Monday, December 29, 2014

जिबोनबाबु

खरा अानंद हा मानण्यात असतो हे कळालं कि सगळं किती सोपं होऊन जातं. हे मी अामच्या लहानपणीच्या चाळीत शिकलो   अत्यंत गजबजलेल्या त्या चाळीमध्ये फक्त दोन घर बंद होती.कारण म्हणे त्याच्या वरच पाण्याची टाकी होती अाणि त्यामुळे त्या खोल्या नेहमी अोलसर असायच्या अाणि अशा टपटपणा-या ठिकाणी कोणी रहात नसे. म्हणुन त्या खोलीच्या समोरची जागा चाळीतल्या लोकांनी रात्रीचा अड्डा म्हणुन केली होती. तिथेच दोन स्टुल टाकुन एकावर कॅरम अाणि दुस-या टेबलवर चेसचा डाव रात्री रंगायचा. रात्रीचे तिथले वातावरण अवर्णनीय असायचे. दोन्ही स्टुलाच्या मध्यभागी एक शंभर वॅटचा बल्ब , खेळणा-याच्या अवतीभवती सल्लागार गर्दी,काही नुसते लाकडी कठड्यावर बसलेली प्रेक्षक मंडळी , आभाळ कंटाळुन चाळीत उसासा घ्यायला अालंय असे सिगारेच्या धुराचे लोट , सोन वितळवुन पाणी अोतल्यावर काचेच्या ग्लासला जसा पिवळसर रंग येईल तसे बियरचे ग्लास. अाणि ह्या गराड्यात ह्या हातातुन त्या हातात 'पास' होणारा एकच ऍशट्रे. मी लहान होतो तेव्हा ब-यादा रात्री जेवण झालो कि तिकडे पळायचो. अाई अोरडायची. मग मी अोरडुन सांगायचो " जिबोनबाबु सोबत बसतोsss ". मग अाई परत अोडायची " "जिबोनदा !!!!! " मग पलीकडुन जिबोनदा उत्तर द्यायचे "हां जी ध्यान है मेरा भेजो दो पार्सल". 
जिबोनबाबु म्हणजे जिवनदास चेटर्जी. एका खोलीत एकटे राहणारे, एका बॅंकेत अनेक वर्ष काढुन रिटार्यड झालेले , बायको देवाघरी जाऊन जवळपास तीसेक वर्ष झालेली अाणि मुलबाळ नसलेले जिवनदास नाव सांगतांना जिबोन सांगायचे मग सगळ्याचे ते जिबोनबाबु झाले. काळ्या जाड फ्रेमचा अारडी बर्मन स्टाईल चष्मा. खुरटी दाढी, पांढरा पायजमा -सदरा असा वेष. जिबोनबाबु कधी पत्ते खेळायचे नाही नेहमी बाजुला बसुन असायचे अाणि त्याच्या नजरेत नेहमी एक चमक असायची. ब-यादा खोचक हसुही असायचं. ते हसु पाहुन चेस खेळणारा माणुस घोडा ठेऊन हळुच प्यादं पुढे सरकवायचा. एका लाकडी बाजेवर बसलेले जिबोनबाबु मी गेलो की त्यांना लोड सारखा रेलुन बसायचो. त्यांची खोली तिथेच असल्याने ते नेहमी मला अातुन अमुक-तमुक अाणायला लावायचे. त्यांच्या घरात भिंती कमी अाणि पुस्तकं जास्त होती. मला वाचनाची सवय खरी त्यांनीच लावली.   बंगाली वर्तमान पत्र, पुस्तकांचे ढिग, जुन्या पध्तीचा रेकॉर्डवाला टेप, त्याच्या तबकड्या, क्राऊनचा खट्खट अावाज करत चॅनल बदलायचा दोन वित टिव्ही.  टागोर ,एसडी बर्मनचे रेकॉर्डस् . संगीत अाणि पुस्तकावर अातोनात प्रेम असणारे जिबोनबाबु कोणत्याही विषयावर तासंन्तास बोलत असे. पण उगाच कोणालाही धरुन द्न्यान पाजळत नसे.कोणी अालं अाणि खुप विचारलं तरच ते बोलत असे. अाणि जेव्हा त्यांचा सुर लागायचा तेव्हा अक्षरश: लोक गुंगुन जायचे. चेस अाणि कॅरम खेळत नसतांना बहुतांशी अामची लोकं पत्ते खेळायचे.ब-याचदा पैसे लावुन खेळ चालतसे. तेव्हा जिबोनबाबुंचे चेह-याचे भाव मजेशीर असायचे . मी जिबोनबाबुंना कधी खेळतांना पहिलं नाही. मी जेव्हा त्यांच्या सोबत बसलेलो असायचो तेव्हा मला कळत असो नसो ते माझ्या कानात खुसफुसायचे. " ये जो पत्तो को पिसते है ना बेटा. ये असल मे गुफ्तगु है इन पत्तो कि समझे" मी डोळै मोठे करुन "हो का ?" असं म्हणायचो फक्त . कधी कधी लोक पैसे लावायचे तेव्हा ते म्हणायचे "बोली किसकी लग रही है ? " मी म्हणायचो "पत्तो की" मग ते म्हणायचे "अरे बावले उनकी किमते तो पहलेसे लीखी है उपर वो वाला पांच, ये वाला दस ,वो राणी याने बारा,ये गुल्लु याने ग्यारह." मग मी विचारायचो " फिर किसकी बोली है ?" ते म्हणायचे " ये लोग अपनी अपनी किस्मत कि बोली लगा रहे है. अभी इस समय उनकी अपने किस्मत पे कितना भरोसा है ये इसकि बोली है." मला मजा यायची. जीवनबाबुंमुळेच मला " खरा अानंद हा तुमच्या मानण्यात असतो" हे कळालं. कधी कधी एकटेच सिगारेट फुंकत बसायचे तेव्हा ते बोलायचे. त्यावेळी खरंतर ते कदाचित स्वत:शी बोलत असावे असं मला ब-यादा वाटायचं. मी फिरायला जायचो तेव्हा ते बोलायचे " पेपर में जो खुनखराबा देख के हररोज रोना रोते है उनको कोनेवाला सर्कस का इश्तिहार क्युं नहीं दिखता भगवान जाने ! " एकदा खालच्या मजल्यावरचे शर्मा वारले. शर्मा म्हणजे परोपकारी माणुस स्वत:साठी कधीछ जगला नाही. त्यावेळी त्यांना पोचवुन अाल्यावर त्यांनी निवांत सिगारेट पेटवली अाणि लाकडी रेलींगवर निर्विकारपणे हात टेकवत म्हणाले " कंधा तो कोई भी देगा मरना खुद को पडता है" असंच एकदा रात्री पत्त्यांचा खेळ खुप रंगला . अाणि नेहमी सारखा सिगारेटचा धुर अाणि वा-यामुळे हलणारा बल्ल्ब अाणि त्यामुळे हलणा-या सावल्या अशा वातावरणात वातावरण खुप तंग झालं ते ही इतकं कि हाणामारी झाली. चुकिचे पत्ते पिसले ,चुकिचे पत्ते निवडले अशा क्षुल्लक कारणावरुन सगळा डाव टोकाला पोचला.अाणि सगळे नाहिसे झाले.अाता उरला फक्त हालणारा बल्ब अाणि अाम्हा दोघांच्या हालणा-या सावल्या अाणि पडलेले स्टुल , विखुरलेले पत्ते , कलंडलेले पेले गोळा करत जीबोनबाबु फक्त स्मित हास्य करत होते. मी त्यांना विचारलं "क्युं हस रहे हो ? क्या हुअा?" तेव्हा जीबोनबाबु म्हणाले " यांद है मेने एकबार कहा था . ये जो पत्ते पिसते है ये गुफ्तगु है इन पत्तों कि..." मी म्हणालो " हा याद है " ते म्हणाले वो बात पुरी नही सुनाई थी मैने तुमको " मी म्हणालो " तो बताअो फिर " जीबनबाबु म्हणाले  " पुरी बात ये है कि ये जो पत्ते पिसते है ये गुफ्तगु है इन पत्तों कि.. अौर असल में हम नही वो हमें चुनते है"

Tuesday, November 4, 2014

बे साले बुरा लगा क्या ?

बे साले बुरा लगा क्या ?

अब बैठेगी धुल 
जिसको बहुत ही दी थी तूल
बजी थी बीन चुनावी
धरपकड खिंचातानी
खिंचातानी से 
पतलुने फट गई
और सीटें बट गई
चीट मचाओ 
अब तो सीट जिताओ 
अपोझीशन के सामने जाओ 
उसकी करतूतें 
भद्दे सूर में गाओ 
गाओ और फिर पुछो,
बेसुरा लगा क्या ?
बे साले बुरा लगा क्या? 

छनछन कि लक्ष्मी
मनमन कि लक्ष्मी 
अब बारिश होगी
वो भी इंग्लीश होगी
अब हाथ जुडेंगे
वो पुरी बात सुनेंगे
सब का थाट दिखेगा
'उंगली डॉट' बिकेगा
इन्सान पटेगा
इन्सान बटेगा
इन्सान कि कसम
इन्सान कटेगा

जानबुझके 
खंजर घोपेंगे
घोप के फिर वो 
ये पुंछेगे 
उप्स ! साब जी, छुरा लगा क्या ?
बे साले बुरा लगा क्या? 

फिर ये जितेंगे
और वो हारेंगे
हारनेवाले आगबबुला 
आगबबुला निले पिले
फिर अंधीयारोंमे होंगी डीले
टेंडर मेरा , तूम म्युनसिपल
डील भी ऎसी सिम्पल सिम्पल
तू झुठमूठ का "मारों” कहना
हम बिना वजह ही उई करेंगे
खा-पी के फिर जम्हाई देंगे
उस्ताद-बंदरीया ,खेल-तमाशा
पब्लिक के मुंहपर इक और तमाचा
खेल खत्म फिर बोला मालिक 
देख बंदरीया देख वो पब्लिक 

जिसको भेजा था उस्ताद बनाके
हालत से तुझको जंबुरा लगा क्या ?

बे साले बुरा लगा क्या ? 

Monday, September 29, 2014

कभिन्न काळ्या तमामध्ये....



ह्या धरेवर नाचणारे, आणि तिजवर पोसणारे,
स्वैर फ़क्त बागडे, राबुन ज्यांना भ्रांत पुढे,
काळ-वेळे पुढती धावणारे, सवे तयांच्या चालणारे,
अन केवळ कुंठीत पाहणारे, सकळ हरदिन माळणारे,
निद्रिस्त थकुनी भागुनी, वा केवळ एक रोजनिशी,
शांत सारे एकीकडे, कभिन्न काळ्या तमामध्ये.....

वाटे स्थिर वेळ जाहली, शांत रात आळसावली,
परि फ़क्त थकणे तुमच्याकडे, स्थिर अन आळसावणे,
पण ह्या धरेच्या वर जरा, ग्रह नक्षत्रादि तारका,
ना थांबती आळसावती, स्थिर ना त्यांची गती,
दिवस त्यांना तोकडे, परि प्रकटती दुसरीकडे,
घेत नशिबे आपुले उरी, पंडिते हे कथन करी,
ध्रुव वा सप्तरुषी मुनी, तेज शलाकेचे धनी,
अविरत टिमटिमणे ज्यांच्या कडे, कभिन्न काळ्या तमामध्ये.....

उण्या नशिबाचे धनी, चांदण्या ज्यांच्या मनी,
तेच नशीब आजमावण्या, दुजे पुण्य माथी लाटण्या,
दिवा स्वप्नाची करण्या पुर्ती, भल्यभल्यांचे अरी,
सुर्य उगे ज्यांच्या कडे, कभिन्न काळ्या तमामध्ये...

