Monday, July 23, 2018

अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

 मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत्त्वाचं नसतं. यशापयशाची गणितं हा धंद्याचा भाग आहे. कलात्मकतेशी त्याचा काहीच संबंध नाही. निखळ कलेचे उपासक हे बहुतांश शेवटपर्यंत भणंगच राहतात, पण पराकोटीची मेहनत आणि असामान्य प्रतिभा ही आपल्या रंगभूमीने नेहमीच जपली आहे आणि त्याहीपेक्षा गौरवलेली आहे. मराठी रंगभूमी मग अशा रंगकर्मींना खूप सांभाळते, त्यांची काळजी घेते आणि त्यांना नावलौकिक आणि प्रतिष्ठा देते. भद्रकाली प्रॉडक्शन्स हे नाव असेच मराठी रंगभूमीच्या इतिहासात अत्यंत मानाचं स्थान प्राप्त केलेल्या सस्थेचं नाव आहे. मच्छिंद्र कांबळी यांची ही संस्था. मच्छिंद्र कांबळी हे असेच मराठी रंगभूमीचे अत्यंत प्रतिभावान, मेहनती आणि म्हणूनच लाडके रंगकर्मी. नाटकाचा कपडेपट सांभाळण्यापासून ते अखिल भारतीय मराठी नाटय़परिषदेचं अध्यक्षपद दीर्घकाळ भूषवण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास हा केवळ मच्छिंद्र कांबळी यांची महती सांगणारा नव्हे तर मराठी रंगभूमीचं निःपक्ष, प्रामाणिक आणि मेहनत व टॅलेन्ट जोपासणारं रूप दर्शवणारी आहे. सांगण्यास आनंद वाटतो की, मराठी रंगभूमीची ही जोपासण्याची वृत्ती आज मच्छिंद्र कांबळींच्या नंतरही भद्रकाली प्रॉडक्शन्सने कायम ठेवलेली आहे. त्यांची ५५ वी कलाकृती ‘संगीत देवबाभळी’ हे सिद्ध करणारी कलाकृती आहे. या नाटकाच्या जाहिरातीवरून ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक शास्त्रीय संगीताची विशेष आवड असणाऱ्या दर्दी लोकांच्या पसंतीचं असेल असं वाटण्याची शक्यता आहे, पण खरं तर हे नाटक तुकोबांच्या अभंगांमुळे संगीतमय आहे आणि म्हणूनच ते दर्दी आणि गर्दी अशा सगळय़ा प्रेक्षकांना भावणारं म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं नाटक आहे.
‘संगीत देवबाभळी’ हे नाटक विविध पातळय़ांवर लक्षणीय आहे. सर्वप्रथम हे नाटक संत तुकाराम आणि विठू माऊली यांच्यातलं नातं सांगणारं नाटक आहे. तरीही नाटकात तुकोबा किंवा विठ्ठल नाही. देव आणि भक्त यांच्या पत्नींच्या माध्यमातून उलगडणारं हे नाटक आहे. ‘संगीत देवबाभळी’ हे याआधी एक एकांकिका म्हणून सादर झालं होतं. म्हणजे हल्लीच्या मराठी रंगभूमीच्या सशक्त संहितेच्या एकांकिकांवरून व्यावसायिक नाटकं बेतण्याच्या ट्रेंडमधलं नाटक आहे. तरीही हे नाटक भद्रकालीने तद्दन व्यावसायिक रूपात न करता ते त्यांची विलक्षण कलात्मकता जोपासत सादर केलेलं आहे. ‘संगीत देवबाभळी’ हे संगीत नाटक आहे. तरीही यातलं संगीत हे कुठेही संगीत शास्त्राचा उहापोह करणारं नाही. नाटकातली गीतं हे तुकोबांचे अभंग आहेत. तरीही नाटकाचं संगीत हे निव्वळ भक्तिसंगीतही वाटत नाही. आनंद ओक या संगीतकाराने या नाटकात अभंग आणि भावगीत यांच्या मधला प्रकार गाठून नाटकाला एक वेगळीच गंमत आणलीये. एकूणच ‘संगीत देवबाभळी’ हे भद्रकाली प्रॉडक्शन्सने कोणताही अधिकचा आव न आणता व्यावसायिक रंगभूमीवर सादर केलेला एक खूपच विलक्षण नाटय़ानुभव आहे. निर्माते प्रसाद कांबळींचं यासाठी विशेष कौतुक करायलाच हवं.
प्राजक्त देशमुख हे एक नवीन नाव ‘संगीत देवबाभळी’मुळे व्यावसायिक रंगभूमीवर आलं आहे. हा तरुण रंगकर्मी अत्यंत प्रतिभावान असल्याचा दाखला हे नाटक देतं. ‘संगीत देवबाभळी’चं लिखाण हे नाटकाची दृष्यात्मकता लक्षात घेऊन केलेलं लिखाण आहे. प्राजक्तने जे नाटक लिहिलंय तसं लिहिणं सोपं नाही. कारण दृष्यात्मक लिखाण करताना त्याने कुठेही आशय ढळू दिलेला नाही. वरवर विठ्ठल भक्तीवरचं वाटणारं ‘संगीत देवबाभळी’ हे एका वेगळय़ा पातळीवर स्त्रियांच्या मानसिकतेवरही प्रकाश टाकून जातं. तरीही नाटक कुठेही अवजड, बोजड वाटत नाही हे प्राजक्त देशमुखचा वेगळेपण दाखवतं. प्राजक्तने जी गीतं ‘संगीत देवबाभळी’साठी लिहिली आहेत तीदेखील विलक्षण आहेत. कारण ती इथे तुकोबांच्या अभंगांबरोबर अगदी गुण्यागोविंदाने नांदतात. दिग्दर्शनात प्राजक्तने प्रचंड कल्पकता दाखवली आहे. जवळजवळ टॅबलो वाटावं असं त्याने हे नाटक बसवलंय. नाटकातल्या प्रत्येक मुव्हमेन्टमध्ये एक विलक्षण लयबद्धता दिसते. ही लय नाटकातल्या गाण्यांची नाही किंबहुना नाटकातील गाण्यांनाही नाटकाची म्हणून एक वेगळी लय आहे. कारण ‘संगीत देवबाभळी’मधली गीतं ही नाटकाच्या गद्याचाच भाग म्हणून येतात. ‘संगीत देवबाभळी’ची दोन तांत्रिक अंगही अप्रतिम झालेली आहेत. एरवी देदीप्यमान सेट निर्माण करणारे जादूगार प्रदीप मुळय़े इथे आपल्या कलात्मक बेस्ट फूटवर आहेत. त्यांनी सूचकपणे उभा केलेला तुकोबांचा वाडा आणि संपूर्ण नाटकाला प्रकाशयोजनेतून प्रफुल्ल दीक्षित यांनी दिलेला फिल टेरीफिक आहे. नाटकाच्या प्रकाशयोजनेलाही काळाचं भान कसं राखता येतं हे ‘संगीत देवबाभळी’ दाखवतं.
हे दोन पात्री नाटक आहे. खरं तर दोन कलाकारांचं नाटक आहे. आवलीच्या भूमिकेत शुभांगी सदावर्ते आणि रुक्मिणीच्या भूमिकेत मानसी जोशी. दोघी उत्तम गातात. आपल्या सहज अभिनयातून आणि वावरातून दोघीही प्रेक्षकांना बांधून ठेवण्यात कमालीच्या यशस्वी झाल्या आहेत. आपल्या अभिनय कौशल्यातून प्रसंग रंगवत असताना या दोघी लीलया गाऊ लागतात आणि प्रेक्षक म्हणून आपण मुग्ध होतो. शुभांगी आणि मानसी या दोघींची या नाटकासाठीची निवड अचूक आहे.
अशा पठडीचं नाटक व्यावसायिक रंगभूमीवरून सादर करणं हा जोखमीचा निर्णय आहे. प्रसाद कांबळींनी हा निर्णय करून मराठी रंगभूमीवर आणि प्रेक्षकांवरचा त्यांचा विश्वास दाखवलाय. खूप तुरळक नाटकं अशी असतात जी प्रेक्षकांनाही भूमिका घ्यायला लावतात. ‘संगीत देवबाभळी’ हे असं नाटक आहे. मराठी प्रेक्षकांनी आपण नाटय़कलेचे भोक्ते आहोत की नाटकांमधून आपली केवळ मनोरंजनाची गरज पूर्ण करणं एवढीच अपेक्षा आहे ही भूमिका स्पष्टकरण जरुरीचं आहे. ‘संगीत देवबाभळी’ हे विलक्षण नाटक कोणत्याही नाटकवेडय़ा प्रेक्षकाला आवडल्यावाचून राहणार नाही.
– दर्जा                 :  साडेचार स्टार
– नाटक               :  संगीत देवबाभळी
– निर्मिती              :  भद्रकाली प्रॉडक्शन्स
– निर्माती              :  कविता मच्छिंद्र कांबळी
– सादरकर्ते            :  प्रसाद कांबळी
– नेपथ्य                :  प्रदीप मुळ्ये
– संगीत                :  आनंद ओक
– पार्श्वगायक           :  आनंद भाटे
– लेखक, दिग्दर्शक   :  प्राजक्त देशमुख
– कलाकार            : शुभांगी सदावर्ते, मानसी जोशी
http://www.saamana.com/review-of-marathi-play-sangeet-devbabhali/







वारी-विठोबाचा अनुवाद ( लोकमत )

वारी-विठोबाचा अनुवाद

 मला वारी कशी दिसते ? असा प्रश्न विचारल्यानंतर वारी-विठोबाचा माझ्यापुरता केलेला अनुवाद सांगणं अाधी मला महत्वाचं वाटतं. कारण ‘वारी का?’ ह्या गावची वाट ‘विठ्ठल कोण?’ ह्या डोंगरावरुन जाते. ह्याच दोन ‘का’ अाणि ‘कोण’ मध्ये पांडुरंगाचा माझ्यापुरता अनुवाद अाणि वारीचं माझ्यापुरतं भाषांतर दडलेलं अाहे. 

