Monday, November 23, 2015

बॅकबेंचर्स : १९ शेवटाकडुन सुरवात

काल रात्री लिहता लिहता पेन उघडंच राहिलं अाणि झोपी गेलो.पेन टेबलावरुन घरंगळत खाली पडला अाणि नदी वहावी तशी शाई वहात गेली . मध्यरात्री त्याचा माग घेत घेत निघालो तर एका शाळेत पोहचलो . अनेक वर्ष बंदिस्त असलेली शाळा. जाळं जळमटं, वेली पानं सारुन अात गेलो.

 शाळेच्या बाकड्यावर गिरवलेले XOXO खेळ सापडले , बिना टोपणाचे पेन सापडले तसे बिना पेनाचे टोपनही सापडले , एक शाईची छोटीशी बसकी रिकामी बाटली सापडली , एक गच्च शाईचं भिजलेलं  सुकलेलं थारोळं सापडलं , शाईचा एक तिरकस सपकारा सापडला , बाकाला कच्च बांधलेली रिबीन सापडली.....वेणी बांधली असेल कोणाची तरी. फळ्यावर पुसट गुणाकार,भागाकार, साईन,थिटा,कॉस, प्रमेय सापडली. कौलांमधुन येणारा निळसर प्रकाश सापडला , डाव्या कोप-यात चिमणीचा विस्कटलेला खोपा होता , मागच्या कोप-यात कबुतरांचा घुमत्कार होता त्यांचा खोपा कधीच कुणाला कधी का नाही सापडला देव जाणे.त्यांच देवा सारखं झालं होतं जाणवायचं पण दिसायचं नाही. वैतागुन टेबलवर छडी अापटली होती तेव्हा पुढचा तुटलेला तुकडा सापडला. सणावरात भिंती चौकटींना पताके लावले होते. त्यांचे रंगविटके अवशेष सापडले. मारलेला कागदाचा बोळा , बोळ्यामधे शाळा सुटल्यावर भेटण़्याचे ठिकाण सापडले. महापुरुषांचे फोटो ज्यावर लटकवले ते खिळे सापडले. फोटो नसलेल्या ठिकाणी भिंतीच्या शुभ्र चौकोटी सापडल्या. महापुरुषांचे फोटो उंच टांगायचे हे अाता चुकीचं वाटतं. नजरेच्या सरळ रेषेत ठेवले असते तर 'डोक्यावरचा विषय' म्हणुन सोडुन दिला नसता. ख्रिस्त टांगावे तसे महापुरुषांचे फोटो मुल्यांसकट टांगुन दिल्यासारख्या भिंती अाता भकास वाटतात. फळ्याच्या तळावरुन बोट फिरवल्यावर खडुची भुकटी सरळ रेषेत खाली पडत गेली. तिथेच खाली काही शिल्लकीतले खडु सापडले. शिक्षकांनी त्यांच्या कपाटातुन खडु अाणायला सांगितला कि खडु घेऊन पाण्याची टाकी , स्वच्छतागृह , मित्राचा वरच्या मजल्यावरचा वर्ग, अशी सगळी विश्वभ्रमंती करुन खडु अाणला जायचा. फळ्याचा कोप-यातली पटावर , हजर, गैरहजर अशी बेरीज वजबाकी सापडली ज्यात  पटावर ह्या विचित्र शब्दाचा अर्थ कितीतरी दिवस लावत होतो नंतर कळालं 'पट' हा मुळ शब्द अाहे. 
परिक्षा संपल्या , शाळा सोडायचा दिवस होता तेव्हा मास्तरांनी फळ्यावर लिहलं होतं " उद्यापासुन परिक्षा " हे पुसट शब्दही सापडले. त्यानंतर शाळेची जागाच बदलली अाणि इथे फक्त अवशेष उरले , अाठवणी उरल्या ज्या नंतर पडक्या झाल्या.  सगळं सापडलं पण वर्गाच्या शेवटीची बाकांची रांग नाहिशी होती. बॅकबेंच ?काही मुलं फक्त शिक्षण घेऊन बाहेर पडतात. बॅकबेंचर्स बेंचच्या वृत्तीसकट बाहेर पडतात.