कुठे उसासे दिर्घ अन, पाणवायू विरघळे,
पाठमोरया आक्रुतीवर, शुन्य नजरंची खिळे
काट्यांची राहुटी वा , मध्यजनांचा महल
उंची राजवाड्याच्या दालनी, असु द्या कुणाचीही पहल
रंग प्रणयाराधना उधळ्तसे, कभिन्न काळ्या तमामध्ये....


चांदण्यानी धवल शिंपडले, वड विराटतेने नटलेले,
धवलधुंदसे रेखाटले, वा समंधाने झपाटले?
अशीच सारी ती वलये, "त्या वडानजीक जाऊ नये.."
भय भागाबाईच्या काळजामधे, कभिन्न काळ्या तमामध्ये.........

-प्राजक्त
08 / Nov / 2007

Friday, July 18, 2014

पावसाची फॅण्टसी

दुरदुरवर फक्त कौलारु घरं , स्वत:ची सावली अापल्याच पायाशी सावलीला यावी असं माथ्यावरचं टळटळीत ऊन, अाणि ह्या राखाडी रुक्ष गराड्यात एक टंच लालकेशरी गुलमोहराचं झाडं. मागच्या जुलै-अॉगस्ट मधली गोष्ट. एका डॉक्युमेंट्रीच्या चित्रीकरणासाठी बुलढाण्याजवळच्या एका गावात गेलो होतो.रात्रीच्या विजेच्या लपंडावात निम्मी शिम्मी चार्ज झालेली बॅटरी परत चार्जींग करण्यासाठी अाम्ही ब्रेक घेतला. त्यावेळी गुलमोहराच्या झाडाखाली अाम्ही थकुन अक्षरश: मेल्यासारखे झोपलो. जरावेळाने शाळेच्या घंटेच्या अावाजाने मित्रांनी फक्त कुस बदलली पण मी डोळे किलकिले करत उठलो. मुलांचा फसफसणारा विजयोत्सव सांगत होता कि ती मधली सुट्टी होती. अगदी साध्या बसक्या चारअाठ खोल्याची शाळा, भिंतींवर भारतमाता, महाराष्ट्राचा नकाशा,पठडीतले सुविचार, बोसबाबु, गांधीबापु, डॉ अांबेडकर, शिवाजी महाराज, गाडगेबाबा इ. ठरलेली भित्तीचित्रं, मध्यभागी झेंडावंदनाची सोय,त्या भोवती गोलगोल खेळणारी मुलं, असं सगळं दृष्य. काही मुलं डबे खातं होती ,काही खेळत होती , काही मुलांची हचाबचा डबे खात कधी उँडारायला जातो अशी घाई दिसत होती. एका ठिकाणी अाभाळाला खोड अाणि पानं फुटावे असे पिंपळाचे झाड होते. त्या खाली दोन-तीन मुलं मला चक्क अभ्यास करतांना दिसली. मधल्यासुट्टीत अभ्यास करणारी मुलं अाणि गर्द झाडाखालची गच्च सावलीचा अानंद घेण्यासाठी मी तिथे गेलो. तिथं कळालं कि मास्तरांनी गृहपाठ म्हणुन निबंध लिहुन अाणायला लावला होता अाणि ह्या तीन बहाद्दरांनी काल शाळेला सुट्टी मारली होती म्हणुन अंगठे धरण्यापेक्षा ही मुलं मधलीसुट्टी सत्कार्णी लावतं होती. त्यातल्या एकाने वहीत पेन्सील टाकुन टपकन उडी मारली अाणि " झाsssलं ! म्हणत तो खेळण्यासाठी धावत सुटला अाणि जातांना बोंबलत गेला. "पंक्या, माझ्या वहीकडं लक्ष ठेव बेsss !  अालोच एक लिंगोरच्या हाणुन!" मी हळुच वही उघडुन त्याचा निबंध वाचायला सुरवात केली.
"माझा अावडता ऋतू"
शाळेत शिकवत जरी असले तरी जन्माला अाल्यापासुन मी कधी तीन ऋतू पाहिले नाही. अामच्या विदर्भाकडं फक्त उन्हाळा असतो. अाणि हिवाळ्यात रात्रीपुरता गारवा असतो. बाकी भुगोलात शिकवलेलं खरं असंल तर पावसाळा हा माझा सगळ्यात अावडता ऋतू असु शकतो. पावसात उभं राहिलं कि म्हणे अंगावरुन थेंब निथळतात. दिन्या,पंक्या अाम्ही पकडा-पकडी खेळुन दमलो की घामाच्या धारा लागतात अाणि अंगावरुन जमीनीवर थेंब निथळतात तेव्हा अाम्ही "पाउस अाला,पाउस अाला" असं म्हणतो. तेव्हा खुप मजा येते म्हणुन मला पावसाळा अावडतं असावा. माझ्यामध्ये कधी कधी जादु अाहे असं वाटतं,कारण माझ्या घामाचा थेंब जमिनीवर पडल्यावर तसाच वाफ होऊन गायब होतो जसा अाईचा गरम तव्यावरचा पाण्याचा शिपकारा गायब होतो. पावसात म्हणे सगळीकडे हिरवं हिरवं होतं. मी एकदा चित्रकलेच्या तासाला तसं चित्र पण काढुन पाहिलं. अामच्या कडे जे तेलकट खडु अाहे त्यात पांढरा अाणि हिरवा खडु कशाला अाहे हे मला अाज पर्यंत कळालंच नाहीए. म्हणुन मी मित्रांचे पण हिरवे खडु घेऊन सगळीकडे हिरवळ दाखवली.पण पोरं खुप हसले म्हणाले 'असं हिरवं कधी असतं का?' म्हणुन मी ते चित्र माझ्या उशीच्या खोळात लपवुन ठेवलं अाहे.मला ते चित्र अावडतं, म्हणुन मला पावसाळा अावडतं असावा. अामच्या इथं एक किराणा दुकानदार दर जून मधे रंगीत छत्र्या विकायला अाणतो. त्या दुकानदाराला अाम्ही नेहमी "सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का?" असं चिडवतो. तो खुप चिडतो अाणि दगडं घेऊन  अामच्या मागे लागतो. तेव्हा पंक्या हळुच बरणीतुन चार-पाच खोब-या गोळ्या काढतो. फुकटच्या खोब-या गोळ्या जास्त गोड का लागतात माहित नाही पण अाम्हाला त्या खुप अावडतात. हे फक्त ह्याच ऋतुत घडतं म्हणुन मला पावसाळा अावडत असावा. 
अाप्पा म्हणतात त्यांच्या लहानपणी पाऊस यायचा तेव्हा ते खालच्या मळ्यात सायकलीवरुन रपेट मारायचे अाणि गार वारा अंगाला झोंबायचा. मी पण कधीकधी गुपचूप थोडं पाणी डोक्यावर अोतुन सायकलीची रपेट मारतो. मग नुकत्याच अोसरलेल्या पावसातुन फिरल्यासारखं वाटतं अाणि लहानपणीचा अाप्पा झाल्याचा भास होतो. मला अाप्पा अावडतात,म्हणुन कदाचित मला पावसाळा अावडत असावा.
जून मध्ये पाऊसाची सुरवात होते असं पुस्तकात लिहलं अाहे. पण अामच्याकडे जून मध्ये साथीचा रोग येतो.त्या रोगाला काय म्हणतात माहित नाही पण लोक इकडे तिकडे फोन करुन "अाला का?" "कुठवर अाला?" "ह्या वेळेला असावा हो ना?" , "थोडथिडका का होईना पण अाहेच " असं बरळायला लागतात. काही लोक तर मुर्खासारखा पैसा खर्च करुन कौलाच्या अाणि घराच्या फटी पक्क्या सिमेंटने बुजवतात. ह्या साथीच्या रोगामुळे दरवर्षी ह्याच ऋतुत खुप लोकं मरतात. सुरेखाचा बाबा असाच साथीच्या रोगामुळे मेला. पण सकाळी त्याला म्हणे झाडावरुन खाली उतरवला असं कळालं. इतकं अाजारी असतांना झाडावर जाऊच नये असं मला तरी वाटतं. ह्या साथीचं रोगाच एक सोडलं तर बाकी नावं ठेवण्यासारखं काही नाही.म्हणुन मला असं वाटतं कि मला बहुतेक पावसाळा हा ऋतु अावडत असावा.
                                                                     जय हिंद. 

- प्राजक्त 












Friday, July 11, 2014

दोष

“सगळाच दोष कृष्णावर कसा टाकायचा ना ? काही गोष्टी घडायच्या थोडीच टळतात. अाणि खरंतर सगळे म्हणतात कि तो देव अाहे म्हणजे कृष्णाला म्हणे सगळं जमतं त्याला दरी ही होता येतं अाणि उंच टोकावरचं अाभाळ सुद्धा , त्याला परकाया प्रवेश ही जमतो अाणि अदृश्य होणंही जमतं. , त्याला सातासमुद्रापलीकडंच जिथल्या तिथं बसुन कळतं , त्याला भविष्यही दिसतं , विश्व व्यापुनही श्रीशिल्लक उरणारा असा अाहे तो. पण असं असतं तर त्या दिवशी यमुनेवर सोबत जातांना त्याला लागलेली ठेच कशी चुकवता नाही अाली ? तो दगड कसा नाही दिसला ? सातासमुद्रापलीकडंच दिसणा-याला सातव्या वळणावरच दिसु नये ? मी त्याची बासरी गुलमोहराच्या उत्तरेकडच्या वडाच्या ढोलीत लपवली अाहे हे कळायला त्याला शोधाशोध का करावी लागली ? कसंय कि एखाद्याला सगळ्यांनीच धीट म्हटल्यावर थोडासा निधडं व्हावं लागतं तसं झालं असेल त्याचं.
कारण स्वत:च स्वत:ला विचारुन-विचारुन थकलेल्या कृष्णाला मी अगतिक होऊन कुशीत रडतांना पाहिलंय. तो खेळिया असेलही पण डबडबत त्याच्या गालांवरुन अोघळणा-या पाण्याची चव मला खेळवु नाही शकत.कारण कुणी रोपटं जमीनीत लावुन 'इथं पुर्वीपासुन कशी हिरवळ अाहे' असं सांगुन फसवु शकतं पण त्याच्याच खोलात गेलं तर सगळं खरं-खोटं कळेल, कारण तुम्ही वरचेवर रोपटं लावु शकतात पण रोपट्याची मुळं कुणी खोलवर पसरवु नाही शकतं.म्हणुनच कान्हा जगाला फसवु शकतो मला नाही. देव केल्यावर देवागत वागावं लागतं म्हणुन त्याला मला सोडुन जावं लागलं असेल.
तो मला एकदा म्हणालाही होता "लोक मला असामान्य म्हणतात. मी आज तुला सांगतो मी आहे असामान्य. म्हणजे अतिसामान्य आहे मी.
रंगांमधला फक्त मुळ रंग मला माहित अाहे.लाल किंवा पिवळ. मला तितकंच होता येतं. अधला मधला नारिंगी रंग मला कळत नाही. मनुष्याच्या स्वभावगुणाचे सर्वात शुद्ध स्वरुप माझ्याठायी आहे. म्हणजे थोडा आनंदी, काहीसा ख़ुश होणं नाही असे मिश्रण मला कळत नाही. मी होतो फक्त आनंदी ज़रा वाईट वाटणं काय असतं मला ठाऊक नाही मी होतो फक्त दु:खी. सगळ्यात शुद्ध स्वरुप असलेला स्वभाव. एखादी व्यक्ती चांगली वाटणं म्हणजे माझ्यालेखी फक्त प्रेम.निखालस प्रेम. " ज्यांना दिवस सोबत नेत नाही आणि रात्र  सोबत देत नाही अशांची संध्याकाळ होतो कृष्ण.मग संध्येकडे कुणी वेळचं बंधन घालतं का?
प्रत्येक येणा-या लाटेचं परतणं येण्याआधीच ठरलेलं असतं पण म्हणुन किना-यावरच्या  रेतीनं भिजणं थांबवावं का? मग सगळाच दोष कृष्णावर कसा टाकायचा ना ?