अापल्या देशात देवी-देवतांची कमी नाही. त्यांच्या दर्शनासाठी जाणा-या यात्रा,जत्रा, उरुसही अनेक अाहेत. पण मग वारीमहात्म काय अाहे ? खरं तर असं अाहे कि वारीचं महात्म असं शोधत असाल तर ती पहिली चूक अाहे. कळत-नकळत, कमी-अधिक फरकाने सगळेच अापल्या अस्तित्वाचं कारण शोधत असतो. अापण अापले भटकत असतो काहीतरी शोधत.  अापण ‘इथं’ का अवतरलोय ह्याचं उत्तर शोधत. ह्याला कुणी अात्मशोध म्हणेल ,कुणी परमेश्वरशोध, कुणी काहीच न म्हणता म्हणेल ‘छ्ये! मी असलं काही शोधतच नाहीए’. हि सगळीच उत्तरं खरीय.
एकदा मी विठोबा शोधत असतांना अापला अापला भटकत होतो. अनेकांना पत्ते विचारले पण मला समजेल असा पत्ता सांगितला तो तुकोबांनी. तो ही अाधी त्यांच्या काखोटीची पुरचुंडी पुढ्यात ठेवत कि ‘ पत्ता मस सापडेल रे, अाधी बस दोन घास खाऊन घेऊ’ .
‘वारी का?’ ह्या गावची वाट ‘विठ्ठल कोण?’ ह्या डोंगरावरुन जाते. ह्याच ‘का’ अाणि ‘कोण’ मध्ये माझं पांडुरंगाबद्दलचा माझ्यापुरता अनुवाद अाणि वारीचं माझ्यापुरतं भाषांतर दडलेलं अाहे. 
अाता विठ्ठल नावाचा डोंगर अाधी चढू. खरं संतामहंतांच्या अाणि भक्तांच्या गाथागोष्टीतुन हा देव अक्षरश: तयार झालाय. अभंग-निरुपणात जे येतं त्याकडे इतिहास म्हणून पहायला कुणी लावत नाही तर जगणं सोडवण़्याचं नितीतत्वांचं प्रमेय म्हणून ते बघावं असा त्या मागचा उद्देश असतो. 
राधाकारणे रसलेली रुक्मिणी द्वारकेच्या दक्षिणेला दिंडीरवनात येऊन लखुबाई(रखुमाई) झाली. तिची समजुत घालायला कृष्ण पंढरपुरास विठ्ठलरुपात अाला. अाणि भक्त पुंडलिकाच्या अाळवणीमुळे कृष्ण पंढरपुरात अाला. भक्त पुंडलिक मातापित्याच्या सेवेत मग्न होता. त्याने विट फेकली अाणि त्याला थांबायला सांगितलं. तो थांबला. तो हा विठ्ठल. हि दोन स्वतंत्र कारणं विठ्ठलाची अाणि पंढरपुराचं नातं सांगणारी अापल्याला वेगवेगळ्या कथा-पुराणा-अाख्यायिकांमध्ये सापडतात. 

विठ्ठल हे एक अत्यंत मानवी रुप अाहे. अगम्य अाणि जगाला चाट करणारे चमत्कार ह्याला येतात असा कुठेही त्याचा दावा नाही. (कथा-सिनेमे-मालिकेवाल्यांना त्यांची पोटं चालवाची असतात. ते बघा अाणि विसरा. ते पाहूच नये किंवा ते संदर्भ म्हणून पाहु नये.) ‘परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्’ असं काही प्रतिपादन नाही त्याचं. कुणाला वाचवायला म्हणून खांब फोडुन अालेला हा अक्राळविक्राळ देव नाही, हा कुणी धर्मरक्षणासाठी अवतरलेला राजपुत्र नाही, हलाहल प्राशुन घ्यायला अालेला हा संकटमोचक देव नाही, नितीअनितीच्या महाभारतात दिशादर्शक सारथ्य करण्यासाठी हा देव अालेला नाही, असुरांचा नि:पात करण्यासाठी अालेल्या देविकांसारखा हा दुर्गात येऊन वसलेला नाही, कोsहम हा जडजटील प्रश्नाची बुद्धी तुम्हाला प्राप्त व्हावी म्हणून काही मांडायला अालेला अवतार नाही. केवळ एका भक्ताने भेटीची इच्छा व्यक्त केली म्हणून अालेलं हे काळंसावळं रुप अाहे. बरं त्यातही ‘भक्त पुंडलिकाच्या घरी साक्षात मी अालोय तरी हा अाईबापाची सेवा करत बसला? अाणि माझ्याकडे विट फेकुन मला प्रतिक्षा करायला लावली? मला?’ हा असा अहंभाव पण त्याच्याकडे नाही.त्याने तसं केलं म्हणून लगेच ‘ढिश्श!!’ करुन शाप नाही दिला विठ्ठलाने. तो कंबरेवर हात ठेवुन बापुडा उभा राहिला. अापापली कर्तव्ये यथायोग्य पार पाडावी हेच त्याला हवंय. अाधी कर्मयोग !
अगम्य सुरस चमत्कारिक अशी जादू वगैरे काही नाही. नाही म्हणायला मनुष्याकडेही असेल असं सामर्थ्य त्याच्याकडे अाहे, पण तेही मानवी अाहेत हो. जनीला दळणकांडणातच मदत केली, एकनाथाचं रुप घेऊन राण्याकडेच गेला, बादशाहाची हजामतच केली, गोरोबाला चिखलच तुडवुन दिला, दामाजीला रसदच पोचवुन दिली. त्याच्याबद्दलच्या चमत्काराच्या कथा ह्या विठ्ठलपुराणातल्या मूळ कथा नव्हे. विठ्ठलाप्रतीच्या उत्कट भक्तीच्या दाखल्याखाली त्या रचल्या गेल्या असाव्या.
ह्याच्याकडे त्रिशूळ नाही, ह्याच्याकडे चार हात , पाच डोकी नाही, गदा-सुदर्शन अशी कोणतीच अस्रशस्त्र नाहीत. कंबरेवर हात ठेऊन तो फक्त वाट पाहतोय. 
 उंदराच्या किंवा नंदीच्या किंवा अाणखी कुणा देवाच्या वाहनाच्या कानात अापली कामना सांगुन देवाकडुन काही मागाचंय का ? मग ती ही सोय इथं नाही. काय असेल तर थेट बोला कि राव. बरं अमूक-तमुक अायास सायास नाही. ते केले म्हणून तो चिडेल वगैरे असंही नाही. इतरां ठायीच्या अादर, अप्रुप, धाक, शरण वगैरे भावना त्याच्या भक्तीत नाही. इतर कोणत्याही धर्मात असा कोणता देव अाहे ज्याच्याकडे गेल्यावर भक्त अाधी त्याला मिठी मारता अाणि मग पाया पडतात? ‘प्रथम भेटी अलिंगन । मग वंदावे चरण’-तुकाराम. विठ्ठल हे रुपच मुळी ‘सांगाती’ म्हणून. न बोलावता कुणाच्यातरी मनात इच्छा झाली म्हणून अालेला. सखा सांगाती. 
सोळा सोमवार, खणानारळाची अोटी, बोकड-बकरु, कार्यप्रारंभ म्हणून गणेशपूजा, कार्यपुर्ती म्हणून सत्यनारायण, संकटमोचन म्हणून महा-लघुरुद्र, तेल-नारळ-धान्य-शेंदूर असलं सगळं किंवा व्रतवैकल्य काहीही नाही. अापण अापल्या माथ्यावरची संकटं जावी म्हणून करावयाच्या ह्या गोष्टी असतील पण मग ह्या जातात कुठं? सृष्टीचा नियम अाहे कि त्या एकाठिकाणाहुन दुसरीकडे जातील फारफार तर. पण नाहिशा नाही होत. ढिग असेल तर खड्डा होतोच कुठं तरी हा निसर्गनियम अाहे तसा. मग हि संकटं अापली जावी अाणि त्याने ईसासारखी त्याच्या माथ्यावर घ्यावी का? पण मग हे भक्तीला , भक्तीमार्गाला अाणि भक्ताला शोभतं का? ह्यात स्वार्थ अाला. ‘त्याच्याकडे धाव म्हणजे अाता लगेच पाव’ असं नाही का? विठ्ठलाचं जेव्हा जेव्हा स्मरण केलंय तेव्हा तेव्हा ते संकट पेलण्यासाठी सामर्थ्य हवं ह्या अांतरिक उर्जेसाठीच केलं गेलंय. म्हणूनच त्याच्यानावाने वर सांगितलं तसलं काही कर्मकांडं अाजवर एेकिवात नाही (असतील तर सब झूठ-कोपलकल्पित)

