रेल्वेमध्ये बसायला जागा न मिळणं हा काळाने तुमच्यावर हलगर्जीपणा केल्याचा उगवलेला सुड असतो. हो म्हणजे एक लोकल चा विषय सोडुन देऊ कारण तिथे मुळातच गर्दी असते. चाळीसेक हजार लोकांसाठी ती केलेली सुविधा होती अाता चाळीसेक लाख लोक 'सुविधा' उपभोगल्यावर अाणखी काय होणार. तर अशा उगवलेल्या सुडामुळे तुम्हाला रेल्वेच्या दाराशी उभं राहुन करावा लागलेला प्रवास हाही बॅक बाकावर बसल्याचा प्रकार. त्यापेक्षा मास्तरांनी शिक्षा म्हणुन मागल्या बाकावर उभं रहायची शिक्षा दिल्यासारखा प्रकार.
असाच दारात बसुन एक प्रवास सुरु झाला. मध्ये एका ठिकाणी एकजण चालत्या गाडीत सराईतपणे लटकुन मला 'थोडं अडजस्ट' खुणावत बसुन राहिला. मग तो म्हणाला 'घरातलं शेंडेफळ अाणि शाळा कॉलेजातला शेवटच्या बाकावरचा दिसतो'.पांढरे केस,पांढरी दाढी, बाह्या वळलेला चेक्सचा शर्ट, अाता फॅशन नसलेलं ससपेंडर, पट्टीने अाखाव्या तशा ठसठशीत कपाळावर चार रेषा अाणि तंबो-याला चुकून हात लागल्यावर कितीतरी वेळ घुमत राहावा तसा घनगंभीर 'बेस'चा अावाज. असा माणुस मी पहिल्यादा पहात होतो. मी म्हणालो 'हो,कसं अोळखलं?'
" शाळेत अाणि घरात शेवटी असलेले जरा शेफारलेले असतात. म्हणुन निघायला उशीर होतो.अाणि दारात बसावं लागतं.पण याची चिडचिड कमी असते अापल्याला. हो अापल्यालाच म्हणालो मी. कारण दारात बसता येतं.मिळाली जागा तर ठिक नाही तर हवेचा प्रवास.दोन्ही बाजुने जिंकल्याची भावना नाही का? तुझं नाव सांगु नको,माझं विचारु नको. शेक्सपिअर म्हणतो,नावात काय अाहे? हाच नियम बाकाला पण लागु होतो बरका. बाकात काय अाहे? पहिला-शेवटचा. तुम्ही काय शिकला ते महत्वाचं.बरं पेपर वाचतो का ? मागच्या महिन्यात भारत-पाक युद्ध संपलं. काय वाटतं ? सोड,अाता कोणाला वाटुन काय फायदा म्हणा. "
मी बोलायच्या अात तो बोलत होता जणू त्याला फक्त कुणीतरी ऎकणारं पाहिजे होतं. मी फक्त ऎकायचं ठरवलं. " See, Wars are not won on Field , my son. (हृदयाकडे हात नेत) Real war is here" अातला लढा जिंकला तरच जिंकला तू. अाणि मारायला काय लागतं? सांग, बंदुक?रायफलं? नाही. कोणाला मारायला लागतात फक्त "steady hands".अाणि जेव्हा तू चारीबाजुने घेरला जातो तेव्हा देश,प्रदेश,मान,सन्मान हे सगळं सारुन तू लढतो फक्त स्वत:साठी.जगण्याची लढाई. War is old man talking & young ones dying.मग सगळं जिंकल्यावर हाताशी येतात पडलेल्या इमारती,लाल जमिनी वगैरे. मग वाटतं हे जिंकायला लढलो अापण? मग शोध सुरु होतो काय जिंकल्याचा. पण शोधल्यावर हरवलेलं मिळतं बदलेलं नाही. एनी वे, टू मच फिलॉसोफी इन वन जर्नी. हे सगळं तुला का सांगतोय मी? कारण यू अार अ बॅकबेंचर."
बाहेर धुकं,पाऊस अाणि मधेच घाटात इमरजंसी गाडी थांबली.. तो उतरुन सिगारेट पिऊ लागला. गाडी सुरु झाली. मी त्याला अावाज दिला. त्याने बेफिकीरपणे मला टाटा केलं.मी त्याला नाव विचारलं. त्याने उत्तर दिलं. Nobody, बाकात काय अाहे?
-प्राजक्त १७/०८/१५

No comments:
Post a Comment