परकाया प्रवेश जमणा-या कृष्णाची प्रत्येक रात्र अशी 'राधा होऊन' स्वत:ची समजुन घातल्यागत खिडकीशी वितळत रहायची अाणि सकाळी रुक्मीणी कृष्णाला म्हणायची "हल्ली झोप वाढलीय तुझी , डोळे बघ किती लाल झालेत"

- प्राजक्त
दै सामना १२ जुलै २०१४




http://216.15.199.42/dainiksaamana/Details.aspx?id=51137&boxid=23019625 )

Friday, July 4, 2014

सावली

निसर्गाने झोपडपलं अाणि राजाने दुर लोटलं तर कुठं जायचं ? हा प्रश्न त्यावेळेस प्रजेला नव्हता. तात्यासाहेब ह्यांचा शब्द प्रमाण होता. कोणत्याही सरकारी पदावर नसतांना केवळ कर्ण म्हणुन पदरचं देत देत त्यांचा अादरयुक्त दरारा सगळीकडे झाला होता. एखाद्याचं काम करुन दिल्यानंतर जर त्याने अाग्रहाने काही देऊ केलं तर तात्यासाहेब नाकारात अाणि म्हणायचे " उपकार नाही केले मी , ह्याचा मोबदलाही मी घेईन. योग्यवेळी , तुला झेपेल इतका मोबदला मागेल तेव्हा वेळेवर फिरु नकोस इतकंच." मग एखाद्या दुस-या गरजुला परस्पर ह्याचा पत्ता देउन त्याची गरज भागेल असं काम करवुन घेतलं कि साटंलोटं होऊन जायचं.
एकदा डोळ्यादेखत एक गाडी बस स्थानकावर जाऊन अादळली तेव्हा तिथे फक्त बाहेरगावाहुन उदरनिर्वाह करायला अालेलं एक कुटूंब होतं.दत्ता अाणि त्याची बायको अाणि त्यांचा कमरेइतका पोरगा अाणि दोन बोचके बस्स इतकाच संसार. तेव्हा तात्यासाहेबांनी त्या कुटूंबाचा ब्रम्हासारखा सांभाळ केला. अाणि दत्ताने त्याचे सगळे अायुष्य तात्यासाहेबांची सावली म्हणुन जगायला सुरुवात केली. उन्हापावसात नको नको म्हणत असतांना छत्री , पाण्याची बाटली अाणि अगदी जंग जंग पछाडुन,लायसन मिळवुन तात्यांसाहेबांच्या सुरक्षेसाठी मागे खोचलेली पिस्तुल. असा लवाजमा जवळ बाळगत, प्रसंगी तात्यासाहेबांच्या तापट स्वभावाच्या

लाखोल्या खाल्या पण दत्ताने कधी तात्यांची सावली होणं थांबवलं नाही. कधी धुळीमुळे त्यांना खोकला अाला , कधी चुकून ठेच लागली तरी दत्ताला अपराध्यासारखं वाटायचं. त्याच्या मते हवेने जरी तात्यांचा भांग विस्कटला तरी त्याची जबाबदारी त्याची होती. एक नक्की की तात्यांचा भार डोक्यावरुन खांद्यावर अाला होता. छोट्या छोट्या गोष्टी अाता दत्ताच बघुन घेतसे. दत्ता अाला कि सगळ्यांना ठाऊक होतं कि अाता दहाव्या मिनीटाला तात्यासाहेब येणार. तात्यांना नेहमी दत्ताची मस्करी करायची लहर असायची. ते म्हणायचे " तुझं नाव दत्ता नाही सांब पाहिजे होतं. इतकं कुणी सरळ असतं का रे ?" ते त्याला कधी दत्ता नावाने हाक मारत नसे. कधी गुरुदेव तर कधी गुरुजी . कोणत्याही देवाचे नाव असलेल्या व्यक्तीला त्यांनी एकेरी हाक मारली नव्हती. त्यांच्या मते मुळात देवाची नावं मुलांना ठेउच नये. उगाच चिडचिड झाली तर मुलांसोबत देवाचाही उद्धार होतो. म्हणुन द्न्यानेश्वर नाव असेल तर माऊली , विठ्ठल असेल तर देवा , गजानन असेल तर पितांबर , लक्ष्मी असेल तर अाई , अशी टोपणनावं ठरलेली होती. तात्यांकडे येणार माणुस त्याचं शिक्षण, हुशारी ,जात, अोळख सगळं बाजुला ठेऊन येतसे. गरजवंताला तात्यांनी कधी मोकळ्या हाताने माघारी पाठवल्याच दत्ताने पाहिलं नाही. सगळ्यांना पंखाखाली घेणार अाभाळ काही काळाने जरा थकलं अाणि भुरकट भुरकट झालं. केसात अाता चांदी चमकु लागली अाणि दत्ताच्या खिशात तातडीला लागतील अशा अौषधांचा भार वाढला. एकदा भर उन्हात छत्री खाली बसलेल्या तात्यांनी दत्ताला सांगितलं " जा पलीकडुन एक ग्लास लिंबु सरबत घेउन ये" दत्ता दुस-या क्षणाला रस्त्याच्या पलिकडे अाणि चौथ्या क्षणाला ग्लास घेऊन हजर झाला. तात्या म्हणाले "हां अाता पिऊन घे. बराच वेळ झालाय तुला उन्हात उभ्या उभ्याने." असे अजब रसायन असलेले तात्या अाता अंथरुणाला खिळले तेव्हा जत्रेसारखी गर्दी त्यांच्या घराबाहेर उभी रहात. दररोजचा नित्यक्रम म्हणुन तात्या पुर्वी जसे बाल्कनीमधुन सगळ्यांना अभिवादन करत तो नित्यक्रम अाता बंद झाला. तात्यासाहेब नसलेला दत्ता अाणि दत्ताशिवाय तात्यासाहेब हे गेले कितेक दिवसात दिसलं नव्हतं अाणि कुणाच्या डोक्यात तसा विचारही नव्हता. अाता तात्यांसाहेब हेच जग असलेली भोवतीची अवघी दुनिया श्वास रोखुन ,देव पाण्यात ठेउन बसली होती. घराला इस्पितळाचं रुप अालं होतं अाणि घराबाहेर छावणीचं. शेवटी निसर्ग नियमाप्रमाणे तात्यांसाहेबांनी निरोप घेतला. अाणि सगळ्यांना पंखाखाली घेणारे पंख अाभाळात नाहिसे झाले.
दत्ताने खिडकीतुन बाहेर पाहिलं तर वरुन रस्ता दिसतच नव्हता जिथे नजर जाईल तिथे फक्त डोकीच डोकी. तोबा गर्दी. अंत्ययात्रा निघाली. सवयी प्रमाणे दत्ता छत्री घेऊन त्यांच्या डोक्याशीच होता. दोन दिवस अंत्यदर्शन चाललं. सामाजिक,राजकिय अाणि सांस्कृतिक दबदबा असलेले तात्यासाहेब ह्या लोकांसाठी देव होते.
तात्यांसाहेबांना जेव्हा अंत्यविधीसाठी सरणावर ठेवलं तेव्हा तात्यासाहेबांपेक्षा दत्ता जास्त मृत वाटत होता. अखेरीस जेव्हा तडतडत्या अावाजात सरणाने पेट घेतला त्यानंतर गर्दीतुन दत्ता कायमचा नाहीसा झाला. दुस-या दिवशी काही लोकांनी शोध सुरु केला तेव्हा घरामागच्या पटांगणावर तात्यासाहेबांच्या नेहमीच्या बसायच्या ठिकाणी जिथे लोक भेटायला यायचे तिथे एक उपडी छत्री पडलेली सापडली. ऎन मध्यान्ह होती अाणि सुर्य अगदी माथ्यावरच असल्याने तिथे शोधत येणा-यांची सुद्धा अाणि पडलेल्या छत्रीचीसुद्धा सावली कुठेच नव्हती.    - प्राजक्त दै सामना ५ जुलै १४
http://216.15.199.42/dainiksaamana/Details.aspx?id=50918&boxid=233320250 )