अाता ‘वारी’ नावाच्या गावाला जाऊ. तर वारी ! 
पांडुरंगाची भक्ती हि भागवतधर्मानुसार अाहे. अाणि भागवतधर्मात माणसाच्या योग्यतेचं मुळ भक्तीत असतं, जातीत नव्हे. त्यामुळे गंमत अशी कि वारीमधल्या ज्या दिंड्या निघतात त्यात बायका-माणसं, मुलं-मुली , अाबाल-वृद्ध तर अाहेच पण ज्ञानदेव, तुकाराम, एकनाथ, निवृत्तीनाथ, मुक्ताई, सोपानदेव, चांगदेव अाणि असे अनेक संतही सहभागी होतात. ( पुर्वी ‘ते’ जायचे, अाता पालख्या.इतकंच) अाणि वारकरी सांप्रदायात संत हे देवाहुनही श्रेष्ठ समजले जातात. त्यामुळे त्यांच्या सहवासात ह्या दिंड्या निघतात.
अापल्याकडे चारधाम किंवा अमरनाथ किंवा जगन्नाथ यात्रेला जाण्याची प्रथा अाहे. ती यात्रा अापण मित्र-कुटूंबासमवेत ठरवुन निघतो. पण इथे वारी मध्ये सगळे एकत्र जमुन एक जत्राच ‘वारीला’ निघालीय असं स्वरुप असतं. ज्यात ‘भेदाभेद नूरे’ हे जगण्याचं ब्रीद केंद्रस्थानी.
पापं धुवून काढायचीय ? चारधामासारखं पुण्य पदरी पाडायचंय? मोक्षप्राप्ती हवीय ? इच्छित फलप्राप्ती हवीय? मग नाही. वारी त्यासाठी नाही. अापल्या परंपरेत वेगवेगळ्या कारणाने माहेरी जाण्याची निमित्तं असतात. अाणि ती निमित्त संपली तरी नंतर ती वर्षातुन का होईना माहेरा जातेच. मग ती माहेरी कोणत्या हेतूने जाते ? काही मिळवायला? नाही. ती तिथे जाते ते केवळ तिची इच्छा असते म्हणून. तिथं गेल्यावर तिचे अाईबाप,भाऊबहिण, जुने सवंगड्यांना नितांत अानंद होईल म्हणून. संसारातला शीणभाग जाईल म्हणून. वर्षभराचा सासुरवास उतरावा म्हणून. बरं सासुरवास म्हणजे त्रास अशा अर्थी नव्हे.  कर्मयोगवादात संसारालाच सासर म्हटलंय. अाणि ती माहेरी गेल्यावर ती अाई पुढे गा-हाणे करीत नाही कारण तिला ठाऊक अाहे कि त्याने अाईला त्रास होईल अाणी परतल्यावर अाईच्या जिवाला घोर लागुन राहिल. तसाच वारकरी काही मागायला वारी करत नाही . तो तिथं जातो. विठ्ठलाला अलिंगन देतो अाणि मग पाया पडतो. एकुणच जगणं काय अाणि संसार काय तो म्हणजे एक लांबच्या पल्ल्याचा प्रवास. मग अशा प्रवासाला निघाल्यावर अापण मध्ये कुठं जर थांबलो तर त्या थांब्याकडुन अापल्याला ईप्सित स्थळी पोहोचण्याच समाधान नको असतं. अापल्या हवं असतं तर ईप्सित स्थळी पोहोचण्यासाठीची शक्ती. प्रवासाचा शीणभाग घालवण्यासाठी अापण तिथं थांबतो.  तीच प्रसन्नता वारीत असते. 
अायुष्यात एकदा अायुष्य कंठल्यानंतर कलत्या वयात चारधाम करावं अशी अापल्याकडे पद्धत अाहे. कारण कलत्या वयात म्हणजे मृत्युची वर्दी अालेली असते. मग अशा तिर्थक्षेत्री मृत्यु अाला तर अाल्या जन्माचं सार्थक होईल. पण हे असलं सार्थकी लागण्यासाठी अायुष्यात एकदा म्हणून वारी करावी असं नाहीच. ती दरवर्षी करायची गोष्ट अाहे. दरवर्षीच्या पेरणी सारखं. फलप्राप्ती वगैरे भानगड इथे नाही .अाणि म्हणूनच वारीमहात्म्य नावाचं थोतांडही इथं नाही. 
अाणि म्हणूनच तुकोबांना पत्ता विचारायला थांबलेला मी. पुन्हा काही हुडकायच्या प्रवासाला निघालो नाही.  समोर सगळ्याच्या माथ्यावर अबीरबुक्का अाणि पायाखाली विट दिसली कि उरतं काय ? उरते फक्त उराउरी भेट ! जरा अापणच अापल्या पायाच्या अंगठ्याने चाचपडलं कि अापल्याही पायाखाली विट जाणवेल. इतका जवळचा पत्ता तुकोबा सांगतात. बरं म्हणून मी अात्यंतिक अाध्यामिक - अास्तिक अाहे का? तर नाही ! मी स्वत:ला डोळस नास्तिक म्हणवत असतो. ‘अाहे एेसा देव वदवावा वाणी । नाही एेसे मनी अोळखावा.’
मला वारी कशी दिसते ? मला वारी ‘अशी’ दिसते. वारी-विठोबाचा अनुवाद.
- प्राजक्त देशमुख