- प्राजक्त २३ नोव्हेंबर २०१५


Saturday, November 21, 2015

बॅकबेंचर्स : १८ तो अाणि हा ( दै सामना २१/११/१५)

हा नोकरीवाला,तो धंदेवाला .हा अगदी गरीब नाही पण व्यवस्थित घर चालु अशी नोकरी, तो गडगंज श्रीमंत असा व्यावसायिक. याची नोकरी म्हणजे ८ तासाचा मालक, व्यवसाय म्हणजे तो २४ तास नोकर.   हा बहाद्दर मेडिकल लिव टाकुन लोणावळ्याला जायला मोकळा,त्याच्या जीवाला घोर मी सुट्टी घेतली तर हे सगळं बघणार कोण ?  ह्याला जरा हात मोकळा करायला वर्षभराचे प्लानिंग करायला लागणार,त्याला पैशाची चणचण नाही. हा घाण्याला जुंपलेला बैल असा याचा समज,तो त्याच्या मर्जीचा मालक असा त्याचा समज.  ह्याला कधी 'सॅलरी हॅज बिन क्रेडीटेड' चा एसएमएस येतो अशी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातली रुखरुख,त्याला महिना संपायला आला की पगार वाटायची कटकट. ह्याला शनिवार रविवार जोडुन येणा-या सुट्ट्यांचं अप्रुप,त्याला सुट्टी माहीत नाही, त्याला सणवारात बॅंकेचे व्यवहार बंद असतील ही चिंता. हा सुट्टी मॅनेज करत चार आॅप्शनमधुन एक देव निवडतो,तो वेळ काढुन देवदेव करत नवे देव हुडकून काढतो.
हा त्याच ट्राफीकमध्ये बसमधून विचार करतोय आयुष्यात एकदा चारचाकी घ्यायचीच ,त्याला ट्राफीकचं,पार्किंगचं टेंशन,तो म्हणतो 'देशात पब्लिक ट्रांसपोर्ट सुधारली पाहीजे'.
कधीकधी ह्याची बायको काही घेऊनच येत नाही म्हणुन वैतागलेली, त्याची बायको काहीही घेऊन येता म्हणुन कंटाळलेली.  कधीकधी हा तिला कुठे घेऊनच जात नाही म्हणुन ती रुसूबाई, तो तिला कुठही घेऊन जातो म्हणुन ती खट्टूबाई . हिला वाटायचं धंदेवाईक मिळाला असता तर बरं होतं, तिला वाटायचं नोकरीवाला मिळाला असता तर किती बरं होत.
ह्याला वाटतं नोकरी सोडुन एखादा धंदा करावा.किती दिवस दुस-यासाठी राबायचं?  ,त्याला वाटतं स्साली नोकरी परवडली जिवाला घोर नाही. 
दोघं एकाच वर्गातले. तो पहील्या बाकावर बसायचा.हा शेवटच्या .
हा नोकरीवाला,तो धंदेवाला. हा पैशावर ताबा मिळवायला झटतोय...जीवाची गरगर , ह्याच्यावर पैशानेच ताबा मिळवलाय.....जीवाला घरघर.

- प्राजक्त 


Monday, November 16, 2015

बॅकबेंचर्स : १७ शुभेच्छा ( त्रासिक ) संदेश ( दै सामना १४/११/१५)