Friday, June 27, 2014

पैलतीर

सोबत दोन बॅग,दोन्ही हातात एक वितभर हिरव्या बांगड्या अाणि दोन वितभर मेहंदी.कपाळावर अाठ्या,मोठ्या प्रयासाने थांबवलेल्या हुंदक्यामुळे थरथरणारी हनुवटी.अशी ती एकटी.तिचा पती अाधीच नव्या घरी गेला होता अाणि नविन कंपनी असल्यामुळे अाणि नविन घराच्या कागदपत्रांच्या तजविज करायला तो जरा लौकरच गेला होता.अाणि अाता ती अाठवड्याच्या अंतराने चालली होती
.विमानतळाच्या चेक-इन काऊंटरवर तिला विचारलं "लगेज अाणि हॅंडबॅग्ज् किती?" तीने फक्त हाताने दाखवलं.तिथेच सुचना म्हणुन हॅंडबॅगमध्ये कोणत्या गोष्टी वर्ज्य अाहे ते लिहलं होतं.काही रोजच्या वापरातल्या वस्तु पण त्यासुद्धा स्फोटक ठरु शकतात म्हणुन त्या न्यायला मनाई होती.तीला जुने दिवस अाठवले,'तो' म्हणायचा "डोकं शांत ठेव नाहीतर एअरपोर्टवर जातांना "content can be explosive" असा शिक्का मारुन नेऊ देणार नाही. पहाट अाणि सकाळच्या मधला जो न सांगता येणारा प्रहर असतो तसंच न सांगता येणार नातं होतं त्या दोघांमध्ये. मग नंतर दोघांनी एकाच अाभाळाखाली वेगवेगळी गावं वसवली. काही दिवसांपुर्वी तीला जेव्हा सांगण्यात अालं कि तीला तिचा नव्यानेच सुरु केलेला संसार (काळजातल्या धाकधुकीसहित) दुरदेशी करायचाय तेव्हा तिच्या श्वासांची थरथर वाढली.तिचं असं व्हायचं.....कधी कधी अपरिचीत अानंदाच्या किंवा अपरिचीत चिंतेच्या अाधी थरथर व्हायची. तिला जेव्हा हे कळालं तेव्हा ती अंगणात बसुन कागदाच्या होड्या सोडत होती.पावसाने नुकतेच डोळे मिटावे तसा पाऊस अोसरला होता पण बोचरी भूरभूर चालु होती. मग तिने शेवटची होडी बनवली अाणि डोळे मिटले.डोळे मिटल्यामुळे डोळ्यातुन पाझरणा-या धारेचा अोघ तुटला अाणि एक थेंब बनुन होडीत पडला. किती तरी वेळ ती त्या जाणा-या होडीकडे बघत बसली. मध्ये होडी थांबली,कलंडली कि अधीर राधेसारखी धावत जाऊन ती सरळ करायची.तिच्या मैत्रीणीने ते पाहिलं अाणि म्हणाली "निरोप दिल्यानंतर प्रवासाभर सोबत करशील तर निरोपाला काय अर्थ राहतो ग" अाता पर्यंत रोखुन धरलेला डोळ्याचा बांध,मोठी लाट यावा तसा फुटला अाणि ती अाल्या पावली धावत माघारी पळाली. ती पळतांना पावसाचे थेंब पैंजणासारखा अावाज करताय कि पैंजणातले घुंगरु पाऊसथेंबासारखे निथळताय इतकी गल्लत व्हायला झाली तिच्या धावणा-या पायांकडे बघतांना. "प्रवासात एखादं गाव जर अावडलं तर अापण कायमचं मुक्कामी राहतो का ? म्हणुन तुला इथलं सगळं इथेच विसरावं लागेल" तीची मैत्रीण तिला म्हणाली. त्यावर ती म्हणाली " प्रवासात गाव अावडला म्हणुन माझ्याकडंच सगळं बोचकं तिथेच ठेउन प्रवास सुरु करायचा ठरवलाय मी.कधी माहित नाही पण परतायचं ठरलं तर हक्काचं अाभाळ हवं म्हणुन.पुर्णत्वाला पोचल्यावर तसाही नंतरचा प्रवास , हा प्रवास नाही अौपचारिकता उरते." ह्या विचारांचे चक्र अविरत चालु असतांना एव्हाना विमानतळावरच्या सुरक्षेच्या अाणि सामानाच्या सगळ्या अौपचारिकता पुर्ण करुन ती अाता विमान येण्याची वाट बघत वेटिंग रुम मध्ये बसली होती. परत अनाउंसमेट झाली कि विमान गेट नं अाय-२ वरुन अाय-१ ला येणार अाहे तरी प्रवाशांनी तशी नोंद घ्यावी. तिने परत विचार केला कि तेच तर झालंय दोनातून एक अाणि पुन्हा एकाचे दोन. तिचा प्रवास सुरु झाला.अाणि सुसाट वा-यामुळे पिंपळपानाने हवेत गिरकी घ्यावी अाणि अाता प्रवास कोणत्याही पैलतीराशी संपेल ह्या समर्पण भावनेत तीचा प्रवास सुरु झाला. नवीन घरात पोचल्यावर सगळंच को-या को-या वहीसारखं वाटायला लागलं. तिकडच्या पावसाने परत इकडे तिच्या अंगणात हजेरी लावली तेव्हा उगाच कुणीतरी अोळखीच भेटल्याचा अानंद तिला झाला. तिची मैत्रीण , म्हणजेच तीचं प्रतिबिंब जे कधी पावसाच्या साचलेल्या पाण्यातुन तिच्याशी बोलायचं ,कधी अारशामधुन बोलायचं ,कधी खिडकिच्या काचेतुन बोलायचं , ती मैत्रीणीने तिला विचारलं "अाल्या अाल्या सगळ्यात अाधी काय थाटणार ? स्वैपाकघर कि अंगण? " ही म्हणाली "देवघर" तीने विचारलं "पण देव-देव्हारा तर अाणलाच नाहीस तू.ठेवणार काय?" ती म्हणाली "मोरपीस" अाणि तीने एक मोरपीस दाखवलं. तीची मैत्रीण म्हणाली "सगळ्या जुन्या गाठ्योड्याला गाठ मारुन यायाला लावलं होतं ना मी ? " तितक्यात पलीकडच्या गल्लीत पावसात खेळणा-या मुलांनी सोडलेली एक कागदी होडी तिच्या पायाशी येउन थांबली. ती उचलतांना ही म्हणाली "दुसरी गाठ मारतांना कितीही बोट ठेवलं तरी पहिली गाठ जराशी सैल होतेच ना?"

- प्राजक्त
दै सामना २८ जून १४
http://216.15.199.42/dainiksaamana/Details.aspx?id=50698&boxid=221742187 )



Friday, June 20, 2014

पाऊसवेळा

त्याने नोकरी शोधतांना सोयीच्या शहरांची जेव्हा यादी केली तेव्हा त्या यादीमध्ये पुढे कंसात सरासरी पावसाचे प्रमाण पण लिहलं होतं. इतका त्याला पाऊस जवळचा होता. जन्मत:च त्याच्या तब्येतीमुळे त्याला काही दिवस काचेच्या पेटीत ठेवलं होतं तेव्हा अाजुबाजुला कापसाची गादी केली होती. कदाचित त्यामुळे त्याला ढगांची इतकी अोढ असावी ,असा माझा अापला अंदाज. पाऊस अाला कि हातातलं काम सोडुन पाहुणा अाल्यागत त्याचा पाहुणचार करायचा. म्हणे "पाऊस चालु असतांना जर भिजलं नाही किंवा खिडकीत बसुन पाऊस पाहिला नाही तर पावसाचा अनादर होतो" . मी म्हणालो "राया, मग थंडीत स्वेटर नको घालु, उन्हाळ्यात दुपारच्याला टळटळीत ऊन खा. ह्यांना अनादर नाही होय ?" मग तो म्हणायचा "कर मस्करी पण माझ्या अायुष्यातल्या महत्वाच्या गोष्टी पावसातच झाल्याय म्हणुन .... " त्याचं वाक्य अर्धवट राहिलं किंवा त्याने तसं ठेवलं. मग थोड्या वेळात तो परत बोलायला लागला " कुठल्याशा वैदुच्या नादी लागुन अाप्पांनी घरातल्या बाळंतपणं घरीच केली. बाळाच जन्म नैसर्गिकचं व्हायला हवा असा त्यांचा हट्ट.तसंही अामच्या खेड्यामध्ये फार सुविधा नव्हत्या. शहरात जायला अाधी कच्ची पायवाट मग बैलगाडी अाणि नंतर दोन बस अासा प्रवास करावा लागे. अाधीच दोनदा मेलेले थंड गोळे जन्माला घातले म्हणुन अामच्या अाईला शंभर बोल ऎकावे लागायचे. माझ्यावेळी तसं झालं नाही. थडथडत्या उडत्या टाळु ने मी जन्म-मृत्यु मधला तोल सांभाळला. अाणि अंगावर हिरव्या टपो-या नसा मोजत अाई झोपी गेली. परत माझे रडणे थांबेना म्हणुन विरोध पत्करुन मला जगवायला अाईने शहराचा रस्ता धरला. तेव्हा वाटेत पाऊस होता. नंतर मोठा होत गेलो. उनाड होतोच पण अभ्यास कधी चुकवला नाही. पण एकदा शाळेची पिशवी अाणि पुस्तकं अोली केली म्हणुन शिक्षकाने अंगठे धरुन शाळेच्या पटांगणात उभं केलं.अाणि पहिल्यांदा शिक्षा झाली. तेव्हा पाऊस होता. डॉक्टर जसे दिवसातुन दोन-तीन वेळा अौषध देतो तसा अौषधाला अामच्या गावात तीन वेळा वीज यायची. त्यातही रात्री नसायचीच. तेव्हा दुर खिडकीत 'ती' पहिल्यांदा दिसली अाणि कंदिलाची ज्योत वर-खाली करुन अामचे सावल्यांचे संवाद रंगले. तेव्हा पाऊस होता. दुरुन बघण्या-लाजण्या पलिकडे काही झालं नाही.ती वेळ-वय-काळ तसाच होता. मी पुढच्या शिक्षणासाठी शहरी अालो. तीच्याही दारात मंडप सजला. मी लग्नाला जाऊ शकलो नाही पण सुमीने पत्रात तिच्या लग्नाबद्दल कळवलं होतं.अाणि हे ही कळवलं होतं कि तिच्या निरोपाच्या वेळी पाऊस होता. नोकरीही शोधली मनासारखी , मनासारख्या शहरात शोधली. मुलाखतीच्या पहिल्या दिवशी सगळ्या टापटिप गर्दीमध्ये मीच एकटा मार्तंडबा दिसत होतो. कारण त्या दिवशीही पाऊस होता. अाताशा दहा वर्ष झाली नोकरीला. काम-पगार-जबाबदा-या वाढत गेल्या. फक्त त्यांचा क्रम उलट-पालट झाला इतकंच. मग अाई-अाप्पानी स्थळं शोधलं अाणि एक चंद्र माझ्या अाभाळात चिकटवुन दिला. अाई-बाप म्हणाले बस झालं अाता जवळपासच्या शहरात नोकरी शोध. दुरच्या शहरात वेगळी भाषा, वेगळे वळण , वेगळ्या पद्धती ह्या भोळीला मानवतील नाही मानवतील देव जाणे. पण अामच्या गावी म्हणावा तसा पाऊस नाही पण हे कारण देणंही शक्य तर नव्हतं.माझाही चंग नव्हता पण प्रयत्न करायला काय जातंय म्हणुन तिला विचारुन पाहिलं. ती तशी शिकली सवरलेली पण खुप नोकरी वैगेरेचा तिचा अट्टहास नव्हता.अगदी साधारण चारचौघाचं असतं तसं अामचं जोडपं. तिच्या अाणि घरच्या संमतीने अाहे त्याच पावसात ...अ ! अाय मीन अाहे त्याच शहरात अाम्ही राहु लागलो. तीला हवं तसं हवं तितकं घर सजवु दिलं. संगीताची अावड म्हणुन तशी शिकवणी सुरु केली. पण अगदीच गावाकडुन नव्या शहरात ते ही तिस-याच भाषेत त्या मुळे हळुहळु तिची छुपी नाराजी दिसु लागली. तशी तीने कधी बोलुनही दाखवली नाही.पण मलाच ती गोष्ट कधी कधी खटकायची. सवय झालं की सगळं सुरळीत होईल ह्या अाशेवर अाम्ही दोघेही होतो. ती जिव
तोडुन सवय लाऊ पहात होती अाणि तिचा हा असा जिव तोडणं मला अावडत नव्हतं. मग शेवटी निर्णय घेतला माझं अावडतं शहर जिथे मी म्हातारा होण्याचे स्वप्न पाहिले होते ते सोडायचा अाणि तिला विचारलं " राणी, हे शहर सोडुया का? अापण अापल्या गावाजवळच्या शहरात जाऊया ? हे बघ अाजच पेपरला एक जाहिरात अालीय. मोठ्या कंपनीत ,माझ्याच हुद्दयाचे अाणि इतक्या किंवा देवाच्या कृपेने जास्त पगारात मिळु शकेल नोकरी. पुढच्या अाठवड्यात मुलाखत अाहे. तू म्हणत असशील तर जाऊया का? " ती जास्त काही बोल्ली नाही पण तीच्या डोळ्यात पाऊस होता.
 - प्राजक्त
दै सामना-२१/जून'१४


http://epaper.saamana.com/Details.aspx?id=50478&boxid=235445234 )