लोकमत : http://www.lokmat.com/blog/adhyatmik/manimatala-vithuraya/

Tuesday, June 26, 2018

अलवार काळजात रुतणारं संगीत देवबाभळी : रविंद्र पाथरे : लोकसत्ता

‘अंधाराला अंधाराला, दिशा नाही मेली
ठेचकळ्या आभाळाला, मलमपट्टी केली।।
हात रंगल्याले, शेणाच्या रंगात
कपिलेचा गंध येतो माझ्याही अंगात।।
दारावर लोक येई, कसे माखले ग हात
सांगते मी शेण न्हाई, नवी मेंदीची ही जात।।’
नाटकाच्या प्रारंभीच संत तुकोबांची बायको आवली आपलं दु:ख, आपली वेदना या रचनेतून व्यक्त करते आणि ‘सं. देवबाभळी’चं रूपरंग काय असणार आहे हे स्वच्छपणे आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं.
संत तुकारामांची बायको आवली ही एक खाष्ट, कजाग बाई होती अशी प्रतिमा जनमानसात रुजवली गेली आहे. ‘संगीत देवबाभळी’ने मात्र तिच्या या प्रतिमेला छेद दिला आहे. आपल्या नवऱ्याला नादी लावून संसाराचा इस्कोट करणाऱ्या त्याच्या विठ्ठलाचा तिने राग राग करणं स्वाभाविकच नाही का? त्या त्राग्यातून तिने विठोबाला शिव्याशाप दिल्या तर त्यात गैर काय? किंबहुना, ‘स्त्रीजन्मा.. तुझी ही कहाणी’ हे स्त्रीजातीचं वास्तव आहे, हे ‘देवबाभळी’तही प्रत्यही जाणवत राहतं. आवलीच्या पायात काटा रुतला असता विठुरायानं तो काढला, हा रूढ संदर्भ ‘देवबाभळी’साठी बीजरूपात वापरला गेला आहे. तुकोबांना भंडाऱ्याच्या डोंगरावर भाकरतुकडा घेऊन जाताना आवलीच्या पायात काटा रुततो आणि साक्षात विठुरायाच तो काटा काढतो अशी प्रचलित कथा आहे. तिचा विस्तार करत लेखक-दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांनी विठोबाची पत्नी रखुमाई हिलाही तीत ओढलं आहे. आणि या दोन्ही स्त्रियांची दु:खं कशी सारखी आहेत आणि त्याकडे पाहायचा त्यांचा दृष्टिकोनही- हे त्यांनी यात मांडलं आहे. एक देवता स्त्री आणि दुसरी मर्त्य मानव. परंतु त्यांची स्त्री म्हणूनची वेदना, जगण्याबद्दलची त्यांची खोल समज आणि त्याकडे पाहण्याची त्यांची दृष्टी यांतून हे नाटय़ घडत जातं. रखुमाईचं दु:खही आवलीपेक्षा वेगळं नाही. तिच्या व्यथा-वेदनेच्या उद्गारांतून ते सहजी उमटतं..
‘राही सवे देवा, सांग काय तुझं नातं
पोरकं पाखरु! राती वसतीला हुतं
आता अबोला अबोला, देवा दिंडीराला जाते
नको करु पाठलाग, रानोमाळी भटकते’
विठ्ठलावर रुसून रखुमाई घराबाहेर पडलीय. दिंडीरवनात ती भटकतेय. परंतु तरीही आवलीच्या पायात काटा रुतल्यावर विठ्ठलाच्या सूचनेवरून ती पोटुशी आवलीची सेवाशुश्रुषा करण्यासाठी तुकोबांच्या घरी कामवाली (लखूबाई) बनून जाते. मात्र, आवली तिन्हीत्रिकाळ विठ्ठलाच्या नावाने शंख करीत असल्याने आणि त्याला शिव्याशाप देत असल्याने तिला ते ऐकवत नाही. जरी ती विठ्ठलावर रुसली असली तरी त्याचा अवमान तिला सहन होत नाही. परंतु तसं स्पष्ट सांगून आवलीवर तिला संतापताही येत नाही. कारण आवली ज्या गोष्टीकरता विठ्ठलाला कोसत असते त्या तिच्या वंचनेला आपला नवराच कारण आहे हेही तिला दिसतंय. आवली एक साधी संसारी बाई आहे. अशात तिचा नवरा संसाराकडे पाठ करून विठुनामाचा गजर करत रानोमाळ भटकत असेल तर कुठली स्त्री ते सहन करील?
रखुमाईचं दु:खही यावेगळं नाहीए. विठ्ठलाला त्याच्या भक्तांची चाकरी करण्यात धन्यता वाटते. त्यांच्यासाठी तो काय वाट्टेल ते करतो. अगदी आताही आवलीच्या सेवेसाठी त्यानंच रखुमाईला लखूबाई बनवून धाडलं आहे. पण आपल्या पत्नीचं- रखुमाईचं दु:ख मात्र तो समजू शकत नाही. आपण त्याच्या खिजगणतीतही नाही, या तीव्र जाणिवेनं ती दुखावली गेली आहे. केवळ नवऱ्याचा शब्द मोडू नये म्हणून ती आवलीची सेवा करतेय. पण तिच्या स्वत:च्या दु:खाचं काय? म्हणूनच तिला आवली आणि आपण समदु:खी आहोत असं वाटतं.
आणि ते खरंच आहे.
या दोन अलक्षित, समदु:खी स्त्रियांना एकत्र आणून लेखक-दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांनी ‘सं. देवबाभळी’ आकारलं आहे. त्यातून अखिल स्त्रीजातीच्या वेदनेलाच त्यांनी हात घातला आहे. माणसातील देवत्व आणि देवातील माणूसपण त्यांनी यानिमित्ते ऐरणीवर आणलं आहे. आवली आणि लखूबाई यांच्यातील संवाद-विसंवादातून, त्यांच्या स्वगतांतून, पतीशी होणाऱ्या त्यांच्या अप्रत्यक्ष संवादांतून त्यांचं लौकिक-अलौकिकाशी असलेलं नातं आणि जगण्याचं भान नाटककर्त्यांने ‘देवबाभळी’द्वारे सामोरं आणलं आहे. आपल्या घरात कामाला आलेली स्त्री ही विठ्ठलाची पत्नी आहे हे आवलीला माहीत नाही. परंतु तुकोबांनी तिला ‘आई’ म्हटलं म्हणजे ती भली स्त्री असणार याबद्दल तिच्या मनात संदेह नाही. दुसरीकडे लखूबाईला विठ्ठलाची ही नेमकी काय करणी आहे हे आकळत नाही. भक्त आणि त्याच्या कुटुंबीयांच्या वाटय़ाला दुर्दैवाचे दशावतार देऊन त्याला नेमकं काय साध्य करायचंय, हे तिला कळत नाहीए. आपणा दोघींना एकत्र आणण्यात आपल्या नवऱ्यांचा काहीतरी डाव असणार असा तिला संशय आहे. परंतु आपलं रूप उघड करून आवलीला ती खरं काय ते सांगू शकत नाही. त्यामुळे आवली विठोबाला देत असलेले शिव्याशाप निमुटपणे ऐकण्याखेरीज आणि मनोमनी चडफडण्याविना तिला काही करता येत नाही. आवलीनं विठोबाचा शेला आपल्या जखमेवर बांधल्याचा संताप येऊनही ती काही करू शकत नाही. या दोघींच्या आपापल्या नवऱ्याविषयी कितीही तक्रारी असल्या तरी त्याच्याविरुद्ध दुसरं कुणी एक शब्दही काढलेला मात्र त्यांना खपत नाही.
या दोघींच्या संवादांतून, त्यांच्या स्वगतांतून आणि आपापल्या नवऱ्याशी केलेल्या संभाषणांतून नाटय़ाशय पुढे सरकतो. आवली ही हाडामांसाची माणूस आहे. त्यामुळे तिच्या ठायी माणूसपणाचे सगळे गुणदोष असणं साहजिकच. रखुमाई ही स्त्री असली तरी ती एक देवी आहे. तरीही तिच्यात माणूसपणाचे रागलोभादी विकार आहेत. स्त्रीसुलभ दोष आहेत. या दोघींचा व्यावहारिक जगापासून अलौकिकापर्यंतचा प्रवास या नाटकात रेखाटलेला आहे. आवली संसाराच्या व्याप-तापांपायी स्वत:साठी जगायचं विसरली आहे. लखूबाई तिला याची आठवण करून देते. तर आवली एके ठिकाणी लखूबाईला ‘प्रत्येकानं आपल्या आपल्या वाटय़ाचं नांगरत राहावं. पाऊस येवो- न येवो..’ ही जाणीव करून देते. दोघींचा हा प्रवास अत्यंत तरल अन् हृद्य आहे.
लेखक-दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांचं हे नाटक व्यावसायिक रंगभूमीच्या रूढ चाकोरीशी पूर्णपणे फटकून आहे. जणू मुख्य धारेला पडलेलं हे एक हळुवार, ठाय लयीतलं स्वप्न आहे. कळीचं हळूहळू उमलत फूल व्हावं तसं हे नाटक उलगडत जातं. आशय, विषय, मांडणी आणि विचार यांचं असं अद्वैत फार क्वचित जुळून येतं. काव्यात्म, नादमधुर बोली हे या नाटकाचं एक वैशिष्टय़. तिला एक अंगभूत लय आहे. ताल आहे. तिचं म्हणून एक संगीत आहे. या साऱ्यांचं एकजीव संयुग म्हणजे ‘सं. देवबाभळी’! अवघ्या दोन पात्रांचं हे नाटक असलं (विठोबा आणि तुकाराम हे इथं भासमान स्वरूपात वावरतात.) तरी रंगावकाशात पोकळी जाणवत नाही. या दोघीच ती भरून काढायला समर्थ आहेत. या दोघींत जे काही घडतं ते नेमक्या शब्दांत व्यक्त करायला शब्द थिटे पडतात. ते प्रत्यक्षच अनुभवायला हवं. या नाटकाची ‘रचना’ केली गेली आहे असं बिलकूल जाणवत नाही, इतक्या नैसर्गिकपणे ते फुलत जातं. याचं श्रेय नाटककर्त्यांला जितकं आहे, तितकंच ते सादर करणाऱ्या कलाकारांनाही जातं. प्रदीप मुळ्ये यांनी मुख्य धारा रंगभूमीच्या मर्यादा उल्लंघत तुकोबांच्या घरातलं माजघर, विठोबाचं देऊळ, इंद्रायणीचा घाट, भंडाऱ्याचा डोंगर ही सारी नाटय़स्थळं सूचक नेपथ्यातून साकारली आहेत. एकाच रंगावकाशात कसल्याही विक्षेपाशिवाय ती साकारणं याला कलाकाराकडे सर्जक प्रतिभाच हवी. त्यांच्या दृश्यसंकल्पनेनं नाटकाला एक आगळीच दृश्यात्मकता लाभली आहे.(जी मराठी नाटकांतून गायब असते असा आरोप केला जातो.) प्रफुल्ल दीक्षित यांची ऋतू-प्रहरांचे विविध विभ्रम दर्शविणारी प्रकाशयोजना अप्रतिम. आनंद ओक यांच्या संगीताने नाटकाला एक ठाय, सात्विक लय दिली आहे; जी व्यावसायिक रंगभूमीच्या प्रेक्षकाला सहसा झेपत नाही. परंतु इथं मात्र ती विनातक्रार स्वीकारली गेलीय, हे विशेष. गायक आनंद भाटे यांनी तुकोबांचे अभंग त्यांच्यातल्या पवित्र, सात्विक भावासह अंतर्यामीच्या उत्कटतेतून पोहोचवले आहेत. महेश शेरला यांची वेशभूषा आणि सचिन वारिक यांची रंगभूषा नाटकाला यथार्थता प्राप्त करून देते.
हे नाटक सर्वस्वी समर्थपणे पेललं आहे ते यातल्या दोघा कलाकारांनी. शुभांगी सदावर्ते यांची आवली पाहणं हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. त्यांचं व्यावसायिक रंगभूमीवरचं हे पहिलंच नाटक आहे याची किंचितही जाणीव त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण वावरामुळे होत नाही. गायकीवरील प्रचंड हुकूमत, अभिनयाचे आरस्पानी रंग.. आणि संवादातून गाण्यात त्या कधी शिरतात हे कळतही नाही. आवलीचं लोभस व्यक्तिमत्त्व तिच्या ग्रामीण बोलीसह त्यांनी प्रत्ययकारी केलं आहे. मानसी जोशी यांनी लखूबाई तिच्या घुसमटीसह संयत, परंतु ठामपणे उभी केली आहे. दोघींची संवाद जुगलबंदी त्यातल्या सूक्ष्म खाचाखोचांसह ऐकत राहावीशी वाटते. मानसी जोशी यांचं गाणं शास्त्रीय संगीत बाजाचं असल्यानं त्यात भारदस्तपणा जाणवतो. लखूबाईचं तीव्रतर दु:ख त्या ‘कडेलोटाच्या क्षणापर्यंत पोहचून परत माघारी का फिरायचं ग आपणच?’ या सहज फेकलेल्या वाक्यातून व्यक्त करतात. हे अवघ्या स्त्रीजातीचं दु:ख आहे. त्यावर आवलीनं दिलेलं उत्तरही मननीय आहे : ‘आनी असं रुसल्यावर सोडून जायचं असतं व्हय बये? घरावर रुसून निघून गेले, आनी परत यायची इच्छा झाली तेव्हा घर जागेवर नसलं तर.? मानूस इसरून जाईल इतका अबोला बरा न्हाई आई!’ जगण्याचं सार सांगणारं आणि अलौकिकाच्या पारंब्या हाती देणारं ‘सं. देवबाभळी’ सच्च्या रसिक प्रेक्षकांनी काही केल्या चुकवू नये.
- पाथरे रविंद्र
https://www.loksatta.com/manoranjan-news/marathi-natak-on-sant-tukaram-1629806/

