1. नाटकाची सुरूवात कोठून झाली?
तसं 'पुरे झाली रे तुझी नाटकं चल अभ्यासाला बस' हे शाळेत असतांना पासुन ऐकत आलोय. गंमतीचा भाग सोडला तर माझ्या काही धुरकट आठवणी आहे आणि आई-वडीलही सांगतात कि माझी नाटकं लहानपणी पासुनचीच . कसंय घरी बरंच धार्मिक वातावरण आहे. लहानपणी त्यांच्या सोबत कुठे जाऊन आलो कि तिथल्या प्रवचनकाराची कपड्या आणि लकबींसहीत हुबेहुब नक्कल करायचो. टिव्ही वर त्याकाळी पंकज कपुरची डिटेक्टीव्ह मालिका 'फटीचर' लागायची. तेव्हा तसा कोट-मफलर घालुन काॅलनीतल्या मोठ्यामुलांसमोर गाजर खात खात 'केसेस सोल्व्ह' करायचो. पण इतकं असलं तरी कधी शाळेत कोणत्याच नाटकात भाग घेता आला नाही.नंतर १९९९-२००० मध्ये माझा मित्र श्रीपादमुळे मी पहिल्यांदा मी रंगभुमीवर पाऊल ठेवलं. त्याच्या सोबत मी फक्त सोबत म्हणुन दौरे करायचो. दिग्दर्शक निरंतर सर म्हणाले हा नुसताच सोबत येतो तर याला गर्दीचा भाग करू. मग मी हो ला हो करणारा गर्दी झाले . तिथे फक्त प्रेतावर रडायचं होतं. जीव ओतुन 'खरा' रडलो. सरांनी पोटतिडकी ओळखली आणि पुढच्याच प्रयोगात बदली कलाकार म्हणुन त्याचा नाटकात महत्वाची भूमिका दिली. नंतर प्रणव मी आणि श्रीपाद
आम्ही तिघांच्या कल्पनेतुन आणि इतर जिगरी मित्रांय्चा साथीने स्वत:ची नाट्यसंस्था सुरु केली.
2. अभिनयाची शिबिरे कितपत दिशादर्शक ठरतात?
अभिनयाची शिबीरे दिशादर्शक आहेत पण अशा लोकांना जे प्रवासाला निघाले आहेत. ज्यांना घरी घ्यायला जाण्यापासुन सुरुवात आहे अशांबाबतीत हे सांगणं कठीण आहे. ह्याचा अर्थ असा कि मुर्ती बनवायची असेल तर मुळात तो दगड पण तशा स्वभावाचा हवा. ढेकळाला छिन्नी हातोडा सोसत नाही आणि दगडाला कोंब येत नाही. मागे एकदा हृषीकेश जोशी म्हणाले होते बहुतांशी कलाकार
शिबीरात देवाचं वलय असल्यासारखे 'अहं ब्रम्हास्मी' अविर्भावात फिरत असतात. हे ऐकुन खुप हसलो होतो. कसंय कि स्शिबीरात स्पंज म्हणुन गेलं तर शोषता येतं. बरं परत 'काय' शोषताय हे ही महत्वाचं. म्हणजे शिबीरं कोणाची आहे हेही महत्वाचे. कारण आजकाल बिझनेस म्हणुन अशा शिबीरांच्या जाहिराती कमी नाही.
थोडक्यात चांगल्या शिबीरात चांगली दिशा मिळु शकते पण शिबीरं म्हणजे कच्चा माल टाकला आणि प्रोडक्ट बाहेर आलं अशी मॅन्युफॅक्चरींग कंपनी नाही. गुंता सोडवायचा असेल तर आपण आधी आतली गाठ शोधतो. त्यासाठी बाहेर बाहेर उसवणं म्हणजे गुंता वाढत स्वत:ला फसवणं. आणि कसंय बुद्ध आतुन प्राप्त होतो त्यासाठी कुठेही शिबीरं नाही.
3. प्रायोगिकमधील आव्हाने व व्यावसायिक मधील कस?
खरं तर व्यावसायिक आणि प्रायोगिक असं विभाजन मला फारसं पटत नाही. कारण व्यावसायिक म्हणजे फक्त मनोरंजन हि संकल्पना समुद्र , दोन स्पेशल, शिवाजी अंडरग्राउंड .. ते आपल्या नाशिकचं गढीवरच्या पोरी असा दर्जेदार नाटकांनी पचवुन दिलंय. त्यामुळे प्रायोगिक आणि व्यावसायिक पेक्षा एकांकिका, दीर्घांक आणि दोन अंकी इतकंच वर्गीकरण जास्त संयुक्तिक वाटतं . त्यात दीर्घांक हा प्रकार जास्त लोकप्रिय होऊ लागलाय. आणि मला ही तो जवळचा वाटतो.