Friday, June 13, 2014

लपाछपी

जर्मनीला चक्कर झाला की मी नेहमी 'त्या' जागेला भेट देतो ज्या जागेमुळे जर्मनीला मला नेहमी यावंस वाटतं. अाताशा त्या ठिकाणी फक्त बर्फ अाहे अाणि 'तो' बाकडा बर्फात अऱ्धवट झाकला गेलाय. पण तो दिवस लख्ख होता.अाभाळालाही तांबड्या रंगाचा हेवा वाटेल इतक्या गडद गुलमोहराच्या झाडाखालची गर्दी पांगली. गर्दी अाता पलिकडे जेवणावळींच्या टेबलाकडे जमा होत होती. अाणि हिरव्याकंच हिरवळीवरची गर्दी कमी झाली तेव्हा एका लाकडी बाकड्यावर तळ्याजवळ एक शुभ्र केसांचा एक वृद्ध माणुस ढग तरंगावा तसा अलगद बसला होता.
मी तळ्याच्या कडेने जाता जाता त्याने मला अावाज देऊन जवळ बोलावलं. मग बाकड्यावर थाप मारत म्हणाला 'बैस,बैस कुठे जायची घाई अाहे का ? ' मी हो-नाही म्हणायचा अात तो परत म्हणाला 'तरी बैस तू'
मग तळ्यातल्या बदकांकडे बोट दाखवुन म्हणाला ' अापले विचार असे पाहिजे, म्हणजे वरती अगदी संथपणे पुढे-पुढे जात राहायचं पण खाली पाण्यामधे विचारांचे 'पॅडलिंग' अविरत चालु.कळ्ळं का ? ' मी नाही म्हणुन कुठे जाणार होतो. तीसेक सेकंदाची विचित्र शांतता गेल्यावर मी निघायच्या तयारीचे हावभाव केले. तो म्हणाला ' बैस अजुन थोडावेळ, माझ्या ९९व्या वाढदिवसाचं गिफ्ट समजुन दे पण बैस'. मग कळालं कि थोड्यावेळापुर्वी जी गर्दी दिसली ती त्याच्या वाढदिवसाची पार्टीची होती. कुठेशा दुस-या देशात राहणारी त्याची मुलं-नातवंड येतात अाणि ह्याचा वाढदिवस साजरा करतात. सगळ्यांच्या सुट्ट्यांच निमित्त झालेला तो काही म्हणत नाही. अाला दिवस वारा वाहुन जावा तसा निघुन जातो.तसंहीपरदेशात भारतासारखी एकत्र कुटूंब पद्धती नाही. शाळा-कॉलेजात गेले की मुलं वेगळ्या घरात राहायला निघुन जातात. म्युनिक मध्ये १९७२ मध्ये झालेल्या अॉलंपिक दरम्यानच्या अातंकी हल्ल्यामध्ये अनेक लोकांमध्ये जर्मनीचा एक पोलीस मारला गेला. जो मारला गेला तो ह्या वृद्धाचा जवळचा मित्र अाणि त्याच्या बायकोचा भाऊ होता. ह्याच धक्क्यात त्याची बायको हे जग सोडुन गेली. तेव्हा पासुन हा एकटाच राहतो. अापल्या गरजा अाणि सोयी बघत अाजुबाजूचे लोक-नातेवाईक एकेक करत निघुन गेले. तो त्याच्या बायकोच्या अाठवणी सांगायचा. " ....मी कधी वैतागुन घरी अालो तर ती म्हणायची कि कशाला वैतागतो तू ? तुझ्या कपाळाच्या अाठीला तळहाताच्या रेषा बनवते, अाधी सांग तरी काय झालं " तो सांगायचा " मी ह्या तळ्याजवळ येऊन का बसतो माहिती अाहे ? माझ्या बायकोला इथे एक तळं अाहे 'दर बोदेनसी' नावाचं ते खूप अावडायचं. अतिअानंदाच्या डोंगरावर असली तरी किंवा नैराश्याच्या दरीत असली तरी एखादी संध्याकाळ तिला त्या तळ्याकाठी घालवलेली अावडायची. जेव्हा बायको तिच्या भावाच्या अाठवणीने व्याकुळ होऊन पडुन रहायची. मग डाव्या कुशीवर वळुन तशीच झोपी जायची तेव्हा तिच्या उजव्या नाकाजवळ वाहिलेल्या अश्रुंच छोटंस तळं साचायचं. आह ! दॅट वॉज माय दर बोदेनसी " अजुनही तो क्षण अाठवला कि लहानपणी पावसाळ्यात सापडलेला रांगणारा पैसा हातावर घेतल्यावर जसा काटा यायचा तसा काटा येतो. त्याने सांगितलं होतं " माझी लहान मुलं अाणि अाम्ही तिकडे तळ्याच्या काठावर झाडाच्या अाडोशाला लपाछपी खेळायचो. बायको म्हणायची निट शंभर मोजा मग या. मी दहा-वीस न म्हणता फक्त शंभर अोरडायचो अाणि पळायचो तर बायको-मुलं मला चिडका-चिडका म्हणत मारायला धावायची अाणि अामचा लपाछपीचा डाव पकडा-पकडीमध्ये कधी बदलायचा कळायचं नाही. मग ती मला नीट मोजुन दाखवायची हे बघा असं असतं म्हणायचं - 'दहा,वीस....., नव्वद, शंभर. येऊ क्का ???' असं निट मोजुन विचारायचं असतं कि येऊ का ? "
त्यादिवशी जेव्हा त्याचा वाढदिवस होता अाणि त्याने मला शेजारी बसवलं होतं , त्या दिवशी त्याने शेवटंच वाक्य जे मला सांगितलं त्या गोष्टीमुळे तयार झालेला पोटातला खड्डा अाजतागायत भरला नाहीए.
तो म्हणाला होता " अाता एकट्याने देवासोबत लपाछपी खेळतोय.राज्य माझ्यावरच अाहे. " मग वरती पहात तो म्हणाला " पंच्याण्णव ,शहाण्णव, सत्तयाण्णव ,अठ्ठ्याण्णव ,नव्व्याण्णव, शंभर...... येऊ क्का ??? "
कदाचित परत रडीचा डाव खेळुन त्याला देवाला फसवुन वर जायचं असेल किंवा कुणीतरी चिडका-चिडका म्हणत त्याला मारायला येईल असं त्याला वाटतं असेल. - प्राजक्त
(दै सामना १४ जुन २०१४ )
( http://epaper.saamana.com/Details.aspx?id=50259&boxid=14020 )

Saturday, June 7, 2014

कार्डिफ नोबडी

त्या छोट्याशा समुद्रकाठच्या गावात जितक्या दूर नजर जाईल तिथे उंच नारळाची झाडं, कौलारु घरं अाणि चर्च इतकंच दिसायचं. तिथेच एक तिरपांगड्या स्वभावाचा माणुस रहात होता. त्याचा जन्म मुळ इंग्लंडजवळ असलेल्या बेटावर.देशाचं नाव वेल्स.त्या वेल्स देशाच्या कार्डिफ ह्या राजधानीत रहायचा म्हणे म्हणुन त्याला सगळे कार्डिफ म्हणायचे अाणि नाव विचारलं तर नोबडी म्हणायचा.म्हणुन त्याचं नाव पडलं कार्डिफ नोबडी. मुलं त्याकडे इंग्लीश शिकायला यायची.अाणि हा बहाद्दरच्या एका हातात वाईन अाणि दुस-या हातात शेक्सपिअर. एक वेळ सुर्याच्या तोंडात थर्मामीटर ठेऊन त्याचा ताप मोजणं शक्य होतं पण कार्डिफ इतक्या लांबच्या देशातुन इकडे भारतात का अाला? ह्याच छोट्या खेड्यात का स्थिरावला? एकटाच का? ह्या प्रश्नांची उत्तरं केवळं अशक्य. मुलांना पण त्याची मजा यायची. कुणी उशीरा अालं कि हा अोरडायचा "बघा कोण अालंय?प्रिंन्स अॉफ वेल्स. गुड इविनिंग माय लॉर्ड! उठा रे रांडिच्यांन्नो सलाम ठोका. बो डाऊन टु द प्रिंन्स " असं म्हणुन तो अक्षरश: सर्वांना राजेशाही सलाम ठोकायला लावायचा. लाजिरवाणा होतं पुन्हा तो विद्यार्थी उशीरा यायचा टाळायचाच. एकदा शेजारच्या विठु कामत ने जास्तीच दुध त्याच्या मांजरीला दिलं तर चवताळलाच. म्हणे "हाऊ डेअर यु टु फिड माय एन्जल? तू पाजलं म्हणुन ती काय तुझ्या घरचे पिशाच्च नाही पळवणार ! शी इज माइन अाणि अाय एम पजेसिव अबाऊट हर". तर असा नोबडि कार्डिफ. अस्खलित मराठी बोलणारा. भांडणावर अाला की मुळ वेल्श भाषेत दानपट्टा सुरू. त्याचा त्याच्या मांजरेवर भारी लळा.एकदा काय जाणवलं कुणास ठाऊक? सगळ्यांना म्हणाला अाज अभ्यास बंद. मग खिशातुन बोचकाभर नोटा देत एका पोराला त्याने फेनीच्या बाटल्या अाणायला लावल्या अाणि दुस-या खिशातुन नोटा देत पेस्ट्री.अाणि म्हणाला " लेट्स हॅव पार्टी !" अाठवड्यानंतर कळालं कि त्याच्या प्रेगनंट एन्जलने अाभाळाच्या पुंजक्यांसारख्या पाच लुशलुशीत पिलांना जन्म दिला म्हणुन अानंदोत्सव. पाच मधली दोन जन्मताच मेली.एक तीने स्वत: खाल्लं. उरली दोन पिल्लं. वा-यामुळे एखादा कापसाचा बोळा घरभर लवंडत राहतो तशी ती पिल्लं घरभर फिरत राहायची.कधी एखादं पिल्लु हरवलं तर मांजर दिवस भर म्याव म्याव करत घर डोक्यावर घेतसे. कधीतरी कार्डीफ मुद्दाम एखादं पिल्लु लपवुन एन्जलची थोडी मजा करत असे.कधी कार्डिफ एखाद्या पिल्ला हाताशी खेळवत शिकवायचा." घ्या अाजचा शब्द घ्या. हायराएथ.H-I-R-E-T-H. "
"Hiraeth (n.) Homesickness for a home to which you cannot return, the grief for the lost places of your past.The Nostalgia for a place which may be never exist. म्हणजे अशी जागा जिथे तुम्ही कधी परतुन जाऊ शकत नाही. किंवा अशा गोष्टीचं दुख: जे कदाचित अस्तित्वातही नसावं. " हा शब्द देतांना त्याचा कंठ उगाच दाटुन अाल्या सारखा झाला अाणि त्या मांजरीच्या पिल्लाखाली सोडुन शेजारच्या टेबलावरचा वाईनचा ग्लास घशात उपडा केला. पहिला कडवट घटस्फोट.अाणि नंतर स्वत:च्या मुलीशी भेटायला पोलिस परवाना.नंतर मैत्रिणीने दिलेला धोका .मग धंद्यात मोठा तोटा.
कार्डिफ लग्नासाठी मागे लागेल म्हणुन पोटातलं बाळं कार्डिफला न सांगता पाडलं. ह्या धक्कयामुळे कार्डिफ कधीच सावरला नाही. शेवटी तो वाट फुटेल तिकडे निघाला अाणि शेवटी इथे स्थिरावला.एका संध्याकाळी एक पिल्लु अाजारी पडलं म्हणुन कार्डिफने शिकवणी थांबवली एक मुलाला त्याच्या फियाटची चावी देत म्हणाला "जा पटकन वेटरनरीचे डॉक्टर शहा ला घेउन ये" तो निघाला तितक्यात चाकाखाली ठिसुळ विट फुटल्याचा अावाज अाला.बाहेर येउन पाहिलं तर चाकाखाली झोपलेलं दुसरं पिल्लु लाल थारोळ्यात पडलं होतं.कार्डिफने घाई केली पण उशीर झाला होता. कार्डिफने सगळं साफ करुन शिकवणीला सुट्टी दिली.अाणि संध्याकाळी दारामध्ये हताश बसला. एन्जल घरभर म्याव करत डोकावुन हरवलेलं पिल्लु शोधत थकुन कार्डिफ शेजारीच दारात म्याव म्याव करत हाका मारात बसली. तितक्यात एक मुलगा धावत अाला,म्हणाला , " सॉरी सर अाज जमलं नाही शिकवणीला.पाहुणे अाले होते.अाजचा शब्द सांगता का प्लीज?" एन्जलच्या म्याव म्याव मधुन वाट काढत कार्डिफचा शुन्यपणे म्हणाला "हायराएथ.H-I-R-E-T-H. म्हणजे अशी जागा जिथे तुम्ही कधी परतुन जाऊ शकत नाही. किंवा अशा गोष्टीचं दुख: जे कदाचित अस्तित्वातही नसावं."

