Friday, May 30, 2014

स्वरा

मंगेशाच्या देवळातली पारायणं झाली , माधवच्या मनाविरुद्ध कुठल्याशा बुवाकडुन अभिषेक करवुन घेतला , कृष्णमंदिरात दर गुरुवारी लोण्याचा प्रसाद वाटप झालं. जे जे ऎकण्यात अालं ते ते भाबड्या जानकीने केलं. पण घरात लग्नाच्या काही वर्षानंतर जो पसारा होतो तो पसारा घालायला कुणी नव्हतं. डॉक्टर म्हणाले होते कि "कधी कधी उशीर होतो. नेमकं कारण असतंच असं काही नाही.अाणि तुमच्या केस मधे तर नाहीच. उशीरा का होईना पण होईल. तुमचे रिपोर्टच तसं सांगताय."
पुर्वी "चहात मीठ टाकलं कि काय?" असं माधव गंमतीने देविका विचारायचा अाणि जानकी लगबगीने "बाई ग्ग ! असं तर नाही शक्य! पाहु पाहु " म्हणत त्याच्या हातुन कप हिसकावुन दोन घोट घ्यायची. तीला चव कळे पर्यंत माधवच्या डोळ्यात हसुन हसुन पाणी अालेलं असायचं. "तुला काय इतका विश्वास नाही का तुझ्या कलाकृतीवर ?" तो हसत विचारायचा. ती म्हणायची "माझ्या कलाकृतीपेक्षाही तुमच्यावर जास्त विश्वास अाहे माझा." मग ती तिच्या कामाला लागली की माधव बाहेरुन दुसरा घोट घेत अोरडायचा "ऊफ्फ ! देख तेरे लबों को छुने का असर. बशीत अोतुन तासभर फुंकतोय गारच होत नाहीए गं. "
ह्या चिडवाचिडवीच्या अल्लड वर्षांनंतर तो सवयीचा 'माधो' झाला अाणि ती सवयीची 'देवी' झाली. अाता ह्या सगळ्याला दहा-बारा वर्ष लोटली. ह्या दहा वर्षात देवी संगीत शिकुन घरच्या घरी गायनाचे क्लासेस घेऊ लागली. माधोला तिचा हा छंद कधी छंद वाटलाच नाही. तिच्या गायनात जादु होती. तो नेहमी म्हणायचा "देवी ,शंभर वैदु एकीकडे अाणि तुझा अावाज एकीकडे.सगळ्या वेदना शांत" जणु त्यांच्या नात्याने षडज पासुन निषाद पर्यंत सगळे शुद्धस्वर अनुभवले होते. तसं माधोला संगीतामधलं छान अाणि ठिक ह्याच्या पलीकडे काही कळत नव्हतं पण देवीसाठी उगाच पंडित भीमसेनी अाव अाणुन बोलत असे."तुला सांगतो देवी, माझा बॉस गाढव अाहे.अाज असा गोडी गोडीत झापत होता लोकांना. म्हणजे ह्याने झापलं अाणि कोणाला कळालं पण नाही.तासभर बडबड केली जसा काय राग मारवा छेडतोय." देवी कुत्सित हसुन म्हणाली "काहीही काय बोलता हो तुम्ही.