मी त्याला शोधतोय जो घाणेरड्या फोटोशॉपच्या मदतीने शुभेच्छा संदेश बनवत बसलाय अाणि प्रत्येकाच्या मोबाईलवर भस्म्या झाल्यागत पाठवत सुटलाय. अशा लोकांची कल्पकता सकाळी सकाळी अत्यूच्च टोकावर असते का काय कोण जाणे ? सकाळी सकाळी मेसेज बॉक्स उघडला कि पुढिल प्रमाणे काही गोष्टी तुम्हाला दिसत असतील तर तुमची किव करावी तेवढी कमी अाहे.सकाळी सकाळी मोबईलमध्ये असा काही कलाविष्कार बघायला मिळणं म्हणजे किवच. 
गुलाबाच्या दवामधुन उगवणारा सुर्य अाणि पिवळ्याचट्ट रंगात 'गुड मॉर्निंग' लिहलेलं , सुर्यफुलामध्ये प्रकाशमान झालेला अोम , कुठलीशी निरागस मुलगी अंगभर मोत्यांच्या माळा वागवतेय अाणि तिच्या हातात गुड अाणि पायात मॉर्निंग गोंदलंय , एखा्द्या मादक ललनेच्या अोठांच्या जागी गुलाब पाकळ्या फोटोशॉप केल्या अाहे अाणि तीच्या खडकावर झोपलीय त्या दगडांवर गुडमॉर्निंग लिहलंय. ह्या शुभेच्छा संदेशात गणपतीरायाचा जेवढा छळ झालाय तेवढा लहानपणी भावंडांच्या भांडणात कार्तिकाने सुद्धा केला नसेल. उंदराने हातात उचललेला  गणपती, मारुतीने खांद्यावर उचलेला गणपती, गवताच्या पात्यांच्या थेंबामध्ये गणपती, गरुडावर बसलेला गणपती ,गाईच्या डोळ्यातल्या बुब्बुळामध्ये गणपती, डोंगराइतकी मोठ्ठी पिंड खांद्यावर उचलुन नेणारा गणपती अाणि असे बरेच सारे धन्य गणपती. शुभ सकाळ वगैरे ठिक अाहे.पण शुभ दुपार ,शुभ संध्या, रम्य रजनी हे जे काही कॉपीपेस्टियांचे खुळ सगळीकडे अाहे ते अत्यंत त्रासदायक अाहे. एखाद्या गोंडस बाळाच्या खुदूखुदू हसणा-या फोटोवर 'हेहेहेहे गुड नाईट नही कलोगे?" अरे हो बाबा नाही करणार अाणि ज्या उघड्याबाळावर जांभळ्या रंगाचा फॉंट अाहे त्याला तर नहीच कलुंगा मै. 
समुद्राच्या फेसाळत्या लाटेवर शुभ अाणि शिंपल्यावर संध्याकाळ , सलमाननामक एखाद्या नटाच्या अश्रुतुन एखादी विश्वसुंदरी तरळतेय अाणि दिल है तो दुखेगा ही असा संदेश त्याने रात्रीच्या कोणत्या प्रहरी बनवुन एडिट केला असेल हे त्याच्या अोल्या उशीलाच माहित.
बरं असंही अाहे बरका कि रोज एक मेसेज गेलाच पाहिजे नाहीतर त्यांना वाटतं कि मेसेज न मिळालेल्या व्यक्तीला पोट साफ न झाल्या इतकी अस्वस्थता वाटत असेल. म्हणजे असं फक्त पाठवणा-यालाच वाटतं. याच्या रोजच्या दिनक्रमात ब्रशच्या अाधी शुभसंदेश धाडणे अाणि त्याच्या रोजच्या दिनक्रमात ब्रशच्या अाधी ते डिलीट करणे असं ठरलेलं असावं इतकं सगळं सवयीच. बरं एखादं सुंदर निसर्गचित्र , सुंदर पुतळा , सुंदर सुर्यास्त किंवा सुर्योदय किंवा पोर्णिमेचा चंद्र यांना गालबोट लावणारा बटबटीत फॉंट कुठून मिळत असेल बरं. तरी मी येताजाता लोकांच्या खिडकीतले बोर्ड बारकाईने वाचत असतो ह्याच अाशेने कि मला कधी तरी ' येथे सुंदर फोटे बटबटीत करुन मिळतील तसेच जिवाला घोर लाऊन मिळेल' हे वाचायला मिळेल.
मला दाट शंका अाहे कि हे षडयंत्र एखाद्या मागच्याबाका बसणा-या टोळक्यांच असेल अाणि कोण किती वाईट चित्र बनवतो ह्या त्याच्या शर्यतीत ते एकमेकांना डोळ्यातुन पाणी येईस्तोवर हसत असतील.
- प्राजक्त


Sunday, November 1, 2015

बॅकबेंचर्स :१६ वसु ( सामना ७ नोव्हेंबर १५)