- प्राजक्त 
(दै सामना ०७/०६/१४)
http://epaper.saamana.com/Details.aspx?id=50038&boxid=2111562 )

Friday, May 30, 2014

स्वरा

मंगेशाच्या देवळातली पारायणं झाली , माधवच्या मनाविरुद्ध कुठल्याशा बुवाकडुन अभिषेक करवुन घेतला , कृष्णमंदिरात दर गुरुवारी लोण्याचा प्रसाद वाटप झालं. जे जे ऎकण्यात अालं ते ते भाबड्या जानकीने केलं. पण घरात लग्नाच्या काही वर्षानंतर जो पसारा होतो तो पसारा घालायला कुणी नव्हतं. डॉक्टर म्हणाले होते कि "कधी कधी उशीर होतो. नेमकं कारण असतंच असं काही नाही.अाणि तुमच्या केस मधे तर नाहीच. उशीरा का होईना पण होईल. तुमचे रिपोर्टच तसं सांगताय."
पुर्वी "चहात मीठ टाकलं कि काय?" असं माधव गंमतीने देविका विचारायचा अाणि जानकी लगबगीने "बाई ग्ग ! असं तर नाही शक्य! पाहु पाहु " म्हणत त्याच्या हातुन कप हिसकावुन दोन घोट घ्यायची. तीला चव कळे पर्यंत माधवच्या डोळ्यात हसुन हसुन पाणी अालेलं असायचं. "तुला काय इतका विश्वास नाही का तुझ्या कलाकृतीवर ?" तो हसत विचारायचा. ती म्हणायची "माझ्या कलाकृतीपेक्षाही तुमच्यावर जास्त विश्वास अाहे माझा." मग ती तिच्या कामाला लागली की माधव बाहेरुन दुसरा घोट घेत अोरडायचा "ऊफ्फ ! देख तेरे लबों को छुने का असर. बशीत अोतुन तासभर फुंकतोय गारच होत नाहीए गं. "
ह्या चिडवाचिडवीच्या अल्लड वर्षांनंतर तो सवयीचा 'माधो' झाला अाणि ती सवयीची 'देवी' झाली. अाता ह्या सगळ्याला दहा-बारा वर्ष लोटली. ह्या दहा वर्षात देवी संगीत शिकुन घरच्या घरी गायनाचे क्लासेस घेऊ लागली. माधोला तिचा हा छंद कधी छंद वाटलाच नाही. तिच्या गायनात जादु होती. तो नेहमी म्हणायचा "देवी ,शंभर वैदु एकीकडे अाणि तुझा अावाज एकीकडे.सगळ्या वेदना शांत" जणु त्यांच्या नात्याने षडज पासुन निषाद पर्यंत सगळे शुद्धस्वर अनुभवले होते. तसं माधोला संगीतामधलं छान अाणि ठिक ह्याच्या पलीकडे काही कळत नव्हतं पण देवीसाठी उगाच पंडित भीमसेनी अाव अाणुन बोलत असे."तुला सांगतो देवी, माझा बॉस गाढव अाहे.अाज असा गोडी गोडीत झापत होता लोकांना. म्हणजे ह्याने झापलं अाणि कोणाला कळालं पण नाही.तासभर बडबड केली जसा काय राग मारवा छेडतोय." देवी कुत्सित हसुन म्हणाली "काहीही काय बोलता हो तुम्ही.शुद्ध मारवा फक्त वाणी,वेणु अाणि वीणा मधुन येतो. तुमचा बॉस वीणा किंवा बासरी नसावा.अाणि वाणी मधुन यायला तो मनुष्य नाही, गाढव अाहे असं तुम्हीच म्हणाला" तो असं तीच मौन तोडायचा.असेच दिवसा मागुन दिवस अाट्यापाट्या खेळुन जात होते. एक दिवस हेच दिवस न खेळता नुसते 'गेले'. मग घरभर देवी जड पायाने अाणि माधो जमीनीवरुन दोन वित तरंगत चालु लागला. अाता माधो देवीला चिडवायला म्हणुन 'चंद्रकला' अशी हाक मारु लागला. माधो उगाचच अॉफिस मधुन येताना महिन्यातुन एकदा एखादं लहानसं वाद्य घेऊन येई. अाणि म्हणायचा " बघ मुलगीच होईल अाणि मी तर नावही ठरवलंय.'स्वरा' ".
अशाप्रकारे देवी अात अाणि बाहेर दोन्हीकडे लहान मुलाचा सांभाळ करत करत एक दिवस मोकळी झाली.अाणि 'स्वरा' अाली. मग फक्त रडण्या अाणि खाण्यासाठी तोंड उघडणारी स्वरा अाधी 'बाबा' म्हणेल कि 'अाई' अशा ह्या दोघांमध्ये पैजा लागल्या. माधो स्वराला घेऊन रोज तासन् तास 'बाबा-बाबा म्हण बा-बा' करत बसे. अाणि ती पंधरा वीस मिनीटं बाबासारखं तोंड वेडवाकडं करुन थकुन मग एकसुरी रडायला सुरवात करे. मग देवी खोटं खोटं चिडत असे " कशाला माझ्या मुलीला त्रास देता हो? कोण कुठून येऊन केव्हाचं बकरीसारखं बा-बा चाल्लंय माझ्या पोरीपुढे" पैजेचा सामना अगदीच अटीतटीचा होऊन बसला. पण ह्याहुन जास्त चिंता ही की जवळपास पंधरा-सोळा महिने झाले पण तिने कोणालाच पैज जिंकल्याचं सुख दिलं नाही. पुन्हा देवी चिंतेत अाणि पुन्हा माधो वातावरण हलकं करत म्हणाला " चलो तिस-या पंचाकडे जाऊ अाणि विचारु कोण जिंकतंय सामना." अाणि डॉक्टरांच्या तपासणीत कळालं स्वरा बोलुच शकत नाही . माधो देवीला बाहेर बसवुन अात चर्चेसाठी निघुन गेला.देवी स्तब्ध बसुन होती जणु पक्क्या न हलणा-या सूरासारखी , एखाद्या गच्च करड्या ढगासारखी.अाणि ब-याच वेळाने माधो बाहेर अाला . अाणि केविलवाणा हसत देवीला म्हणाला "काही नाही गं होईल ठिक अापल्या स्वराचा मंदा षड्ज लागलाय."अाणि स्थिर सूरागत बसुन राहिलेल्या देवीने माधोच्या मिठीत पडुन करड्या ढगांना पावसाची वाट करुन दिली.

- प्राजक्त   
दै.सामना ३१/०५/१४
http://epaper.saamana.com/Details.aspx?id=49818&boxid=135368 )

Friday, May 23, 2014

टिफीन बॉक्स

"असा पाऊस ह्या भागाने गेल्या दहा वर्षात नसेल पाहिला" हे जेव्हा मला चौकशी खिडकीतुन ऎकायला अालं तेव्हा असं वाटलं मी बसस्थानकाच्या चौकशी खिडकीवर अाहे कि हवामान खात्याच्या ? रात्री दहाच्या बसची वाट पहात अाता रात्रीचा एक वाजला होता.तासभरात-तासभरात अशी माळ जपुन झाल्यानंतर शेवटी चौकशीवाला दहा वर्षाचं हवामान सांगुन मोकळा झाला. पावसानेच परतीचे दोर कापले होते. अाणि अशा तालुका ठिकाणी लॉजची शकयता कमी होती. जवळ एकुलता लॉज बंद होता. अाता हातात पाणी अोसरणे अाणि बस येणं इतकंच उरलं होतं
निर्जन स्थानकावर वीज नसल्याने एक मुलगी प्रत्येक खांबावर कंदिल लावत होती.कंदिलाच्या अंधुक प्रकाशात मला ती जरा भडक रंगांचे कपडे घातलेले दिसली अाणि डाव्या गालात पान असावं. "तुम्ही कधीपासुन बसलाय? सकाळी सहा पर्यंत कोई गाडी नही अाएगी" तिने जवळ येऊन मला सांगितलं. मी म्हणालो "हां अब कही जा भी नही सकता सो रुका हुं" .
तिने परत विचारलं "कुछ खाअोगे ? मेरे पास है. लेकिन चालेल तुम्हाला माझं?" . मी समजलो नाही म्हणुन म्हणालो " मी जात पात ....." तिने माझ्या वाक्य तोडलं अाणि म्हणाली "तसं नाही. पण सहसा माझ्याकडे रात्रीचे सभ्य लोक येत नाही". मी समजुन गेलो अाणि भुकही लागली होती. मी म्हणालो "अन्नाला जसा धर्म नाही तसं रांधणा-याच्या कर्माशी कसलं अालंय देण घेणं?". तिच्याकडचा डब्बा अाम्ही खाऊ लागलो ती बोलत होती "वैसे मी जवळच राहते. पण पावसात पहिला मजला बुडालाय अाणी उरली एकच खोली त्यात अाधीच दोन जोडपी अाहे. दोघं सकाळ झाली जातील म्हणुन मी अाले बाहेर. अाणी झोप येत नाही तशीही रात्री.
वैसे अपनी निंद थी , मोहताज़ 'उसके' ख्वाब की
अब ये मअसला चांद के खुंटीपे हमने टंग दिया
इथली पडली धडली कामं करते कधी कधी. म्हणजे मला कुणी फसवुन,बळजबरी वगैरे करुन नाही अाणलं इथे. अाई हेच करायची.मग तिला पहात मोठी झाले मग काय तेच काम नशिबी. मुख्य म्हणजे तिची सुटका व्हावी म्हणुन तिला सोडुन नाही गेले. तसा तिचा धाक म्हणजे वाघाची डरकाळी. तराजु डोळ्यात विजा तोलायची. अाता थकलेत डोळे तिचे. ती गेली कि मी पण जाणार इथुन. इथल्या काही मुली अाहे लहान त्यांना शिकवायला घेऊन जाईल. अाजुबाजूला तेच पाहुन त्यांना उद्या असंच जगावंस वाटायला नको. ह्यात काय अालंय जगणं?. सरकारी अाणि अंतरमनाविरुद्धचा हा बेकायदा पैसा काय करायचा? अातुन बाहेरुन पोखरल्या पुरुषी अहंकारासाठी रोज रात्री नव्याने नटायचं.लेकिन इधर उधर रेप कर के नोचनेवालोंसे ये लोग लाख गुना बेहतर है. इनके वेहशित मै एतिहाद है. राक्षसीपणा असला तरी तो नियम पाळुन अाहे. " "तो कंदिल विझला बघ ग" कुणीतरी अावाज दिला. "झाली वेळ येईलच गाडी अाता."असं म्हणुन ती गेली. माझी गाडी अाली.थांबणार नव्हती. मी संपलेल्या डब्यात त्या अन्नदात्याचे अाभार म्हणुन काही पैसे ठेवले. गाडी स्टेशनच्या अगदी टोकावर असतांना ती परतांना दिसली. तीने हसुन निरोप दिला. त्यानंतरचा प्रवासभर एक गोष्ट सारखी अाठवतेय. अामच्या जुन्या घरी मागल्या पिंपळाखाली लहान मुलं मुली भातुकली खेळायचे. रुमालाचा मंडप,मुरमु-याची पंगत वगैरे. मग दरवेळी जत्रेतुन अाणलेल्या नवनव्या राजबिंड्या बाहुल्यांसाठी , त्याच पिपाणी हरवल्या पायाच्या बाहुलीला नेहमी बोहल्याचा घाट असायचा.कायमचा .