शुद्ध मारवा फक्त वाणी,वेणु अाणि वीणा मधुन येतो. तुमचा बॉस वीणा किंवा बासरी नसावा.अाणि वाणी मधुन यायला तो मनुष्य नाही, गाढव अाहे असं तुम्हीच म्हणाला" तो असं तीच मौन तोडायचा.असेच दिवसा मागुन दिवस अाट्यापाट्या खेळुन जात होते. एक दिवस हेच दिवस न खेळता नुसते 'गेले'. मग घरभर देवी जड पायाने अाणि माधो जमीनीवरुन दोन वित तरंगत चालु लागला. अाता माधो देवीला चिडवायला म्हणुन 'चंद्रकला' अशी हाक मारु लागला. माधो उगाचच अॉफिस मधुन येताना महिन्यातुन एकदा एखादं लहानसं वाद्य घेऊन येई. अाणि म्हणायचा " बघ मुलगीच होईल अाणि मी तर नावही ठरवलंय.'स्वरा' ".
अशाप्रकारे देवी अात अाणि बाहेर दोन्हीकडे लहान मुलाचा सांभाळ करत करत एक दिवस मोकळी झाली.अाणि 'स्वरा' अाली. मग फक्त रडण्या अाणि खाण्यासाठी तोंड उघडणारी स्वरा अाधी 'बाबा' म्हणेल कि 'अाई' अशा ह्या दोघांमध्ये पैजा लागल्या. माधो स्वराला घेऊन रोज तासन् तास 'बाबा-बाबा म्हण बा-बा' करत बसे. अाणि ती पंधरा वीस मिनीटं बाबासारखं तोंड वेडवाकडं करुन थकुन मग एकसुरी रडायला सुरवात करे. मग देवी खोटं खोटं चिडत असे " कशाला माझ्या मुलीला त्रास देता हो? कोण कुठून येऊन केव्हाचं बकरीसारखं बा-बा चाल्लंय माझ्या पोरीपुढे" पैजेचा सामना अगदीच अटीतटीचा होऊन बसला. पण ह्याहुन जास्त चिंता ही की जवळपास पंधरा-सोळा महिने झाले पण तिने कोणालाच पैज जिंकल्याचं सुख दिलं नाही. पुन्हा देवी चिंतेत अाणि पुन्हा माधो वातावरण हलकं करत म्हणाला " चलो तिस-या पंचाकडे जाऊ अाणि विचारु कोण जिंकतंय सामना." अाणि डॉक्टरांच्या तपासणीत कळालं स्वरा बोलुच शकत नाही . माधो देवीला बाहेर बसवुन अात चर्चेसाठी निघुन गेला.देवी स्तब्ध बसुन होती जणु पक्क्या न हलणा-या सूरासारखी , एखाद्या गच्च करड्या ढगासारखी.अाणि ब-याच वेळाने माधो बाहेर अाला . अाणि केविलवाणा हसत देवीला म्हणाला "काही नाही गं होईल ठिक अापल्या स्वराचा मंदा षड्ज लागलाय."अाणि स्थिर सूरागत बसुन राहिलेल्या देवीने माधोच्या मिठीत पडुन करड्या ढगांना पावसाची वाट करुन दिली.