मागच्या बाकावरचे म्हणजे मागे राहणारे असाच नाही होत. कधी कधी मागे राहुन गेलेले असाही होतो हे मला त्या दिवशी कळालं. संध्याकाळ होऊन गेलेली होती. परतीचं गुरं गोठ्यात , काही हौदाजवळ येऊ उभी राहिली होती. पण त्याला एक वासरु कुठं दिसत नव्हतं. तेच त्याच्या अावडतं वासरु ,तो त्याला 'वसु' म्हणायचा. वसुच्या कपाळावर केशरी किरमीजी रंगाचा ठिपका होता म्हणुन त्याला तो सर्वात प्रिय होता. त्याचे अाईवडिल म्हणाले " येतंय अाण कुठं जातंय ते . चल तू जेऊन घे" मग भरभर जेवुन "अाज खुप झोप येतेय" असा बहाणा करुन तो झोपायला माडीवर गेला. अाणि तिथली त्याची नेहमीची पाच कौल काढुन वरतुन उडी टाकली.तो लगबगीने टोर्च अाणि काठी घेऊन निघाला. 
माळरानावर नेहमीच्या रुईजवळ पाहिलं. पाणवठ्यावर पाहिलं. जवळच एका टेकडीवर जिथे तो नसायची शक्यता जास्त होती तिथेही जाऊन पाहिलं. .कितीवर्षापासुन कोरडी विहीर होती. तिथे पडली असेल असा विचार खुप वेळ टाळुन तिथे डोकवायलाच नको असं त्याच्या मनात होत होतं पण शेवटी भिती होती तरी मनामध्ये देवाचा धावा करत करत करड्या विहरीत डोकवुन पाहिलं. तर तिथे ही पहिल्यांदा 'बरं झालं इथं नाही' असं त्याच्या मनातुन उमटलं. एव्हाना रात्र झाली होती. पुर्ण चंद्राची रात्र होती. त्याचे पाय शोधुन शोधुन दगडाचे झाले होते. भिती , अंधार असे विचार त्याच्या डोक्यात शिवले सुद्धा नाही. घरी तो नसल्याने गोंधळ झाला असेल हा विचारसुद्धा त्याला शिवला नाही कारण तो रात्री झोपायला माडीवर गेला कि परत सकाळीच खाली येतसे. 
अाताशा गारठा वाढु लागला होता. निळीशार रात्र अाणि सांदीझाडामधले काजवे टपटपु लागले. एक हवेची झुळूक यायची अाणि काजवे हवेत उडायचे. असं वाटायचं चांदण्यांना पंख लागलेत. रात्र गडद झाली पण त्याला घरी परतावंसं वाटलं नाही. त्याने विचार केला इथेच एखाद्या झाला खाली पडी टाकु अाणि पहाटे जरा उजाडलं कि परत शोध सुरु करु. तिथेच चिंचेच्या झाडाखाली तो पहुडला. पाय ठसठसत होते. अंग ठणकत होतं. एका गार झुळूकेत त्याला झोप लागली सुद्धा. झोपेत पण तो वेगवेगळी ठिकाणं फिरुन बघत होता. थंडीची धार वाढली तो कुडकुडायला लागला.नंतर जरावेळाने त्याचीच त्याला उब यायला लागली अाणि तो परत शांत झोपी गेला. झोपेत त्याला असं वाटलं कि तो वसुच्या कुशीत झोपला अाहे. वसु पण थकुन भागुन त्याच्या सोबत झोपी गेलीय. पहाटे पहिल्या प्रहराला त्याच्या तोंडावर कुणीतरी वडाच्या पारंब्या मारल्यागर भास झाला. पण पहाटेची झोप ती कशाला त्याला अावरतेय. तिथेच झाडाखाली बाहेर अालेल्या मुळाला उशाशी अाणखी घट्ट धरुन तो झोपी गेला. जरावेळाने त्याला अर्धजागृत अवस्थेत विचार अाला कि अापल्या चिचेची मुळं इतकी बाहेर तर नाही. अाणि तो वडाच्या झाडाखाली नाही तर चिंचेखाली होता. ताडकन त्याला जाग अाली. पाहतो तर वसु खरोखरच त्याच्या जवळ होती. अाणि तो तिच्याच कुशीत होता. जी त्याला मुळं वाटतं होती ते वसुचे पाय होते. अाणि सवयीप्रमाणे  हलवलेल्या शेपटाचा भास त्याला वडासारखा झाला होता. कुठे ? कधी ? कसा ? ह्या विचारात न पडता त्याने वसुला मिठी मारली अाणि घराकडे निघाला. घरी जाताच त्याला अाई म्हणाली "कुठ गेलता सकाळी सकाळी?" तो म्हणाला " अासचं सहजं"  अाई "म्हटलं होतं ना येईल कुठं जातंय" त्या दोघांवरुन हात फिरवुन कानावर बोटं मोडुन अाई म्हणाली " वसु ग माझी बाय ती "

