Friday, December 18, 2015

बॅकबेंचर्स :२० ग ( दै सामना ५ डिसेंबर १५)

 तू मला नेमकी कुठे भेटलीस?' ह्याचा मी जेव्हा जेव्हा शोध घ्यायला जातो तेव्हा तेव्हा मला सगऴयात अाधी अाठवतात त्या तू निसटल्याच्या खुणा. थोडं मोठं झालो तेव्हा पावसात कागदाच्या बोटीत, वहीतुन अस्ताव्यस्त फाडलेल्या पानांच्या उरलेल्या चुरगळीत सापडलीस. सायकलीच्या निसटल्या चैनीत , तिस-या दिवशी नखात अडकलेल्या ग्रिसच्या काजळीत सापडलीस. पहिल्यांदा जमलेल्या शिट्टीत, रात्री येळंमाळं शिट्टी वाजवतो म्हणुन अाजीने मारलेल्या टपलीत सापडलीस.एकदा रानात सापडलेल्या किड्याच्या शेपटाला दोरी लाऊन हॅलीकॉप्टर म्हणुन उडवण़्यात दोरी सकट तो किडा सकाळी कोळी जाळ्यात सापडला तिथं तू परत हरवलीस.
मधल्या काळात चहाकपाच्या गोल शिक्कयात , दोन बोटांमधल्या धुरातुनही भेटत राहिलीस तू. नंतर  कुणाकडुन काहीतरी हिसकवल्या गेल्यानंतरच्या विद्रोहातही तू भेटलीस. नाकारल्या, टाळल्या गेलेल्या दु:खातही मी म्हणत राहिलो कि “ त्यांना तर कुठेतरी रमायचं होतं पण अाता त्यांचा प्रवासपक्षी तुमच्याकडे जपा किंवा उडवुन द्या.एक दिवस माझीही हिच गत होईल त्या अाधी …. घ्या हा माझा उर अाणि मलाही माझ्या हक्काचा सूरा एकदाचा देऊन टाका." तेव्हा तू निश्चयाने भेटलीस.त्यावेळी तू निसटल्याची नोंद नाही माझ्याकडे.पण धुरकटल्याची अाहे.
मग काळाने घात केला अाणि अापण मोठे झालो. कुणीतरी डोळ्यात पाहिलं अाणि काळजात भरती अोहोटी झाली. मग त्याच कोणीतरी कायमचा निरोप घेतला तेव्हा अावेगाने भिडली अाणि तू सापडली परत. मग सावरीच्या झाडाची पांढरी म्हातारी जशी हळुहळु उडुन जाते तशी तू अलगद नकळत निसटत राहिलीस.अाणि पुन्हा बोटाला धरुन घेऊन गेलीस ते शेवटच्या बाकावर.
मोराचा जन्म लांडोराने प्राशान केलेल्या मोराच्या अश्रुने होतो तसं कारुण्यात गवसणा-या चैतन्यासारखी तू भेटली असावी असंही राहुन राहुन वाटतं. पण मोर म्हटलं कि लोकांना मोरपिस अाठवतो अाणि मोरपिस म्हटलं कि कृष्ण. पण मला मात्र कृष्ण म्हटलं कि रानावनात हरवलेलं,निसटलेलं एक मोरपीस शोधणारा मोरच अाठवतो. हि अजुन एक निसटल्याची खुण.
पण ह्या गवसण्या निसटण़्याच्या लपंडावात……. ग ‘कविते’ तू मला नेमकी कुठे भेटलीस?' ह्याचा मी जेव्हा जेव्हा शोध घ्यायला जातो तेव्हा तेव्हा मला सगऴयात अाधी अाठवतात त्या तू निसटल्याच्या खुणा. 


- प्राजक्त दै सामना 
५ डिसेंबर

No comments:

Post a Comment

अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...