- प्राजक्त   
दै.सामना ३१/०५/१४
http://epaper.saamana.com/Details.aspx?id=49818&boxid=135368 )

Friday, May 23, 2014

टिफीन बॉक्स

"असा पाऊस ह्या भागाने गेल्या दहा वर्षात नसेल पाहिला" हे जेव्हा मला चौकशी खिडकीतुन ऎकायला अालं तेव्हा असं वाटलं मी बसस्थानकाच्या चौकशी खिडकीवर अाहे कि हवामान खात्याच्या ? रात्री दहाच्या बसची वाट पहात अाता रात्रीचा एक वाजला होता.तासभरात-तासभरात अशी माळ जपुन झाल्यानंतर शेवटी चौकशीवाला दहा वर्षाचं हवामान सांगुन मोकळा झाला. पावसानेच परतीचे दोर कापले होते. अाणि अशा तालुका ठिकाणी लॉजची शकयता कमी होती. जवळ एकुलता लॉज बंद होता. अाता हातात पाणी अोसरणे अाणि बस येणं इतकंच उरलं होतं
निर्जन स्थानकावर वीज नसल्याने एक मुलगी प्रत्येक खांबावर कंदिल लावत होती.कंदिलाच्या अंधुक प्रकाशात मला ती जरा भडक रंगांचे कपडे घातलेले दिसली अाणि डाव्या गालात पान असावं. "तुम्ही कधीपासुन बसलाय? सकाळी सहा पर्यंत कोई गाडी नही अाएगी" तिने जवळ येऊन मला सांगितलं. मी म्हणालो "हां अब कही जा भी नही सकता सो रुका हुं" .
तिने परत विचारलं "कुछ खाअोगे ? मेरे पास है. लेकिन चालेल तुम्हाला माझं?" . मी समजलो नाही म्हणुन म्हणालो " मी जात पात ....." तिने माझ्या वाक्य तोडलं अाणि म्हणाली "तसं नाही. पण सहसा माझ्याकडे रात्रीचे सभ्य लोक येत नाही". मी समजुन गेलो अाणि भुकही लागली होती. मी म्हणालो "अन्नाला जसा धर्म नाही तसं रांधणा-याच्या कर्माशी कसलं अालंय देण घेणं?". तिच्याकडचा डब्बा अाम्ही खाऊ लागलो ती बोलत होती "वैसे मी जवळच राहते. पण पावसात पहिला मजला बुडालाय अाणी उरली एकच खोली त्यात अाधीच दोन जोडपी अाहे. दोघं सकाळ झाली जातील म्हणुन मी अाले बाहेर. अाणी झोप येत नाही तशीही रात्री.
वैसे अपनी निंद थी , मोहताज़ 'उसके' ख्वाब की
अब ये मअसला चांद के खुंटीपे हमने टंग दिया
इथली पडली धडली कामं करते कधी कधी. म्हणजे मला कुणी फसवुन,बळजबरी वगैरे करुन नाही अाणलं इथे. अाई हेच करायची.मग तिला पहात मोठी झाले मग काय तेच काम नशिबी. मुख्य म्हणजे तिची सुटका व्हावी म्हणुन तिला सोडुन नाही गेले. तसा तिचा धाक म्हणजे वाघाची डरकाळी. तराजु डोळ्यात विजा तोलायची. अाता थकलेत डोळे तिचे. ती गेली कि मी पण जाणार इथुन. इथल्या काही मुली अाहे लहान त्यांना शिकवायला घेऊन जाईल. अाजुबाजूला तेच पाहुन त्यांना उद्या असंच जगावंस वाटायला नको. ह्यात काय अालंय जगणं?. सरकारी अाणि अंतरमनाविरुद्धचा हा बेकायदा पैसा काय करायचा? अातुन बाहेरुन पोखरल्या पुरुषी अहंकारासाठी रोज रात्री नव्याने नटायचं.लेकिन इधर उधर रेप कर के नोचनेवालोंसे ये लोग लाख गुना बेहतर है. इनके वेहशित मै एतिहाद है. राक्षसीपणा असला तरी तो नियम पाळुन अाहे. " "तो कंदिल विझला बघ ग" कुणीतरी अावाज दिला. "झाली वेळ येईलच गाडी अाता."असं म्हणुन ती गेली. माझी गाडी अाली.थांबणार नव्हती. मी संपलेल्या डब्यात त्या अन्नदात्याचे अाभार म्हणुन काही पैसे ठेवले. गाडी स्टेशनच्या अगदी टोकावर असतांना ती परतांना दिसली. तीने हसुन निरोप दिला. त्यानंतरचा प्रवासभर एक गोष्ट सारखी अाठवतेय. अामच्या जुन्या घरी मागल्या पिंपळाखाली लहान मुलं मुली भातुकली खेळायचे. रुमालाचा मंडप,मुरमु-याची पंगत वगैरे. मग दरवेळी जत्रेतुन अाणलेल्या नवनव्या राजबिंड्या बाहुल्यांसाठी , त्याच पिपाणी हरवल्या पायाच्या बाहुलीला नेहमी बोहल्याचा घाट असायचा.कायमचा .

- प्राजक्त (२४ मे १४ दै सामना)
http://epaper.saamana.com/Details.aspx?id=49598&boxid=221148328 )

