विझला. तो उठला तेव्हा गुढघ्यातुन कडाडकट् झालं. उरकल्याचे हात त्याने जेव्हा विसळले तेव्हा त्याला घमेल्यात छोटा मूद दिसला. मग उगा अाता दिसलच अाहे तरी दुर्लक्ष कसा करायचा म्हणुन त्याने त्या घासभर मूदेची एक छोटी पणती करुन टाकली. अाणि हुश्श करत हात विसळले.
दुस-या पहाटे माळविठोबा मागुन जेव्हा सुर्य अाला तेव्हा भट्टीतुन खरपुस भाजलेल्या पणत्या सायकलीच्या मागे उभट टोपल्यात भरुन त्याची बाजाराला निघायची वेळ झाली होती. तालुक्यात दिवाळसणाला बाजारपाटी लावयची म्हणजे सक्काळी सक्काळी तुम्ही अाधी बाजाराला सगऴयात अाधी हजर पाहिजे हे त्याला माहीत होते. नदीला अाल्यावर गुढघाभर पाण्यात उभं राहुन त्याने अाधी टोपलं नावाड्याकडे सरकवलं अाणि नंतर खांद्यावर सायकल घेऊन तो होडीत बसला. होडी जरा हिंदकळलीच. काल जवळच्या गावात लग्न झालेल नवं जोडपं अाणि सोबतची बुजूर्ग मंडळी होडीत बसलेली होती. नवपरिणेतेचं अवघडलेपण पदर हनुवटीपर्यंत अोढलेलं असुनही लपत नव्हतं. नवरदेवाच्या कपाळाला कालची चमकी अजुनही दिसत होती. कोणाचं लक्ष नाही पाहुन नवरदेवाने दोन बोटाने नदीतुन शिंतोडे बुज-या पदरावर शिंपले. ती तशातही हसली वगैरे असावी. पणत्यांच्या टोपल उगाच सरळ करुन त्याने वरचं फडकं सरळ केलं. टोपल्याच्या खाचेतुन कालची लहानगी पणती डोकावत होती. वल्हवतांना काही शिंपण त्या टोपलातुन डोकावणा-या त्या छोट्या पणतीवरही झाली. होडी काठाला लागली तसा तो टोपलं घेऊन टप्पकन खाली उतरला. इतर लोकं लगबगीने उतरण्याचा सोहळा पार पाडे पर्यंत तो सायकलीला टोपलं डकवुन निघालासुद्धा. बाजार नाही नाही म्हणता हा हा भरुन गेला अाणि संध्याकाळी रांगोळी नकळत पुसत जावी तसा विझायला पण लागला. पणती घ्यायला अालेल्या एका बाई सोबत एक दोन वेण्यांच्या बाहुलीची नजर छोट्या पणती कडे गेली पण नुकतेच काही वेळापुर्वी खालेल्या फटक्याचे हुंदके अाटोक्यात अालेल्यानंतर परत नव्याने अाईला मागणी कशी घालावी ह्या पेचात ती होती. त्याने ते हेरलं अाणि ती लहानगी पणती त्या बाहुलीला तशीच देऊन टाकली
बाहुली खुशीत होती. वा-याला जमीन समजुन उड्या माराव्या तशी उडत उडत चालायला लागली. घरी पोचताच तिने ती पणती पेटवली. तिच्यासाठी अाजच पाडवा होता. तिथेच शेणसारवलेल्या भिंतीवर तिने सावल्याचे ससे,मोर,बदकं बनवत त्या पणतीला जिवाभावाची मैत्रीण करुन घेतली. त्या रात्रीची त्या बाहुलीची झोप चाळावली ती सकाळी झालेल्या रडारडीनेच. ती धावत धावत माजघरात गेली. जातांना तिने तुळशीचा कोनाडा पाहिला तो रिकामा होता. तिची पणती नव्हती तिथे. समोर पाहते तर बाहुलीच्या अाजोबांच्या डोक्याशी ती पणती लावलेली होती अाणि अजुबाजुला लोकांच्या भावनेला बांध नव्हता. बाहुली तशीच कोनाड्यात जाऊन बसली . भरभर लोक येत गेले अाणि गेले सुद्धा. त्यातले काही अाजोबांना पांढ-या फडक्यात खांद्यावर घेऊन गेले अाणि दुपार कलायला लागली तेव्हा परतले. काही काळ लोटला. डोक्याजवळ पहा-याची पणती घरात पुन्हा पेटवत नाही म्हणे. घरातला केर काढतांना तीच पणती घरातल्या केरासोबत चौकाजवळ कोनाड्यात फेकली. 
चौकात बसलेल्या पोरांना काय सकाळ अाणि काय दुपार. हुक्की अाली म्हणुन. तिथुन उठले अाणि बॉल बॅट घेऊन शेजारी मोकळ्या जागेत खेळायला सुरवात केली. स्टंप म्हणुन भिंतीवर अाखायला काहीतरी शोधणा-या पोराच्या टाचे खाली ठिसुळसा ठप्प अावाज झाला. पाय उचलुन पाहिलं तर उपड्या पडलेल्या पणतीचे चार तिकडे होते. एक तुकडा भिंतीवर स्टंप अाखायला घेतला. एक तुकडा खिशात अोलीसुकी करायला घेतला. खेळ रंगत गेला. भिंतीवरचे अाखलेले स्टंप गडद करण्यात एक पणती तुकड्याचा जन्म खर्ची गेला. दुसरा पणती तुकडा अोलीसुकी झाल्यानंतर तसाच पडुन राहिला अाणि मातीमध्ये माती होत राहिला. खेळ रंगात अाला असतांनाच पोरांना तिथुन कुणीतरी हटकलं. खेळ थांबला. एक म्हातारी टोपलं घेउन त्यांच्या खेळाच्या मधोमध अाली . खेळ थांबवत म्हणाली “जराकं कमी पडतेय माती घेऊन जाते इठलीच” . तिथलीच माती मुठ मुठ करुन टोपलीत भरुन ती निघुन गेली. नव्या जागेत,नव्या गावात,नव्या मातीत,नवा श्वास जन्माला अाला होता.

