नेहमी प्रमाणे सरकारी कामासाठी ठरवलेली वेळ देऊन अगदी ठरवल्याप्रमाणे मला एका अधिका-याने ताटकळत ठेवलं. अाता तासभर अंधुक खोली,पिवळसर भिंती,अंगात देवी अाल्यागत घुमणारा धुळकट पंखा अाणि लाल पट्ट्याच्या फाईलींचे ढिगारे बघत बसण्यापेक्षा मी बाहेर टपरीवर चहा मारायचा ठरवलं. बाहेर जिल्हा परिषद ,पोस्ट अॉफिस अाणि सीबीएस अगदी जवळ जवळ असल्याने नेहमीची यांत्रिक वर्दळ. कार पार्किंगला पोस्ट अॉफिससमोर कशीबशी जागा मिळाली होती.मग पोस्टअॉफीस समोरच गाडीजवळ टेकुन मी उसताद राशीद खानची ठुमरी मंद स्वरात लावुन मी घोट घेत बसलो. तिथेच पोस्टाजवळ एक गर्द झाडं अाहे तिथे सावलीमध्ये लाल पोस्टबॉक्स शेजारी एका बाकड्यावर एक मुलगा अाणि मुलगी बोलत बसले होते. चोरुन ऎकण्याचा विषयच नाही पण त्यांच्या गप्पाच इतक्या मोठ्या अावाजात होत्या कि ठुमरीवरुन माझं लक्ष उडालं. त्याच्या हातात दोन वह्या , खिशाला पेन अाणि शंकराच्या गळ्यात नाग लटकावा तसा हेडफोन लटकवलेला.अाणि तीच्या हातात कॉलेजबॅग वजा पर्स वजा हॅंडबॅग वजा असं बरंच काही. ते नेमकं काय हे मला कधीच कळालं नाही. तर तिचं म्हणणं असं होतं कि हिने त्याला सकाळी मेसेज केला अाणि 'दोन निळे टिक’ दिसले तरी ह्याने रिप्लाय का केला नाही. अाणि ह्याचं म्हणणं कि मी वाचलेच नाही. तिला इतकं रागवायचं कारणचं नाही कारण तो सुद्धा काही दिवसांपुर्वी रात्री चॅटींगला तिच्या रिप्ल्याची वाट बघत बसला तेव्हा बराच वेळ ‘…… is typing’ असं अर्धातास अालं. नंतर सकाळचा पेपरवाला अाला पण हिचा रिप्लाय अालाच नाही.
अाता माझ्यासमोर दोन ऎतिहासिक गोष्टी होत्या . एक म्हणजे अर्थातच हे माझ्या ठुमरीसाधनेत व्यत्यय अाणणारं ठुमरीद्वेषी
जोडपं अाणि दुसरी म्हणजे पोस्ट बॉक्स. मला मजा वाटली. पुर्वी जेव्हा 'मेसेज पाठविणे’ म्हणजे फक्त खाकी कार्ड किंवा निळं अांतरदेशिय पत्र इतकंच होतं तेव्हा कल्पनाशक्तीला वाव होता. अाणि मुळात कमालीचा संयम होता. म्हणजे व्हायचं कसं पुर्वी मी अौरंगाबादेला बहिणीला पत्र लिहलं कि मनातल्या मनात मीच पत्र होऊन जायचो. अाज टाकलं म्हणजे उद्या प्रवास सुरु झाला. मग लाल गाडीतुन सिन्नर,येवला,वैजापूर करत चौथ्या दिवशी अौरंगाबादेच्या लालडब्यात. मग त्यात किती मुलींनी लाल पोस्टगाडी दिसली म्हणुन बोटांची अाढी घालुन मनाच्या इच्छा व्यक्त केल्या असतील ह्याचा हिशोब. पुर्वी मुलींचे खेळही किती खुळे अाणि लोभस होते (त्यावर नंतर कधीतरी बोलुच) मग अाता तिथल्या ‘पोस्ट्या’ने त्याच्या खाकी झोळीत अापलं पत्र घेतलं असेल अाणि सायकलवर टांग टाकली असेल. टांग टाकतांना पत्र पडणार तर नाही ना? खाकी झोळीला भोक तर नाही ना ? अशा शंका यायच्या. झाले पाच दिवस. झालं म्हणजे अाता हातात पडलं असेल. अाता ते साताठ वेळा वाचुन शनिवारी-रविवारी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तिकडुन उत्तर लिहलं जाईल. मग एकनाथ रंगमंदिराजवळ गुलमोहराच्या झाडाला लावलेल्या लालपेटीत पडेल. मग परत उलटा प्रवास सुरु. मग सगळे अंदाज बांधुन रविवारी येणार पत्र जर उशीराने मंगळवारी अालं. तर वेळ नसेल मिळाला,अाजारी असेल, अभ्यास असेल, टाकायला उशीर झाला असेल असे अंदाज बांधुन अापण सगळ्यात अाधी ‘अापल्या’ माणसाला दोषमुक्त करायचो. पण अाता? अाता सेकंदभराच्या विलंबासाठी अापण अापल्या माणसाला वेठीस धरतो. वेळप्रसंगी एकदा मी पोस्टमनशी भांडल्याचं अाठवतंय. तो पण भला होता हसुनहसुन समजुन घातली त्याने माझी. मग पत्र यायचं अाणि हे प्रश्नउत्तराचं एक वर्तुळ पुर्ण झालं कि हायसं वाटायचं अाणि दोन अाठवड्याची हुरहुर , नविन काही सांगण्यासारखं घडेपर्यंत शांत व्हायची. हा संयम , हा अापल्या लोकांना सगळ्यात अखेरीस दोषी ठरवण्याचा , हा अनोळखी माणसाशी लाडीक रागालोभाचा काळ सरला. जातांना ती त्याला काहीतरी म्हणाली . अाणि ह्याने जरा समजुत घालुन कसंबसं तिला शांत केलं. तीने सुद्धा "अाता ठिक अाहे परत केलंस तर याद राख’ अशा अविर्भावात स्कार्फ गुंडाळुन डावीकडे जाण्याचा इंडिकेटर न देत डावीकडे निघुन गेली.अाणि तो सुद्धा कानात हेडफोन घालुन सिग्नलला घरातल्या लोकांसारखं नावाला मान देत अर्धवट बोलण्यातुन निघुन जावा तसा हिरवा लागायला १२-११-१०-९ सेकंद होते हे पाहुन निघुन गेला. अशी लोक हेडफोनचे L अाणि R जितके सिरीअसली घेतात तितके जर त्यांना नात्यांना सिरीअसली घेता अालं असतं तर किती बरं झालं असतं.नाही?
- प्राजक्त
- प्राजक्त
म.टा. ६ फेब्रुवारी १५
http://epapermt.timesofindia.com/Article.aspx?eid=31833&articlexml=06022015004017#
http://epapermt.timesofindia.com/Article.aspx?eid=31833&articlexml=06022015004017#

झकास रे
ReplyDelete