Friday, May 16, 2014

कांड्या

"........ श्शक् श्शक् ! ते तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट अाहे का ? " 
अाधीच चार जणांच्या जागेवर पाच जण रिक्षात बसावे तसे एडजस्ट होत माझा रेल्वे प्रवास चालु होता. सोबतच्या मित्रांपासुन दुर मला कसेबसे सिट मिळाले त्यात "किच्चेने किच्चेने ! देखने मै क्या जाता हय , देखने का पैसा नय " असं सांगणारा माणुस नाकासमोर वडाच्या पारंब्या लटकाव्या तशा कि-चैनच्या पारंब्या लटकवत होता. अाणि त्यात हा असा एकाचा प्रश्न. मी हो म्हणालो तर म्हणाला " ते भिंड ते जळगाव किती अंतर अाहे बघता का ? भिंड मध्यप्रदेश मधलं ... " मी प्रयत्न केला पण प्रवासामुळे सिग्नलमध्ये व्यत्यय येत होता. मी म्हणालो " थोडा वेळ लागेल सिग्नल प्रोब्लेम अाहे." तो म्हणाला " कांड्या नाहीए का ? बरं तेवढं कांडी अाली की बघुन सांगा ." थोडावेळ टोकावर टेकुन टेकुन माझ्या बुडाने " अाता बास्स " म्हटले म्हणुन मग मी पाय( किंवा बुड) मोकळे करायला दारामध्ये जाऊन उभा राहिलो.
"कांड्या अाल्या का?" मी जवळ जवळ दचकुन खाली दरीत उडीच मारायचा बाकी होतो.तोच माणुस परत तोच प्रश्न घेऊन उभा होता.मी खिशातुन मोबाईल काढुन पाहिला 'कांड्या' नव्हत्या. मग अाम्ही दोघं नुसतेच दारावर उभे राहिलो अाणि तो म्हणाला " माझा लहाना भाऊ अाहे. तो शिक्षक अाहे पण हे इलेक्शन डयुटीसाठी गेला होता तिकडे भिंडला. काल निघाला म्हणे अाठ रात्री वाजता अाता जवळपास रात्रीचे नऊ होत अाले पण घरी पोचला नाही.फोन बंद अाहे.खराब झाला म्हणाला होता शेवटंच बोलणं झालं तेव्हा.काळजी वाटतेय. ११ दिवसांनी लग्न काढलंय त्याचं. " समोरुन भरधाव रेल्वे गेली अाणि त्याच्या ह्या खुलाशाने अाणि समोरच्या रेल्वेमुळे नखशिखांत हादरलो. मी परत मोबाईल काढुन एक निष्फळ प्रयत्न केला.
मी विचारलं " कोण कोण असतं घरी ?" तो अजुन बोलत होता "सरकारचं काय कळत नाही कशाला पाठवता शिक्षक लोकांना इतक्या लांब लांब ?" तो माणुस तंद्रीत होता मी परत विचारलं " कोण कोण असतं घरी?" त्याने ऎकलं की नाही ठाऊक नाही पण तो बोलतंच होता "मी कारकुन अाहे एका खाजगी कंपनीत . वडिल चालतांना शुद्धीत नसायचे त्यामुळे बोटधरुन चालायला कुणी नाही शिकवलं. गुडघे फुटतंच शिकलो. अाई सकाळी दोघांना रांगेत बसवुन गुडघ्यांना मलमपट्टी करायची. पाठीशी एक भाऊ अाणि एक बहिण. मी मोठा असल्याने मलाच कितेकदा त्यांचा बाप व्हावं लागलं. नंतर एकदा बाप कायमचा नाहीसा झाला अाणि अाई गेली. मग मला अाई पण व्हाव लागलं.

बाप होणं सोपं होतं...किंवा पुढे होणारच असं कुठे तरी माहिती होतं पण सालं आई कसा होऊ. मोठा असलो तरी म्हणावी तितकी आई माझ्या वाट्याला कधी आलीच नाही.
लहान असतांना झाप्या मधुन उजेडाचा तुकडा पसरायचा घरात मग मी खाट घेऊन जायचो तिथे आणि ती उब कवटाळुन झोपुन जायचो. उठल्यावर तो उबेचा तुकडा दुर वर कुठेतरी कौलाच्या खुटीवर लटकलेला असायचा. बस तितकीच झोपेच्या गुंगीत जितकी आई वाट्याला आली तेवढी.
कोणाला आई म्हणटल्यावर चंद्रासारखा गोल अंबाडा आठवत असेल ,कोणाला रुपया इतकं कपाळ कुंक आठवत असले.कुणाला दुलईची उब आठवत असेल. पण मला ना आई म्हण्टलं की फ़क्त कानाजवळ बांगड्यांची खुळखुळ ऐकु येते. झोपेच्या गुंगीत तितकीच आई आली वाट्याला.मला थापटणारी. तिच्याकडे पहावं म्हटंल तर "मिटा डोळे..मिटा" म्हणायची.
लहान होतो तर मांजरीच्या पिलासारखा घुटमळायचो तिच्या भोवती...पण मग चुलीचा धुर झाला की मग तुळशीला पाठ टेकवुन स्वैंपाक घरात डोकावुन बघायचो...डोळ्यात पाणी येईस्तोवर. नाही रडलो नाही कधी मी .ते धुर जास्त असायचा ना.
आईच्या पदराला धरुन चालंल की आई म्हणायची.. "काय रे नुसता पदराशी ? लहान राहिला का तू आता ? मोठ्यासारखं वागायला शिक अाता"
एकदा शाळेत निरोप आला मला. मी शाळेची पिशवी सोडुन घरी पळालो तर लहान बहिण आईची साडी घालुन नुसती हसत होती.उगाचच... आणि घराच्या आत बाहेर गर्दीच गर्दी.गर्दी भागुन आत शिरलो तर तुळशीचं पान ओठाशी धरुन आई निजलेली दिसली.
बहिण हसत हसत आली आणि आईच्या पदराशी खेळायला लागली...
त्या दिवशी तिला पहिल्यांदा आणि शेवटंच मारतांना मी म्हणालो.... "काय गं नुसतं पदराशी ? लहान राहिली का तू आता ? मोठ्यासारखं वागायला शिक अाता."

