Thursday, July 23, 2015

बॅकबेंचर्स : २. ज्याचा त्याचा विठ्ठल

प्रिय तुक्या ,

  सनविवि  अरे हो नव्हत लिहायचं ना. काय म्हणतंय शहर लेका ? माझं कॉलेज अजुन सुरु नाही झालं. म्हणजे कागदोपत्री झालंही असेल पण इकडे पंचायतीच्या निवडणुकीच्या धामधुमीत अापल्या शाळा कॉलेजांच्या बिल्डींगी दिल्या अाहे. त्यामुळे इथे सध्या फक्त राजकीय वर्ग भरताय. माझ्या चांगल्या अक्षरामुळे मला याद्या करायला बसवतात कधीकधी. मी अापल्या वर्गाच्याच शेवटच्या बेंचवर बसुन ते काम करतोय सध्या. खिडकीमधुन टोळक्यांच्या गप्पा अाणि सुध्या चहावाल्याच्या टपरीच्या रेडिअोमधले रफी-मेंहदी हसनचे अमृतगाणी ऎकु येतात. तुला सांगतो मला जाम डाऊट अाहे कि रफीची गाणी गुणगुणत हा चहा बनवतो म्हणुन याचा चहाला वेगळी चव अाहे, लय अाहे. तो सांगतो ते अालं-इलायची सब झुट ! लास्टबेंच वर बसुन याद्या लिहता लिहता टोळक्यांच्या गप्पा ऎकुन एक नक्की कि काही लोक बिनबुडाचे तांबे अाहेत. 
परवा अापल्या शाळेच्या पटांगणात एका दिंडीचा थांबा होता. किर्तन-हरिपाठाच्या तालावर मी नकळत अाठ पानं लिहली बोल. जरा वेळाने अचानक पाऊस अाला सगळी लोकं झाडाच्या अाडोशाला किंवा तंबुत घुसली. ह्या गदारोळात पांडुरंगाची तीनेक फुटी पितळी मुर्ती तशीच पाऊसात कटीवर हात ठेऊन मनसोक्त भिजत होती. मी भरपावसात जाऊन सुध्याच्या टपरीवरुन एक चहा अाणि येता येता विठ्ठलाची मुर्ती उचलुन अाणली. अाता लास्ट बेंचच्या खिडकीतुन मी अाणि पांडुरंग निथळत बाहेर बाहेरचा पाऊस डोळ्यात साठवत होतो अाणि सोबत चहाची वाफ. तुका म्हणे आम्ही बैसलों शेजारीं । करील तें हरी पाहों आतां । तंबूत टाळगाथा सुरु केली होती कुणीतरी. काय योग !
अापल्या लास्टबेंच वर विठ्ठलाला बसवलं,लेका. अाहेस कुठे ? त्याच्या शेजारुन खिडकीत पाहतांना 'तो वरतुन बघतांना' कसा बघत असेल याचा फिल अाला. पाऊस, तंबु, पलिकडे टपरीवर चहाचा ढग, छत्रीत डोकं लपल्यामुळे पाय असलेल्या छत्र्या झपझप चालतांना दिसत होत्या. अाहे कि नाही जादु ? तू विचारतो ना अनूभुती म्हणजे काय हेच ते. तेच हे. मग काय गणिताचा तास संपावा तसा जरावेळाने पाऊस संपला. अाणि मी निमूटपणे ज्याचा विठ्ठल त्यांना सुपूर्द करुन अालो.तिथे अाजीबाईं त्यांच्या नातवाचं डोकं पदराने पुसत होत्या. मी विठ्ठल दिल्यावर नातवाला सारुन त्यांनी ह्या माऊलीला पुसायला घेतलं.शेवटी ज्याचा त्याचा विठ्ठल. काय !


