Saturday, August 1, 2015

बॅकबेंचर्स : ३ डोपलर इफेक्ट

"कल्पना करा तुम्ही रस्त्याच्याकडेला ऊभे आहात लांबुन येणा-या गाडीकडे एकटक बघताय. गाडी समोरुन भरधाव जाते. वेगाकडे लक्ष दिलं तर कळेल की पलीकडून येणारी गाडी समोरुन जातांना वेगाच्या मानाने भुर्रकन निघुन जाते. हेच आता रस्त्यापासुन फर्लाँगभर दुर उभं रहा. आता तो वेग कमी असेल. तीच गाडी आता अम्ब्युलंस आहे अस समजा, आता आवाजातुन अंतराची गंमत कळेल. ह्याला डोपलर इफेक्ट म्हणतात. बाकीचं उद्या बघु" विज्ञानाचा तास संपला. तेव्हापासुन मला खिडकीतून येत्या जात्या गाड्यांना बघायचा छंद लागला. रविवारीची दुपार अर्ध्यावर सोडुन दिलेल्या लिंगोरचाच्या खेळासारखी निपचीत वाटायची. अशावेळी आमचा जादा तास असायचा. त्यावेळी लांबुन येणा-या बैलगाडीच्या डोपलर इफेक्टमध्ये रमुन जायला व्हायचं.
लास्टबेंचवर बसायचे हे काही फायदे. म्हणजे खिडकीच्या बाहेर रमता येतं, भुक लागेल तेव्हा डबा खाता येतो, सुचेल तेव्हा कविता लिहता येते, वहीच्या मागल्या पानावर फुल्या-गोलचा खेळ खेळता येतो. आणि इतकं करुन परत समोर काय शिकवताय त्याकडे लक्षही देता येतं. किंवा तसं निदान दाखवता तरी येतं. हा शेवटचा फायदा खरंच फायदा आहे की तोटा हा वेगळा भाग आहे.
पण दुरुन जर कोणाला तो तोटा वाटत असला तरी जवळून पाहीलं तर कळेल की तो फायदा आहे. ती थियरी तर हे प्रॅक्टिकल. आपलं ते डोपलर इफेक्ट ? हां बरोबर.
ठरवुन खुप लक्ष दिलं ना कि डोक्याला झिणझण्या येतात आणि डोक्यात काही घुसेनासं होतं. दर्यावरची रेती कशी जितकी घट्ट पकडाल तितकी निसटते ना तशी. एकदा जीव धोक्यात घालुन पहिल्या बेंचवर बसायचा योग आला होता. त्यात इतिहासाचा तास. अरेरेरे महाराज आणि मावळे दिल्लीतून निसटले तेव्हा काय ती धुळदाण..., काय तो टापांचा आवाज...  त्यात अगदी पुढे रस्त्याच्याकडेला असल्यासारखं पुढच्या बेंचवर बसलेलो त्यामुळे समोरुन ते कधी भर्रकन् गेले ते कळालंच नाही इतकं अंगावर आलं सगळं. तेव्हा वाटलं हेच मागे बसलो असतो तर लांबुन येणारी, लांब जाणारी घौडदौड दिसली असती.
अजुन अाठवतं....तो विज्ञानाच्या मास्तरांचा शेवटचा तास होता. मास्तर निवृत्त होणार होते. टोपीखाली कानशीलाची पांढरी चांदी लपवत, पाणावल्या डोळ्यांनी , थरथरत्या हाताने फळ्यावर मास्तरांनी लिहले 'निरोप'. मग पुढे चाळीसेक मिनीटं मास्तर भुतकाळ-भविष्यकाळाबद्दल बोलत होते. जाता जाता म्हणाले " ते करायचं राहीलं आणि हे करणार ह्या दोन विचारांमध्ये जे भुर्रकन निघुन जात ना मुलांनो ते म्हणजे ...? " " आयुष्य ! " सगळी मुलं एकसुरात ओरडली.
" अहं.... चूक . ते करायचं राहीलं आणि हे करणार ह्या दोन विचारांमध्ये जो भुर्रकन निघुन जातो तो म्हणजे ... डोपलर इफेक्ट."
घंटा झाली. मास्तर काठी टेकवत निघुन गेले. काठी टेकवायचा टक्कंटक्कं आवाज जवळुन दुरदुर जात राहिला.

 - प्राजक्त / ०१ / ०८ /१५



No comments:

Post a Comment

अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...