तितक्यात माझं स्टेशन अालं. गाडी दहा मिनीटं थांबणार होती. मी गाडीतुन उतरल्यावर दोन गोष्टी केल्या.
पहिली गोष्ट, प्लॅटफॉर्मवर थोडा जास्त वेळ रेंगाळलो अाणि मोबाईलवर शोधुन त्याला म्हणालो "दादा, ८५० किमी अाहे साधारण. म्हणजे निदान उद्या सकाळी ११/१२ पर्यंत यायलाच पाहिजे.काळजी नका करु"
अाणि 
दुसरं गोष्ट, " हां ,पोचलोय स्टेशनवर. येतोच १५ मिनीटात घरी" .घरी फोन केला.

- प्राजक्त 

(दै सामना १७।०५।२०१४ )
http://epaper.saamana.com/Details.aspx?id=49382&boxid=111926796 ) 

Friday, May 9, 2014

लॉस्ट एण्ट फाऊंड

माझ्या नेहमीच्या लायब्ररीकडे जाताना मधे रद्दीचं दुकान लागतं मग कधी कधी रद्दी मी तुटका स्टुल घेऊन रद्दी मधली पुस्तक चाळत बसतो. त्यात चुकून कधी कधी एखादं दुर्मीळ वाट चुकलेलं पुस्तक सापडुन जातं. पण परवा जे काही सापडलं तेव्हा पासुन मी लायब्ररीचा रस्ता बदलायचा विचार करतोय. रद्दी दुकानाशेजारीच स्क्रॅप मटेरीअलचं दुकान कम टपरी अाहे. तिथे गोल चौकोनी पत्र्याच्या वस्तु कापुन सरळ करतात अाणि मग परत विकतात. नुकतीच एक गंजलेली लाल पत्रपेटी उभी कापुन टाकली तेव्हा माझं लक्ष गेलं की वरच्याबाजुला एक पत्र चिकटलेलं होतं पण अवस्था बिकट होती.

(प्रियवर लिहुन काठ मारलेली ) सगुणास ,
काही लिहण्यासारखं नाही पण माहिन्यामधुन एकदा पत्र लिहुन घेण्याचं वचन घेतलंय म्हणुन हे अाजचं पत्र. सगळीच गंमत दुसरं काय. मला डोळे बंद करुन रस्ते क्रॉस करण-यांचा भयंकर राग येतो , बंद म्हणजे खरोखर बंद नाही पण उगाच 'कुणीच नाही , कुणीच नाही' असं स्वत:ला सांगत रस्ता अोलांडला म्हणजे अाजुबाजुने येणा-या गाड्यांच सत्य नाकारता थोडीचं येतं. पण अाजकाल स्वत: तेच करतोय असं वाटतंय मला. 'डोळे बंद करुन रस्ते क्रॉसींग'. देव करो माझा अंदाज चुको अाणि बेमौत धडक बसो. सुटका.
अच्छा मागे नवरात्रीत देवीला गेलो होतो तिथली गर्दी पाहुन 'प्रचंड' ह्या शब्दाला ईर्षा निर्माण झाली असेल. तिथे देवीनंतर (की देवीपेक्षा ? ) दोन गोष्टी जास्त लक्षात राहिल्या
एक - पोलीसाचा एक छोटेखानी 'लोस्ट एंड फाउंड' चा तंबु . जिथे काही लहान पोरं अाणि पिशव्या पडल्या होत्या.
दोन - थोड्यावेळाने मरणाच्या गर्दीतुन "सोनी, सोनी" हाका मरणारा मध्यमवर्गीय बाप.

तो बाप एक शतमुर्ख - असं घट्ट पकडलेला हात कोणी सोडतं का कधी.पण त्याची तरी काय चुक म्हणा त्याला वाटलं असेल सुटलाच हात तर 'तीच' परत य़ेउन बिलगेल त्याला.

सगळीच गंमत दुसरं काय.