असं कसं? एकुणातच एकमेकांना एकमेकांचा संबंध नसतो असं कसं म्हणतात तुम्ही


- प्राजक्त २९ अॉक्टोबर २०१६



Wednesday, September 28, 2016

लेख: घरघर (मटा: मोहर)

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधे टळटळीत दुपारी भटके होत अाम्ही कितीतरी फिरलो असु. तेव्हा पाठीतभम्मदिशीधपाटा घालीत अाई म्हणायचीकशाला रे जिवाला इतकी घरघर?’ तेव्हा पहिल्यांदाच एेकलेला हा शब्द.घरघर.
नंतर कानशिलामागचा घाम सुकण्यासाठी पंख्याचा रेगुलेटर पुर्ण शेवटची खटकी वाजेपर्यंत फिरवायचा. शेवटची खटकी वाजली म्हणजे फुल्ल स्पिड, रेगुलेटरवरचा पाचचा अाकडा एव्हाना पुसुन गेला होता मग खटकी म्हणजे पाच हे ठरलेलं. गरम्म वाफाळलेल्या डोळे अाणखी वाटारुन तो गारवा झेलत कधीतरी झोप लागायची पण ती थोडाच वेळ. वर सताड डोळ्यांनी भमभमणारा पंखा बघत रहायचा. तेव्हा कळायचं नाही पणजिवाला घरघरअाणि हि पंख्याची घरघर उगाच साम्य वाटायचं
एकदा एक नवाबी मांजर घरात येऊ लागलं. नवाबी इतक्यासाठी कि कोण अदब होती त्यात कि विचारु नका. दाराची कडी पुढच्या पायाने पकडुन मागच्या पायाने कडी वाजवायचं ते मांजर. दार उघडुन कोण अालंय हे पाहेपर्यंत मांजर अात टिव्हीवर उब घेत बसलेलं असायचं. नंतर सवय झाली त्या मांजराला अामची , अाम्हाला त्यांची. एकदा मी ज्या उशीवर डोकं ठेवलं त्याच उशावर ते पण पहुडलं होतं. तेव्हा अजुन एक घरघर एेकु अाली. उत्सुकता म्हणुन मांजराच्या पोटाला कान लावला तर पाणी उपसण्याचा पंप घरघरावा तशी मोटरीची घरघर एेकु येत होती. मग मला कोणाच्या घरी पाळीव मांजर असलं कि ती घरघर अनुभवायचा छंदच लागला. गंमत अाहे ,इतरांची घरघर अनुभवायचा छंद?!
जत्रेतमौत का कुअांमध्ये गरगरणा-या फटफटीची घरघर, पेट्रोल भरतांना मोटारसायकलच्या टाकीवर जाणवणारी घरघर, हातावर बहात्तर फुलपाखरं हुळहुळावी तसा एकदा भवरा घेतला होता तळहातावर नंतर तो कुणीच रहात नसलेल्या एका पत्राच्या घरावर सोडायचो अाम्ही. तिथेच थोडा फिरुन परत घरंगळत खाली यायचा. तो पत्र्यावर सोडायची शर्यतच लागायची. एकदा पोरं वर खेळत असतांना मी खाली हरवलेला बॉल शोधायला त्या अंधा-या खोलीत गेलो. वर भवरे सोडणं चालु होतं. तेव्हा ही अोलसर अंधारासोबत एेकलेली घरघर अजुनही त्या घरात घुमत असेल का असं कधीकधी अाठवत राहतं.
त्याकाळी दरडावुन झोपवतांना नंतर डोळा चुकवुन गळ्यावर उमटलेल्या घडीत दडलेल्या घामाची रेष पालथ्या हातानी पुशीत मागल्या गॅलरीतुन रेल्वेलाईनला अाम्ही पळालेलो असायचो. थोडं चालत गेलं कि जवळंच एका निर्जन रेल्वेरुळ लागायचे. मग रुळावरुन तोल सावरत कितीतरी लांब चालत चालत जायचं. एकदा कुणीतरी सांगितलं कि रुळावर पैशाचं नाणं ठेवलं अाणि त्यावरुन रेल्वे गेली तर म्हणे त्याचं चुंबक होतं. किराण्यातुन काहीबाही अाणयला दिलेल्या पैशातुन उरलेली चिल्लर अापलीच ह्या निस र्गनियमानुसार माझ्याकडे कधीकधी पैसे असायचे. हे कळाल्या नंतर मग मोठ्या कष्टाने मोह अावरुन तो पैसा दडवुन ठेवला अाणि रुळावर ठेवला. रेल्वे येतेय का ह्यांचा अंदाज घ्यायला थोड्या थोड्या वेळाने दोघं जण दोन विरुद्ध दिशेला तोंड करुन रुळावर कान देऊन एेकायचो. उगाच इकडे तोंड असतांना तिकडुन रेल्वे अाले तर काय घ्या? ह्या भितीमुळे. एकदा समुद्रावर गेलो होतो तेव्हा किना-यावर अालेल्या शंखाला कान लावल्यावर अातुन समुद्राच्या लाटा एेकु येतात म्हणे अाणि तुमचं भाग्य असेल ब्रम्हांडाचा सुत्राचा पण अावाज येतो म्हणे अातुन. एवढं कधीच काही एेकु अालं नाही पण एक कधीही विसरला जाणारा एक थंडाव्याचा चटका अायुष्यभर स्मरणात राहिला. त्या दिवशी रुळावर कान लावला तेव्हा गालाला परत त्या समुद्रकिनारी शंख लावल्याची अाठवण लाटेसारखी उचंबळुन अाली. तेव्हा ही रेल्वे यायच्या कोसभर अाधी कानाला घरघर एेकु अाली होती.
मग वादळ यावं किंवा एखादी अावडती व्यक्ती निर्वाणीचं बोलुन तुम्हाला बोलायची संधी देता अायुष्यातुन कायमची निघुन जावी तशी रेल्वे समोरुन भरधावत निघुन गेली. तो रोंरावत जाण्याचा अावाज अाणि ती कंपनं थेट अातवर जाणवली होती. ती अजुन एक घरघर.
त्या नाण्याचं चुंबक नाही झालं ह्यापेक्षा एक नाणं गमावल्याचं कोण दु: होतं काय सांगु. चपटा लंबगोलाकार धातू सारखं काहीतरी झालं. अाता ना त्याचं चुंबक झालं होतं अाणि ना चलन राहिलं होतं. कितीतरी दिवस कंपासपेटीत ठेवलं. त्या दिवशी अाम्हाला एकाने रेल्वेरुळाच्या ठिकाणावरुन हटकलं अाणि काहीदिवसासाठी अामचा तो अड्डा बंद झाला. पण जेव्हा जेव्हा शाळेत कंपासात ते नाणं दिसे तेव्हा तेव्हा गालावर थंडगार रुळाचा चटका अाणि अात कुठेतरी घरघर एेकु यायची.
गावी अाजी गेली तेव्हा बायका अापसात सांगतांना मी एेकलं होतं. शेवटी शेवटी घरघर खुप वाढली होती. ताकं घुसळण्याच्या भांड्यात रिकामी रवी फिरवत राहिल्यावर जसा अावाज येतो तशी मोठ्ठाली घरघर यायची म्हणे
लहानपणी वडलां सोबत अॉफीसला जायचो अाणि त्यांच्या मागे तयाच खुर्चीवरत मोटारसायकलवर टांगटाकुन बसतात तसा बसायचो. झोप लागली कि पाठीला टेकुन झोपुन जायचो. पाठीला कान लावल्यावर जेव्हा ते बोलत असायचे एक वेगळाच घुमारायुक्त अावाज यायचा. अाणखी एक घरघर.हे कळाल्यानंतर मी त्यांच्यासोबत पुढं टाकीवर बसणं बंद करुन मागे बसायला लागलो अाणि कमरेला पकडुन बसायचो तेव्हा पाठीला कान लावायचो. पुढं टाकीवर होतो तेव्हा कधी अनुभवलेली गोष्ट नंतर मागे अनुभवली. ते गाडीवर गुणगुणायचे