- प्राजक्त (२४ मे १४ दै सामना)
http://epaper.saamana.com/Details.aspx?id=49598&boxid=221148328 )

Friday, May 16, 2014

कांड्या

"........ श्शक् श्शक् ! ते तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट अाहे का ? " 
अाधीच चार जणांच्या जागेवर पाच जण रिक्षात बसावे तसे एडजस्ट होत माझा रेल्वे प्रवास चालु होता. सोबतच्या मित्रांपासुन दुर मला कसेबसे सिट मिळाले त्यात "किच्चेने किच्चेने ! देखने मै क्या जाता हय , देखने का पैसा नय " असं सांगणारा माणुस नाकासमोर वडाच्या पारंब्या लटकाव्या तशा कि-चैनच्या पारंब्या लटकवत होता. अाणि त्यात हा असा एकाचा प्रश्न. मी हो म्हणालो तर म्हणाला " ते भिंड ते जळगाव किती अंतर अाहे बघता का ? भिंड मध्यप्रदेश मधलं ... " मी प्रयत्न केला पण प्रवासामुळे सिग्नलमध्ये व्यत्यय येत होता. मी म्हणालो " थोडा वेळ लागेल सिग्नल प्रोब्लेम अाहे." तो म्हणाला " कांड्या नाहीए का ? बरं तेवढं कांडी अाली की बघुन सांगा ." थोडावेळ टोकावर टेकुन टेकुन माझ्या बुडाने " अाता बास्स " म्हटले म्हणुन मग मी पाय( किंवा बुड) मोकळे करायला दारामध्ये जाऊन उभा राहिलो.
"कांड्या अाल्या का?" मी जवळ जवळ दचकुन खाली दरीत उडीच मारायचा बाकी होतो.तोच माणुस परत तोच प्रश्न घेऊन उभा होता.मी खिशातुन मोबाईल काढुन पाहिला 'कांड्या' नव्हत्या. मग अाम्ही दोघं नुसतेच दारावर उभे राहिलो अाणि तो म्हणाला " माझा लहाना भाऊ अाहे. तो शिक्षक अाहे पण हे इलेक्शन डयुटीसाठी गेला होता तिकडे भिंडला. काल निघाला म्हणे अाठ रात्री वाजता अाता जवळपास रात्रीचे नऊ होत अाले पण घरी पोचला नाही.फोन बंद अाहे.खराब झाला म्हणाला होता शेवटंच बोलणं झालं तेव्हा.काळजी वाटतेय. ११ दिवसांनी लग्न काढलंय त्याचं. " समोरुन भरधाव रेल्वे गेली अाणि त्याच्या ह्या खुलाशाने अाणि समोरच्या रेल्वेमुळे नखशिखांत हादरलो. मी परत मोबाईल काढुन एक निष्फळ प्रयत्न केला.
मी विचारलं " कोण कोण असतं घरी ?" तो अजुन बोलत होता "सरकारचं काय कळत नाही कशाला पाठवता शिक्षक लोकांना इतक्या लांब लांब ?" तो माणुस तंद्रीत होता मी परत विचारलं " कोण कोण असतं घरी?" त्याने ऎकलं की नाही ठाऊक नाही पण तो बोलतंच होता "मी कारकुन अाहे एका खाजगी कंपनीत . वडिल चालतांना शुद्धीत नसायचे त्यामुळे बोटधरुन चालायला कुणी नाही शिकवलं. गुडघे फुटतंच शिकलो. अाई सकाळी दोघांना रांगेत बसवुन गुडघ्यांना मलमपट्टी करायची. पाठीशी एक भाऊ अाणि एक बहिण. मी मोठा असल्याने मलाच कितेकदा त्यांचा बाप व्हावं लागलं. नंतर एकदा बाप कायमचा नाहीसा झाला अाणि अाई गेली. मग मला अाई पण व्हाव लागलं.

बाप होणं सोपं होतं...किंवा पुढे होणारच असं कुठे तरी माहिती होतं पण सालं आई कसा होऊ. मोठा असलो तरी म्हणावी तितकी आई माझ्या वाट्याला कधी आलीच नाही.
लहान असतांना झाप्या मधुन उजेडाचा तुकडा पसरायचा घरात मग मी खाट घेऊन जायचो तिथे आणि ती उब कवटाळुन झोपुन जायचो. उठल्यावर तो उबेचा तुकडा दुर वर कुठेतरी कौलाच्या खुटीवर लटकलेला असायचा. बस तितकीच झोपेच्या गुंगीत जितकी आई वाट्याला आली तेवढी.
कोणाला आई म्हणटल्यावर चंद्रासारखा गोल अंबाडा आठवत असेल ,कोणाला रुपया इतकं कपाळ कुंक आठवत असले.कुणाला दुलईची उब आठवत असेल. पण मला ना आई म्हण्टलं की फ़क्त कानाजवळ बांगड्यांची खुळखुळ ऐकु येते. झोपेच्या गुंगीत तितकीच आई आली वाट्याला.मला थापटणारी. तिच्याकडे पहावं म्हटंल तर "मिटा डोळे..मिटा" म्हणायची.
लहान होतो तर मांजरीच्या पिलासारखा घुटमळायचो तिच्या भोवती...पण मग चुलीचा धुर झाला की मग तुळशीला पाठ टेकवुन स्वैंपाक घरात डोकावुन बघायचो...डोळ्यात पाणी येईस्तोवर. नाही रडलो नाही कधी मी .ते धुर जास्त असायचा ना.
आईच्या पदराला धरुन चालंल की आई म्हणायची.. "काय रे नुसता पदराशी ? लहान राहिला का तू आता ? मोठ्यासारखं वागायला शिक अाता"
एकदा शाळेत निरोप आला मला. मी शाळेची पिशवी सोडुन घरी पळालो तर लहान बहिण आईची साडी घालुन नुसती हसत होती.उगाचच... आणि घराच्या आत बाहेर गर्दीच गर्दी.गर्दी भागुन आत शिरलो तर तुळशीचं पान ओठाशी धरुन आई निजलेली दिसली.
बहिण हसत हसत आली आणि आईच्या पदराशी खेळायला लागली...
त्या दिवशी तिला पहिल्यांदा आणि शेवटंच मारतांना मी म्हणालो.... "काय गं नुसतं पदराशी ? लहान राहिली का तू आता ? मोठ्यासारखं वागायला शिक अाता."

तितक्यात माझं स्टेशन अालं. गाडी दहा मिनीटं थांबणार होती. मी गाडीतुन उतरल्यावर दोन गोष्टी केल्या.
पहिली गोष्ट, प्लॅटफॉर्मवर थोडा जास्त वेळ रेंगाळलो अाणि मोबाईलवर शोधुन त्याला म्हणालो "दादा, ८५० किमी अाहे साधारण. म्हणजे निदान उद्या सकाळी ११/१२ पर्यंत यायलाच पाहिजे.काळजी नका करु"
अाणि 
दुसरं गोष्ट, " हां ,पोचलोय स्टेशनवर. येतोच १५ मिनीटात घरी" .घरी फोन केला.

- प्राजक्त 

(दै सामना १७।०५।२०१४ )
http://epaper.saamana.com/Details.aspx?id=49382&boxid=111926796 ) 

Friday, May 9, 2014

लॉस्ट एण्ट फाऊंड

माझ्या नेहमीच्या लायब्ररीकडे जाताना मधे रद्दीचं दुकान लागतं मग कधी कधी रद्दी मी तुटका स्टुल घेऊन रद्दी मधली पुस्तक चाळत बसतो. त्यात चुकून कधी कधी एखादं दुर्मीळ वाट चुकलेलं पुस्तक सापडुन जातं. पण परवा जे काही सापडलं तेव्हा पासुन मी लायब्ररीचा रस्ता बदलायचा विचार करतोय. रद्दी दुकानाशेजारीच स्क्रॅप मटेरीअलचं दुकान कम टपरी अाहे. तिथे गोल चौकोनी पत्र्याच्या वस्तु कापुन सरळ करतात अाणि मग परत विकतात. नुकतीच एक गंजलेली लाल पत्रपेटी उभी कापुन टाकली तेव्हा माझं लक्ष गेलं की वरच्याबाजुला एक पत्र चिकटलेलं होतं पण अवस्था बिकट होती.

(प्रियवर लिहुन काठ मारलेली ) सगुणास ,
काही लिहण्यासारखं नाही पण माहिन्यामधुन एकदा पत्र लिहुन घेण्याचं वचन घेतलंय म्हणुन हे अाजचं पत्र. सगळीच गंमत दुसरं काय. मला डोळे बंद करुन रस्ते क्रॉस करण-यांचा भयंकर राग येतो , बंद म्हणजे खरोखर बंद नाही पण उगाच 'कुणीच नाही , कुणीच नाही' असं स्वत:ला सांगत रस्ता अोलांडला म्हणजे अाजुबाजुने येणा-या गाड्यांच सत्य नाकारता थोडीचं येतं. पण अाजकाल स्वत: तेच करतोय असं वाटतंय मला. 'डोळे बंद करुन रस्ते क्रॉसींग'. देव करो माझा अंदाज चुको अाणि बेमौत धडक बसो. सुटका.
अच्छा मागे नवरात्रीत देवीला गेलो होतो तिथली गर्दी पाहुन 'प्रचंड' ह्या शब्दाला ईर्षा निर्माण झाली असेल. तिथे देवीनंतर (की देवीपेक्षा ? ) दोन गोष्टी जास्त लक्षात राहिल्या
एक - पोलीसाचा एक छोटेखानी 'लोस्ट एंड फाउंड' चा तंबु . जिथे काही लहान पोरं अाणि पिशव्या पडल्या होत्या.
दोन - थोड्यावेळाने मरणाच्या गर्दीतुन "सोनी, सोनी" हाका मरणारा मध्यमवर्गीय बाप.

तो बाप एक शतमुर्ख - असं घट्ट पकडलेला हात कोणी सोडतं का कधी.पण त्याची तरी काय चुक म्हणा त्याला वाटलं असेल सुटलाच हात तर 'तीच' परत य़ेउन बिलगेल त्याला.

सगळीच गंमत दुसरं काय.

'लोस्ट एंड फाउंड'च्या इथुन जातांना थोडा रेंगाळलो म्हटंल बघु स्वत: सारखं काही दिसतंय का . टोटल वनपीस मध्ये. हे असं न झोपणारे तांबरलेले डोळे , थापलेल्या अाशेचे खांदे , फिट अाल्यागत अात पोटात गळुन पडलेली शांत जीभ, इत्यादी इत्यादी चे वेडे वाकडे कोलाज चिकटवुन 'मी' म्हणुन फिरतोय इतके दिवसं म्हणुन 'लोस्ट एंड फाउंड'च्या इथुन जातांना थोडा रेंगाळलो म्हटंल बघु स्वत: सारखं काही दिसतंय का . टोटल वनपीस मध्ये. पण फक्त घशाची शीर ताणून रडणारं पोरगं दिसलं अाणि शीर ताणुन ताणुन थकुन निजलेली एक घाबरी घुबरी पोरगी .ती डाव्या कुशीवर झोपली होती अाणि अश्रू अोघळतो तसा धुळीचा अोघळ होता डाव्या गाली.देवीचं दर्शन निट नाही झालं ह्या असमाधानात 'ती झोपलेली' 'सोनी' असावी असा अापला स्वत:शीच अंदाज करत वेगळं समाधान घेउन घरी गेलो (हेच ते डोळे बंद करुन क्रॉसींग)
सांगायचं तात्पर्य हे की कपाळाची शीर ठणकते अाहे अाजकाल . सगळीच गंमत दुसरं काय.
देवाला गेल्यावर कुणीतरी अापल्याला 'देव मानतं' ह्याची अाठवण येते कधी कधी . मग 'कोणता देव?' तर परत अापण अापलं कृष्ण मानुन घ्यायचं (डोळे बंद करुन क्रॉसींग). नाही , कारण असं की त्याच्याकडे लोकं सगळ्या जगाची दुखणी घेउन यायची. द्रौपदी काय तर साड्याच मागते, अर्जुन काय तर सारथ्यंच मागतो , सुदामा काय तर मैत्रीचे ऋणंच मागतो , राधेला काय तर पावाच अएकायचा- पण कृष्णाची खरी कळ,खरी ठसठस कुणाला कधी कळलीच नाही अाणी ती कधी थांबलीसुध्दा नाही.