-प्राजक्त

बॅकबेंचर्स : १५ तुकाराम (सामना ३१ अॉक्टोबर १५)




लहानपणी जेवणाची वेळ टळुन, चहाची वेळ यायची तरी मी हाका मारुन थकलेल्या आईला ५ मिनीटांत आलो हे उत्तर दर २-२ तासाने देत असायचो. मग वैतागून पदर खोचुन आई बांगड्यां मागे खेचुन मला हाताला धरुन न्यायची. आणि रविवारी मोटारसायकल धुवावी तशी माझे हातपाय धुवून जेवायला बसवायची. तणतणत म्हणायची 'इतका कसला खेळ . जेवणाचंही भान नाही म्हणजे काय. तुक्याची खोडं मेली' जित्याची खोड ऐकुन होतो पण तुक्याची खोड म्हणजे सगळं भान विसरुन काहीतरी करत राहणं हा शब्द प्रयोग मराठीला दिला तो माझ्या घराने. मग हळुहळु त्या तुक्याशी एकएक गुणधर्म जुळू लागला. मनासारखा छापा पडला कि मित्र नाचायचे पण मी मात्र शिक्का उचलून आधी 'काट्याचे' कपडेधुळ स्वच्छ करायचो. न देखवे डोळा ऐसा हा आकांत। पर पिडे चित्त दु:खी होते। तुकोब्बा.
मग काळाने घात केला आणि मी लहानाचा मोठा झालो. आणि ' मी बोलत असतांना कुठे तंद्री असते हो तुमची' असं विचारणारी तुकोब्बारायांची अवली इथेही आयुष्यात आली. कोणी कसंही वागो हसतमुखाने शांतचित्ताने सगळं निभावून नेण्याचा तुकाचार(तुकारामी शिष्टाचार ) अंगी भिनला असल्याने कुणी चिडून वीट जरी फेकली तरी तिला 'सावळ्याची भेट' म्हणुन मी पुजेल की काय ह्या भितीने कुणी कधी ते ही केले नाही.हे लहान आणि मोठे होण्याच्या प्रवासामध्ये एक तारुण्य नावाचा थांबा येतो. त्यात कुणी 'मार्गाला लागतं' तर कुणाकुणाला खरा मार्ग सापडतो. आजोबाम्हणायचे 'बिडी काडी, दारूबाजी परवडली पण नाटकाची दळभद्री थेरं नको' पण कसंय नव्या बाकावर लिहलेलं असतं ना कि ' रंग ओला आहे बसु नये' तिथे आपण गुमान वाट धरण्यापेक्षा अगोचर खात्री करुन हात रंगवुनघेतोच. तसं झालं आणि नाटकाने मानगुट धरलीच. तेव्हा चिडलेले आजोबा तुकोबाच्या दाखल्ला देत चिडले .उध्दरीले कुळ आपण तरला । तोचि एक झाला त्रेलोक्यात ।
पण नंतर प्रतिभा पाहुन शब्बसकी देत हेही म्हणाल्याचं आठवतं की शरण गेलियाने काय होते फळ । तुका म्हणे कुळ उध्दरीले .

तर असं आहे आपला आणि तुक्याचा संबंध. तुमचे जे चाल्लेय ते चालु द्या पण मला त्यात ओढुनताणुन आणु नका . तुम्ही समाधानी रहा मलाही राहु द्या. हे फक्त २ प्रकारच्या लोकं म्हणु शकतात. एक बॅकबेंचर किंवा दुसरे तुकोब्बाराया.
ठेविले अनंते तैसेची रहावे। चित्ती असु द्यावे समाधान।
म्हणुन तुकोब्बा जवळचे वाटतात.
पांडुरंग ! पांडुरंग !