नंतर कॉलेजात महत्वाच्या तासाला शेवटच्या बाकावर करकटकने खोदुन खोदुन कंपास मधल्या त्या नाण्याला भोक पाडलं अाणि गळ्यात लॉकेट सारखं घालुन घेतलं. बरेच जणकाय घातलंय?’ म्हणुन जवळ येऊन पहायचे अाणि कायमचे मित्र व्हायचेहॉस्टेलच्या रुमवर घरघरत्या पंख्याकडे बघत अाणि  गळ्यातलं लॉकेट तोंडात चघळत सहज विचार अाला . म्हणजे रेल्वे,नाणं अाणि चुंबकवाली गोष्ट खरी होती तरं

-  प्राजक्त २९।०९।२०१६

Monday, August 29, 2016

का असं ? लेख

देवळा मागच्या निर्माल्यात तुझ्या हिरव्या बांगडीचा तुकडा सापडला. मग त्याच तुकड्याने दिवसभर काळजावर चरे अोढत बसलो. पण काही उमटलंच नाही. का असं….?
तू पहाटपाराला उठायची तेव्हा प्रसन्न दिसायची. अगदी अात्तासारखी सारखीच. तेव्हा वाटायचं सकाळी सकाळी तुझ्यामुळे तुळस प्रसन्न दिसते कि तुळशीमुळे तू ? तुला पाहुन असे अनेक प्रश्न मला पडतात. पडतात पण कसे माहीत अाहे ? तू तुळशीला पाणी घालुन गेल्यानंतर शेवटचा थेंब मंजिरीवरुन अोघळुन खाली पडतो तसा. का असं….?
दुपारी झाप्यातुन उजेडाचा तुकडा यायचा सरकत सरकत पडवीमध्ये. नंतर माजघरातल्या खापरनिपर पंजोबांच्या फोटोंच्या रांगेवरुन चमकायचा. परत फोटोवरुन प्रतिध्वनीत झालेले काही  तिरकस उजेड भिंतीवर नवा रंग उमटवायचे. तेव्हा वाटायचं अंधाराला उजेडाने गोंदलंय जणू. गोंदण्यावरुन अाठवलं तुझ़्या हनुवटीवर तीन ठिपके गोंदलेय ना …कि दोन….? तू झोपल्यावर काल तर मोजले होते मी . परत विसरलो बघ. का असं….?
तू एकदा अंबाड्याला मोग-याची रासच लावली होती तेव्हा तुझा अंबाडा मला पोर्णिमेचा चंद्र वाटला होता. मग तू अचानक अंधारात नाहीशी झाली . कि मीच अंधारात हरवलो कुणास ठाऊक. तेव्हाही अंधार यायचा अाणि घप्पकन घोंगडं टाकायचा अंगावर असं व्हायचं अाणि कळायचंच नाही कि कधी संध्याकाळ संपली अाणि रात्र सुरु झाली. निबिड अंधाराला झिंग चढल्यावर कसं होईल ,तसं होतं तुझ्या डोळ्यात पाहिल्यावर. का असं….? 
रात्री उशाला तू नेमाने पाण्याचा गडू ठेवते. रात्री लागलीच तहान तर पिते त्यातुनच. सकाळी असेलच उरलं पाणी तर तेच पाणी अंगणाला शिंपायाला घेते. नंतर तू न्हाऊन अालेला तुझा सकाळगंध जवळुन घेता यावा म्हणुन मी माझी रात्रीची तहान नेहमी टाळत अालोय. सकाळ होते अाणि तुझ्या चुलीत निखारे भगभगतात तशी झोप भगभगत रहाते दुस-या सकाळीची वाट पहात तुझ्या सकाळगंधासाठी. अाभाळाचा इवलासा गडू घेऊन तू सकाळी तुळसपरसात सडा शिंपत रहाते जसं काय पाणी नाही चैतन्य अाहे त्यात. मग फुलपरडी घेऊन परत देवळात. मांजरीमुळे दुध नासल्याची तुझी कारणं किती खोटी होती हे मी पाहिलं नंतर कितीदा. साय बाजुला करायला जावं तर तुझा गुलाबी रंग उतरायचा दुधात अाणि म्हणुन नासायचं दुध हे तू कोणालाच कळु दिलं नाही कधी.का असं….?