Monday, January 22, 2018

मटा दिवाळी अंकासाठी : नाटक : जगण्यातलं कॅथारसिस

कल्पना करा कि मी तुम्हाला एक नाणं दाखवतोय अाणि विचारतोय कि हे काय अाहे ? तुमच्याकडुन एक उत्तर येईल उदा. ’काटा’. 
तर , नाटकाची बीजे नेमकी कोठे असतात ? ह्याक्षणी मला अचानक एक अभंग अाठवतोय.
नामदेव केले स्वप्नामाजी जागे सवे पांडुरंगे येऊनिया ।। सांगितले काम करावें कवित्व वाऊगे निमित्य बोलो नको ।।
तुकोबांनीत्यांच्याकाव्यसर्जनशीलतेचे बीजं कधी रुजली ह्याची नोंद अशी करु ठेवली अाहे. जागृताअवस्थेत अाजुबाजुला घडणा-या घटनांबाबत अनभिज्ञता असलेल्या अापल्या सारख्यांकडुन अापल्या 'अशा' नोंदींच्या अपेक्षा ठेवणं म्हणजे तशी अत्युक्तीच म्हणावी लागेल. 
अापल्याच अाजुबाजुला घडणा-या एखाद्या घटनेमुळे किंवा एखाद्या एेकिव प्रसंगामुळे नाटक सुचत असेल असं नसावं. पहिल्याच धारेत घडा पुर्ण भरत नसतो. अशा असंख्य धारांचा संचय झाल्यानंतर अापणघडा भरलाअसं म्हणतो.  एखादं भाषण किंवाआसुड..’ सारख्या लेखनापेक्षा फुलेंना 'तृतीय रत्न' हा विषय नाटकातच का मांडावा वाटला असेल? तर ह्याच संचयातुन. एखादी घटना किंवा एखाद्या घटनेतुन तयार झालेली अवस्था कुठेतरी मनात घर करुन रहात असावी. अाणि अनेक तशाच घटनांची जंत्री जमली कि मग वाटतं किहा विषय मांडायला हवा.’  तेंडुलकरांच्यागिधाडेसारखं उदाहरण एखादंच. 
तेंडुलकर म्हणतात, “गिधाडेच्यावेळी मी एखादी व्यक्ती भडाभडा बोलत जावी तसं लिहत गेलो. कथा, पात्र, रचना काही काही डोक्यात नव्हतं . मुळात मीलिहतोयह्याचंच मला भान नव्हतं.” ‘एका सुस्त पडलेल्या समाजावर कुणीतरी बॉंब टाकावेअसंगिधाडेचं वर्णन गिरिश कर्नाडांनी कुठंतरी केलं होतं. पण मुळात हे नाटकचला समाजाला घडवुया किंवा समाजविघातकांना अद्दल शिकवुयाअशा भावनेनं लिहलेलंच नव्हतं. मुळात नाटक हे समाजासाठी असतं, प्रेक्षकासाठी असतं, त्यातुन प्रबोधन वगैरे करायचं असतं ह्या असल्या धास्तीतुन तेंडुलकरांनी कुठलंच लिखाण कधी केलं नाही. अाणिगिधाडे’ लिहतांना तर तसं तत्कालिन निमित्तंही नव्हतं. नाटक पुर्ण झाल्यावरमुदतीच्या तापातुन बाहेर अालेल्या माणसासारखं वाटलंअसं स्वत: तेंडुलकरांनी म्हटलंय. मग हे कसं झालं ? त्यांचं मध्यमवर्गीय जगणं, घर सोडुन एकटे मुंबईला येऊन रहायला अाल्यानंतर मोठ्या भावाचा अाजारात सांभाळ करणं हे सगळं त्यांच्यासाठी नविन होतं. पण ह्याचा अाणिगिधाडेचा तसा काहीच संबंध नाही. परंतु तत्कालिन निमित्त नसलं तरी नाटक हे माध्यम त्यांच्याअातपर्यंत शिरलेलं होतं. त्यामुळे त्या अनुभवांतुन झालेल्या अवस्थेचं रुपांतर होऊन ते लिहल्या गेलं असु शकतं. चार दिवसात कोणताही विषय डोक्यात नसतांना लिहलं. किंबहुना हे नाटक लिहतांना तेंडुलकर दुसरंच नाटक (शांतता,कोर्ट चालु अाहे) लिहित होते. ते बाजुला ठेऊन त्यांनी गिधाडे लिहुन काढलं. 
‘शांतता…’चं देखील तसंच. ह्या नाटकाला तर मानाचा ‘कमलादेवी चट्टोपाध्याय पुरस्कार’ मिळाला. पण ‘तें’ म्हणतात कि लेखकाने एखादं नाटक कसं लिहु नये ह्याचं उत्तम नमुना म्हणजे हे नाटक. नाटक केलं नसतं तर संस्था बंद पडायला येईल म्हणुन अगदी डोक्यावर बसुन लिहुन घेतलेलं नाटक. ते नाटक पण ठरलेल्या वेळेपेक्षा कमी होत असल्याने अाता काय तर … नाटकाच्या शेवटी बेणारेबाईचं स्वगत लिहुन टाकलं. अर्थात तालमी बघितल्यानंतर त्यांनी लिखाणाची पुनर्बांधणी देखील केली होती. पण नाटक लिहतांना, त्याबद्दल चर्चा करतांना कधी कधी असं बळजबरी लिखाणही करावं लागतं पण नाटककाराच्या डिएनएमध्येच नाटक असलं तर हाती अालेलं साध्य सकसच असतं ह्याचा हा नमुना.
अार्थर मिलरच्या ‘डेथ अॉफ सेल्समन’चं बीज १९४९च्या अमेरिकेच्या अार्थिक घडामोडीचं केंद्र असलेल्या ‘अमेरिक ड्रिम’ ह्या संकल्पनेत होतं. तेंडुलकरांच्या अगदी उलट, म्हणजे अापल्या नाटकातुन काहीतरी संदेश गेला पाहिजे , नाटक प्रेक्षकाला डोक्यात ठेऊनच लिहलं गेलं पाहिजे अशी त्यांची धारणा होती.
एलकुंचवारांचा जन्म ‘वाडा चिरेबंदी’ सारख्याच वाड्यात झाला. त्यांचे वडिल तिथले जमिनदार होते. एलकुंचवार कुटुंबाची जरी ‘वाडा..’तल्या देशपांड्यांसारखी परिस्थिती नसली तरी अाजुबाजुला असे अनेक वाडे त्यांनी ढासळतांना पाहिले होते. स्वातंत्र्योत्तर काळातल्या अशा कुटुंबाची घुसमट अाणी कोलमडण्याबद्दल एलकुंचवार एकदा सत्यदेव दुबें बरोबर चर्चा करत होते. दुबेजी सुद्धा अशाच पार्श्वभुमीमधुन अालेले असल्याने त्यांनी त्यांच्या एका लिथार्जिक मनोवृतीच्या मित्राचा दाखला दिला. बदलाशी जुळवुन न घेणा-या अशाच एका परिवारातल्या त्याने एक ट्रॅक्टर घेतला जो त्याने कधीच वापरला तर नाहीच पण नंतर कधी विकलाही नाही. तो तसाच अंगणात पडुन राहिला. अाणि हीच ट्रॅक्टरची प्रतिमा त्यांनी नाटकात वापरायची ठरवली. ट्रॅक्टरच्या प्रतिमेने विचारांची घुसळण सुरु केली अाणि मग ‘वाडा चिरेबंदी’च्या पात्रांनी हळुहळु अाकार घ्यायला सुरवात केला. 
शेक्सपिअर अाणि त्याच्या नाटकविषयक तथ्यांच्या तर अाता मिथ्यकथा झाल्या अाहेत. तो दिवसा खाटीकखान्यात अाणि रात्री नाट्यगृहाच्या अावारात अालेल्या प्रेक्षकांच्या घोडागाडी सांभाळत होता म्हणे. नाट्यगृहाची पार्किंग ते नाट्य जगतातला सर्वश्रेष्ठ नाटककार ह्या प्रवासात कितीतरी मनात घर करुन बसलेल्या गोष्टींनी मुर्त रुप धारण केलं असेल. तत्कालीन गरीबी , बेरोजगारी अाणि मध्यमवर्गीयांच्या द्विधावस्था बघुन बादल सरकारांचे ‘एवम इंद्रजीत’ अाकाराला अाले. सफदर हाश्मींची नाटकं तर सरळ सरळ यंत्रणेच्या विरुद्धची बंड असायची. तत्कालीन एखाद्या समाजविरोधी घटनेने पेटवलेल्या ठिणग्यांचं रुपांतर ते नुक्कडच्या माध्यमातुन वणव्यात करण्यात वाकबगर होते. अशा नाटककारांची नजरच अशी तयार झालेली होती कि अाजुबाजुला दिसणा-या अन्यायाला वाचा फोडणं हे त्यांचं साध्य होतं अाणि नाटक हे साधन.
हि उदाहरणं एवढ्यासाठी की बहुतांशी हि नाटकं पाहिलेली, वाचलेली असतील मग त्यांच्या मुळाचा अंदाज घेणं सोपं पडेल. सरतेशेवटी अापण पुर्ण तयारीने लिहायला बसलेलो असु द्या किंवा काहीही डोक्यात नसतांना नुसतंच लिहायला बसु द्या परंतु कळत नकळत अापल्याच जगण्यातल्या तुकड्या तुकड्या पासुन अखेरीस एक कॅलिडोस्कॉप तयार होतो. एकुण जगण्याचंच कथारसिस म्हणजे नाटक. हि वरची अनेक यशस्वी उदाहरणं तर त्याच दिशेने अंगुलीनिर्देश करताय. 
मी एकदा जेवण करत असतांना समोर बातम्यांमध्ये, अोरिसाची एक बातमी बघितली. अॅंब्युलंसला पैसे नसल्याने खांद्यावर बायकोचं प्रेत वाहुन नेणा-या एका माणसाची बातमी. मी प्रचंड अस्वस्थ झालो. कुठेतरी 'हे असं' घडतंय अाणि त्याच कुठेतरी पासुन काही शे अंतरावर असलेले अापण निवांत जेवण करतोय? ह्या सगळ्याचा मला प्रचंड तिटकारा अाला. नंतर अनेक दिवस ते दृश्य छळत रहायचं. वरवर तुम्ही चॅनल बदलुन भौतिक देहाला फसवु शकाल पण अंत:करणाच्या पडद्यावर तेच चित्र लूप मध्ये चालु राहतं. त्याच दरम्यान मला विचारणा झाली अाणि मी '१२ किलोमिटर' लिहुन काढलं. अाता फक्त तेवढी बातमीच कारणीभुत होती असंही नाही. कारण नंतर तशीच एक बातमी पुन्हा वाचण्यात अाली त्यावर मला लिहावं नाही वाटलं. जेवण अाणि बातमी पैकी एकच गोष्ट जर मी करत असतो तर ह्या लिखाणाचे बीज मिळाले नसते. अाणि एकुणच अाजवरच्या यंत्रणेवरच्या कडेलोटातुन हे अालं असावं.
माझ्या जगण्याच्या चारही बाजुने प्रिझम फिरला गेला पाहिजे. जिथे रंगांचा पसारा प्रकट झाला ती तिरिप अापली. पण अट हि अाहे कि प्रिझम सातत्याने फिरला पाहिजे. स्वत:बाबतीत तर माझे मत फारच निष्करुण अाहे. माझ्यातला लेखक स्वार्थ पाहतो. मला ज्या गोष्टींचा त्रास होतो ती गोष्ट माझ्या यंत्रणेबाहेर गेली पाहिजे हि माझी प्राथमिक गरज होऊन बसते. हा त्रास जाऊन माझा त्रास कमी झाला पाहिजे. इतकं साधं. कधी कधी असंही होतं कि फक्त एखाद्या पात्राच नाव, एखादी अाकृती दिसते अाणि अापण ती कुठेतरी नोंदवुन ठेऊन देतो. योग्यवेळी ते पुढे येतं. त्याच्या तसं पुढे येण्याला कालमर्यादा नाही. अंगणातल्या झाडाला एखादं फळ अाल्यावर कसं अापण ते धान्यात पिकायला ठेवतो तसं असतं ते.
मजुरावरचं नाटक लिहुन लगेच कुठेतरी मजुरांचा रोज वाढणार नसतो कि दुष्काळावर लिहुन लगेच पाऊस पडणार नसतो. एखाद्या मानवी संबंधांवर लिहुन लगेच माणुस आत डोकावून पहातही असेल पण वागण्यात लगेच बदल घडेलच असं नाही. पण मांडलं जाणं गरजेचं आहे. त्याची नोंद गरजेची असते.  

