प्रस्तावना : दोन गावाकडचे घनिष्ठ मित्र. त्यातला एक शहराकडे शिकायला गेला अाहे. एक गावातच. त्याच्यातला ह्या पत्रव्यवहाराची मालिका. अाणि मागल्या बेचंवरुन उलगडणारे त्याचे भावविश्व
सनविवि लिहायचा नियम शाळेत मारोती मास्तरांनी सांगितला असला तरी मला तो अापल्यात पाळायची गरज नाही वाटत. पण बरका तुझी पत्राची कल्पना भन्नाट अाहे. अापण एकमेकांना नेहमी पत्रच लिहित जाऊ. अाज कॉलेजाचा पहिला दिवस संपल्या संपल्या खोलीवर येऊन तुला पत्र लिहायला घेतलं. तू इथं पाहिजे होता. इथं शहरात पोरंसुद्धा जंटलमंटल दिसतात म्हणुन मी अापला गुमान मागल्या बेंचावर जाऊन बसलो. दिवसभर फक्त सर लोकांनी अोळखीपाळखी करुन घेतल्या. इथं खिडकीतुन काहीच दिसत नाही. अापल्या शाळेतल्या प्रत्येक खिडकीतुन गुलमोहर, सावळ्या अाईचं देऊळ, शिवाईची टेकडी ह्यापैकी काहीतरी दिसायचंच. इथंल्या खिडक्यांमधुन पलिकडच्या इमारतीची खिडकी, गिरणीची चिमणी अाणि जास्त डोकावुन पाहिलं तर फुंकर मारल्यावर पळुन जाणा-या मुंग्यासारख्या सिग्नलवरच्या गाडया दिसतात. पहिल्या दिवस होता म्हणुन जरा टरकलीच होती. इथले वर्ग खुप मोठे अाहे. एखाद्या मास्तराने लक्ष नाही म्हणुन खडु मारला तर पोहचेल कि नाही हि शंकाच वाटते. तुला पाठवलेलं पत्र घरी पोहोयच्या अात पोस्टातुन घेऊन टाकत जाशील का ? नाही म्हणजे इथल्या पोरींबद्दल सांगायचं होतं. तू इंग्लिश शिकवायचा त्यामुळे फिजिक्स,केमेस्ट्री समजायला सोप्प जातंय. तुझं कॉलेज सुरु झालं का ? तू सोबतीला नसल्यामुळे कोणताच वर्ग बुडवायचा नाही ठरवलंय. तू इथं पाहिजे होता. सोबत असता तर जोडीने 'टॅंजंट' मारला असता. खोलीवर पार्टनर म्हणुन एक 'जेजे'चा पोरगा अाहे. जादु अाहे जादू. कसली चित्र काढतो. पण कमी बोलतो. जे बोलतो ते तुझ्यासारखं.माझ्या तर साला एकदम टॅंजंट जातं कधी कधी. म्हणजे निर्वात, क्षितीज, अाणीबाणी, सुर्यडुबी, लॅंपपोस्ट असं सगळं बोलतो तो. काल शेवटल्या बेंचावर माझ्या शेजारी एक पोरगा होता त्याने चालु वर्गात तंबाखु मळली. मला ही म्हणाला 'डबल मळू का?' खरं सांगतो टरकली माझी त्यात पलिकडची दोन वेण्याची.... नाही ते नंतर सांगतो. गोदीला वासरु झालं का? उत्तराची वाट पाहतोय. पुढल्या अाठवड्यापर्यंत लिही. सोप्पं लिही.
इथं सगळं ठिक अाहे. वर्ग तसेच पण थोडे मोठे, गोंधळ तोच पण अनोळखी, अाणि शेवटचा बेंच तोच पण शेजारी तू नाही.
इथं सगळं ठिक अाहे. वर्ग तसेच पण थोडे मोठे, गोंधळ तोच पण अनोळखी, अाणि शेवटचा बेंच तोच पण शेजारी तू नाही.
तुझा दोस्त
तुक्या
ताक : सोबत जेजेवाल्या मित्राचं एक छोटं स्केच पाठवतोय. जादू रे साला जादू.
- प्राजक्त १५ जुलै १५
(दै सामना २५ जुलै फुलोरा )

No comments:
Post a Comment