‘तुझ्या हातातली हिरवी बांगडी ,जी कमी झाली होती ती भरली का परत ? इतक्या टच्च मागे अोढू नको हज्जारदा सांगितलं होतं. अाता वळ अालं असेल ना लाल..गोल..? गोल लाल वरुन अाठवलं….. अाता  मोकळं मोकळं वाटतं असेल माझ्याशिवाय… तुझं कपाळ ? तरी झाप्यातुन उजेडाचा तुकडा माझ्या फोटोवर अाला कि  मी अंग चोरुन माळ्यावर निघुन जातो. तरी तो तुकडा रोज मलाच शोधत येतो असं वाटत असतं सतत मला . सांग ना….. का असं ?

- प्राजक्त २९ /०८/२०१६


Monday, July 4, 2016

‘तुम मेरे हो कौन कनु?’ : कनुप्रिया ( मटा १०/०७/१६)


ज्यावेळी धर्मवीर भारतींचं कनुप्रिया माझ्या हातात अालं तेव्हा तळाशी गेलेल्या ‘काहीतरी’ ह्या अनामिक भावनेने परत उचल खाऊन सगळं गूढगढूळ केलं होतं.
‘तुम मेरे हो कौन कनु?’ अापण सगळ्यांनीच किंवा अापल्या मधल्या एखाद्या तुकड्याने स्वत:ला कधीतरी कळत नकळत त्या कृष्णाला विचारलेला प्रश्न. कृष्ण ह्या गुंत्यात प्रत्येकजण ह्या ना त्या प्रकारे कधीतरी गुरफटला जातो अाणि तो गुंता उकलत असतांना कुणीतरी अापली चाललेली फरफट पाहुन विचारतो “ ये कनू अाखिर तेरा है कौन?” किंवा सरतेशेवटी अापणच थकुन स्वत:ला कधी थकुन,कधी चिडुन,कधी लाडीकपणे विचारतो कि ‘तुम मेरे हो कौन कनु?’
चंडीदासांची राधा, सुरदासाची राधा ,जयदेवची राधा , अरुणा ढेरेंची राधा ह्या सगळ्यांची राधा वेगळ्या अाणि धर्मवीर भारतीची राधा एकीकडे. खिडकीशी वाट पाहणारी , नदी किनारी गत स्मृतींना उजाळा देणा-या राधेच्या पलिकडे जाऊन कनुप्रियामधली भारतींची राधा कृष्णाच्या समोर उभी ठाकते अाणि रोखठोक उत्तरं मागते, त्याला झाल्या प्रकारांबद्दल बोल लावते. कनुप्रिया मधे राधेच्या नजरेनं कृष्ण चितारला अाहे. 
वाट पाहणारी राधेच्या पलिकडे वाट पाहणारा कृष्ण इथे दिसतो. वाट पाहणारा कृष्णही असा चितारलाय जणु राधा त्याला लपुन पहात असावी अाणि हटकुन भेटीची वेळ टाळते. ती म्हणते, ‘शेवटी तू उठलास अाणि वरुन झुकलेल्या फांदीचा मोहोर चुरगळुन हळुहळु पायवाटेने चालु लागला, पण मी अाले नाही’ , ‘मावळत्या सुर्याचे उदास किरणं नाईलाजास्तव तुझ्या माथ्यावरच्या मोरपिसांकडे निरोप मागत होते , पण मी नाही अाले’, ‘परतीला निघालेल्या गाईंनी त्यांच्या लोभस-भोळ्या डोळ्यांनी वर तुझ्याकडे पाहिलं अाणि हळुहळु  परतपावली तुझ्याशिवायच परतु लागल्या, पण मी नाही अाले’
फक्त एकमेकांच्या सहवासाबद्दल बोलणारी राधा इथे कृष्णासोबत महाभारताच्या युद्धाबद्दलही बोलते.कृष्णाच्या जीवनातुन राधेचा धडा वगळला तर फक्त रक्तपातच उरतो हे सांगण्याचं धाडस ती करते. 
कृष्ण अर्जुनाला गीता सांगतोय तेव्हा अर्जुनाच्या जागी ती स्वत:ला ठेऊ पाहते. अाणि समोर अाता राधा असल्यामुळे कर्म,स्वधर्म,निर्णय,जबाबदा-या अशा सा-या गीतासाराचे अर्थ तीच्या पर्यंत पोहचता पोहचता बदलुन गेले अाहे. कारण कृष्णाकडे अनेक शब्द असले तरी त्यांचा उगम अाणि अर्थ एकच अाहे . राधा. मग त्याच शब्दांनी कृष्ण त्याच राधेला इतिहास कसा समजावणार ?
मंत्राने प्राणप्रतिष्ठीत केलेला बाणासारखा कृष्ण निघुन गेल्यावर धनुष्यावर थरथरणा-या प्रत्यंचासारखे जे उरती -ती राधा. त्याच्या डोळ्यात डोळे रोखुन विचारावं तशी ती त्याला जाब विचारते कि ‘कनु, मी तुझ़यासाठी फक्त लीलाभुमी अाणि युद्धक्षेत्र जोडणारा पूल होते का?”
हिच कनुप्रिया रंगभुमी पाहण्याचा योग अाला. तो रंगभुमीवर इतक्या ताकदीने पाहणे एक सोहळा होता. भारतींचा दर्जेदार हिंदी कवितेला नाट्य-नृत्याची जोड देऊन जो काय अविष्कार सादर करायचं कृष्णधनुष्य दिग्दर्शिका जोशी यांनी अदभुत अभिनेत्रींसोबत पेललंय ते अफाट अाहे.  राधेचं मिथक सगळ्यांनाच भुलवणारं अाणि जो तो त्याच्यापरीने त्यातुन मार्ग काढत असतो. मिताली जोशी अाणि टिम ने ते ज्या पद्धतीने मांडलंय ते कृष्णासारखंच शब्दातीत अाहे. अापल्या अाजच्या जगण्यातले काही क्षण गुंफून अाजच्या अाणि कनुप्रियामधल्या राधेचा एक मिलाफ ह्या नाट्याविष्कारात पहायला मिळाला. एक सबंध कृष्ण नावाचा अारसा खळ्ळ् कन फुटावा अाणि त्याच्या सहस्त्र वेगवेगळ्या तुकड्यांमधुन नेहा जोशी ,विभावरी देशपांडे, नम्रता कदम , विभावरी देशपांडे, कोमल गुजराथी,रुचा अापटे राधारुपाने प्रतिबिंबीत होत राहाव्या तशी कनुप्रिया हा रंगभुमीवर उलगडत रहातो. 
‘तुम मेरे हो कौन कनु’ हा गुंता अापण यशस्वीपणे उकलत रहातो ,कृष्णधागे सोडवत मागे मागे टाकत राहतो. सगळं झाल्यावर मागे टाकलेल्या धाग्यांच्या एक नवा गुंता तयार होतो. अाणि अापण पुन्हा तो गुंता पुढ्यात घेऊन पुटपुटत रहातो ‘अाखिर तुम मेरे हो कौन कनु’ 
प्रयोगानंतर राधेच्या ह्या वेगळ्या रुपाकडे पाहुन मला भास झाला होता कि फार काही अवघड नसेलही कनु अाणि तिच्या प्रियाला समजावुन घेणं. असं असेल कि ती जेव्हा कृष्ण नसते तेव्हा राधा असते.इतकंच.