'लोस्ट एंड फाउंड'च्या इथुन जातांना थोडा रेंगाळलो म्हटंल बघु स्वत: सारखं काही दिसतंय का . टोटल वनपीस मध्ये. हे असं न झोपणारे तांबरलेले डोळे , थापलेल्या अाशेचे खांदे , फिट अाल्यागत अात पोटात गळुन पडलेली शांत जीभ, इत्यादी इत्यादी चे वेडे वाकडे कोलाज चिकटवुन 'मी' म्हणुन फिरतोय इतके दिवसं म्हणुन 'लोस्ट एंड फाउंड'च्या इथुन जातांना थोडा रेंगाळलो म्हटंल बघु स्वत: सारखं काही दिसतंय का . टोटल वनपीस मध्ये. पण फक्त घशाची शीर ताणून रडणारं पोरगं दिसलं अाणि शीर ताणुन ताणुन थकुन निजलेली एक घाबरी घुबरी पोरगी .ती डाव्या कुशीवर झोपली होती अाणि अश्रू अोघळतो तसा धुळीचा अोघळ होता डाव्या गाली.देवीचं दर्शन निट नाही झालं ह्या असमाधानात 'ती झोपलेली' 'सोनी' असावी असा अापला स्वत:शीच अंदाज करत वेगळं समाधान घेउन घरी गेलो (हेच ते डोळे बंद करुन क्रॉसींग)
सांगायचं तात्पर्य हे की कपाळाची शीर ठणकते अाहे अाजकाल . सगळीच गंमत दुसरं काय.
देवाला गेल्यावर कुणीतरी अापल्याला 'देव मानतं' ह्याची अाठवण येते कधी कधी . मग 'कोणता देव?' तर परत अापण अापलं कृष्ण मानुन घ्यायचं (डोळे बंद करुन क्रॉसींग). नाही , कारण असं की त्याच्याकडे लोकं सगळ्या जगाची दुखणी घेउन यायची. द्रौपदी काय तर साड्याच मागते, अर्जुन काय तर सारथ्यंच मागतो , सुदामा काय तर मैत्रीचे ऋणंच मागतो , राधेला काय तर पावाच अएकायचा- पण कृष्णाची खरी कळ,खरी ठसठस कुणाला कधी कळलीच नाही अाणी ती कधी थांबलीसुध्दा नाही.

सांगायचं तात्पर्य हे की अाजकाल कपाळाची शीर ठणकते अाहे. सगळीच गंमत दुसरं काय.

त्यात राधेला अाठवण अाली की कृष्णाने पावा हाती घ्यावा अाणि पोहचावं कधीही राधे पर्यंत पण मग अशाच प्रसंगी कृष्णानं काय करावं ? कारण राधेला पावा येत नाही (अाणि कृष्णच जगत्पालक झाल्याने त्याला 'धावा' करता येत नाही) अाणि तिला-राधेला सगळीकडे त्याला-कृष्णाला बघण्याचं कसब जमुन अालाय अाताशा.
पण मग अापण स्पष्ट दिसावे म्हणुन अर्जुनाला अाणि राधेला कृष्णाने 'दिव्य दृष्टी' दिली .पण त्यामुळे राधेची चिंता कायमचीच मिटली असली तरी अशाच प्रसंगी कृष्णानं काय करावं ?

तर सांगायचं तात्पर्य हे की देवाला गेल्यावर कुणीतरी अापल्याला 'देव मानतं' ह्याची अाठवण येते कधी कधी . मग कोणता देव तर परत अापण अापलं कृष्ण मानुन घ्यायचं. सगळीच गंमत दुसरं काय.

त्यात अाजकाल विसरायला तर होतंच अाहे पण एकच गोष्ट दोन दोनदा सांगीतली जातेय माझ्याकडुन. बरं, मी हे सांगितलं का तुला की अाजकाल कपाळाची शीर ठणकते अाहे.

सगळीच गंमत दुसरं काय.

तुझा ,
पुसट होत चाल्लेला
????
ता.क. : अाजकाल विसरायला होतंय खुप अाणि एकच गोष्ट दोन दोनदा सांगीतली जातेय माझ्याकडुन...

