काल रात्री लिहता लिहता पेन उघडंच राहिलं अाणि झोपी गेलो.पेन टेबलावरुन घरंगळत खाली पडला अाणि नदी वहावी तशी शाई वहात गेली . मध्यरात्री त्याचा माग घेत घेत निघालो तर एका शाळेत पोहचलो . अनेक वर्ष बंदिस्त असलेली शाळा. जाळं जळमटं, वेली पानं सारुन अात गेलो.
शाळेच्या बाकड्यावर गिरवलेले XOXO खेळ सापडले , बिना टोपणाचे पेन सापडले तसे बिना पेनाचे टोपनही सापडले , एक शाईची छोटीशी बसकी रिकामी बाटली सापडली , एक गच्च शाईचं भिजलेलं सुकलेलं थारोळं सापडलं , शाईचा एक तिरकस सपकारा सापडला , बाकाला कच्च बांधलेली रिबीन सापडली.....वेणी बांधली असेल कोणाची तरी. फळ्यावर पुसट गुणाकार,भागाकार, साईन,थिटा,कॉस, प्रमेय सापडली. कौलांमधुन येणारा निळसर प्रकाश सापडला , डाव्या कोप-यात चिमणीचा विस्कटलेला खोपा होता , मागच्या कोप-यात कबुतरांचा घुमत्कार होता त्यांचा खोपा कधीच कुणाला कधी का नाही सापडला देव जाणे.त्यांच देवा सारखं झालं होतं जाणवायचं पण दिसायचं नाही. वैतागुन टेबलवर छडी अापटली होती तेव्हा पुढचा तुटलेला तुकडा सापडला. सणावरात भिंती चौकटींना पताके लावले होते. त्यांचे रंगविटके अवशेष सापडले. मारलेला कागदाचा बोळा , बोळ्यामधे शाळा सुटल्यावर भेटण़्याचे ठिकाण सापडले. महापुरुषांचे फोटो ज्यावर लटकवले ते खिळे सापडले. फोटो नसलेल्या ठिकाणी भिंतीच्या शुभ्र चौकोटी सापडल्या. महापुरुषांचे फोटो उंच टांगायचे हे अाता चुकीचं वाटतं. नजरेच्या सरळ रेषेत ठेवले असते तर 'डोक्यावरचा विषय' म्हणुन सोडुन दिला नसता. ख्रिस्त टांगावे तसे महापुरुषांचे फोटो मुल्यांसकट टांगुन दिल्यासारख्या भिंती अाता भकास वाटतात. फळ्याच्या तळावरुन बोट फिरवल्यावर खडुची भुकटी सरळ रेषेत खाली पडत गेली. तिथेच खाली काही शिल्लकीतले खडु सापडले. शिक्षकांनी त्यांच्या कपाटातुन खडु अाणायला सांगितला कि खडु घेऊन पाण्याची टाकी , स्वच्छतागृह , मित्राचा वरच्या मजल्यावरचा वर्ग, अशी सगळी विश्वभ्रमंती करुन खडु अाणला जायचा. फळ्याचा कोप-यातली पटावर , हजर, गैरहजर अशी बेरीज वजबाकी सापडली ज्यात पटावर ह्या विचित्र शब्दाचा अर्थ कितीतरी दिवस लावत होतो नंतर कळालं 'पट' हा मुळ शब्द अाहे.
परिक्षा संपल्या , शाळा सोडायचा दिवस होता तेव्हा मास्तरांनी फळ्यावर लिहलं होतं " उद्यापासुन परिक्षा " हे पुसट शब्दही सापडले. त्यानंतर शाळेची जागाच बदलली अाणि इथे फक्त अवशेष उरले , अाठवणी उरल्या ज्या नंतर पडक्या झाल्या. सगळं सापडलं पण वर्गाच्या शेवटीची बाकांची रांग नाहिशी होती. बॅकबेंच ?काही मुलं फक्त शिक्षण घेऊन बाहेर पडतात. बॅकबेंचर्स बेंचच्या वृत्तीसकट बाहेर पडतात.
- प्राजक्त २३ नोव्हेंबर २०१५
No comments:
Post a Comment