हा प्रकार अजुन रुजायला हवा.
तंत्राने भारावून आजकाल गिमीक्स कडे ओढा वाढलेला दिसतो. पुर्वीच्या नाटकांमध्ये कलाकार, लेखक, दिग्दर्शकांपेक्षा नाटकाचा विषय हा 'हिरो' असायचा. आजकाल आधीच ओरिजीनलची वाणवा झालीय त्यात गिमीक्सची भर. मी आणि मित्र अजुनही फक्त नाटक पहायला मुंबई/पुण्याला जातो. आताशा बोलणारा ऐकत नाही. तो समोरचा बोलत असतांना मला पुढे काय बोलायचंय ह्याचा विचार करतो . अगदी तसंच आता बहुतांशी फक्त लोकं आपलं नाटक सादर करतात पण नाटक बघायला कमी जातात.
आणि जसं पुण्यात सुदर्शन आहे , मुंबईत टॅग आणि अस्तित्व ह्या संस्था जशा काम करताय तसं एक छोटेखानी थिएटर किंवा तसं काम नाशकातही व्हायला हवं जेणे करुन आणखी समजुतदार ,जातिवंत प्रेक्षकवर्ग तयार होईल.
4. नाटक करिअर म्हणून की कला म्हणून?
माझ्यासाठी नाटक व्यसन म्हणुन. गायकाला गायकातून , संताला चिंतनातून , नर्तकाला नाचण्यातुन, गांजेवाल्याला चिलीमीतुन , वाचकाला अस्सल कथा वाचुन जी झिंग येते ती मला नाटकातुन व्यक्त झाल्यावर येते. एखादी कानफडात बसल्यावर जो कानात कुईऽऽऽऽ आवाज येत राहतो तसा अनुभव नाटकानंतर येतो. मग मी अभिनेता असो, दिग्दर्शक असो वा प्रकाशयोजना करत असो तो येतोच. तेच संवाद , तेच प्रतिसंवाद , त्याच जागी जाऊन आनंदी होणं वा कोसळणं हे सगळं तेच तेच असुनही दरवेळी अंगावर नवा काटा कसा उभा राहतो ? हे मला कळतं नाही. मी तो शोध घेतोय. प्रयोग सुरु असतांना आपणं तुकाराम होऊन समोरच्या काळ्या अंधाराकडे पांडुरंग समजुन व्यक्त होत राहणं ह्याला 'करियर' , 'कला' ह्या व्याख्येत कसा बांधु ? पण हे ही खरं कि करियर म्हणुन फक्त आणि फक्त नाटकावर चरितार्थ चालेल अशी अजुन तरी रंगभुमी श्रीमंती देत नाही. ऊस लावणारा शेतकरी कोप-यात तुकडाभर वावरात मेथी,शेपु,कोबी काहीतरी 'कॅशक्राॅप' लावतो तसं आहे हे. नाटक हा रिचार्ज आहे . ते करणं गरज झाली आहे बॅटरी 'डेड' होईपर्यंत.
5. नाटकाकडे तरूणाई कोणत्या दृष्टीकोनातून पाहते?
बरेच जण टिव्ही मालिका आणि चित्रपटाची पहीली पायरी म्हणुन नाटकाकडे बघतात. ह्यात तसं काही गैर नाही. कारण आधी म्हटलं तसं तुलनेने नाटकात पैसा कमीच आहे जो जगायला लागतो.
पण नाटकात मिळणा-या समाधानाची तुलना ध्यान घारणेतही नाही. पण दुर्दैव हे कि आईबाप,बायको,नातेवाईक,लाॅंड्रीवाला, साखर मागायला आलेल्या काकु हे लोकं 'मुलगा किती कमावतो?' हे विचारतात 'किती समाधानी आहे ?' हे नाही .
तरुणाई खुप मनस्वीपणे नाटकाकडे बघतात हे आजुबाजूला बघताना जाणवतं. त्याबाबतीत खुपच अाशादायी वाटतं. गेल्या काही वर्षात खुप सुंदर विषय आणि कलाकृती बघायला मिळाल्या. त्याची संख्या वाढावी इतकीच इच्छा. पण नाटकाबाबतीत तरुणाई लांब जातेय किंवा निराशावादी आहे वगैरे मी साफ नाकारतो . अत्यंत ऊर्जीत अवस्था आहे आणि यातुन सकसच बाहेर येईल हि आशा आहे .

No comments:
Post a Comment