सुरवातीला दाखवलेल्या नाण्याला तुम्ही 'काटा' म्हटला होतात ना? पण माझ्याबाजुने तो 'छापा' होता. माझा छापा तुमचा काटाही असु शकतो. मी फक्त माझं गवसलेलं मांडलं. इतकंच.

संगीत देवबाभळी ( दिव्य मराठी)

संगीत देवबाभळी... रंगभूमीचे अायाम बदलणारी एक विठूसावळी कलाकृती. मच्छिंद्र कांबळींच्या अाणि अाता प्रसाद कांबळींच्या भद्रकाली प्राॅडक्शनने मंचावर साकारलेली ही देहूनगरी. रंगसंगीत एकांकिका स्पर्धेत राज्यात प्रथम पारिताेषिक मिळवलेल्या प्राजक्त देशमुख लिखित, दिग्दर्शित अाणि अानंद अाेक याने संगीतबद्ध केलेल्या ‘संगीत देवबाभळी’ एकांकिकेचे विठूमय दाेन अंकी नाटक.

विठ्ठलभेटीची अास असतेच, पण याच भेटीत जेव्हा अापण विठ्ठलचरणी नतमस्तक हाेताे तेव्हा कुठे तरी काही तरी हरवल्यासारखं वाटतं अाणि ते हरवल्यासारखं असतं तिथे रखमाबाईचं नसणं. तिला भेटायला वळसा घालून जावं लागतं. हा वळसा का घालावा लागताे... विठूमाउलीचे अाणि रखमाबाईचेही अंत:करण तेव्हा काय म्हणत असेल... अापण विठूरायाला माउली म्हणताे म्हणजेच त्या स्पंदनात कुठेतरी बाईच्या भावनांचा प्रवाह वाहत असताे, रखमाबाईचा तर हा प्रवाह अापण अविरत बघतच अाहाेत... बाईच्या मनात चाललेला हाच कल्लाेळ जेव्हा तुकारामबुवांच्या अवलीच्या रूपाने उभा राहताे तेव्हा ताे प्रवाह रहात नाही तर त्याचा अंत:करण स्पर्शातून ‘विठ्ठल, विठ्ठल’ असा हरिनाम हाेताे अाणि अापणही इंद्राणी डाेहातील त्या हरिनामात कधी प्रवाही हाेऊन जाताे ते कळतही नाही... तल्लीनतेची ही राेमांचकारी अनुभूती मिळते संगीत देवबाभळीतून...

संगीत देवबाभळी... रंगभूमीचे अायाम बदलणारी एक विठूसावळी कलाकृती. मच्छिंद्र कांबळींच्या अाणि अाता प्रसाद कांबळींच्या भद्रकाली प्राॅडक्शनने मंचावर साकारलेली ही देहूनगरी. रंगसंगीत एकांकिका स्पर्धेत राज्यात प्रथम पारिताेषिक मिळविलेल्या प्राजक्त देशमुख लिखित, दिग्दर्शित अाणि अानंद अाेक याने संगीतबद्ध केलेल्या ‘संगीत देवबाभळी’ एकांकिकेचे विठूमय दाेन अंकी नाटक. अवलीच्या मानसिकतेतून जरी नाटक पुढे जात असले तरी रखुमाई म्हणजेच नाटकातील लखुबाईच्या वेदना रसिकांच्या हृदयाच्या खाेलवर जातात. संगीत नाटक म्हटलं म्हणजे खूप रागदारी, अालापी अाणि नाटकात गाणी किंवा संगीत ठासून भरणे... असा एक समज झाला अाहे. मुळात अाता फारशी संगीत नाटकंच रंगभूमीवर येत नाहीत. पण, प्रसाद कांबळींनी तेच धाडस केलं अाणि एक वेगळ्या धाटणीची नाटकवारी मंचावर अाणली. विठ्ठलभेटीची काेणतीही अास मागे साेडली नाही. मुळातच विठूगंधासारखी संहिता, तुळशीमाळेसारखं संगीत अाणि अवलीच्या भूमिकेतील शुभांगी सदावर्ते अाणि लखुबाईच्या भूमिकेतील मानसी जाेशी यांचा पंढरीच्या कळसासारखा अभिनय. विठूने कंबरेवर हात ठेवावे अाणि सगळा कल्लाेळ शांत हाेऊन अापण इंद्राणीच्या पाण्याने त्याच विठूरायाचे चरण धुवावे ही अनुभूती प्रफुल्ल दीक्षितच्या प्रकाशयाेजनेची अाणि साक्षात देहूत जाऊन विठूरूपात तुकाेबांचे दर्शन देणारं प्रदीप मुळ्ये यांचं नेपथ्य. यामुळे चार दिंड्या एकत्र येऊन त्या चार टाेकांवरील मनांचं रिंगण जेव्हा फेर धरून रसिकरूपी वारकऱ्यांच्या भावानुभूतीला स्पर्शून जातं तेव्हा विठ्ठलाशी कडकडून राेमांचकारी अालिंगन हाेते अाणि अवघा रंग देवबाभळी हाेऊन जाताे.