- प्राजक्त

(दै.सामना १० मे २०१४ )

http://epaper.saamana.com/Details.aspx?id=49160&boxid=1230432


Friday, May 2, 2014

सी दत्ता (सामना) / निरोप (मटा)

"सरळ जाऊन चर्चच्या मागे डावीकडे गेलं की घर लागेल त्यांचं..." मग मी चर्चच्या संध्याकाळच्या घंटानादाला डावीकडुन वळसा घेतला. दाट झाडीतुन पसरलेल्या उन्हाने वाटेवर गालीचा बनवला होता. एक टुमदार छोट्याशा बंगल्याजवळ थांबलो. गेटवर बंगला अाणि बंगल्याच्या मालकाची अोळख लिहली होती. 'स्वरगंगा'सी.दत्ता संगीत दिग्दर्शक.

काही दिवसांपुर्वी धारवाडला गेलो तेव्हा त्यांच्या बहिणीशी परिचय झाला. मी त्यांच्या भावाच्या गावकरी म्हटल्यावर त्यांनी लागलीच अोळखपाळख काढुन मला अमुकतमूक ठिकाणी त्यांना हे फोटो , ही डायरी अाणि हा डब्बा देशील का विचारलं. त्या तरतरित नाकाच्या, रुपया इतक्या लाल कुंकवाच्या पण चिंतीत कपाळाच्या अाजींना नाही म्हणवलं नाही.अाणि इंटरनेट ने फोटो 'शेअर' करा की असंही एकंदरीत त्यांच वय पाहुन सांगितलं नाही. दार बराच वेळ झाला उघडलं नव्हतं म्हणुन हातातली डायरी चाळत बसलो.
हां, तर सी.दत्तांचं दार उघडलं काटक दिसणा-या काकुंनी "अात्ता फोन केलेले तुम्हीच का ? , विजुने पाठवलं ? " मी दोन्ही प्रश्नांचं मिळुन एक उत्तर 'हो मीच' देउन अात शिरलो. " बसा , हे येतीलच इतक्यात' सांगुन काकु स्वैपाकघरात गेल्या .
खरंतर सी दत्ता हे नाव मी कधीच ऎकलं नव्हतं.घरी माहीत असेल असं समजुन मोठ्या अभिमानाने सांगितलं की अाज सी दत्तांकडे चाल्लोय तर 'हम्म' इतकंच उत्साह ऎकु अाला. म्हणजे ह्या नावाने कोणी अाहे हे घरीपण माहीत नव्हतं.
पण घर अत्यंत सुबकपणे सजवलं होतं. गोदाघाटाचं अप्रतिम पेंटींग, जुना ग्रामोफोन , त्याच्या जवळच अन्टिक शेल्फवर ठेवलेल्या ग्रामोफोनच्या खुप सा-या रेकॉर्डस् , काचेच्या शोकेस मधे ठेवलेल्या सिडीस् अाणि केशरी,पिवळसर रंगांच कॉंबीनेशन असलेली बैठक.
कोकम सरबत घेऊन येता येता काकुंनी अावाज दिला " दत्ताssss ! , तो मुलगा अालाय रे ! " मी हसलो . काकुंनी कुठे राहतो वैगेरे विचारलं. मग सी दत्ता अाले . अत्यंत संथगतीने हातात काठी, शुभ्रकेस , शुभ्र सदरा , पाणीदार डोळे अाणि स्मितहास्य. "जोतिबा , काही पाणी-थंड ? " त्यांनी त्यांच्या पत्नींना विचारलं. (कदाचित त्यांच्या पत्नीचं नाव ज्योती होतं) मी माझी कुरिअरसेवा केली. मग त्यांनी इकडची तिकडची विचारपुस केली. अाणि बोलु लागले.
"हि बघ ही ' संगीत कृष्णकाठ' ची सिडी . ठेव तुझ्याकडे. ऎक अाणि कळवं कशी वाटली. मास्टर दिनानाथांचं पत्र अालं होतं खुप अावडली होती सगळी गाणी त्यांना. तुला कुमार प्रभु माहिती अाहे ? " मी अर्थातच हो म्हणालो प्रभुंना कोण नव्हत अोळखत. मग त्यांनी मला प्रभुंची स्वाक्षरी असलेली सिडी दाखवली . " पंडीत चौरासियांबरोबर कामाचा योग येता येता राहिला. कार्यक्रमच रद्द झाला पण त्या निमित्ताने भेट झाली . माझं काम खुप अावडलं होतं त्यांना. तुझे कुणी अोळखीचे असतील तर कळव छान चाली लाऊ अापण . तू स्वत: पण कविता लिहतोस म्हणाला ना . अाण घेऊन ये एकदा करु या काहीतरी . फक्त रेकॉर्डींगच बघावं लागेल. " ते बोलत होते अाणि मी त्यांनी दिलेली सिडी कॅसेट बघत होतो. "जोतिबा !!! , अगं......" त्यांच वाक्य पुर्ण व्हायच्या अात अातुन अगदी समंजस अावाज अाला " हो हो लावते इंद्रधनुची गाणी लावते "