Monday, June 27, 2016

नाशकात अलिकडे पाऊस कमी का पडतो? म.टा.

तुम्ही अाम्ही अापली  नुसती चर्चा करत राहतोनाशिकच्या पावसाला नेमकं झालंय काय?”  पुर्वीवर्गात भुगोलाच्या काटकुळ्या सरांनी प्रश्न विचारला"सांगा पाऊस कधी येतो ?"तर बॅकबेंचर पोरंसुद्धाएका सुरात म्हणायची "सा........जुन !! "  आता जर विचारलं तर फ़क्त खुसफ़ुस ऐकु येईल किंवा तीपोरं वर्गाच्या तुटक्या खिडकीतुन वर बघतील " भोआता पण येऊ शकतो काय भरवसा ? " 

आधी कसं व्हायचं.... पावसाळा ब्रम्हगीरीला सोप्यामधे आपल्या चपलाकाढायचा..खुंटीवर आभाळाची टोपी अडकवुनहातपाय पसरुन नाशकात बि-हाड टाकायचामामाच्या घरी आल्यासारखा.....पावसाआधी सगळंभरुन यायचंपुलावरुन काळारामाच्या कळसाकडेपाहिलं की आभाळ कुठे सुरु होतं आणिकाळ्यारामाचा काळा कातळ कुठे सुरु व्हायचा हेकळायलासुद्धा वेळ लागायचागंगेतीरावरनारोशंकराची घंटा गार हवेने हलल्याचा भासव्हायचातिकडे त्रंबकराजाला थेंबांचा अभिषेककरुन हळुहळु पुढे अंजनीसुताची विचारपुस करतपलिकडे पांडवलेण्यांवरची लव्हबर्ड्सची खुडूबाजीपुसुन टाकायचातिकडे दूर जव्हारच्या घाटातलेकाजवेगोंदण पावसाच्या झोकात हळुहळु मिटुलागायचे.

तिकडे सप्तशृंगीच्या भुरकट पाय-यांना नवा काळारंगयायचासगळ्या देवांचे आयास सायास झाले कीमग आभाळ दुस-या टोकाला भगुरला तात्यारावांच्याअंगणातली मातीच्या गंध छातीत भरुनघ्यायचा.आणि सज्ज व्हायचा धुमाकुळ घालायलामग पहिली धार ‘दुस-या’ तात्यारावांच्याघराबाहेरच्या ‘जगण्यासाठी माझी कविता कधीचनव्हती...’ ह्या बोर्डावर.... तिथुन जो अलिप्तपणापावसाळा अंगात भिनवायचा तो त्याला पुढचे चारमहिने पुरायचामग सिबीएस-शालिमारची अचानकधावपळ व्हायचीसोमेश्वराच्या धबधब्याला नवीनफ़ेस यायचागंगापुर रोड वहातरहायचा.नाशिकरोडला चौकाचौकाचे आडोसे धरुनडोक्यावर रुमालाची बांधाबांध सुरु व्हायचीमगमेनरोड्ला डोकी कमी छत्र्यां जास्तसरकारवाड्याच्या शेजारची कौल टपटप तालधरायचे.जवळच आनंदीबाईची हवेली अंबाडा सोडुनपरत सारखा करायचीसकाळी अंघोळ करुन सुद्धाबसल्या बसल्या जरा झोपेची लहर आल्यावर नव्याहिमतीने तोंडावर स्वच्छपाणी मारल्यागत.. नाशिकनवं नवं नटायचं