मंचावर अनेक वर्षांनी अशी वेगळ्या धाटणीची संगीत कलाकृती सजली. गर्भार असलेली अाणि तुकाेबांच्या विठ्ठलभक्तीमुळे अत्यंत वैतागलेल्या अवलीच्या पायात तुकाेबांना रानात शाेधताना देवबाभळीचा काटा रुतताे अाणि हाच काटा चार मनांतली संवेदना-कल्लाेळ, भक्ती-तुसडेपण, मानसिकता-हताशपण, सामान्यपण ते देवत्व, नकार अाणि नकारातील स्वीकार, जाणीव-जाणिवांचा उद्धार, अश्रू अाणि अास असं सगळंच दाखवून जाताे तेव्हा थाेड्याफार फरकाने ताे काटा कुठेतरी अापल्यालाच बाेचलेला नाही ना? असा सवाल अापणच अापल्याला विचारताे अाणि नाटक नव्हे तर अापण मंचावरी कधीही न दिसलेल्या विठूनामात तल्लीन हाेऊन विलिन झालेल्या तुकाेबाला कधी भेटताे, मंचावर असलेल्या फूटभराच्या विठ्ठलमूर्तीतून माउली कधी प्रत्यक्षात दर्शन देते अाणि संवेदनांचे अश्रू झेलते ते अापण अाजपर्यंत किती वेळा अाई म्हटलाे हे जसे सांगता येत नाही तसेच अाहे. काटा जरी अवलीला बाेचला तरी वेदना मात्र रखुमाईला झालेल्या अाहेत. एकीकडे रूसून पाठीमागे गेलेली रखमाई जशी अाहे तशीच संसारातून अंग काढून केवळ विठूभक्तीत रमलेल्या तुकाेबांवर रूसलेली अवली अाहे. दाेघींची वेदना एकच. पण, एकीत देवत्व तर दुसरीचं सामान्यपण. अवलीचं माउलीला शिव्याशाप देणं अाणि अापल्या पतीला लागलेला बाेल रखमाईला सहन न हाेणं. त्यातून तिचा विठूरायाशी हाेणारा वाद... कित्येकदा हा वाद तिच्या मनातलं द्वंद्वच अाहे म्हणूनच या द्वंद्वातच मग तिच्या रूपातूनच स्वत:बराेबरच माउलीचेही दर्शन देऊन जाते. दुसरीकडे दाेघींचाही मंचावर फक्त प्रतीकात्मक असलेल्या तुकाेबांशी चाललेला संवाद नश्वरतेच्या अनुभूतीचं अत्युच्च टाेक दाखवून जाताे अाणि अापण देवबाभळीने झालेल्या जखमेच्या तळाशी येऊन पाेहाेचताे.

मुळातच संहिताच अत्यंत पराकाेटीची सुंदर. रखुमाई अवलीला म्हणते की ‘अापण अापलं नांगरत रहावे, पाऊस येवाे न येवाे’ किंवा ‘मग मी अाणि तू दाेघी गाभाऱ्याबाहेर अाहाेत पण, तू मात्र गाभाऱ्याबाहेर राहूनही गाभाऱ्याचा घुमारा झालीस...’ असे संवाद संवेदनशील रसिकांच्या अंगावर शहारा उभा करणार नाहीत तर नवलच. तसेच ‘करपायच्या अात खरपूस झाल्या झाल्या उलथायची भाकरी, फाेडणी तांबूस झाल्या झाल्या अाेतायची भाजीत, ऊतू जायच्या अात उतरवाचं भांड... का? कडेलाेटाच्या क्षणापर्यंत पाेहाेचून पुन्हा माघारी का गं फिरायचं अापण बायकांनीच?’ एक बाईही बाईच्या मनाचा असा खाेलवर विचार करणार नाही ताे प्राजक्तने लिहिलेल्या अनेक संवादांतून झालेला दिसताे. या नाटकात प्राजक्तने काही अभंग अाणि गाणीही लिहिली अाहेत ती अानंद अाेकच्या अविट संगीतातून उमटली अाहेत. अवलीची चिड, वैताग हा पराकाेटीचा हाेताे तेव्हा ती म्हणते की,

माझ्या काेटी शिव्या। तुझ्या येवाे ठायी ।
विटे तुझ्या पायी। तडे जावाे।।
किंवा मग
इझू दे रे देवा। इझू दे रे।
अंतरीची पिडा । इझू दे रे।।
सजू दे रे देवा। सजू दे रे
पायातळी काटा। सजू दे रे।।

एवढ्या प्रगल्भतेने हे अभंग येणं यामागे तुकाेबांचा केलेला अभ्यास स्पष्टपणे दिसून येताे. 
लेखनाबराेबरच प्राजक्तच दिग्दर्शनही भन्नाटच म्हणावं लागेल. तुकाेबांचं घर, त्यांची बसण्याची जागा अाणि इंद्रायणी नदी अशा साधारणत: महत्त्वाच्या तीन ठिकाणी नाटक घडतं. पण पाठमाेरी कमबरेवर उभी राहिलेली रखमाबाई असाे, विठ्ठलाच्या कानात बाेलणारी रुख्मिणी असाे वा राधेवर चिडणारी रखमाई असाे नाहीतर अवलीची सेवा करणारी लखुबाई असाे. दिग्दर्शनात तिच्या या रूपांचा अत्यंत काैशल्याने वापर झाला अाहे. तेच अवलीच्या बाबतीतही. गर्भार असलेल्या अवलीचे काटा रुतून पडणे, तुकाेबांना शाेधणे, विठ्ठलाला शिव्याशाप देणे, इंद्रायणीची तिला भीती वाटणे अशा सगळ्याच बाबी तुकाेबांचे माजघर, बैठकीची जागा अाणि इंद्रायणीच्या पायऱ्यांवर घडताना दिग्दर्शक म्हणून कमाल जाणवते. या सगळ्याचा कळस ठरताे ते म्हणजे नाटकाचे संगीत. संतवाणी नाटकात येते म्हणजे अर्थातच पखवाज अालाच. तबला, संवादिनी, टाळ-चिपळ्या ही पारंपरिक वाद्ये तर अाहेतच, पण अनेक गाण्यांमध्ये एकतारी, सतार, स्वरमंडलाचा केलेला वापर रसिकांना डाेलायला लावताे. करी ताे कवित्व, येई गा विठ्ठला ही गाणीच मुळात अानंदगंधर्वांनी म्हणजेच अानंद गंधर्व यांनी गायली अाहेत. त्यांच्या अावाजातून तुकारामाची भेट हाेते. ती भेट संगीताच्या माध्यमातून हाेते अाणि रसिकाही डाेलायला लागतात.

नाटकाची प्रकाशयाेजना तर थेट देहूत घेऊन जाते, मग ते इंद्रायणीचे पाणी असाे, तुकाेबांची बसण्याची जागा असाे किंवा अवलीचा संसार असाे. प्रकाशयाेजनेतून मंचावर संपूर्ण अंधार अाणि कधी फक्त तुकाेबाच दिसतात तर कधी फक्त विठूमाउली दिसते. त्यावेळी जिवंत हाेते देहूनगरी. एवढं सगळं असताना सगळ्यात माेठी जबाबदारी येते ती म्हणजे अभिनयाची. अवली अाणि लखुबाई अशा दाेनच पात्रांभाेवती नाटक फिरते, पण त्यांना मंचावर मात्र अाणखी दाेघांना दाखवायचे अाहेे ते म्हणजे विठूमाउली अाणि तुकाेबांना. अशावेळी शुभांगी सदावर्ते अाणि मानसी जाेशी यांचा कस लागताे. ही पात्रं सर्वसामान्य नाहीत किंवा ही कथाच सर्वसामान्य नाही याचा पुरेपूर अभ्यास या दाेन तरुण अभिनेत्रींनी केला अाणि चारही पात्र रसिकांसमाेर जिवंत केली. नाटकाची व्यावसायिक गणितं जरा वेगळी असतात. या नाटकात ती गणितं किती अाहेत ते येत्या काही प्रयाेगांतून दिसेलच. पण, रंगभूमीला एक नवा मेकअप देण्याचा यशस्वी प्रयत्न या नाटकाने नक्कीच केला अाहे असे म्हणायला काहीच हरकत नाही. शेवटी काय तर

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। 
शब्दांचीच वस्त्रे यत्ने करू।।
शब्दचि आमुच्या जीवीचे जीवन। 
शब्द वाटे धन जनलोका।।

हे जनलाेकासाठी असलेला शब्दच संगीत देवबाभळीतून रसिकांपर्यंत पाेहाेचले अाहेत. प्रयाेगागणिक काही सुधारणा हाेतीलही पण, प्रत्येक विठूभक्ताने एकदातरी देवबाभळीची वारी केली तर त्याला विठ्ठलाबराेबर तुकाेबा, रखुमाई अाणि अवली यांच्यातून कुठेतरी स्वत्वाचा शाेध लागले हे मात्र निश्चित.

