Monday, August 10, 2015

बॅकबेंचर : ४ शेवटची खिडकी

बसमध्ये सहसा शेवटी कोणी बसतं नाही. कंडक्टरने मागे जाऊन बसा असा इशारा केला कि ‘शेवटची सीट ? नको रे देवा’ असे यांत्रिक शब्द नेहमीच कानावर पडतात. पण मी बसमध्ये सुद्धा ‘लास्ट बेंचर’च. बसमध्ये पुढे बसलं कि जरावेळाने मागुन कुणीतरी अातला राग दाबत उसन्या-खोट्या अादरयुक्त अवसानात अापल्याला म्हणतं ‘ अहो जरा खिडकी लावता का प्लिज’.  झालं ! संपला कि हो विषय. बंद खिडकीचा प्रवास म्हणजे छळ अाहे. त्यात पावसाळा असेल तर ते पाप ही असु शकतं. नाही ते चित्रपटात वगैरे दाखवतात तसं  अर्ध अंग बाहेर काढुन , तळहातावर अाणि चेह-यावर पावसाचे थेंब झेलत “ अहा अहा रम्य निसर्ग “ असा फालतु थिल्लर दिखाऊपणा नाही म्हणत मी. पण नुसती उघडी खिडकी , मागे जाणारं जग अाणि अापलाच अापल्याशी चालेल्ला ‘ ते बघ , हे बघ,  हे काय असेल ? तिकडे एकदा जाऊया ‘ असा संवाद. हे मजेशीर असतं.
बाहेर डोकावत असतांना मध्येच एखादं लहानसं गावं , पडकी भिंत, गर्द पारंब्यांच झाडं लागतं हे सगळं अगदी हिरवंशार. शेवाळाच्या नावाखाली का होईना पावसात पडक्या दुर्लक्षित भिंतींना पालवीचा मोह होतो. हे पाहुन कधीही विस्मरणात न जाणारा ताजेपणा मनामध्ये भरुन राहतो. कधी कधी निराश व्हायला झालं कि हे क्षण अाठवल्या बरोबर परत रिचार्ज मिळतो. अाणि हे चालु असतांना अापल्यामागे कुणीच नसतं कारण अापणच सर्वात शेवटचे असतो. अाणि त्यामुळे खिडकीतुन येणारा पाऊस, वारा यांचावर फक्त अापलाच निर्विवाद हक्क असतो. ह्या शेवटाबद्दलच्या अोढीचं मुळ खुप जुन्या लहानपणीपासुनच्या प्रसंगांमध्ये अाहे.

वडिल लहानपणी गोष्ट सांगायचे राजपुत्राची. तो तलवार घेऊन निघतो वाटेत त्याला कोण कोण भेटतं त्यांना तो सवयीने मदत करतो अाणि ते लोक अानंदी होऊन राजपुत्राला अशी एकएक जादुई वस्तु देतात ज्याचा फायदा राजपुत्राला पुढे राक्षसासोबत लढतांना होणार असतो. कमीत कमी शंभरेक वेळा ही गोष्ट ऎकली असेल पण दरवेळी नवे प्रश्न पडायचे अाणि नेहमी त्याची मजेशीर उत्तरं मिळायची. गोष्टीच्या शेवटी एक वाक्य ठरलेलं असायचं ‘… अाणि ‘शेवटी' सगळं ठिक झालं.’ मी म्हणायचो ‘ पण एखादा दुसरा राजपुत्र असता अाणि शेवटी ठिक नसतं झालं तर?’. उत्तर यायचं ‘कधी कधी सुरवात-मध्य बिघडु शकतो पण शेवट ठिक नसेल तर तो शेवट नसतो.'

-प्राजक्त ९ अॉगस्ट २०१५


No comments:

Post a Comment

अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...