पण आताशा... भरुन आलेले ढग वरुनच बेशिस्तमाजोरड्या रिक्षावाल्यासारखं "अय येता का ? " असंविचारणा-या नाशिककडे तोंड फ़िरवतंमग पाऊसराग उतरल्यावर उगाच अंदाज घेण्यासाठी चारदोनथेंब टाकुन पाहतो तर तेही जमीनीवर कमी आणिबेढब काळ्याबिंद्र्या भाऊ-दादांच्या फ़्लेक्सवर जाऊनजास्त पडतातपावसाने गोदेमध्ये पहिली डुबकीमारावी तर सर्वांगाला शेवाळाची घाण , धुणेक-यांचेमांगल्य’ आणि पुन्हा ‘स्वच्छताप्रियवाहनांचेसर्वमांगल्य’. बरं इतकं करुनसुद्धा जर "तुला जावंचलागेलअशी त्रंबकराज शंकराने दटावणी दिली तरउगाच तो पाऊस शाळेला कावलेल्या मुलासारखाहो-नाही करत पाट्या टाकल्यागत शिंपण करतोतीशिंपणसुद्धा काही वेळातच भुरभुर करत स्वत: अंगआकसुन घेते...कारण चारदोन थेंब गाडीवरच्यालोगोवरुन घसरण्याऐवजी लोगो चोरलेल्या खरबुड्याजागेत अडकुन राहतेकाही थेंब चौकामधल्याबेशिस्त आक्रस्ताळी रिक्षावाल्यांच्या थुंकीत अडकुनभिंतींला तर काही थेंब रस्त्याच्या कोप-यात दडतातउरलेले थेंब राजीवगांधी भवन अाणि नाशिकरोडच्याविभागीय अायुक्तालया बाहेरच्या ‘फ़ुलटाईमदुर्लक्षित आंदोलन’ करणा-या मंडपावर अडतातकाही थेंब कॉलेजरोडच्याविलीला दड्पुनरस्ताबदलुन पलीकडच्या गंगापुर रोडकडे जातातअाणि काही इंदिरानगरलापण तिथेही सोनसाखळीचोराच्या तोंड लपलेल्या रुमालात ते थिजतातउरलेले थेंब दत्तमंदिरच्या ट्राफिक पोलीस नसलेल्यासिग्नलवरुन ओघळतात तर काही थेंब बिटकोचौकातल्या सिग्नल तोडुन , १०-१२ प्रवासीकोंबलेली रिक्षा पाहुनसुद्धा दुर्लक्ष करणा-या षंढट्राफ़िक पोलिसच्या बिल्ल्यावर पडतातगल्लीबोळातल्या अतिक्रमणात अडकुन पडतात , अन काही थेंब दिशादर्शक कमानींवर गलेलठ्ठथोबांडांचे अभिनंदन बॅनर असल्यामुळे रस्ता चुकतातआणि भलत्याच माळरानावर जाऊन बरसतातअाजकाल काही सरी तर झोकात बरसायची तयारीकरतात पण पंचवटी , सातपुर भागातल्यानिर्ढावलेल्या गोळीबारात घाबरुन पुन्हा वाफ होऊनढगात अंग चोरुन बसत असाव्यात.

पण ह्या अशा सगळ्या तुरळक,घाबरट, शिंपलेल्या पावसाच्या थेंबांचा आपल्या नाशिकला फ़ायदाशुन्यअसा हा उशीरा उगवलेला पाऊस चार महिनेसत्राशे साठ ठिकाणी अडकतो,हिरमुसतो आणिपुढल्यावेळी आणखी जास्त अंग चोरत पायातल्याचपलाही  काढता नुसता डोकवतोमधल्यासुटीतशाळेच्या अंगणात डोळे किलकिले करत ‘करुनउभं असलेल्या चार दोन पोरांच्या तोंडातगेल्याचे...चार आणे समाधान उराशी घेउन .पाऊसनाशकातुन काढता पाय घेतो आणि पुढे कुठल्याशागर्दरानात जाउन पडत नाही तर जुन्या नाशिकच्याहिरव्या आठवणी आठवत आठवत धो धो रडतराहतोअाणि तुम्ही अाम्ही चर्चा करत राहतोनाशिकच्या पावसाला नेमकं झालंय काय?”



Tuesday, April 12, 2016

लेख : रघुवीराच्या देहत्यागाचा साईडइफेक्ट

मरिनड्राइव्ह. सुर्य धुवुन पिळुन दोरीवर वाळत घालावा , त्याच्यातुन थेंब थेंब केशरी रंग पसरत रहावा , अाजुबाजुला सबंध पिवळसर केसरी रंग अशी रात्र अाणि संध्याकाळच्या उंबठ्यावरची वेळ होती. घरात साचलेलं लोटा-लोटा पाणी कितीही वेळ बाहेर फेकत रहावं तरी पावसामुळे घरात पाणी कमी होत नाही तसं समुद्राची भरती काठावर लोटा-लोटा पाणी फेकत होती. संध्याकाळ सरली, रात्र सुरु झाली अाणि सगळी कडे गर्द दाट पिवळसर केसरी रंग पसरु लागला. रस्त्याच्या कडेचे स्ट्रिटलाईट सुरु झाले होते. प्रत्येक पाच फुटावर एक मुठभर सुर्यगोळा उगवावा तसे प्रत्येक पाच फुटावर स्ट्रिटलाईट सुरु झाले होते. तुम्ही लोकलच्या दाराशी उभे असतांना अचानक समोरुन दुसरी लोकल भरधावावी तसा वारा बेफाट वहात होता. समुद्र , वारा अाणि वळणदार रस्त्यावरुन डोकावणारा स्ट्रिटलाईटचा तरंगणारं प्रतिबिंब जणु काही स्ट्रिटलाईटचा अोला पिवळसर रंग वितळुन पाण्यापर्यंत अोघळलाय. मरिनड्राइव्ह. 