"हा बरोबर ! अाणि ते....." परत त्यांचं वाक्य पुर्ण व्हायच्या अातुन सवयीचा प्रेमळ अावाज अाला "हो दत्ता, तिसरं गाणं अाधी लावते " मग गाणं सुरु झालं. " ऎक हा तु मी अालोच " असं म्हणुन सी दत्ता अात गेले. मी गाणं ऎकत एकंदर अाजुबाजुचा अंदाज घेत होतो की काही अोळखीची गाणी दिसताय का जी दत्तांनी केलीय जेणे करुन मलाही 'मला तुमचं अमुक गाणं खुप अावडतं' असं म्हणता येईल.
तितक्यात काकु बाहेर अाल्या. काकुंनी पंखा लावत माझ्या शेजारी काही महत्वाचं सांगायच्या पवित्र्यात बसल्या अाणि बोलु लागल्या. " माफ करा पण दार उघडायला उशीर झाला. तुम्ही दिसला पण फक्त हातात डायरी दिसली म्हणुन मला वाटलं कुणी काम घेऊन अालंय. कसंय अाता दत्ताचं वय झालं अाणि लोक सर्रास चर्चा म्हणुन येता अाणि काम करवुन निघुन जातात. उमेदीचा काळातही दत्ताने फक्त संगीताच्या वेडापायी कामं केली. दैवी देणगीला कचकडी रुपड्यात विकणं त्याला मान्य नव्हतं. पण ह्या समाधानाने मन भरतं , लोकांकडुन कौतुक होतं पण कौतुकाने पोट भरत नाही. नंतर मग दत्ता हताश व्हायचा. अाणि कलाकाराचं हताश होणं सगळ्यात वाईट. अाणि कलाकाराचा अाशावाद त्याहुन जास्त. ' 'एक दिवस असा येईल.......'ह्या अाशावादावर कलाकार त्याचं संपुर्ण अायुष्य काढु शकतो. अाताशा वयाने त्याला हा त्रास सहन होत नाही. मागेदत्ता अॅडमिट होता तेव्हा 'हार्ट रेट मॉनिटर' वर दिसणा-या ठोक्यांवर त्याने पडल्या पडल्या ताल धरुन एक धुन बनवली. हे तेच 'इंद्रधनु'मधलं तिसरं गाणं  "ती अन ही दो राधांमध्ये अंतर नव्हते कसले - 
तिला मिळाला कृष्ण ,बिचा-या हिचे अंदाजच फसले " . कुणी पाहुणे अाले की एखाद्या नाटकाच्या संवादासारखे त्याचे सगळे संवाद पाठ झालेत मला. कलाकाराला चिमुटभर अाकड्यांपेक्षा मुठभर शब्द जवळचे वाटतात. तो अाता त्याच्या खोलीत 'संगीत शिरोमणी' नावाचं पाच वर्षापुर्वीच मासिक अाणायला गेला असेल. त्याच्यावर ३पानी लेख अाला होता.अाणि लौकरच एक नवीन 'प्रोजेक्ट' सुरु करणार असल्याची बातमी सुद्धा. ह्या-त्या कारणाने प्रोजेक्ट अजुन ढकल्याच जातोय. काही चांगल्या मानधनाच काम असेल तर नक्की सांग" तितक्यात दत्ता हातात मासिक घेऊन अाले. " हे बघ रे 'संगीत शिरोमणी' पुस्तक ....... " पुढंच सगळं काकुंनी सांगितलंच होतं. मी तिथुन निघालो.
बाहेर पडतांना एक विचार सगळ्या घटना अाधीपासुन डोक्यात घोळत होत्या. एक विचार अाला ' प्रत्येक कलाकार सच्चा हवा अाणि त्याला एक व्यवहारी जोडीदार असायलाच हवा.अगदी सुरवातीपासुनच.


- प्राजक्त देशमुख
( दै सामना ०३/०४/२०१४ http://www.saamana.com/2014/May/03/Link/FULORA13.HTM 
http://epaper.saamana.com/Details.aspx?id=48926&boxid=2375458 )


अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...