"अापला चहा दुनियेचा भारी असतो.दुनियेचा भारी. अनुभवामुळे रापुन काळी-चॉकलेटी झालेली पावडर , राकट अालं-इलायची....बापासारखी ! हां पण भल्यासाठीच अाणि जीवाभावाचे गोड 'साखर'क्षण इतकं टाकलं की अापला चहा तयार होतो. नाही पाणी-दुध पण असतं की पण ते अापल्यासारखं दुध काय पाण्यासारखं पातळ अाणि पाणी पण दुधासारखं गढुळ "डिपी दिवसातुन पंचवीस वेळेस हे एखाद्या नवीन माणसाला सांगायचा.
डिपी - अगदी मौक्याच्या ठिकाणी डिपीची चहाची टपरी होती.टपरीला नाव नव्हतं पण डिपी ह्या त्याच्या नावावरुन सगळे त्याला अोळखायचे. डिपी म्हणजे दिलीप पावसकर ? कि दानिश परवेझ ? कि डेरेक पॅट्रिक ? कि दलविंदर पुरी? कि ???? अाणखी बरंच काही ??? हे कोणालाच माहिती नव्हतं. पण बोलयाचा असा कि जशी चहाला उकळी.
"अाज चहा नको का? " अोरडुन विचारायचा . मग पलिकडुन कोणीतरी म्हणायचं "नको नको तोंड अालंय, डिपी" मग डिपी हसुन बडबडायचा ,"'तोंड' आलं की रावणाचं नवल वाटायला लागतं,राव"
"तुला गंमत सांगतो , साहेबा " डिपी एका रोज मुलाखती देउन थकलेल्या अाणि नविनच डिग्री 'प्रसुत' झालेल्याला तरुणाला सांगत होता. "गंमत सांगतो कि माझ्याकडे रोज हातावर काम घेणा-या वेठबिगारापासुन तर हाताच्या इशा-यावर कोटीच्या उलाढाली करणा-या पर्यंत सगळे येतात चुस्कीसाठी. देवाला मानणारे अाणि मान न (दे)णारे दोघं येतात. " अाणि हे सगळं डिपी अाजुबाजुच्यांना चहा देत अाणि साफसफाई करत अाणि सोबतच्या मदत करणा-या मुलाला अॉर्डर देत देत बोलत होता. डिपीच्या टपरीवर मदत करणा-या पोरांची गंमत होती. अगदी गरजु मुलांना तो कामावर घ्यायचा ज्यांना सहसा कोणी घरादाराचा शेंडाबुडखा नसायचा अाणि तो पोरांना कामावर ठेवतांना सांगायचा कि "हं तर, डिपी कंपनीपॉलिसी नुसार(कंपनी ? पॉलिसी ??) ,कंपनी तुला एक नाव देईल तेच तुझं नाव असेल" अाता ही वितभर टपरी म्हणजे हयाची कंपनी. अाणि डिपी त्याच नाव द्यायचं कारण म्हणे त्याला नावं लक्षात नाही राहायची.
"सॉक्रेटीस , सुर्या वाल्याकडे ४ कट मार ! " अाता सॉक्रेटिस म्हणजे ह्याचा चहा वाटणारा पोरगा (तो सारखे प्रश्न विचारायचा म्हणुन असं नाव बहाल केलं होत डिपी ने ) सुर्यावाला म्हणजे नाक्यावर सुर्या एंटरप्राईजेस नावाचं दुकान , ४ कट मार म्हणजे ४ कटींग नेउन दे. हा असा सगळा डिपीचा चहोत्सव, पहाटे रस्तावर एक कप अोतुन अाणि रात्री शेवटचा चहा सगळं अावरुन सॉक्रेटीस सोबत स्वत: घेतला की संपायचा. पहाटेचं धुकं त्याच्या चहाच्या उकळीतुन उगम पावतंय असं वाटायंच अाणि रात्री स्टोव्हच्या फरफर सोबत अाजुबाजुचा गजबजाटडिपीने शांत केल्यासारखं वाटायचं. "डिपीशेठ, थंडीत चहा जास्त गोड लागतो का हो ?" सॉक्रेटीस ने हात शेकत प्रश्न केला अाणि डिपी शुन्यात बघितल्यागत शेकोटीकडे टक लाऊन बघत बसला.
अाणि अचानक शेकोटीतुन अागीचा अजस्त्र अाकार घेत एक जमाव उभा राहिला अाणि त्याच्या बापाला विचारु लागला " नाव बोल बे पटकन नाव बोल " बाप पुटपुटला अाणि जमावाने बापाला ऊस कापावा तसा कापला . मग जमाव पळुन गेला.मग त्याच शेकोटीच्या धुरातुन दुसरा जमावाचा अाकार तयार झाला अाणि त्याच्या बहिणीला नाव विचारु लागला अाणि ती काही म्हणायच्या अात तीला नासवलं सुद्धा.हे सगळं वितभर उंचीचा डिपी, बोटावर मोजण्या इतक्या वयात कोप-यात गुढघे मुडपून बघत होता. अाजच्या डिपीने त्या लहान्या डिपीकडे पाणी डोळ्याने पाहिलं. दोन वेगवेगळे जमाव येउन अापला घराला वेगवेगळं करुन गेल्याची सल त्याच्या तांबरलेल्या डोळ्यात स्पष्ट होती. जमावातला एक जण जाता जाता म्हणाला थंडीतला हवा जास्त गोड लागते हो ना ? त्यातल्या एकाने जाता जाता अंगणातल्या पिंपावर हातातल्या काठीने उगाच जोरात अावाज केला अाणि.....
शेकोटीमध्ये अांधळ्या स्वप्नाने झेप घेणारा किडा ताडकन उडाला अाणि डिपीची तंद्री भंगली .
मग उठता उठता डिपी म्हणाला , "दंगल जर जिवघेणी असेल तर दंगली नंतर जे जगतो ते काय असतं ?"
सॉक्रटीस "काय? "
डिपी " काही नाही छापा पण नाही काटा पण नाही .नाव विचारलं तर सॉक्रेटीस सांगायचं सॉक्रेटीस . !"
- प्राजक्त
काय भैताड लिहीलंय बे ! लव्ह यू रे ! साॅक्रेटिस .....
ReplyDeleteदंगली नंतर जे जगतो ते काय असतं ?>>
ReplyDeleteभ या ण.....