हेच मरिनड्राइव्ह अनेकांचं एसी बेडरुम अाहे.  मी अाणि सच्या कितेकदा तिथे रात्रभर गप्पा मारत बसतो अाणि अामच्या साथीला हातातल्या काळ्या गंड्यासारखी रात्र सोबत झुलत राहते. दिवसभर राबुन काही लोकं तिथे कठड्यावर पाठ टेकवुन देतात अाणि उठतात ते सकाळी सायकलवर चहावाला चहा द्यायला येतो तेव्हाच. लंबगोलाकार सिमेंटच्या दगडांचा कृत्रिम काठ तिथे तयार केलाय. तो तिथल्या सौदर्यात भर घालतो. उसळुन अालेलं पाणी त्या दगडांच्या खाच खळग्यात जाऊन बसतं. अाता रात्र उलटुन गडदरात्र सुरु झाली होती. समुद्राची गाज अाणि एक्कादुक्का गाड्यांचे अावाज इतकंच एेकु येत होतं. मी तिथेच कठड्यावर रेलुन तितक्यात एक न्युज चॅनलची ‘अोबी वॅन’ अाली अाणि एक वार्ताहर माईक घेऊन माझ्याकडे येतोय असं वाटत असतांना त्याने माझ्या शेजारी बसुन खाली सिमेंटच्या खडकामध्ये असलेल्या एका खळग्यातल्या गढुळ साचलेल्या लाटेला प्रश्न विचारायला सुरवात केली.
“अथांगतेचा घटक , परंतु असले जगणे , कसे वाटते? सखोलतेशी नाते , किन्तु चुळ असावी , असले जगणे , कसे वाटते? ,अगाधतेचे अंग, तरिही द्रोण पुरावा , असले जगणे , कसे वाटते? "

शेंगा,टरकल,थुंकी,चिंगम अशा बरबटलेल्या त्या गढुळ पाण्याला तो प्रश्न विचारत होता. मला अाश्चर्य वाटले . पण नंतर विचार केला कि प्रश्नही तसा चुक नाही. तिकडे अथांग, सखोल, अगाध अशा समुद्राचा भाग असलेल्या लाटेने असे कोप-यात घाणीत जगणे कंठावे हे जरा दुर्दैवीच नाही का ?
घनगंभीर थरथरता अावजात डुचमळती लाट बोलु लागली “ प्रायश्चित्त अाहे हे. केलेल्या कर्माचं परिमार्जन अाहे हे. “ वार्ताहर म्हणाला ,” जरा उलगडुन सांगा, तुमचं दु:ख जगा समोर येऊ द्या”
दूरुन मोठी भरती अाली. लाट जागीच डुचमळली. अात मधल्या गढुळतेमध्ये नवी गढुळता विसळली. पोटात ढवळल्यासारखं झालं. लाट पुढे सांगु लागली , “ लोकांचे बोल,टोमणे एेकवेनासे झाले. दुस-यांचे टोमणे एकवेळ सहन करु अापण पण अापल्या लोकांचा अबोला नाही सहन होत अाता. अनेक हजारो वर्षांपुर्वीची गोष्ट अाहे हि. मी अवखळ होते ,लहान होते. त्यावेळी समुद्र नव्हते. त्यावेळी मी ‘शरयू’ होते.

अवधची  शरयू. सकाळी सकाळी भरत, लक्ष्मण, शत्रु अाणि राम माझ्या काठाशी येऊन  उंच बाण मारायचे अाणि कुणाचा बाण सगळ्यात लांब जातो अशी शर्यत लागायची. अात नदीमध्ये त्यांचा निषाद कुळातील मित्र गुहा एक नाव घेऊन तरंगत असायचा. तो लांबुन अचुक सांगायचा कि कोणाचा बाण किती लांब गेलाय. अनेकदा भरतच जिंकायचा. लक्ष्मण नेहमीप्रमाणे चिडचिड करायचा. राम भरतला शाबाशी द्यायचा. अनेकदा असं वाटायचं राम मुद्दाम भरतला जिंकु देतोय. 

