Friday, February 13, 2015

ज्याचा त्याचा वेलेंटाईन (मटा १४ फेब १५)


‘ती' कुठे असेल तिथे अानंदात असो. अाजच्या दिवशी मोटरसायकल काढुन एकट्याने ‘किशोर’ ऎकत अापल्याच तंद्रीत रपेट मारायला जायची.  कुठे तरी असलेल्या ‘त्या’चा वेलेंटाईन.

'माझ्यासाठी उन्हात उभं राहुन स्कीनचा टोन चार शेड ने डार्क केलाय ग त्याने. सांग ना ह्यावेळेस ‘हो’ म्हणुन का पिंट्याला ?’ असं काकुळतीला येऊन झिंपीने पिंकीला विचारलं. खरंतर स्किन, टोन, शेड अाणि डार्क असे चार इंग्लीश शब्द एकाच मराठी वाक्यात वापरणा-या झिंपीला प्रेमाबद्दल काही तत्वज्ञान सांगावं अाणि ते तिला कळेल अशी भोळी अाशा ठेवणा-यातली पिंकी नव्हतीच. तरीही डोळे लपलप लपलप करत कधी एकदा तो विचारेल अाणि झिंपी हो म्हणेल ह्या पवित्र्यात बसलेली झिंपी. हा झिंपीचा वेलेंटाईन.

‘गप ग तू, असं लगेच हो नसतं म्हणायचं. एकदा ‘होकार’ अाला कि अापण ‘टुकार’ होतो.’ असं पिंकीचं जगावेगळं तत्वज्ञान. पर्सच्या पुढच्या कप्प्यात एक , गाडीच्या डिक्कीत दोन अाणि सॉक्समधे लपवुन ठेवलेला तिसरा. छुप्या युद्धाला जायची तयारी करावी तशा तीन 'पेपर स्प्रे’ निशी तयारीत असलेली अाणि मनातल्या मनात “ अाज कोणी अडवुच द्या, नाही त्याच्या डोळ्याला फोडणी घातली तर नाव नाही सांगणार” असा जप करणारी पिंकी. हा पिंकीचा वेलेंटाईन.

'काहीही झालं तरी यंदा पिंकीला गुलाब द्यायचाच’ असा चंग बांधलेला चंगेज पिंट्या. कितीतरी दिवस, दिवस? दिवस कसले महिने, महिने? महिने कसले वर्ष उन्हा-तान्हात उभं राहुन पिंकीच्या मैत्रीणीकडे, झिंपीकडे पिंकीसाठी पत्र द्यावं असं मनात ठरवुन असलेला पिंट्या. अाता सरळ सरळ मुद्दयातच हात घालायचा अशा अविर्भावात श्वास रोखुन बसलेला पिंट्या. हा पिंट्याचा वेलेंटाईन.

तो’ जिथे असेल तिथे खुषीत असो. अाज किशोरच्या तंद्रीत जास्त लांब न जाअो. अापण मात्र अाजच्या दिवशी खिडकीशी बसुन एकट्याने ‘रफी’ ऎकत बसायचं. कुठेतरी असलेल्या ‘ती’चा वेलेंटाईन.

सोसायटीच्या पार्किंगमध्ये झिंपी नेहमीच्या ठिकाणी गाडी लावायला अाली कि एकच गाठ मारलेली दोरी अोढायची अाणि वरुन गुलाबाच्या पाकळ्यांचा पाऊसच पाऊस पाडायचा असा अत्यंत फिल्मी प्लान. पण वाढत्या धडधडीमुळे एकाच्या ऎवजी गोंधळात दोन गच्च गाठी मारुन दबा धरुन बसलेला मंग्या. हा मंग्याचा वेलेंटाईन.

“ह्ये काय नाष्ट्याला पुरणपोळी? टकुरं ठिकाणावर अाहे का ? अानी हे बघ मोठ्या साहेबांनी मोठ्या इश्वासाने वेलेंटाईनविरोधी पथकाचा प्रमुख केला हाये. सोत्ता:ला कृष्ण समजणा-या पोरांस्नी बासरीशिवाय अजुन येगळे पोकळ बांबु असत्यात हे दावुन देतो कि नाय पाय तू अाज.” मारक्या बैलासारखा दिसेल त्याला उडवणाच्या तयारीत असलेला मंग्याचा बाप. हा मंग्याच्या बापाचा वेलेंटाईन.

“ ‘हे' सकाळी लौकर जाणार म्हणत होते. म्हणुन पहाटेच उठुन पुरणपोळीच सारण लाटायला घेतलं”. हा मंग्याच्या अाईचा वेलेंटाईन.

वेलेंटाईनच्या दिवशी शहरात नसती गडबड असते. रिक्षास्टॅंडवर रिक्षा उभी न करता चहा टपरीजवळ उभी करु. शंभर-शंभर रुपये जास्त अाकारुन कोणालाच माहित नाही अशा ठिकाणी कस्टमरला घेऊन जाऊ. जे जास्त पैसे येतील त्यातुन पिंट्याच्या अाईला यंदा दिवाळी व्यतिरिक्त अाणखी एक साडी किंवा चांदीची मुरणी घेऊन देऊ. अशा अाशेत दुकानाबाहेर काचेतुन हाताचा खोपा करुन साडीचा काठपदर अाणि काठापदराला लटकलेलं किमतीच लेबल बघत बसणारा पिंट्याचा बाप. हा पिंट्याच्या बापाचा वेलेंटाईन.

“अाज तरी माझ्यावर एखादी प्रेमकविता जमणार अाहे का? निदान पुर्वी कोणासाठी केली असेल ती ऎकवली तरी चालेल. येऊ द्या चला.” माझ्या ‘ती’चा वेलेंटाईन.

चुकलंच सालं , प्रेमावरती कविता केली नाही । विशाल बुंधी झाडावरती 'बदाम' कोरले नाही । चुकलंच सालं. हा माझा वेलेंटाईन


 -प्राजक्त 
दै महाराष्ट्र टाईम्स् १४ फेब्रुवारी १५

http://epapermt.timesofindia.com/Article.aspx?eid=31833&articlexml=14022015004014 )

No comments:

Post a Comment

अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...