-प्राजक्त
(दै सामना साठी )



ग ( मटा ३१ अॉगस्ट १५)


( निसटलेल्या खुणा)

ग तू मला नेमकी कुठे भेटलीस? ह्याचा मी जेव्हा जेव्हा शोध घ्यायला जातो तेव्हा तेव्हा मला सगऴयात अाधी अाठवतात त्या तू निसटल्याच्या खुणा. पाहिजे त्या क्षणाला खुप शोधाशोध करुन न सापडणारी पण एखाद्या अवचित वेळी नकळत जुन्याशा पुस्तकपानातुन जाळीदार सच्छील पिंपळपानासारखी गरगरत खाली येणारी तू नेमकी कधी भेटलीस ?, कुठे भेटलीस ? का भेटलीस ? ह्याचा मी जेव्हा जेव्हा शोध घ्यायला जातो तेव्हा तेव्हा मला सगऴयात अाधी अाठवतात त्या तू निसटल्याच्या खुणा.

अगदी लहानपणी , टॅह्यॅपणात रडतांना दोन श्वासांमध्ये उर धपापायचा अाणि झोळी वर टांगलेल्या फिरकी सोबत डोळे गरगरायचे , त्यानंतरच्या तासंतासाच्या अोल्या हुंदक्यांनी मान टाकल्यानंतरच्या अचानकशा पहिल्या घोटात सापडलीस कि त्या घोटातुन अालेल्या दचकण्यात सापडलीस कि त्यानंतरच्या झोपेत सापडलीस? शोध अजुन चालु अाहे. 
नंतर कधीतरी पुन्हा सापडलीस तेव्हा मी नाकळत्या कुशीतल्या वयात होतो. सायकलच्या प्रवासात डबलसीट बसलेलल्या अाईच्या कुशीत असतांना तिच्या कानाच्या डुलणा-या डूलेमध्ये , डूलेमधल्या चिमुकल्या घुंगराच्या लगबगीत तू पुन्हा सापडलीस. पण परतीप्रवासाला रित्या कानावर असलेल्या लालनिळ्या वळांमधुन , डूल नसलेल्या कानाच्या रंध्रामधुन निसटलीस ते निसटलीसच.
पुन्हा भेटलीस तेव्हा मी गावी माळरानावर हुंदडत होतो. तिथल्या रानाशेणातल्या वासात भटकत होतो. रानफुलं गोळा करत होतो.त्या फुलांच्या किरमीजी रंगात तू भेटत गेलीस. अचानक रानभैरी अाभाळ झाकोळुन अालं अाणि गचांडी धरुन झोडपावा तसा पाऊस अाला. सैरावैरा धावतांना एका धनगर बाबानं घोंगडीखाली घेतलं अाणि टेकाडावरच्या तुटक्या देवदगडाच्या गाभा-यात अाडोशाला बसवलं. तिथे कुंद गाभा-यातल्या उदबत्तीच्या अंधारवासामध्ये धनगराच्या दाढीघोंगडीचा मेंढीवास मिसळला. धनगरबाबा म्हणाला ‘पाहु हातात काये ?” मी मुठ उघडली तर अाधीचा रानफुलांचा कुस्कर होता. धनगरबाबा म्हणाला “ या फुलांस्नी काय म्हंता मायती का ? “ मी थरथरत्या अोल्या देहाने नाही म्हणालो. धनगरबाबा म्हणाला “ सितेची अासवं “. कड्डाड् वीजेचा कल्लोळ झाला.मी गप्पदिशी डोळे मिटले. तू तेव्हा निसटलीस परत.