राम….रघुवीर …अगाध मस्तक, भव्य ललाट, ललाटावर भुरभुरणारे केश, टपोरे डोळे, मध्यम उंचीचा, सर्व देहावर अवर्णनीय कांती असलेला, विद्यपारंगत, राजनीतिज्ञ, सज्जनांचा संग्रह आणि दुर्जनांचा निग्रह करणारा, धर्म-अर्थ व काम या तिन्ही पुरूषार्थाचे योग्य पद्धतीने सेवन करणारा, प्रजाहितदक्ष व प्रजाजनांना अत्यंत प्रिय, देवासुरांना ज्ञात असलेली सर्व अस्त्रे जाणणारा व संग्रमात अजिंक्य, असा रघुवीर.मी लांबुन पहायचे अनेकदा एकटाच माझ्या तीरावर येऊन पाय सोडुन बसायचा. कमळासारखे ते मऊशार पाय मी अोंजळीत घ्यायचा अनेकदा प्रयत्न करायचे पण मी लहान लाट होते म्हणुन सगळे मला मागेच  ठेवायचे. मग अनेक दिवस मला कुणीच दिसलं नाही. अनेक वर्ष. सालाबादाने पाऊस यायचा तेव्हा समुद्रातुन वाफ झालेल्या सरी नदीत बातम्या घेऊन कोसळायच्या कि ‘अाज रघुवीर पश्चिमेला दिसले ,अाज दक्षिणेला दिसले’ मग तिकडे लांब युद्ध कि काय झालं म्हणे अाणि सगळं अालबेल होऊन रघुवीर अाणि जानकी परतले. राजपुरोहितांनी विजयी रघुवीराच्या पाद्यपुजेसाठी शरयूतुन कमंडलु भरला . मी तेव्हा पण घाई करुन त्या कमंडलुत जायचा प्रयत्न केला पण मला इतर मोठ्या लाटांनी मागे सारलं. काठावरुन गुलाल,फुलं उधळंत रघुवीराचे अागमन झाले. मी नदीतुन सगळं पहात होते. असं समजा कि करोडोंच्या गर्दीतली मी एक डोकावुन डोकावुन काठावरुन अायोध्येत नाचत जाणारा सोहळा पहात होते.
काही दिवसमास अाणखी उलटले. मी रोज काठावर येऊन परतायचे कि एकदा तरी रघुवीराचा स्पर्श होईल. मला सगळे हसायचे. एकदा मला झोपी लावतांना मी मोठ्या, पुढे समुद्रात जाणा-या लाटेला थांबवलं अाणि विचारलं,”मी म्हटलं “मी अात्ताच का नाही चंद्राला हात लाऊ शकत ?” त्या खळखळ हसल्या म्हणाल्या “असं वेड्यागत करु नये बये. थोडी मोठी झाली कि तुला पुढे जाऊन दर्या व्हायचंय. मग हवं ते कर. अाणि रघुवीर जाऊ दे तुला ना चंद्राला हात लावता येईल. कारण रघुवीर पण तसाच शितल अाहे. बघ तो चंद्र दिसतोय का? तो वर पांढरा शुभ्र गरगरीत चंद्र? दर्या झाली ना कि मोठ्यापणी तुला अाभाळा इतकी उंच झेप घेऊन त्याला हात लावता येईल. भरतीवेळा असतात त्या.पण त्यासाठी शहाणं हो! सांगेल ते एेक हां ? असं उठसुठ कुठेही पळु नको रघुवीर रामाला हात लावायला जाऊ नकोस. अादराने वाग त्यांच्याशी. युगपुरुष अाहे ते अाणि तू अजुन अवखळ अाहेस.” मला डुलकी लागली अाणि मी तिथेच तरंगत राहिले . वर निळंशार चांदणं पडलं. माझ्या डोक्याखालुन अलगद हात काढुन मोठ्या लाटा प्रवाहाला निघाल्या. पुढे जाऊन त्यांना गंगार्पण व्हायचं होतं. गंगार्पण झालं कि जन्ममरणाचा फेरा सुटतो अाणि अाम्ही नद्यांना दर्याचं अथांग अमरत्व प्राप्त होतं. हे तितकं सोपं नाही त्याला मोठी तपश्चर्या लागते."
"किर्रर्र रात्र होती. वातावरण जरा उदास उदास होतं. मला पावलांचा अावाज अाला. मी हळुच उचंबळुन पाहिलं. सगळे सवयीने, मिटल्या डोळ्याने प्रवाहत होते. अवचित भुरभरु पावसाला सुरवात झाली. मी कुस बदलली. दूर पाहते तर काय ? एक तेज:पुंज अाकृती चालत येत होती. खांद्यावर रुळणारे केस , खांद्यावरुन खाली तरंगणारं उत्तरीय, नदीच्या प्रवाहात एकएक पाऊल उचलुन ती अाकृती धीरगंभीर चालत होती. जोर लाऊन चालावं लागत असल्याने खांदे मागेपुढे होत होते. मी संमोहित होऊन पहात राहिले. ती अाकृती चालत येत होती पण जशी पुढे येत होती तितकी ती खोल जात नव्हती. कदाचित शरयूमधील इतर सख्या अादराने बाजु होत किंवा जमिनीचा भर वाढवत नदीची खोली जाणवु देत नसेल. पावसाचा जोर वाढला मी पुढे पुढे जाऊ लागले. संमोहन कि काय असेल ते होत होतं. हळुहळु अाजुबाजुला गलका सुरु झाला अाता मला अडवणं शक्य नसल्याने सगळ्याजणी अोरडु लागल्या. ‘फिर मागे तू . अगं हा जो दिसतो, तो चंद्रासम, दिसतो केवळ, नसे चंद्र तो, फिर मागे तू.’ मी अापले दर्या होण्याच्या अाधीच चंद्राला हात लावायया कल्पनेने शहारले. अाता तो अाणि मी समोरासमोर होते. कुजबुज एेकु अाली. रघुवीर!! एका शब्दाने माझ्यातला थेंबन्थेंब शहारला. रघुवीर ! 
मी अावेगाने पुढे गेले अाणि त्या अाकृतीला कवेत घेतले. सगळी कडे हल्लकल्लोळ झाला. दर्या प्रवाहाला निघालेल्या नद्यांचा प्रवाह मागे फिरला मला थांबवायला. पावसाने जोर धरला. क्षितीज थरथरलं. अाभाळात गडगड झाली. मी स्वत:ला विसरुन गेले. भानावर अाले तेव्हा सकाळी सगळे जण माझ्याकडे पहात होते. काठावर कुजबुज होती. ‘रघुवीराने देहत्याग केला’
मग शरयू नदीतल्या सगळ्या जेष्ठांनी निर्णय घेतला अाणि मला शिक्षा म्हणुन पुढे पाठवायचं ठरवलं. मी जिथे जिथे प्रवाहत पुढे गेले तिथे तिथे सगळ्यांच्या खोचक नजरा माझ्यावरच असायच्या. “ हिच ती ! ह्याच लाटेने सुरवात केली,हिनेच रघुवीराला बुडवलं.” मी मुकाट खाली मान घालत प्रवाहत राहिले .युगानुयुगे. 
अाता मला नको झाल्यात सगळ्याच्या नजरा म्हणुन प्रायश्चित्त म्हणुन मी इथे कोप-यात येऊन अोंजळभर जागेत डुचमळते. मला वाफ व्हायचं अाहे. पण नव्याने एक लाट येते थोडी भर घालुन जाते अाणि मी अाहे तशीच राहते.” अाणि ती पुटपुटत राहिली श्रीरामजयराम जयजयराम! 
 सकाळी सकाळी एक मोठ्ठा पाण्याच्या बंबाची गाडी भरधावत मरिन ड्राईव्ह च्या रस्त्यावरुन गेली अाणि माझी झोप मोडली. शेजारी सायकलच्या कॅरिअयवर चहावाला हसत माझ्याकडे पहात होता. मला विचारलं “साब चाय लोगे ?” मी चहा घेतला. मी पैसे द्यायला लागलो तर म्हणाला “नही साब दिन कि शुरवात कि प्याली मै दिल से किसी दिलवाले को देता हुं, पैसे नही लेता” मी हसलो अाणि सहज म्हणुन विचारलं “ किधरसे अाए हो दोस्त ? क्या नाम ?”
तो म्हणाला “ युप्पीसे हुं ,अायोध्या. रघ्घु नाम है. चलो निकलता हुं. जय रामजीकी!”  

- प्राजक्त 
१२ एप्रिल २०१६

अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...