" वस्तुमान असलेल्या कोणत्याही दोन वस्तूंच्या एकमेकांकडे आकर्षिल्या जाण्याच्या प्रवृत्तीला गुरुत्वाकर्षण असे म्हणतात. उदाहरणार्थ हे डस्टर जर मी एक विशिष्ट बल लावुन फेकलं तर एका सरळ रेषेत जाऊन जसे जसे ते बल कमी होईल तसे तसे ते खाली अोढले जाईल अाणि शेवटी खाली पडेल. धाssssड ! " शेवटच्या बेंचवरच्या अायझॅकच्या डोक्यात डस्टर जाऊन पडलं. त्याचं नाव अायझॅक नव्हतं . पण ते नाव ह्याच प्रसंगामुळे पडलं. समस्त भुतलावरच्या गणित अाणि विज्ञानाचे मास्तर जर मास्तर नसते तर थाळीफेक, भालाफेक,नेमबाजीमध्ये तरबेज असते असा शालेय कालापासुनचा माझा समज दहावीत येता येता तेव्हा दुढ झाला जेव्हा मी एका मास्तराच्या डस्टरपासुन लपायला दप्तराची ढाल केली होती अाणि मास्तरांनी शेजारच्या भितीवरुन डस्टर अादळवुन तो मला बाजुनं खांद्यावर मारला. नंतर हीच क्लृप्ती मी कॅरममध्ये बापरु लागलो. अशा प्रकारे 'क्लृप्ती' हा शब्द वापरण्याचा माझा या जन्मीचा प्रथम अाणि अंतिम अट्टहास मी इथे केलेला अाहे. जसा गाणितातला साईन,थिटा दैनंदिन जीवनात नेमके कुठे येतात हा माझा कळीचा प्रश्न अाहे तसाच काही मराठीच्या शब्दांबद्दलसुद्धा 'क्लृप्ती' हा त्यातलाच एक शब्द.असो. हा शब्द अाता इथे मी माझ्या बालभारतीच्या मास्तरांना दिलेली अादरांजली समजा. तर असे हे विज्ञान मास्तर एखाद्या कलावंतासारखे विक्षिप्त अाणि लहरी वाटतात. कधी पुर्ण वर्गाची मंडई होते पण यांना फरक पडत नाही. अाणि कधी यांना टाचणीचा अावाज पाहिजे असतो.मुळात अती हुशार , अती कलासक्त लोक हे थोडे लहरीच असतात. अाईनस्टाईनने त्याच्या मांजरीला येजा करायला त्याच्या लॅबच्या दाराला एक मोठं भोक केलं होतं. कलांतरांनं त्या मांजरीला पिल्लु झालं. मग अाईनस्टाईनने त्या भोकाशेजारी छोटं भोक केलं अशी अाख्यायिका अाहे. अाता हे पाहुन जर त्याला कोणी 'तू येडा अाहे का रे' म्हटंल असेलच. तेव्हा पासुन 'तू येडा अाहे का रे?' असं मला कुणी म्हटलं तर राग न येता अभिमान येऊ लागला. तर विषय असा कि गुरुत्वाकर्षणचा धडा शिकवुन झाल्यावर मास्तरांनी शेवटी विचारलं " या प्रकरणाबद्दल कोणाला काही प्रश्न? तर अायझॅकने शेवटच्या बेंचवरुन हातवर केला अाणि म्हणाला "मास्तर, सफरचंद पडल्यामुळे गुरुत्वशक्तीबद्दलचा प्रश्न न्युटनला पडला तर इतके वर्ष त्याची लघवी काय वर उडत होती का? " पुढे काय झालं हे सांगणे नलगे. त्या दिवसापासुन त्याला अामचं अखिल गाव अयझॅक नावाने अोळखु लागलं
-प्राजक्त २४/०८/२०१५
-प्राजक्त २४/०८/२०१५