एकदा अशीच तुळसकट्ट्याजवळ भिंगाने कागदं जाळत बसण्याची दुपार. “तुळशीला किड लागलीय बरं.ती उपटुन घे. उद्या वाड्यावरुन अाणुन दुसरी लाऊ” नंतर उरली ती जेवणावळी उरकल्यानंतर टम्म भरलेल्या पोटाची सुस्तावलेली दुपार.अाम्ही पेंगाळलो पण बायकांचा रामरगाडा चालु होता. बांगड्यांच्या येरझा-याच्या नादामध्ये जात्याची घरघर सुरु झाली अाणि जात्याचा खालचा दगड जणू माझी छाती अाहे असं दडपण येऊ लागलं.तू तिथे सापडलीस. जरावेळाने पलीकडे काकणाच्या तालावर ताकाची फेसाळ घुसळण चालु झाली. घुसळणीमुळे नसलेल्या झोक्यावर मला पडल्या पडल्या कोणीतरी जोजवतंय असं भासत राहिलं.तू तिथे सापडलीस. संध्याकाळी गोठ्यात कंकण सळसळीत कुणीतरी धारा काढत होतं तिथं तू सापडलीस. चुलीच्या जाळाशी थापलेल्या भाकरीच्या पिठांची वादळं राखेसोबत गरगरायची तिथे तू सापडली. त्याच रात्री सवयीने दुसरा घास ठेवायला तुळशीजवळ अालो अाणि तिथल्या तुळस नसलेल्या खळग्यात तू पुन्हा निसटलीस.

नंतर थोडं मोठं झालो तेव्हा पावसात कागदाच्या बोटीत, वहीतुन अस्ताव्यस्त फाडलेल्या पानांच्या उरलेल्या चुरगळीत सापडलीस. सायकलीच्या निसटल्या चैनीत , तिस-या दिवशी नखात अडकलेल्या ग्रिसच्या काजळीत सापडलीस. पहिल्यांदा जमलेल्या शिट्टीत, रात्री येळंमाळं शिट्टी वाजवतो म्हणुन अाजीने मारलेल्या टपलीत सापडलीस.एकदा रानात सापडलेल्या किड्याच्या शेपटाला दोरी लाऊन हॅलीकॉप्टर म्हणुन उडवण़्यात दोरी सकट तो किडा सकाळी कोळी जाळ्यात सापडला तिथं तू परत हरवलीस.

मधल्या काळात चहाकपाच्या गोल शिक्कयात , दोन बोटांमधल्या धुरातुनही भेटत राहिलीस तू. नंतर  कुणाकडुन काहीतरी हिसकवल्या गेल्यानंतरच्या विद्रोहातही तू भेटलीस. नाकारल्या, टाळल्या गेलेल्या दु:खातही मी म्हणत राहिलो कि “ त्यांना तर कुठेतरी रमायचं होतं पण अाता त्यांचा प्रवासपक्षी तुमच्याकडे जपा किंवा उडवुन द्या.एक दिवस माझीही हिच गत होईल त्या अाधी …. घ्या हा माझा उर अाणि मलाही माझ्या हक्काचा सूरा एकदाचा देऊन टाका." तेव्हा तू निश्चयाने भेटलीस.त्यावेळी तू निसटल्याची नोंद नाही माझ्याकडे.पण धुरकटल्याची अाहे.

मग काळाने घात केला अाणि अापण मोठे झालो. कुणीतरी डोळ्यात पाहिलं अाणि काळजात भरती अोहोटी झाली. मग त्याच कोणीतरी कायमचा निरोप घेतला तेव्हा अावेगाने भिडली अाणि तू सापडली परत. मग सावरीच्या झाडाची पांढरी म्हातारी जशी हळुहळु उडुन जाते तशी तू अलगद नकळत निसटत राहिलीस.
मोराचा जन्म लांडोराने प्राशान केलेल्या मोराच्या अश्रुने होतो तसं कारुण्यात गवसणा-या चैतन्यासारखी तू भेटली असावी असंही राहुन राहुन वाटतं. पण मोर म्हटलं कि लोकांना मोरपिस अाठवतो अाणि मोरपिस म्हटलं कि कृष्ण. पण मला मात्र कृष्ण म्हटलं कि रानावनात हरवलेलं,निसटलेलं एक मोरपीस शोधणारा मोरच अाठवतो. हि अजुन एक निसटल्याची खुण.

पण ह्या गवसण्या निसटण़्याच्या लपंडावात……. ग ‘कविते’ तू मला नेमकी कुठे भेटलीस?' ह्याचा मी जेव्हा जेव्हा शोध घ्यायला जातो तेव्हा तेव्हा मला सगऴयात अाधी अाठवतात त्या तू निसटल्याच्या खुणा.

- प्राजक्त २९/ १०/१५

म.टा. मैफल







अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...