- पीयूष नाशिककर
piyushnashikkar@gmail.com
लेखकाचा संपर्क - ७७७००५९००९
https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-IFTM-piyush-nashikkar-write-about-play-sangit-devbhabali-5795942-PHO.html

Friday, November 3, 2017

मास्तर उवाच ( जागतिक रंगभुमी दिन) ५ नोव्हेंबर २०१७


प्रति ,
तोंडाला रंग लावलेल्या 
जागतिक सगळ्यांना
सनविवि,
त्याचं झालं अास्सं कि गेल्यावर्षी अाम्ही सगळ्या गावक-यांनी एका अोळीची पाण्याची गीता सांगायला मावळवाडीची वेस अोलांडायची 
ठरविली. ह्ये तांडा निघाला ना अामचा. संभ्या , चंद्री तांड्याच्या सगळ्यात पुढं. अानी गावक-यांच्या तांड्यासोबत काय कमीजासं पहाला गावाचे खंदे लोकं बी होते. जशे कि मलेरिया डाक्टर, तुणतुणंवाला मास्तर, गाणारं गुरुजी, तहसिलदार बाई, चायवाला, कंडक्टर, बायजा, पुर्वी, शांताक्का, असे हाय नाय ते समदे . अाणि सगळ्यात शेवटाला मी. कसंय शेवटी अासलं कि मागं वळुन पाह्यल्यावं तांड्यांने किती वाट तुडवलीय हे तं दिसतंच पन तांडा कुठं चाल्लाय ह्ये पन पटदिशी कळतं. 
गायकवाड चौकातल्या दत्ताच्या देवळाजवळच्या सच्चा पीराच्या सांगण्यावरुन अाम्ही सुरवात केली. गावापासुन सुरु झालेली अामची गीता समद्या लोकांना ‘काय त्येच त्येच टुमणं’ वाटंल असं वाटलं होतं पन तसं नाई झालं अो ! जो तो म्हणायचा हे ‘जिवाला घोर लावणारं अाहे’ , ‘तुमच्या गीतेपायी अामचा अावंढा बाटलीचं बूच वाटुन श्वास अडकायला झाल्तां’. काही सुशिक्षित लोकं ‘हे फारच जिवघेणंय, अस्सल मातीतमदलं’ वगैरे पन म्हणाले. ‘पानी नाही पाणी म्हणा’ सांगणा-या मंडळींना तहानेची व्याकुळता कळाल्याने त्यांनी कुणी तसली दुरुस्ती सुचवायचा प्रयत्न कधी केला न्हाई. शेवटी ‘पानी-पानी म्हणत मेले काय अाणि पाणी पाणी म्हणत मेले काय’ मरणा-यांच्या फक्त नोंदी घेणा-यांबद्दल किती शिरिअस रहायचं हे अाधीच गीतेत लिहुन ठेवलंय ते एक बरं होतं. 
अामचा प्रवासाची गंमत हि होती कि प्रत्येक थांबा अाम्हाला अामचाच वाटायचा. नक्की शेवटं ठरवुन ‘झेंडा तिथं जाऊन रोवायचा’ हे असलं अाम्ही ठरवलंच नव्हतं. जिथं जाऊ तिथं तिथं झेंडा रोवायचा असंच ठरलं प्रवासात अामचं. थोरामोठ्यांयच्या पाया पडल्यावर ते अाशिर्वाद द्यायचे तवा अाम्ही ‘अाशिर्वादापेक्षा दोन हंडे पानी द्या म्हनायचो’ ते त्यांनला अाधी अागोचरवानी वाटलं अासलं पन अाम्ची गीता एेकल्यावर त्यांना त्यातली खोली कि काय म्हणता ती अाकळली अासलं. खोल डोहापेक्षा पिचलेल्या अॅल्युमिनअम हंड्यातलं पानी कधी पहा मग कळलं कि खरं ‘गहन’ काय असतं ते !
भाषेचा अडसर अोलांडणारी अाम्ची गीता दिल्लीला पोहोचल्यावं ख-या अर्थाने कळालं कि अापन ज्ये करतोय त्ये किती महत्वाचं हाय. तसं सगळं दुन्येला माहिती असतं पन कुनतरी शिक्का मारल्याबिगर दुन्या झुकत बी न्हाई तसंच झालं. दिल्लीनं ‘या’ म्हनल्यावर ‘अामची गीता जागतीक का काय म्हंता तशी झाली’. जेव्हा गीता एेकल्यावं लोकं टाळ्या वाजवित उभी राहिली तेव्हा टाळ्या वाजवणारी मंडळी हळुहळु अस्पष्ट दिसाय लागली. अानी अासं काय हुतंय हे कळेपर्यंत डोळ्यातला चोरटा थेंब गालावर अाला. 
दिल्लीचं एकवेळ समजलं पन बिहार सारख्या अगदीच मराठीचा मागमुस नसलेल्या ठिकानी दिल्लीपेक्षा जास्ती गळाभेटी झडल्या तवा अाम्ही जरा बुचकाळ्यात पडलो कि नाटकानं संगीताचा अांगडं टोपडं घातलंय कि काय जणु . कारण संगीत म्हंजे लईच जालिम विद्रोही प्रकरण. कसलंच बंधनं न्हाई तेला. मंग जरा डोक्यातली ढवळाढवळ अाणखी शांत झाल्यावर लक्षात अाल्तं कि ‘माणुस नावाच्या त्वचेला एकदम घट्ट चिकटलेल्या वेदनेला संगीत काय, नाटक काय, गीता काय कशातही बांधा. ती थ्येट पोहचणारंच. अामची माई लहानपनी सांगायची ‘पाण्याचा धर्म असतो’, ‘पाण्याला न्हाई म्हणु नई’. दुन्येने अामच्या माईला खोटं पाडलं न्हाई ह्याचं लई बरं वाटलं. अामच्या पाण्याच्या गीतेला सगळ्यांनी डोस्कावर नाचवलं. ठाण्या-मुंबईला लोकांयच्या डोळ्याचा कडा पानावल्या. एक पांढ-या केसाची म्हातारमाऊली तर बोचकंभर पैशे घेऊन थेट स्टेजावर चढली अानी म्हणाली हे राहु द्या. नंतर माईक हातमदी घेऊन गहिवरल्या स्वरात म्हनली ‘ माझ्याकडे अात्ता इतकेच पैसे अाहे म्हणुन तितके दिले कृपया ते तुमचं मुल्यमापन अाहे असं कृपा करुन समजु नका’. अामच्या चारदोन शब्दानी लोक पसापसा पैसे अोंजळीत टाकुन जात्येत हे पाहुन खरं सांगतो अातडीला पीळ पडला. 
अशी कितेक गावखेडी असतील, रुसलेल्या निसर्गाचे पाडे असतील जिथं सरकारी अोलावा नसेल पोचत पण अापुलकीची अोल पोचतेच. देशादेशात, राज्याराज्यात ,कितीही भिताडं उभी करा पन मनं जुळली कि कापुरासारखी सगळी अंतर नाहीशी हुत्यात. 
हे सगळं वै श्विक अनुभव कुठे अनुभवलं अाम्ही? तर एका रंगमंचावर अनुभवले. 
विंगेत डफडी,तुणतुणंवाले संभ्याच्या बापाला परत परत मरतांना पहाचे, परत परत संभ्या बापाला अागीच्या हवाले करायचा, चंद्री परत परत सोडुन गेलेल्या नव-याच्या अाठवणी कोरड्या हंड्यात पहाची, मास्तर परत सगळा धीर एकवटुन मरणाला मिनतवा-या करुन संभ्यापुढं धीरानं उभा रहाचा. सगळं त्येच त्येच परत परत. कापल्यानंतर काळ जातो तशी कट्यारीची धार बोथट होत जाती पण हिथ मात्र नव्यानं काळीज कापल्या मावळवाडीच्या दु:खाला  प्रत्येक वेळी नवी धार यायची. 
काय होती अामची एक अोळीची पाण्याची गीता ? असा कोण्चा अाशावाद सांगत सुटलो होतो? असं कोण्चं तत्वज्ञान मांडत निघालो होतो अाम्ही मावळवाडीवाले ? हेच कि  ‘शेवटी उशीरा का होईना पाण्याचा टॅंकर येतोच’ अानी फक्त अापल्या गावाची वेस अोलांडली कि समदं जागतिक असतं. ह्याच अामच्या उण्यापु-या हंडाभर चांदण्या. 

- अापलाच मास्तर (मुपो: मावळवाडी)

अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...