सांगायचं तात्पर्य हे की अाजकाल कपाळाची शीर ठणकते अाहे. सगळीच गंमत दुसरं काय.

त्यात राधेला अाठवण अाली की कृष्णाने पावा हाती घ्यावा अाणि पोहचावं कधीही राधे पर्यंत पण मग अशाच प्रसंगी कृष्णानं काय करावं ? कारण राधेला पावा येत नाही (अाणि कृष्णच जगत्पालक झाल्याने त्याला 'धावा' करता येत नाही) अाणि तिला-राधेला सगळीकडे त्याला-कृष्णाला बघण्याचं कसब जमुन अालाय अाताशा.
पण मग अापण स्पष्ट दिसावे म्हणुन अर्जुनाला अाणि राधेला कृष्णाने 'दिव्य दृष्टी' दिली .पण त्यामुळे राधेची चिंता कायमचीच मिटली असली तरी अशाच प्रसंगी कृष्णानं काय करावं ?

तर सांगायचं तात्पर्य हे की देवाला गेल्यावर कुणीतरी अापल्याला 'देव मानतं' ह्याची अाठवण येते कधी कधी . मग कोणता देव तर परत अापण अापलं कृष्ण मानुन घ्यायचं. सगळीच गंमत दुसरं काय.

त्यात अाजकाल विसरायला तर होतंच अाहे पण एकच गोष्ट दोन दोनदा सांगीतली जातेय माझ्याकडुन. बरं, मी हे सांगितलं का तुला की अाजकाल कपाळाची शीर ठणकते अाहे.

सगळीच गंमत दुसरं काय.

तुझा ,
पुसट होत चाल्लेला
????
ता.क. : अाजकाल विसरायला होतंय खुप अाणि एकच गोष्ट दोन दोनदा सांगीतली जातेय माझ्याकडुन...

- प्राजक्त

(दै.सामना १० मे २०१४ )

http://epaper.saamana.com/Details.aspx?id=49160&boxid=1230432


Friday, May 2, 2014

सी दत्ता (सामना) / निरोप (मटा)

"सरळ जाऊन चर्चच्या मागे डावीकडे गेलं की घर लागेल त्यांचं..." मग मी चर्चच्या संध्याकाळच्या घंटानादाला डावीकडुन वळसा घेतला. दाट झाडीतुन पसरलेल्या उन्हाने वाटेवर गालीचा बनवला होता. एक टुमदार छोट्याशा बंगल्याजवळ थांबलो. गेटवर बंगला अाणि बंगल्याच्या मालकाची अोळख लिहली होती. 'स्वरगंगा'सी.दत्ता संगीत दिग्दर्शक.

काही दिवसांपुर्वी धारवाडला गेलो तेव्हा त्यांच्या बहिणीशी परिचय झाला. मी त्यांच्या भावाच्या गावकरी म्हटल्यावर त्यांनी लागलीच अोळखपाळख काढुन मला अमुकतमूक ठिकाणी त्यांना हे फोटो , ही डायरी अाणि हा डब्बा देशील का विचारलं. त्या तरतरित नाकाच्या, रुपया इतक्या लाल कुंकवाच्या पण चिंतीत कपाळाच्या अाजींना नाही म्हणवलं नाही.अाणि इंटरनेट ने फोटो 'शेअर' करा की असंही एकंदरीत त्यांच वय पाहुन सांगितलं नाही. दार बराच वेळ झाला उघडलं नव्हतं म्हणुन हातातली डायरी चाळत बसलो.
हां, तर सी.दत्तांचं दार उघडलं काटक दिसणा-या काकुंनी "अात्ता फोन केलेले तुम्हीच का ? , विजुने पाठवलं ? " मी दोन्ही प्रश्नांचं मिळुन एक उत्तर 'हो मीच' देउन अात शिरलो. " बसा , हे येतीलच इतक्यात' सांगुन काकु स्वैपाकघरात गेल्या .
खरंतर सी दत्ता हे नाव मी कधीच ऎकलं नव्हतं.घरी माहीत असेल असं समजुन मोठ्या अभिमानाने सांगितलं की अाज सी दत्तांकडे चाल्लोय तर 'हम्म' इतकंच उत्साह ऎकु अाला. म्हणजे ह्या नावाने कोणी अाहे हे घरीपण माहीत नव्हतं.
पण घर अत्यंत सुबकपणे सजवलं होतं. गोदाघाटाचं अप्रतिम पेंटींग, जुना ग्रामोफोन , त्याच्या जवळच अन्टिक शेल्फवर ठेवलेल्या ग्रामोफोनच्या खुप सा-या रेकॉर्डस् , काचेच्या शोकेस मधे ठेवलेल्या सिडीस् अाणि केशरी,पिवळसर रंगांच कॉंबीनेशन असलेली बैठक.
कोकम सरबत घेऊन येता येता काकुंनी अावाज दिला " दत्ताssss ! , तो मुलगा अालाय रे ! " मी हसलो . काकुंनी कुठे राहतो वैगेरे विचारलं. मग सी दत्ता अाले . अत्यंत संथगतीने हातात काठी, शुभ्रकेस , शुभ्र सदरा , पाणीदार डोळे अाणि स्मितहास्य. "जोतिबा , काही पाणी-थंड ? " त्यांनी त्यांच्या पत्नींना विचारलं. (कदाचित त्यांच्या पत्नीचं नाव ज्योती होतं) मी माझी कुरिअरसेवा केली. मग त्यांनी इकडची तिकडची विचारपुस केली. अाणि बोलु लागले.
"हि बघ ही ' संगीत कृष्णकाठ' ची सिडी . ठेव तुझ्याकडे. ऎक अाणि कळवं कशी वाटली. मास्टर दिनानाथांचं पत्र अालं होतं खुप अावडली होती सगळी गाणी त्यांना. तुला कुमार प्रभु माहिती अाहे ? " मी अर्थातच हो म्हणालो प्रभुंना कोण नव्हत अोळखत. मग त्यांनी मला प्रभुंची स्वाक्षरी असलेली सिडी दाखवली . " पंडीत चौरासियांबरोबर कामाचा योग येता येता राहिला. कार्यक्रमच रद्द झाला पण त्या निमित्ताने भेट झाली . माझं काम खुप अावडलं होतं त्यांना. तुझे कुणी अोळखीचे असतील तर कळव छान चाली लाऊ अापण . तू स्वत: पण कविता लिहतोस म्हणाला ना . अाण घेऊन ये एकदा करु या काहीतरी . फक्त रेकॉर्डींगच बघावं लागेल. " ते बोलत होते अाणि मी त्यांनी दिलेली सिडी कॅसेट बघत होतो. "जोतिबा !!! , अगं......" त्यांच वाक्य पुर्ण व्हायच्या अात अातुन अगदी समंजस अावाज अाला " हो हो लावते इंद्रधनुची गाणी लावते "
"हा बरोबर ! अाणि ते....." परत त्यांचं वाक्य पुर्ण व्हायच्या अातुन सवयीचा प्रेमळ अावाज अाला "हो दत्ता, तिसरं गाणं अाधी लावते " मग गाणं सुरु झालं. " ऎक हा तु मी अालोच " असं म्हणुन सी दत्ता अात गेले. मी गाणं ऎकत एकंदर अाजुबाजुचा अंदाज घेत होतो की काही अोळखीची गाणी दिसताय का जी दत्तांनी केलीय जेणे करुन मलाही 'मला तुमचं अमुक गाणं खुप अावडतं' असं म्हणता येईल.
तितक्यात काकु बाहेर अाल्या. काकुंनी पंखा लावत माझ्या शेजारी काही महत्वाचं सांगायच्या पवित्र्यात बसल्या अाणि बोलु लागल्या. " माफ करा पण दार उघडायला उशीर झाला. तुम्ही दिसला पण फक्त हातात डायरी दिसली म्हणुन मला वाटलं कुणी काम घेऊन अालंय. कसंय अाता दत्ताचं वय झालं अाणि लोक सर्रास चर्चा म्हणुन येता अाणि काम करवुन निघुन जातात. उमेदीचा काळातही दत्ताने फक्त संगीताच्या वेडापायी कामं केली. दैवी देणगीला कचकडी रुपड्यात विकणं त्याला मान्य नव्हतं. पण ह्या समाधानाने मन भरतं , लोकांकडुन कौतुक होतं पण कौतुकाने पोट भरत नाही. नंतर मग दत्ता हताश व्हायचा. अाणि कलाकाराचं हताश होणं सगळ्यात वाईट. अाणि कलाकाराचा अाशावाद त्याहुन जास्त. ' 'एक दिवस असा येईल.......'ह्या अाशावादावर कलाकार त्याचं संपुर्ण अायुष्य काढु शकतो. अाताशा वयाने त्याला हा त्रास सहन होत नाही. मागेदत्ता अॅडमिट होता तेव्हा 'हार्ट रेट मॉनिटर' वर दिसणा-या ठोक्यांवर त्याने पडल्या पडल्या ताल धरुन एक धुन बनवली. हे तेच 'इंद्रधनु'मधलं तिसरं गाणं  "ती अन ही दो राधांमध्ये अंतर नव्हते कसले - 
तिला मिळाला कृष्ण ,बिचा-या हिचे अंदाजच फसले " . कुणी पाहुणे अाले की एखाद्या नाटकाच्या संवादासारखे त्याचे सगळे संवाद पाठ झालेत मला. कलाकाराला चिमुटभर अाकड्यांपेक्षा मुठभर शब्द जवळचे वाटतात. तो अाता त्याच्या खोलीत 'संगीत शिरोमणी' नावाचं पाच वर्षापुर्वीच मासिक अाणायला गेला असेल. त्याच्यावर ३पानी लेख अाला होता.अाणि लौकरच एक नवीन 'प्रोजेक्ट' सुरु करणार असल्याची बातमी सुद्धा. ह्या-त्या कारणाने प्रोजेक्ट अजुन ढकल्याच जातोय. काही चांगल्या मानधनाच काम असेल तर नक्की सांग" तितक्यात दत्ता हातात मासिक घेऊन अाले. " हे बघ रे 'संगीत शिरोमणी' पुस्तक ....... " पुढंच सगळं काकुंनी सांगितलंच होतं. मी तिथुन निघालो.
बाहेर पडतांना एक विचार सगळ्या घटना अाधीपासुन डोक्यात घोळत होत्या. एक विचार अाला ' प्रत्येक कलाकार सच्चा हवा अाणि त्याला एक व्यवहारी जोडीदार असायलाच हवा.अगदी सुरवातीपासुनच.


- प्राजक्त देशमुख
( दै सामना ०३/०४/२०१४ http://www.saamana.com/2014/May/03/Link/FULORA13.HTM 
http://epaper.saamana.com/Details.aspx?id=48926&boxid=2375458 )


अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...