तुझा 
माऊल्या

Wednesday, July 15, 2015

बॅकबेंचर्स - १ टॅंजंट

प्रस्तावना : दोन गावाकडचे घनिष्ठ मित्र. त्यातला एक शहराकडे शिकायला गेला अाहे. एक गावातच. त्याच्यातला ह्या पत्रव्यवहाराची मालिका. अाणि मागल्या बेचंवरुन उलगडणारे त्याचे भावविश्व 


प्रिय माऊल्या , 

सनविवि लिहायचा नियम शाळेत मारोती मास्तरांनी सांगितला असला तरी मला तो अापल्यात पाळायची गरज नाही वाटत. पण बरका तुझी पत्राची कल्पना भन्नाट अाहे. अापण एकमेकांना नेहमी पत्रच लिहित जाऊ. अाज कॉलेजाचा पहिला दिवस संपल्या संपल्या खोलीवर येऊन तुला पत्र लिहायला घेतलं. तू इथं पाहिजे होता. इथं शहरात पोरंसुद्धा जंटलमंटल दिसतात म्हणुन मी अापला गुमान मागल्या बेंचावर जाऊन बसलो. दिवसभर फक्त सर लोकांनी अोळखीपाळखी करुन घेतल्या. इथं खिडकीतुन काहीच दिसत नाही. अापल्या शाळेतल्या प्रत्येक खिडकीतुन गुलमोहर, सावळ्या अाईचं देऊळ, शिवाईची टेकडी ह्यापैकी काहीतरी दिसायचंच. इथंल्या खिडक्यांमधुन पलिकडच्या इमारतीची खिडकी, गिरणीची चिमणी अाणि जास्त डोकावुन पाहिलं तर फुंकर मारल्यावर पळुन जाणा-या मुंग्यासारख्या सिग्नलवरच्या गाडया दिसतात. पहिल्या दिवस होता म्हणुन जरा टरकलीच होती. इथले वर्ग खुप मोठे अाहे. एखाद्या मास्तराने लक्ष नाही म्हणुन खडु मारला तर पोहचेल कि नाही हि शंकाच वाटते. तुला पाठवलेलं पत्र घरी पोहोयच्या अात पोस्टातुन घेऊन टाकत जाशील का ? नाही म्हणजे इथल्या पोरींबद्दल सांगायचं होतं. तू इंग्लिश शिकवायचा त्यामुळे फिजिक्स,केमेस्ट्री समजायला सोप्प जातंय. तुझं कॉलेज सुरु झालं का ? तू सोबतीला नसल्यामुळे कोणताच वर्ग बुडवायचा नाही ठरवलंय. तू इथं पाहिजे होता. सोबत असता तर जोडीने 'टॅंजंट' मारला असता. खोलीवर पार्टनर म्हणुन एक 'जेजे'चा पोरगा अाहे. जादु अाहे जादू. कसली चित्र काढतो. पण कमी बोलतो. जे बोलतो ते तुझ्यासारखं.माझ्या तर साला एकदम टॅंजंट जातं कधी कधी. म्हणजे निर्वात, क्षितीज, अाणीबाणी, सुर्यडुबी, लॅंपपोस्ट असं सगळं बोलतो तो. काल शेवटल्या बेंचावर माझ्या शेजारी एक पोरगा होता त्याने चालु वर्गात तंबाखु मळली. मला ही म्हणाला 'डबल मळू का?' खरं सांगतो टरकली माझी त्यात पलिकडची दोन वेण्याची.... नाही ते नंतर सांगतो. गोदीला वासरु झालं का? उत्तराची वाट पाहतोय. पुढल्या अाठवड्यापर्यंत लिही. सोप्पं लिही.
इथं सगळं ठिक अाहे. वर्ग तसेच पण थोडे मोठे, गोंधळ तोच पण अनोळखी, अाणि शेवटचा बेंच तोच पण शेजारी तू नाही.

तुझा दोस्त
तुक्या

ताक : सोबत जेजेवाल्या मित्राचं एक छोटं स्केच पाठवतोय. जादू रे साला जादू.


- प्राजक्त १५ जुलै १५

(दै सामना २५ जुलै फुलोरा )

अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...